टेनिसचा अनिभिषिक्त सम्राट

टेनिसचा अनिभिषिक्त सम्राट

४० देशात टेनिस खेळलेल्या रॉजर फेडररची २० ग्रँड स्लॅम चषकांचा विजेता, १०३ इतर टुर्नामेंट्सचा जेता आणि जगातील असंख्य चाहत्यांचा अत्यंत लाडका खेळाडू ही वैशिष्ट्ये आहेतच. त्याने केलेल्या आणि मोडलेल्या रेकॉर्डस् बरोबरच त्याची महत्ता अफाट लोकप्रियता, दिला जाणारा आदर आणि त्याला मिळालेले लोकांचे प्रेम यातूनही कायमच अधोरेखित होत आली आहे. फेडररने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली, पण त्याचा खेळ टेनिसच्या इतिहासात एक अद्भूत पर्व होते. रॉजरच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख.

कॅप्टन अमरिंदर सिंगांचा भाजपात प्रवेश
बेकारी पात्र उमेदवारांच्या कमतरतेमुळे: कामगार मंत्री
विनोद दुआंवरची राजद्रोहाची तक्रार रद्द

१५ सप्टेंबरला संध्याकाळी रॉजर फेडरर या टेनिसच्या अनिभिषक्त सम्राटाने सोशल मीडियाद्वारे निवृत्ती जाहीर केली आणि जगभरातून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सगळ्या भाषांतील बातम्यांच्या वाहिन्यांवर फेडररची निवृत्ती ही हेडलाईन प्रत्येक तासाच्या वार्तांकनात होती. अगदी राफाएल नदाल पासून ते सेरेना विलियम्स ते अनेक लहान मोठे टेनिस खेळाडू, टेनिसचे कोचेस, इतर खेळातील दिग्गज खेळाडू आणि जगभरातील प्रसिद्ध तसेच असंख्य अनामिक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना, कौतुक आणि प्रेम व्यक्त केले.

चाळीस देशात टेनिस खेळलेल्या फेडररची २० ग्रँड स्लॅम चषकांचा विजेता, १०३ इतर टुर्नामेंट्सचा जेता आणि जगातील असंख्य चाहत्यांचा अत्यंत लाडका खेळाडू ही वैशिष्ट्ये आहेतच. त्याने केलेल्या आणि मोडलेल्या रेकॉर्डस् बरोबरच त्याची महत्ता अफाट लोकप्रियता, दिला जाणारा आदर आणि त्याला मिळालेले लोकांचे प्रेम यातूनही कायमच अधोरेखित होत आली आहे.

गेल्या १८-१९ वर्षांपासून टेनिसचा इतिहास बघितल्यास, फेडरर कुठल्याही देशात खेळत असला, अगदी त्या देशाच्या खेळाडू विरुद्ध जरी खेळत असला तरी अधिकाधिक प्रेक्षक फेडररला प्रोत्साहन देत असत. विम्बल्डनमध्ये जवळजवळ सगळे स्टेडियम त्याच्या नावाचा उद्घोष करत असे आणि जगातील अनेक टुर्नामेन्टसमध्येही फेडररच्या नावाचा जप दिसून येई.

गेली २४ वर्षे कलात्मक कौशल्यपूर्ण टेनिस खेळणाऱ्या, लोभसवाण्या व्यक्तिमत्वाच्या आणि  संवादकुशल रॉजर फेडररच्या लोकप्रियतेचे आणि महानतेचे गमक काय असावे याचा शोध घेतल्यास अनेक लोकविलक्षण गुणवैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतील.

एका ताऱ्याचा जन्म आणि स्वप्न

रॉजरचा जन्म ८ ऑगस्ट १९८१ सालचा. स्वित्झर्लंडमधील बाझेल शहरात तो वाढला.

रॉबर्ट आणि लिनेट फेडरर यांचे रॉजर हे शेंडेफळ. मोठी बहीण डायना. आई वडील दोघेही नोकरी करणारे. घरची श्रीमंती नव्हती पण खाऊनपिऊन सुखी घर. आई लिनेट या मूळच्या आफ्रिकन. त्यामुळे रॉजर दक्षिण आफ्रिकेचाही नागरिक आहे.

