“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल

“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल

बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग ६ रसेलची तत्त्वज्ञानाकडे झालेली वाटचाल मोठी नाट्यमय आहे. गणित आणि भूमिती हे प्रारंभी रसेलचे आवडते विषय होते. पण तत्त्वज्ञानाकडे मात्र तो एका अस्वस्थ जिज्ञासेने ओढला गेला. ही जिज्ञासा त्याच्या समग्र लेखनात प्रतिबिंबित होत राहिली... विज्ञान, इतिहास, काव्य आणि साहित्य या विषयांमधील त्याच्या रुचिला त्याने विकसित केलेल्या तत्त्वज्ञानाचे भक्कम अधिष्ठान लाभलेले आहे. साहजिकच चिंतन केलेल्या सर्वच विषयांत तो उच्चकोटीला गेला....

“ज्ञान म्हणजे काय?” हा तात्त्विक प्रश्न प्राचीन ग्रीक, भारतीय आणि चिनी तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला. त्याविषयी विविध सिद्धांत मांडले. मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याला असलेल्या मर्यादा, प्रामाण्याचे निकष, ज्ञानाचा आणि समग्र अस्तित्वाचा संबंध या प्रश्नांचा विचार या साऱ्या तत्त्ववेत्त्यांनी केला. ज्ञानाची साधने, ज्ञानाचे स्वरूप, ज्ञानाचे निकष, तसेच यथार्थ आणि अयथार्थ ज्ञानातील नेमका फरक यांचीही चिकित्सा त्यांनी केलीच. पण त्याही पुढे जाऊन ‘आपण जाणतो हे कसे जाणतो? म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते, याचे ज्ञान कसे होते?’ याचाही अधिक चिकित्सक विचार त्यांनी मांडला.

इमान्युएल कांट

इमान्युएल कांट

ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने “ज्ञान म्हणजे काय?”  हा प्रश्न यथार्थपणे प्रथम उपस्थित केला. पण त्याने हा प्रश्न आध्यात्मिक पातळीवर गेला, उत्तराच्या शोधात उच्चकोटीच्या स्वतंत्र अमूर्त प्रज्ञाविश्वाची ‘आयडियांच्या जगाची’ निर्मिती केली. त्या जगात केवळ काही निवडक साधू प्रवृत्तीच्या तत्त्ववेत्त्यांनाच प्रवेश करण्यास पात्र ठरविले. प्लेटोने दृश्य भौतिक जगापेक्षा एका अलग विश्वाची निर्मिती केल्याने भौतिक जग दुय्यम ठरले, परिणामी सामान्य माणसाचे सुखदुःखयुक्त जीवन, विज्ञान, साधने इत्यादी गोष्टी बिनमहत्वाच्या ठरल्या. काही प्रमाणात अॅरिस्टॉटलने हा प्रश्न भौतिक पातळीवर आणला, पण त्यानेही अंतिम सत्य, ईश्वर, आत्मा इत्यादी संकल्पना मान्य केल्याने प्रश्नाला वास्तविकता लाभली नाही.

“ज्ञान” या संकल्पनेला पाश्चात्य-युरोपीय प्रबोधन काळात वास्तविकता लाभली. किंबहुना, ‘आधुनिकता’ निर्माण झाली तो ‘ज्ञान’ संकल्पनेच्या चिकित्सेने. धर्म आणि धर्मसंस्था यांच्या जोखडातून ‘ज्ञान’ ही संकल्पना मुक्त करण्यानेच प्रबोधनाचा पाया रचला गेला. ‘ज्ञान म्हणजे विवेकशक्ती’ ही संकल्पना प्रबोधनाने दिली. पाश्चात्य तत्त्वज्ञानाने त्याच्या प्रदीर्घ इतिहासात तत्त्वज्ञानाची अनेक कार्ये  प्रत्यक्षात करून दाखविली. त्यातील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे माणसाच्या विवेकशक्तीच्या स्वातंत्र्याची घोषणा आणि त्या शक्तीस दिलेले साक्षात उत्तेजन. आता, विवेकशक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? (Answering the Question: What Is Enlightenment?) ही एक मूलभूत समस्या आहे, तिचे उत्तर देण्यासाठी इमान्युएल  कांट (१७२४-१८०४) या गेल्या सहस्त्रकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वेवेत्त्याने What is Enlightenment ? (प्रबोधन म्हणजे काय?) हा निबंध लिहिला. (निबंधाचे मूळ शीर्षक “An Answer to the Question: What Is Enlightening?” असे आहे.) कांट म्हणतो, “प्रबोधन हा माणसाच्या, जिच्यासाठी तो स्वतःच जबाबदार आहे; अशा अपरिपक्व स्थितीतून उसळणारा विवेकशक्तीचा उद्भव आहे. आपल्या आकलन सामर्थ्याचा उपयोग करण्याची पात्रता गमावून बसणे ही माणसाची अपरिपक्वता असते. माणूस स्वतःच या अपरिपक्वतेस जबाबदार असतो. “स्वतःची विवेकबुद्धि वापरण्याचे धैर्य निर्माण करा!” (“Have the courage to use your own understanding“) हे प्रबोधनाची घोषणा आहे.

