पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्टला लोकांना स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा प्रदर्शित करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत आपल्या अकाऊंटवर राष्ट्रध्वजाचा फोटो न लावल्याबद्दल अनेकांनी आणि काँग्रेस नेत्यांनी आरएसएस आणि त्याचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर ५ ऑगस्टला संघाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर दिल्लीतील विज्ञान भवनात सप्टेंबर २०१८ सालातील मोहन भागवत यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी त्याला प्रतिवाद करणारा लेख रत्नाकर महाजन यांनी महाराष्ट्र कॉँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ यामध्ये लिहिलेला लेख.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचाही सहभाग नसलेल्या, उलट त्या लढ्याशी गद्दारी करणाऱ्या आणि ‘संघस्वयंसेवकांनी या लढ्यात भाग घेऊन आपली शक्ती वाया घालवू नये’ असे निर्देश देऊन स्वातंत्र्य लढ्याचा घात करणाऱ्या रा. स्व. संघाला आता उपरती होऊ लागली आहे. संघाचे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हणूनच इतिहासात न घडलेल्या घटनांचा पाढा वाचणे सुरू केले आहे.
भागवतांच्या दिल्लीतील तीन दिवसांच्या व्याख्यानांमध्ये त्यांनी असे अनेक नवे पण खोटे दावे केले. त्यापैकीच एक फैजपूर येथील १९३६ च्या काँग्रेस अधिवेशनाशी संबंधित प्रसंग होता. महात्मा गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशानुसार काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे २८ डिसेंबर १९३६ या दिवशी भरले होते. अधिवेशनाच्या प्रारंभी झेंडावंदन करण्याचा काँग्रेसचा स्थापनेपासूनचा प्रघात आहे. ‘आम्ही तिरंग्याचा सन्मानच करतो’ असे निखालस खोटे विधान करून त्याच्या समर्थनार्थ भागवत यांनी या झेंडावंदनाच्या वेळी घडलेला प्रसंग मानभावीपणाने वर्णन केला; पण ही एक लोणकढी थाप होती. या अधिवेशनातील झेंडावंदन पं. नेहरूंच्या हस्ते झाले. नेहरूंनी झेंड्याची दोरी ओढली, पण तो झेंडा मध्येच अडकला. अशा वेळी तिथे जमलेल्या जमावातील किशनसिंग रजपूत नावाचा एक १४ वर्षांचा मुलगा धावत पळत आला आणि तो झरझर झेंड्याच्या स्तंभावर चढला आणि दोरीला पडलेला पीळ सोडवून त्याने झेंडा मोकळा केला; आणि झेंडा पूर्णपणे फडकवला गेला.
हा किशनसिंग रजपूत संघाचा स्वयंसेवक होता असा दावा भागवतांनी केला. भागवतांनी आज तो दावा केला असला तरी संघाच्या शाखा शाखांमधून ही भाकडकथा अनेक वर्षांपासून सांगितली जात असते. वस्तुस्थिती अशी आहे की हे रजपूत कधीही संघशाखेवर गेले नाहीत. त्या काळी जळगाव जिल्ह्यात संघ शाखांचा एवढा प्रसारही झाला नव्हता. शिवाय म. गांधी, पं. नेहरू व काँग्रेसबद्दल
प्रथमपासूनच द्वेष आणि विरोधाचे बाळकडू पाजला गेलेला एखादा स्वयंसेवक काँग्रेस अधिवेशनाच्या ठिकाणी कशाला तडफडायला जाईल? पुढे या किशनसिंग रजपूत यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता देऊन पेन्शन चालू करण्यासाठी श्री. मधुकरराव चौधरी यांनी प्रयत्न केले; व त्यांना ती मिळवून दिली. अशा रीतीने काँग्रेस पक्षाने मान्यता मिळवून दिलेले ते स्वातंत्र्य सैनिक होते. कालांतराने हे जनसंघ भाजपमध्ये सामील झाले. नेमक्या याच घटनेचा उपयोग करून त्यांच्यावर संघ स्वयंसेवक म्हणून शिक्का मारला. प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या जाणत्या वयात एकदाही संघ शाखेवर पाऊल ठेवले नव्हते. म्हणजे ते कधीही संघाचे स्वयंसेवक नव्हते. तथापि, आपल्या खोटे बोलण्याच्या व गैरप्रचार करण्याच्या परंपरेला अनुसरून संघ त्यांना आपला स्वयंसेवक म्हणून गेली अनेक वर्षे मिरवीत आहे. शिवाय तो तिरंगा काँग्रेसचा होता, त्यावर काँग्रेसची सुरुवातीची निशाणी असलेल्या चरख्याचे चित्र होते. अजूनही काँग्रेसच्या झेंड्यावर चरखाच असतो. म्हणजेच तो राष्ट्रध्वज नव्हता. १९५० साली लागू झालेल्या राज्यघटनेने अशोकस्तंभ चिन्हांकित तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज मान्य केला. तोच आजपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी हा राष्ट्रध्वज सरकारी, खासगी अशा सर्व इमारतींवर फडकवला जातो. संघाने मात्र स्थापनेपासून तब्बल ९० वर्षे हा राष्ट्रध्वज आपल्या मुख्य कार्यालयात व अन्य कार्यालयांमध्ये फडकवण्यासाठी घेतला नाही.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यावर नव्याने निर्माण झालेल्या देशप्रेमातून २०१५ साली संघाने प्रथम तिरंगी झेंडा फडकावून त्याला वंदन केले.