आठव्या वर्षांपासून त्याने टेनिसचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या अकादमीत बॉल बॉय म्हणून तो कामही करत असे. तो म्हणतो की एक बॉल बॉय म्हणून तो अनेक सुप्रसिद्ध टेनिसपटूंना जेव्हा खेळतांना बघत असे तेव्हा आपणही त्यांच्यासारखे खेळावे ही मनीषा मूळ धरू लागली. नावाजलेला टेनिसपटू होण्याचं स्वप्न तो तेव्हापासून पाहू लागला. त्यांच्या सारखे मोठे व्हायचे या ध्यासाने तो मेहनत करू लागला.

ओबढधोबड, धुसमुसळी आणि भावनाप्रधान सुरुवात

सुरुवातीची अनेक वर्षे रागीट खेळाडू म्हणून रॉजरची ख्याती झाली होती. लाईनमनने चुकीचा कॉल दिला तर तो चिडत असे. रेफ्रीने चुकीचा पॉईंट दिला तर तो रागावत असे. रॅकेट आपटणे आणि रागावून बोलणे, चिडणे हे नेहमीचे होते. मॅच हरली की रॉजर चेअर अंपायरच्या खुर्चीच्या मागे जाऊन ढसाढसा रडत असे. मूळचा रागीट स्वभाव जायला बराच काळ जावा लागला.

त्याची भावी बायको मिरका त्यावेळच्या झेकोस्लोव्हाकियातून स्वित्झर्लंडला स्थलांतरित झाली होती. तीही तिथे टेनिस खेळत असे. एक भावी प्रतिभावान खेळाडू म्हणून तिने रॉजरची कीर्ती ऐकली होती.  मात्र तिने त्याला प्रथम पाहिले ते त्याच्या रागीट अवतारातच! रॉजर सांगत होता की बिएल येथील अकादमीत टेनिस कोर्टांचे विभाजन करायला मोठा जाड पडदा लावला होता. त्याला वाटलं इतके जाड पडदे आहेत, ते फाटणार नाहीत. बिनधास्तपणे त्याने रॅकेट भिरकावली. ती भिरभिरत पडदा उभा चिरत गेली. अशा वर्तनामुळे अकादमीतील अधिकाऱ्यांनी त्याला ऑफिस व्हॅक्यूम क्लीन करण्याची आणि तेथील टॉयलेट्स स्वच्छ  करायची शिक्षा दिली.

मॅच हरली की रडणे, चिडणे आणि कटकट करणे हे नेहमीचेच असे. त्याची आई त्याला समजावे की तुझ्या अशा वर्तनाने तू विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंना तुला हरवायचे निमंत्रण देतो आहेस. हळूहळू हा बोध त्याने अंगात बाणवला. रॉजरच्या लक्षात आले की प्रत्येक खेळात चढउतार असतातच. तसेच हार-जीतही असते. तेव्हा हरत असलो तरी काहीही प्रतिक्रिया न देणे हे महत्त्वाचे आहे.

रॉजरच्या सुरुवातीच्या चिडखोर, रागीट वर्तनाची लाज वाटत असे त्याचे वडील हसून सांगतात. रॉजरच्या वडलांनी त्याचा रागीट स्वभाव बदलायला खूप प्रयत्न केले. एकदा मॅच हरल्यावर रॉजर भयंकर संतापला होता आणि त्याने खूप कटकट सुरू केली. शेवटी, कारमधून बाहेर काढून वडलांनी रस्त्याकडील बर्फात अक्षरश: त्याचे डोके घासले जेणेकरून हा त्रस्त समंध शांत व्हावा!

ते म्हणतात की रॉजर हरला तर त्याचं वाईट वाटत नसे मात्र त्याची चिडचिड आणि रडणं हे त्यांना अजिबात आवडत नसे. एकदा रॉजरच्या चिडचिडीवर ते संतापले. त्यांनी त्याला सांगितले की हे पैसे घे, घरी ये नंतर आणि ते निघून गेले. रॉजर जरा शांत झाला आणि वडील गाडी घेऊन येतील याची वाट पाहू लागला. वडील निघून गेले हे लक्षात आल्यावर बस, ट्राम अशी मजलदरमजल करत तास सव्वा तासाने घरी पोहोचला. तेव्हा त्याला लक्षात आले की कुणी मोठं व्हायचं असेल तर त्याचं वर्तन सुधारायला हवंय. हळूहळू करून त्याने स्वतः पूर्णपणे बदलले हे विशेष.