होरास (Quintus Horatius) रोमन कवी तत्त्ववेत्ता

होरास (Quintus Horatius) रोमन कवी तत्त्ववेत्ता

“बुद्धिप्रामाण्य हा ज्ञानाचा मूलभूत निकष असावा”, ही भूमिका मूलतः सॉक्रेटीसने मांडली, त्यानंतर होरास (Quintus Horatius Flaccus  जन्म: इ.स.पूर्व ०८ डिसेंबर ६५, मृत्यू: इ.स.पूर्व २७ नोव्हेंबर ०८) या रोमन कवी तत्त्ववेत्त्याने  “शहाणे होण्याचे धैर्य निर्माण करा”(“dare to be wise”) किंवा “ज्ञान मिळविण्याचे धैर्य निर्माण करा (“dare to know”) अशी घोषणा केली. लॅटीन भाषेत ती Sapere aude अशी माडंली गेली. होरासने First Book of Letters (इ.स.पूर्व २०) या ग्रंथात ही घोषणा केली. या घोषणेचाच पुनरुच्चार कांटने केला आणि तिला ‘प्रबोधनाचे सूत्र’ हा दर्जा दिला. त्यानंतर पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानात जणू कोपर्निकन  क्रांती झाली.

“शहाणे होण्याचे धैर्य निर्माण करा”, “ज्ञान मिळविण्याचे धैर्य निर्माण करा” ही घोषणा तत्कालिन रोमन साम्राज्यात आणि प्रबोधन काळात शिक्षणाचे धोरण म्हणून स्वीकारले गेले. रोमन काळात शिक्षण केवळ राज्यकर्ते आणि उमराव वर्गापुरते होते, त्या वर्गावर घोषणेचा मोठा परिणाम झाला. प्रबोधन काळात शिक्षण सार्वजनिक करण्यास ही घोषणा महत्वाचे कारण ठरली. अनेक पाश्चात्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये ती स्वीकारली गेली. पक्व लोकशाहीसाठी शिक्षित जनता मूलभूत मानली गेली. शिक्षण त्यामुळे सार्वजनिक झाले.

“ज्ञान म्हणजे काय?”  या प्रश्नाला आध्यात्मिक, धार्मिक, किंवा ईश्वरीय स्पर्श नसलेला निखळ भौतिक स्वरूपाचा सामाजिक, राजकीय आणि मुख्यत्वे करून वैज्ञानिक आशय दिला गेला तो विसाव्या शतकात केवळ बर्ट्रंड रसेलकडून. प्लेटोपासून कान्टमार्गे या प्रश्नाला लाभलेल्या धार्मिक व आध्यात्मिक वलयाचा विलय रसेलने केला! ‘ज्ञान’ या संकल्पनेची धर्माच्या विळख्यातून मुक्तता केली कान्टच्या या सूत्राचा त्याने केवळ आधार घेतला. ‘ज्ञान’ या संकल्पनेला भौतिक जगाच्या बाहेरच्या अतार्किक सत्याशी न जोडता भौतिक जगातील वास्तवाशी जोडले. तो प्रश्न खऱ्या अर्थाने मानवी जीवनाशी सुसंगत केला. या संकल्पनेला त्याने वास्तव आणि यथार्थ वैज्ञानिक व तात्त्विक स्वरूप दिले. ही रसेलची मोठी कामगिरी ठरते.

