भारतात अल्पसंख्याकांवर, धार्मिक स्थळांवर हल्ले वाढलेः अमेरिका

भारतात अल्पसंख्याकांवर, धार्मिक स्थळांवर हल्ले वाढलेः अमेरिका

वॉशिंग्टनः भारतामध्ये २०२१ या संपूर्ण वर्षभरात अल्पसंख्याक समाजावर हल्ले केले जात असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आंतरराष्ट्रीय धार्म

दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते
आरबीआयद्वारे अखेरीस प्रमुख कर्जबुडव्यांची नावे जाहीर
पोलिस धमकावणीनंतर सरकारची ट्विटरला समज

वॉशिंग्टनः भारतामध्ये २०२१ या संपूर्ण वर्षभरात अल्पसंख्याक समाजावर हल्ले केले जात असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल गुरुवारी परराष्ट्र खात्याने अमेरिकेच्या संसदेकडे सुपूर्द केले. २०२१ या वर्षात भारतात अल्पसंख्याक समाजावर केवळ हल्ले झाले नाहीत तर त्यामध्ये हत्या, धमकी देणे असेही प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याचे या अहवालाचे म्हणणे आहे.

गेल्या दोन महिन्यात भारतातील मानवाधिकार उल्लंघनावर अमेरिकेने दुसऱ्यांदा प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून जगभरातल्या त्यांच्या दुतावासाकडून वार्षिक माहिती मागितली जाते. या माहितीचे दस्तवेजीकरण केले जाते व त्यावर अमेरिका स्वतःची भविष्यातील धोरणे आखत जात असते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी हा अहवाल आपल्या विशेष नोंदीसह संसदेला सादर केला.

धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ब्लिंकन यांनी आपल्या अहवालात तैवान, तिमोर लेस्ते, इराक व मोरोक्को या अन्य देशांचे कौतुक केले आहे. या देशांनी धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून उल्लेखनीय प्रगती केल्याचे ब्लिंकन यांचे मत आहे. मात्र म्यानमार, चीन, इरिट्रिया, सौदी अरब, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन केले जात असल्याचे ब्लिंकन यांचे मत आहे.

भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दल या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून या देशात सर्वाधिक विविधता आढळून येते. तरीही या विविधतेत गेल्या वर्षभरात अल्पसंख्याक समाजाच्या प्रार्थनास्थळांवर, नागरिकांवर हल्ले होताना दिसले. काही हल्ले जीवघेणे होते, काहींच्या हत्या झाल्या, धमक्या, मारहाण असे प्रकार घडले. गोवंश हत्या, गोमांस व्यापार आदी कारणांवरून अल्पसंख्याक समाजाला विशेष करून लक्ष्य केले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ब्लिंकन यांच्या अहवालात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू व मुसलमानांचा डीएनए एकच आहे, धर्माच्या आधारावर या दोघांना वेगळे करता येणार नाही, या वक्तव्याचाही समावेश आहे. त्याच बरोबर उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यात त्यांनी गेल्या सरकारने मुस्लिमांचे लांगूनचालन केल्याचा आरोप केला होता, त्याचा उल्लेख आहे.

भारताने आरोप फेटाळला

ब्लिंकन यांनी सादर केलेल्या अहवालावर भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात मतांचे राजकारण खेळण्याचा हा प्रयत्न असून भारतासंबंधातले निरीक्षण हे पूर्वग्रहदुषित, एकांगी आहे. भारतीय समाज हा विविधतेचा आहे. भारत धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार यांचा आदर करतो अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र खात्याने दिली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0