कलात्मक कौशल्यपूर्ण खेळाची परिश्रमपूर्वक जडणघडण

एव्हाना रॉजरची उत्तम टेनिस खेळण्याची चुणूक तेथील प्रशिक्षकांच्या लक्षात येऊ लागली होती. त्याच्या आयुष्याला आकार देणारा एक उत्तम प्रशिक्षक त्याला नवव्या वर्षीच भेटला. त्याचं नाव पीटर कार्टर.

पीटरने रॉजरची प्रतिभा आणि क्षमता ओळखली होती. टेनिसचे धडे देतांना तो त्याला सांगत असे की एक दिवस तू खूप मोठा खेळाडू होणार आहेस.

१३-१४ वर्षाचा झाल्यावर तो रोज ६ तास सराव तो करत असे. याचं श्रेय तो मिरकाला देतो. ती स्वतः ६ तास सराव करतांना पाहिल्यावर रॉजर देखील खूप मेहनत घेऊ लागला.

६ फूट १ इंच उंच असलेल्या रॉजरचं वजन कायम ८५ किलो इतकं स्थिर असतं. अंगकाठी सडपातळ असल्याने त्याच्या शरीरात एक लय आहे. खेळताना जमिनीवर हलकेच तरंगत असल्यासारखा तो वावरतो. हलकाईने तो खेळतो. तो सरावसुद्धा इतका शास्त्रशुद्ध  करतो की, खेळताना फारसा घामाघूम होत नाही. म्हणूनच ५० शॉट्सची रॅली खेळूनही त्याची दमछाक झालेली दिसत नाही. फार कमी वेळा तो तोंडाने श्वास घेताना दिसतो. हे सगळे श्रेय फेडररचे आहेच, पण त्याचा कंडिशनिंग कोच पियर पानिगिनीचेही आहे. ग्रास, क्ले किंवा हार्ड कोर्टप्रमाणे पियर त्याचे फिजिकल कंडिशनिंग करून देतो, तसेच ज्या देशात तो खेळणार आहे, तेथील हवामानाप्रमाणे त्याच्या व्यायामात बदलही करून देतो.

रॉजरने स्वतःच्या रागीट स्वभावाला पूर्ण मुरड तर घातलीच तसेच लाईनमन्सनी दिलेले बहुतांशवेळा कॉल सहजपणे स्वीकारणे आणि मुख्यतः फोकस ठेवून आनंदाने खेळणे सुरू केले आणि काय आश्चर्य तो मॅचेस वर मॅचेस आणि टुर्नामेंट्स जिंकू लागला.

पीटर कार्टर, पीटर लुंडग्रेन, टोनी रोश, सेव्हरीन ल्युथी, पॉल ऍनॅकाँन, स्टीफन एडबर्ग आणि इव्हान लुबिचीच या सगळ्या कोचेसनी रॉजरच्या कलात्मक आणि कौशलयपूर्ण टेनिसच्या खेळात मोठा हातभार लावला आहे.

कलाकार त्यांच्या कलेतील सौंदर्य अधिक उठावदार व्हावे, यासाठी रियाज करतात. पराकोटीच्या स्पर्धात्मक खेळांच्या दुनियेत मात्र सौंदर्याला फारसे स्थान नसते. अपेक्षा असते, विजिगीषू वृत्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि लढाऊ बाण्याची! फेडररने मात्र या सगळ्याबरोबरच लालित्य, ताल आणि सौंदर्य अशा कलात्मक गुणांचा संगम घडवून खेळाचा ढंग, बाज आणि व्याख्याच बदलली, ती कायमचीच!