तत्त्वज्ञानाकडे वाटचाल

‘रसेल तत्त्वज्ञानाकडे का वळला’ यांची चर्चा त्याच्या “Philosophy for Laymen ” (1946), “Why I Took To Philosophy” (1956), “My Philosophical Development” (1959), आणि “My Mental Development” (1943) या तीन निबंधात प्रामुख्याने आढळते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४६ साली त्याने Philosophy for Laymen हा लोकप्रिय धाटणीचा लेख लिहिला.  त्याआधी त्याच्या त्रिखंडात्मक आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाच्या  Prologue: What I Have Lived For (1967) प्रस्तावनेतही त्याची तत्त्वज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दरम्यान त्याने अमेरिकेत तत्त्वज्ञानावर जी व्याख्याने दिली ती The Art of Philosophizing  या शीर्षकाने १९६८ साली प्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. त्यात The Art of Rational Conjecture, The Art of Drawing Inferences आणि The Art of Reckoning असे तीन निबंध आहेत.

“Philosophy for Laymen” (1946), “Why I Took To Philosophy” (1956) हे दोन निबंध आणि “The Art of Philosophizing” (1968) ही व्याख्याने किंवा तीन निबंध रसेलने जिज्ञासू वृत्तीच्या तत्त्वज्ञानेतर सुशिक्षित सामान्यजनांसाठी लिहिले आहेत. “My Mental Development” (1943) आणि “My Philosophical Development” (1959) हे निबंध तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे विद्यापीठीय अॅकेडेमिक अभ्यासक, अध्यापक व विद्यार्थीवर्गासाठी लिहिले आहेत. या साऱ्या निबंधांमधून रसेलने “माणसांना तत्त्वज्ञानाचे अभ्यासक का व्हावेसे वाटते, तत्त्वज्ञ का व्हावे वाटते?” या समस्येचे उत्तर वेगवेगळ्याप्रकारे दिलेले आहे.

प्रत्येक निबंधाचा वाचकवर्ग वेगवेगळा असल्याने रसेलची लेखनशैली ह्या पाचही निबंधात वेगवेगळी आहे. सामान्यजनांसाठीच्या निबंधात ती सहज, ओघवती आणि एखाददुसरा अपवाद वगळता कोणतेही तत्त्वज्ञानाचे पारिभाषिक संज्ञा न वापरता लिहिले आहेत तर तत्त्ववेत्ते आणि इतर अॅकेडेमिकवर्गासाठी लिहिलेल्या निबंधांमध्ये तत्त्वज्ञानाच्या पारिभाषिक संज्ञांचा संपृक्त वापर आढळतो, तरीही नवशिक्या विद्यार्थीवर्गाच्या आकलनाबाहेत जाणार नाही, याची काळजी रसेलने घेतली असल्याचे ठळकपणे जाणवते.

“My Philosophical Development” (1959), हे रसेलचे मोठे स्वतंत्र पुस्तक आहे, त्याची परिचयात्मक रूपरेखा (Introductory Outline) “My Philosophical Development” याच शीर्षकाची आहे.

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दोन प्रेरणा  

रसेलच्या “तत्त्वज्ञानातील समस्याया ग्रंथाच्या प्रारंभी ‘ज्ञान’ या संकल्पनेला रसेलने दिलेले यथार्थ वास्तव, वैज्ञानिक व तात्त्विक स्वरूप समजून येते. तो म्हणतो “ज्याच्या सत्यतेविषयी कुणीही समंजस माणूस शंका घेऊ शकणार नाही असे निश्चितपणे सत्य असलेले काही ज्ञान जगात आहे का ? हा एक कठीण प्रश्न आहे असे प्रथमदर्शनी वाटणार नाही. पण वास्तविक आपण जे कित्येक अत्यंत कठीण प्रश्न उपस्थित करू शकू अशा प्रश्नांपैकी तो एक प्रश्न आहे.”

रसेल कथन करतो, की “मी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे का वळलो? सर्व रूढ व पारंपरिक स्वरूपाच्या प्रेरणांनी एकत्र येऊन मला या अभ्यासाकडे वळविले. अनेक निरनिराळ्या शंका आणि अनेक प्रेरणा स्पष्ट, अस्पष्ट साध्या व गुंतागुंतीच्या प्रेरणा होत्या. यापैकी एक प्रेरणा प्रारंभापासून होती. ही प्रेरणा माझ्या तात्त्विक आयुष्यात सर्वात जास्त टिकाऊ ठरली. ‘अत्यंत सुनिश्चित म्हणून स्वीकारता येईल, असे ज्ञान शोधावे’, ही इच्छा माझ्या बाबतीत फार महत्त्वाची प्रेरणा ठरली. फक्त एकाच गोष्टीने माझा तनामनाचा कब्जा घेतला होता: ‘ज्ञान झाले आहे’ असे कितपत आपण म्हणून शकतो’ आणि निश्चिंततेच्या किंवा संशयास्पदतेच्या किती पातळीपर्यंत आपण तसे म्हणून शकतो, याचा पुनर्शोध घेण्यात मी कमालीचा आसुसलेला होतो. दुसरी प्रेरणा होती, ‘मनातील धार्मिक स्वरूपाच्या चेतनांना जरा जमले तर तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने शांत करावे.’ पण ही दुय्यम प्रेरणा होती.”