हा आपला बेगडी राष्ट्रप्रेमाचा इतिहास पुसला जावा या उद्देशाने संघाने ही भाकडकथा वर्षानुवर्षे पसरवली आहे. भागवतांनी नव्याने तेच केले. प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यातील वर्तमानपत्रांमध्ये हा प्रसंग खालील प्रमाणे प्रसिद्ध केला आहे.. भागवत व रा. स्व. संघ यांचा खोटेपणा, लबाडी व गैरप्रचार उघडा पाडण्यास हे वृत्त पुरेसे आहे.
“श्री. किशनसिंग रजपूत यांनीच वरील १२० फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर चढून ध्वज उभारला. फैजपूर काँग्रेसच्या वेळी झालेल्या पहिल्या झेंडावंदनाचा प्रसंग तर, त्यावेळी उपस्थित असलेल्यांच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव, प्रत्येकाच्या कथनात त्याचा उल्लेख येतोच, आणि जणू अजूनही तो प्रसंग ते बघत आहे अशारीतीने ते सांगत असतात.”
पंडितजींच्या हस्ते ध्वज वंदन व्हायचे होते. ध्वजवंदनाच्या ठिकाणी हजारो लोक झुंडीझुंडीने दरवाजातून येत होते. प्रचंड गर्दी जमली. अजून पंडितजी यायचे होते. झेंडावंदनासाठी तिरंगी झेंडा बांधून १२० फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर चढविला. पण अचानक दोरी गरडीवरून खाली घसरली आणि ध्वज अर्ध्यावर अडकला. ध्वजस्तंभ बांबू व दांड्या एकत्र बांधून केलेला होता. एवढ्या उंच स्तंभाच्या टोकापर्यंत चढून अडकलेली दोरी गरडीवर टाकल्याशिवाय ध्वज वर जाणे शक्य नव्हते. अर्ध्यावर ध्वज ठेवणे अशुभ; म्हणून होता तसाच राहू देणेही अशक्य. आणि १२० फूट उंच ध्वजस्तंभाच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचणे ही गोष्ट तर जवळजवळ अशक्यप्राय वाटत होती. उपस्थित नेत्यांनी आवाहन केल्यानुसार एक-दोघांनी प्रयत्न करून पाहिला पण स्तंभाच्या अर्ध्याच्या वर ते पोहोचू शकले नाहीत. शेवटी खान्देशच्या मातीचाच एक लसलसता अंकुर धावून आला. शिरपूर किसनसिंग ओंकारसिंग रजपूत (परदेशी) गर्दीतून पुढे झाला व झरझर वर चढला. सर्वांचे श्वास रोखले गेले. त्याने दोरी गरडीवर चढवून ध्वज फडकाविला. टाळ्यांचा कडकड झाला. पंडितजींनी आणि इतर नेत्यांनी त्याचे कौतुक केले; त्याला पारितोषिके दिली.” किसनसिंगांचे त्यावेळचे छायाचित्र उपलब्ध नाही.
COMMENTS