फेडररची खेळण्याची काव्यात्म शैली, एखाद्या बॅले नर्तकासारखा त्याचा कोर्टवरील सहजसुंदर वावर, टेनिसच्या पुस्तकातील प्रत्येक शॉट अत्यंत कुशलतेने आणि कलात्मकतेने खेळण्याचं असामान्य कसब, उच्च कोटीची शारीरिक क्षमता (athleticism) आणि खेळातील चढउतार शांतपणे पचवत प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याच्याही नकळत शिताफीने हरवण्याचं एखाद्या प्रतिभावंत बुद्धिबळपटूप्रमाणे अंगी असलेलं चातुर्य यामुळे फेडरर जगभरातील टेनिसप्रेमींच्या तसेच क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत नसेल, तर नवलच!

फेडररला RF या अद्याक्षरांनी ओळखले जाते. ‘RF’ हा त्याचा लोगोही आहे आणि अनेकदा perfect हा शब्द गौरवार्थ peRFect असाही लिहिला जातो इतकं तंत्रशुद्ध आणि लोभसवाणं टेनिस तो खेळतो!

हसरे, आनंदी, हजरजबाबी, लोभसवाणे आणि निर्मळ व्यक्तिमत्व

कोवळ्या वयातील रॉजरवर पीटरच्या निर्दोष खेळाचा, शांत, हसऱ्या, आनंदी आणि विनोदी स्वभावाचा खूपच प्रभाव आहे. फेडरर म्हणतो की, मी आज जो आहे तो पीटरमुळे आहे.

प्रसिद्ध दिवंगत पत्रकार डेविड फोस्टर वॉलेस एकदा म्हणाले होते, की फेडररची मॅच बघणे हा एक अध्यात्मिक अनुभव आहे. अशी किमया करू शकणारा फेडरर हा प्रेक्षकांचा, प्रतिस्पर्ध्यांचा, टेनिस जगतातील मान्यवर खेळाडू आणि पंडितांचा लाडका खेळाडू आहे. असं उच्च प्रतीचं प्रावीण्य आणि पूर्णत्व केवळ नैसर्गिक प्रतिभा, सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध, समर्पित ध्यासाबरोबरच अध्यात्मिक डूब असल्यावरच येऊ शकतं.

फेडररला एकदा त्याच्या जीवनाचे तत्वज्ञान काय आहे असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तो म्हणाला की, “It is nice to be important but more important to be nice”.

मॅचमध्ये गेम्सची कशीही स्थिती असली तरी डोकं थंड ठेवणे, शांत राहाणे आणि कुशलतेने मार्ग काढण्याच्या गुणामुळेही प्रेक्षक त्याच्यावर लुब्ध असतात.

फेडररचे चार अतिशय नावाजण्याजोगे गुण म्हणजे त्याचं पारदर्शी व्यक्तिमत्व, थेट संवाद साधण्याचे कौशल्य, हजरजबाबीपणा आणि चातुर्य!

मॅचआधी आणि नंतरही अतिशय पारदर्शीपणे तो त्याच्या गेम प्लॅन बद्दल, त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूबद्दल बोलत असे आणि व्यवस्थित माहित देत असे तेही नर्म विनोदाची पखरण करत, अगदी आनंदाने! त्यामुळे सगळ्या माध्यमातील पत्रकारांचा देखील तो अत्यंत आवडता खेळाडू असल्यास नवल नाही. रॉजर अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक तरीही त्याला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले जात. तेव्हा एखाद्या मुत्सद्दी नेत्यासारखा चातुर्याने उत्तर देई तेव्हा मनोमन सलाम माझ्यासारखे हजारो अभ्यासक करत असावेत.

१५ सप्टेंबरला टेनिसमधून निवृत्त होत असण्याचा व्हिडीओ जगभर क्षणात व्हायरल झाला. त्यात त्याचे नितळ, निर्मळ व्यक्तित्व प्रकर्षाने दिसून आले. इतका महान खेळाडू असूनही, इतकी लोकप्रियता आणि प्रचंड संपत्ती असूनही त्याने स्वतः शेखी नाही मिरवली किंवा प्रौढीने बोलला नाही. प्रेक्षक, स्पर्धक, आईवडील, बहीण, बायको, प्रशिक्षक यांना त्याच्या अद्वितीय करिअरचे श्रेय त्याने मोठ्या मनाने अगदी निर्मळपणे दिले यातच त्याची महानता अधोरेखित होते.