रसेल लिहितो,”वयाच्या अकराव्या वर्षी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे मी ओढला गेलो. ( अर्थात त्या वयात Philosophy हा शब्द मला परिचित झाला नव्हता.) माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता आणि माझे बालपण बरेचसे एकांतातच मला घालवावे लागले. याचा परिणाम म्हणून बालवयातच मी काहीसा गंभीर झालो. मला नुसता विचार करायला वेळच वेळ असायचा. पण माझी ही विचारशीलता कशी व्यक्त करावी याचे ज्ञान मात्र मला नव्हते. काही मानसिक गोष्टी सूत्रबद्ध रीतीने प्रदर्शित करण्याचा आनंद मी अनुभवत होतो. पण हा आनंद अजाणतेपणानेच अनुभवला जात होता. थोडे वय वाढल्यावर, असाच आनंद जे अनुभवू शकतात अशीही काही माणसे मला भेटली. शुद्ध गणिताचा प्राध्यापक असलेला माझा मित्र जी. एच. हार्डी (Godfrey Harold Hardy,

जी. एच. हार्डी

जी. एच. हार्डी

जन्म: ०७ फेब्रुवारी १८७७, जन्म: ०१ डिसेंबर १९४७) असाच आनंद जास्त तीव्रतेने अनुभवत असे. एखाद्या कल्पनेची सिद्धता मिळण्यात त्याला मनापासून आनंद वाटायचा. एकदा तो मला म्हणाला, तू आणखी पाच मिनिटांनी मरणार आहेस, याची सिद्धता जर मला आता सापडली तर तुला गमावल्याचे थोडे दुःख मला होईल, पण योग्य सिद्धता सापडल्याचा आनंदच मला जास्त होईल.” अर्थात त्याला हा आनंद देणे झाले नाही. त्याला हा आनंद लाभू शकला नाही म्हणून मला थोडा विषादही वाटला. पण त्याच्या या विक्षिप्त अभिप्रायाने अपमानित झाल्यासारखे वाटले नाही, हे एक आश्चर्यच.”

रसेल ज्याचा आदरपूर्वक उल्लेख करतो तो हार्डी म्हणजे ज्याने श्रीनिवास रामानुजनला ‘जाणले’ आणि ज्याच्यामुळे श्रीनिवास रामानुजन जगप्रसिद्ध झाला. आपण भारतीयांनी हार्डीचे कायमचे ऋणी आहोत.

०९ ऑगस्ट १८८३

तत्कालिन ब्रिटीश उमरावी घराण्याच्या परंपरेनुसार बर्ट्रंड रसेलचे शिक्षण घरीच झाले. त्याचे वडील व्हायकाउंट अँबर्ले यांनी दोन नास्तिक शिक्षकांची त्यासाठी नियुक्ती केली होती. तिसरा घरातील शिक्षक म्हणजे बर्ट्रंडचा मोठा भाऊ फ्रँक रसेल. हा मोठा गणिती होता (फ्रँक हा दुसरा अर्ल रसेल, बर्ट्रंड तिसरा अर्ल रसेल).

बर्ट्रंड अकरा वर्षाचा असताना फ्रँकने  बर्ट्रंडला भूमिती आणि गणित शिकविले. तो लिहितो, ” मी आज दुपारी बर्टीला युक्लिडचे पहिले धडे दिले. त्याने ते लगेच आत्मसात केले. इतके की दाखवली की आम्ही युक्लिडच्या  दुसऱ्या व्याख्येकडे अतिशय वेगवान गतीने आलो!” पण युक्लिडची भूमितीची सुरुवातच मुळात अशा काही मूलाधारांवर (Axioms) होते की ज्यांच्यावर सत्य म्हणून विश्वास ठेवावा लागतो पण ती सत्यता सिद्धी देता येत नाहीत. त्यावर त्यांची  बर्ट्रंडने ती स्वीकारण्यास नकार दिला आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. फ्रँकने बजावले की ते मूलाधार मान्य केल्याशिवाय-स्वीकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ही नोंद ०९ ऑगस्ट १८८३ रोजीची आहे.