पराकोटीच्या स्पर्धात्मक खेळातील दीर्घ कारकीर्द

असं म्हटलं जातं की, जेव्हा जेव्हा रॉजर फेडरर टेनिस खेळायला कोर्टवर येतो, तेव्हा तेव्हा तो एक नवीन रेकॉर्ड करतो किंवा मोडतो. फेडररने २००३ साली विम्बल्डनचा चषक प्रथम जिंकला आणि नंतर तो सलग चार वेळा जिंकला. २००४ पासून ते २००८ आणि जवळजवळ २००९-२०१० पर्यंत तो टेनिसचा अनभिषिक्त सम्राट होता. २००९ साली त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा देखील जिंकली तेही राफाएल नदालचे या कोर्टवर पूर्ण वर्चस्व असताना! हा त्याचा ग्रँड स्लॅम स्पर्धांतील १४वा विजय. पुढे १५ वी, १६ वी आणि १७ वी ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याने जिंकली.

३५व्या वर्षी १८ वी ग्रँड स्लॅम चषक जिंकणे आणि त्यानंतर आणखीन दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून म्हणजे एकूण २० ग्रँड स्लॅम चषके प्रथम जिंकणारा फेडरर हा इतिहासातील पहिला खेळाडू आहे. पुढे हा रेकॉर्ड नदाल आणि जोकोविचने मोडला.

तिन्ही प्रकारच्या कोर्टवर अत्यंत लीलया खेळू शकणारे फार मोजकेच खेळाडू होते आणि आहेत. त्यातही फेडरर अव्वल क्रमांकावर आहे. किंबहुना, वयाच्या ४० वर्षापर्यंत १८ वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा तऱ्हेने ग्रास, क्ले किंवा हार्ड कोर्टवर खेळू शकणारा फेडरर हे टेनिस पंडितांना आणि प्रेक्षकांना पडलेलं एक विलक्षण कोडं आहे.

फेडररला ज्या प्रकारे टेनिस कोर्टाची पूर्ण भूमिती माहीत आहे, तितकी कदाचित दुसऱ्या कुठल्याही खेळाडूला माहीत नाही. कारण त्याची आक्रमक, भेदक सर्व्ह, त्याचे सर्विस विनर्स आणि कोर्टवरील कोणत्याही ठिकाणावरून त्याने अत्यंत ताकदीने मारलेला फोरहँड, क्लासिक सिंगल हँडेड बॅकहँड, लॉब्ज, स्लाइसेस, ड्रॉपशॉट आणि पासिंग शॉट अनेक वेळा भौतिकशास्त्राच्या काही नियमांनासुद्धा चकवा देणारे आहेत.

२०१९ साली म्हणजे वयाच्या ३८व्या वर्षी त्याने शंभरावी स्पर्धा तर जिंकली आणि १२००वी मॅच जिंकली. १२व्या विम्बल्डन अंतिम फेरीत मात्र तो अपयशी ठरला.

शेकडो काय हजारो मॅचेस खेळूनही त्याच्या ताज्यातवान्या, नजाकतीने भरलेल्या सुंदर खेळाचे रहस्य काय?

फेडररचा एक प्रतिस्पर्धी एकदा म्हणाला होता, की त्याने खेळलेला प्रत्येक बॉल जणू त्याच्याशी बोलतो आणि तो म्हणेल तिथेच प्रतिस्पर्ध्याला चुकीचा शॉट मारायला प्रवृत्त करतो. त्याचा खेळावरील, बॉलवरील आणि पॉइंटवरील फोकस इतका जबरदस्त असतो की, तो त्या खेळाचा पूर्ण ताबा अतिशय शिताफीने घेऊ शकतो. फेडरर ऑलराउंडर आहे, सगळ्या कोर्टवर उत्तमपणे खेळू शकणारा जुन्या पद्धतीचा, पण नव्या तंत्राला जोडून घेतलेला त्याचा सर्वांगीण खेळ आहे. त्याचा फोरहँड हा टेनिसमधला सर्वोत्तम शॉट आहे, असं जॉन मकॅन्रो म्हणतो. त्याचे इनसाइड-आऊट किंवा इनसाइड-इन फोरहँड हेसुद्धा अतिशय शक्तिशाली शस्त्र आहेत. त्याचे ट्वीनर्स म्हणजे, पाठमोरं असताना पायांच्या मधून मारलेला विनर, हेही टेनिस रसिकांना लुभावून टाकणारे आहेत.

२३७ आठवडे सलग (म्हणजे फेब्रुवारी २००४ ते  ऑगस्ट २००८ पर्यंत) प्रथम मानांकित खेळाडू असणे, चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांत एकंदरीत २३ वेळा उपांत्य फेरीत पोचणे, विम्बल्डनचा चषक ८ वेळा जिंकणे, त्यातही ५ वेळा तो सलग जिंकणे, ग्रास कोर्टावर सगळ्यात जास्त स्पर्धा जिंकणे इत्यादी न मोडले जाणारे रेकॉर्डस् फेडररच्या नावावर अजूनही आहेत. तसेच जगातील सर्वोत्तम खेळाडू असण्याचा नावलौकिक त्याने पाच वेळा मिळवला असण्याचा रेकॉर्ड अजूनही मोडलेला नाही. यशस्वी पुनरागमनाचा पुरस्कारही मिळवला आहे.

फेडरर हा आजवरचा महान खेळाडू आहे की नाही, G.O.A.T. – Greatest of All Time आहे की नाही असा अधूनमधून वाद सुरूच असतो. या वादात न पडता असे म्हणता येईल की, टेनिस या खेळात अनेक कलांचा आविष्कार दाखवणारा तो पहिला आणि कदाचित शेवटचा खेळाडू आहे.

खिलाडूपणा आणि कोर्टावरील नेमस्त आणि सभ्य वर्तन

पण या सगळ्यांत, रॉजरचा अतिशय लुभावणारा पैलू म्हणजे, त्याचा न्यायी स्वभाव. तो कधीही रडीचा डाव खेळत नाही. प्रतिस्पर्ध्याला चुकीचा कॉल दिला असेल, तर तो पॉइंट परत बघायला सांगून त्याला तो मिळवून देतो. त्याने ATP Fan’s Favorite अवॉर्ड सगळं १७ वर्षे जिंकले आहे यातून तो त्याच्या समकालीन खेळाडूंमध्येही किती लोकप्रिय आहे याची कल्पना येते.

त्याची सभ्य वागणूक, प्रतिस्पर्ध्याला सन्मानाने वागवण्याचा स्वभाव आणि न्यायी वृत्ती यामुळे तो गेली १३ वर्षं ‘स्टीफन एडबर्ग स्पोर्ट‌्समनशिप अवॉर्ड’ जिंकतो आहे. मात्र, २००९च्या यूएस ओपनच्या फायनलमध्ये त्याने रॅकेट आपटली. रेफ्रीला रागावून बोलला, तेव्हा त्याला भरपूर दंड द्यावा लागला. रॉजर हा चुकाही करणारा माणूस आहे, हे तेव्हा अनेकांना कळले. पुढे मायामी ओपन आणि इतर काही मॅचेस मध्ये तो रागावला होता. चोवीस वर्षाच्या कालावधीत, हजारो मॅचेस खेळतांना, त्यातील चढउतार आणि हारजीतीतून  जातांना रागावून बोलणे किंवा खिलाडूपणे न वागण्याची उदाहरणे फक्त तीन किंवा चारच आहेत यावरून रॉजरच्या संयत आणि सभ्य आचरणाची कल्पना येते.

लॉकर रूममध्येही रॉजर अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे. पुढे जगप्रसिद्ध सुपरस्टार झाल्यावरही त्याचे इतर खेळाडूंबरोबरचे वागणे अतिशय सभ्य आणि आदराचे राहिले आहे. जेव्हा जेव्हा तो ग्रँड स्लॅम जिंकत असे तेव्हा तेव्हा लॉकर रूममध्ये फार जोराने स्वतःच्या विजय साजरा न करणारा बहुधा रॉजर एकमेव खेळाडू असावा. विजयोत्सव जोरात न करण्याचे कारण काय तर बाजूच्या रूममध्ये खूप मोठा लढा देऊनही हरलेला त्याचा प्रतिस्पर्धी आहे म्हणून!

ATP असोशिएशनच्या खेळाडूंचा अध्यक्ष म्हणूनही रॉजरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. त्याने कधीच वादग्रस्त वर्तन केले नाही किंवा निर्णय घेतले नाहीत, गे खेळाडूंचे स्वागत आहे असं रॉजर फेडररने म्हणून त्याची आधुनिक आणि सर्वसमावेशक भूमिका जगजाहीर केली होती. तसेच आजारी पडलेले खेळाडू किंवा दुखापतग्रस्त खेळाडूंना मदत करण्याचा आग्रह त्याने केला हे विशेष.

नेमस्त वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबवत्सल प्रतिमा

रॉजर फेडररचं व्यक्तिमत्व राजबिंडे! वागणं नेमस्त आणि कोर्टावरील  वावर मात्र फुलपाखरासारखा!

२००३ ला पहिले ग्रँड स्लॅम जिंकल्यावर त्याची विजयी घौडदौड खरेतर २०२१ मध्ये थांबली. या काळात त्याचा कलात्मक खेळ बहरला.

एक अतिशय सभ्य, नम्र, आनंदी, नेमस्त आणि उच्च कोटींचं प्रावीण्य असणारा प्रतिभावान खेळाडू म्हणून प्रतिमा झाली.

२००९ साली त्याला जुळ्या मुली आणि २०१४ मध्ये जुळी मुलं झाल्यावर त्याचं ६ जणांचं कुटुंब पूर्ण झालं. रॉजर कुटुंबवत्सल माणूस आहे हे सगळ्या जगणे पाहिलं आणि मानलं देखील. कारण आई वडील, बहीण तिची जुळी, जगभरातील त्याच्या दोस्तांपैकी काही असे त्याच्या प्लेअर बॉक्स मध्ये कायम दिसत. अखिल विश्वाचा सुपरस्टार म्हणून त्याची लोकप्रियता सतत वर्धिष्णू होत होती.

त्याच्या फौंडेशनच्या माध्यमातून तो कोट्यवधी मुलांच्या भल्यासाठी काम करतो.

सामाजिक बांधिलकी आणि दानशूर वृत्ती

लहानपणापासूनच रॉजरच्या आईने त्याला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली असे तो आवर्जून सांगतो.

रॉजरचा आवडता प्रशिक्षक पीटर दुर्दैवाने, २००२मध्ये गाडीला अपघात होऊन वारला. फेडररची विजयी घोडदौड तो बघू शकला नाही. मात्र, २००५पासून फेडरर नेमाने पीटरच्या आई-वडिलांना ऑस्ट्रेलियन ओपनला बोलावतो, त्यांना विमानाची तिकिटं, त्यांच्या राहण्याची उत्तम सोय करतो, त्यांना प्रत्येक सोहळ्यात सामील करतो.

आपुलकी आणि आत्मीयतेचा हाच भाव जपत आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून देशोदेशीच्या भूकंपग्रस्तांना संपत्तीचं दानही तो करतो.

रॉजर फेडररचे फौंडेशन आहे. त्या द्वारे २० लाख आफ्रिकन मुलांच्या शिक्षणाची सोय त्याने केली आहे. युक्रेनमधील युद्धात त्याने तेथील मुलांना सढळ हस्ताने मदत केली.

टेनिसचा अनिभिषिक्त सम्राट आणि एकमेवाद्वितीय राजदूत

रॉजर फेडररने टेनिस या खेळाला कलात्मक आयाम देऊन तसेच  अभिजात आणि नितांत सुंदर खेळ कसं खेळावा याचा दंडक घालून दिला आहे. त्याचबरोबर अतिशय उत्तम, नेमस्त वागणूक, जबाबदार वावर आणि उत्कृष्ट व्यावसायिकतेचा संगम दाखवून टेनिस खेळाची लोकप्रियता आणि लोकमान्यता शिगेला नेली आहे.

फेडररचा खेळ म्हणजे एखादी कविता आहे जणू. वाचणाऱ्याला आनंद देणारी, उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायला भाग पाडणारी, कधी हळवं करणारी, कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारी, आणि पुन:पुन्हा वाचावीशी वाटणारी…

एका सिद्धहस्त, प्रतिभावंत कलाकारासमान कलाकृती सादर करणारा फेडरर प्रेक्षकांना त्याच्या अद्भुत नि अलौकिकतेचा स्पर्श लाभलेल्या विश्वात घेऊन जातो, तेव्हा तो बुद्ध किंवा जे. कृष्णमूर्ती ज्याप्रमाणे त्यांच्याकडे आलेल्या सत्यशोधकांना क्षणस्थ अवस्थेकडे घेऊन जात, तसाच काहीसा अनुभव देतो.

आनंदी आणि शांत स्वभाव, वागण्यात कमालीची नम्रता, सच्चाई आणि हेवा वाटावी अशी खिलाडू वृत्ती जपलेल्या फेडररची महानता त्याने मोडलेले किंवा केलेले असंख्य नवीन रेकॉर्ड‌्स तर आहेतच, पण त्याचबरोबर टेनिससारख्या रम्य खेळात सौंदर्य, ताल, लालित्य आणि नजाकतीची उधळण करून जवळजवळ दैवी अनुभूती देणाऱ्या फेडररसारख्या प्रतिभावान खेळाडूला जीनियस म्हणणे अतिशयोक्ती ठरत नाही.

इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि स्वीस-जर्मन अशा चार भाषांवर प्रभुत्व असलेला फेडरर जन्मानं स्वीस. काटेकोर, तंत्रशुद्ध नि तितकीच सुंदर घड्याळं ही स्वित्झर्लंडची खासियत. या मोहात पाडणाऱ्या घड्याळांप्रमाणे जडणघडण असलेल्या फेडररने अनेक वर्षं रसिकांना दैवी अनुभव दिला आहे. पुढल्या आठवड्यात लँव्हर कपमधील शेवटच्या काही मॅचेस खेळून तो निवृत्त होतोय.

विम्बल्डनवरील हिरवळीवर पांढऱ्या शुभ्र कपड्यातील शुचिर्भूत रॉजर त्याचं कमालीचं कलात्मक टेनिस खेळतांना पाहण्याची प्रेक्षकांची २४ वर्षांची सवय आता मोडणार आहे. तसेच इतर सगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, मास्टर्स स्पर्धा किंवा उर्वरित लहानमोठया टुर्नामेंट्समध्ये आता प्रेक्षकांचा लाडका रॉजर नसणार आहे. आता कधी नव्हे इतकी टेनिस कोर्टांवरील त्याची अनुपस्थिती खटकणार आहे.

गेली २४ वर्षे अभिजात, कलात्मक, कौशल्यपूर्ण टेनिस खेळून त्याने कोट्यवधी प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेडली आहेत आणि त्यांना निर्भेळ आनंद रसिकांना आणि प्रेक्षकांना दिला आहे. त्याच्या या सगळ्या अभूतपूर्व कारकिर्दीचे, योगदानाचे आणि टेनिस या खेळाला कलात्मक उंचीवर नेऊन ठेवण्याच्या करामतीचे हजारो व्हिडीओज इंटरनेटवर उपलब्ध आहेत हे आश्वासक आहे. त्यामुळे रॉजर फेडरर नामक टेनिसच्या कलात्मक किमयागाराचे हजारो व्हिडीओज पुनःपुन्हा येणाऱ्या सगळ्या पिढ्या बघतील यात शंका नाही.

सगळ्या जगातील प्रेक्षकांना, टेनिस आणि क्रीडा रसिकांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या, कलात्मक टेनिस खेळून निर्भेळ आनंद देणाऱ्या फेडररच्या भावी आयुष्याला खूप शुभेच्छा देऊन, शुभकामना व्यक्त करून, अभिष्टचिंतन व्यक्त करून त्याच्या चांगुलपणाला, सभ्य आचरणाला, त्याच्या राजबिंड्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाला सलाम करून म्हणावेसे वाटते, ‘जुग जुग जियो रॉजर. तुस्सी ग्रेट हो!’. जीवेत् शरदः शतम् रॉजर!

गायत्री चंदावरकर, या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून त्या टेनिस विश्लेषकही आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0