या घटनेबाबत रसेल लिहितो,” माझा मोठा भाऊ मला भूमिती शिकविणार होता. माझ्या भावाने काही मूळ व्याख्यापासून अभ्यासाला आरंभ केला. मी त्या व्याख्या स्वीकारल्यानंतर मूलाधाराचा (Axioms) अभ्यास सुरू झाला. हे मूलाधार सिद्ध करता येणार नाहीत, पण त्यांचा स्वीकार केल्याशिवाय भूमितीतील इतर गोष्टी सिद्ध करता येत नाहीत,” तो म्हणाला. हे ऐकून माझ्या भूमिती बद्दलच्या अपेक्षा खलास झाल्या. ‘खरोखरच सिद्ध करता येण्यासारख्या काही कल्पना शिकणे’  हा विचार प्रथम मला मोठा आकर्षक वाटला होता. पण आता पाहतो तर काही गोष्टी गृहीत धरल्याशिवाय इतर गोष्टी सिद्धच करता येत नाहीत. “हे मूलाधार जर सिद्ध करता येत नाहीत तर ते मी मान्य का करायचे?” मी भावाला विचारले. तो शांतपणे म्हणाला , “हे बघ , जर तुला हे मूलाधार मान्य करायचे नसतील तर आपल्याला पुढे जाता येणार नाही.” नाखुषीनेच मी हे ऐकले. पण या गृहीत मूलाधारांबद्दलचा माझा गोंधळ आणि असमाधान मात्र कायमच राहिले. भूमितीत काही निःसंदिग्ध व शंकातीत गोष्टी सापडतील ही माझी अपेक्षा अपूर्ण राहिली. या प्राथमिक महत्त्वाच्या शंकांची काही उत्तरे असावीत जी अजूनही मला सापडली नाहीत- अशी समजूत करून घेऊन मी पुढील अभ्यास केला. या प्राथमिक शंका जर सोडल्या तर मात्र माझा गणिताचा पुढील अभ्यास फार आनंद देणारा झाला. भौतिक प्रत्यक्ष घटनांना गणिती नियम लावून पाहण्यात मला मौज वाटू लागली. मानवी वर्तनालासुद्धा यांत्रिक हालचालींप्रमाणेच गणिती नियम केव्हा तरी लागू करता येतील, असेही मला वाटू लागले. मानवी वर्तनातील इच्छास्वातंत्र्य मला महत्त्वाचे वाटायचे. तरी काही गणिती पद्धतीने निरनिराळ्या गोष्टी सिद्ध करण्याची ओढ एवढी मोठी होती की, या इच्छास्वातंत्र्यापेक्षाही मानवी वर्तनाचे नियमित गणिती चित्र तयार करण्याची कल्पना मला जास्त मोलाची वाटू लागली. असे जरी असले तरी पण गणिताच्या अभ्यासातील माझ्या मूलभूत शंकांची उत्तरे मला कधीच सापडली नाहीत. गणिती अभ्यासाची खरोखर योग्यता व उचितता कोणती आहे, हे मला निश्चितपणे ठरविता आले नाही.”

“नंतर मी प्रगत गणिताचा अभ्यास सुरू केला ; आणि नवीन शंका व अडचणींनी मला बेजार केले. माझ्या शिक्षकांनी काही गणिती सिद्धता सांगाव्यात आणि मला त्या तर्कदोषपूर्ण वाटू लागाव्यात. (पुढे मला कळले की, त्या खरोखरच आभासपूर्ण आहेत- जर्मन गणितज्ञांनी यापेक्षा चांगल्या सिद्धता दिल्या आहेत, हे मला केंब्रिज सोडल्यावर काही काळाने समजले.)

“चौदा-पंधराव्या वर्षी मला धर्माच्या चिंतनात प्रचंड आवड निर्माण झाली. मग इच्छास्वातंत्र्य, अमरत्व आणि ईश्वर यांच्याविषयीच्या तार्किक युक्तिवादात गुंतून गेलो. आणि अठराव्या वर्षी या तिन्ही गोष्टी मी झुगारून दिल्या.” त्याचे कारण रसेल असे देतो. त्याचा Godfather जे. एस. मिलचे आत्मचरित्र वाचताना रसेलला एक वाक्य आढळले. ” मला माझ्या वडिलांनी शिकविले की “मला कुणी निर्माण केले?” या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, कारण तो प्रश्न लगेच पुढचा “ईश्वराला कुणी निर्माण केले?” हा  प्रश्न सुचवितो.” मिलचे हे वाक्य वाचताच मी ताबडतोब ईश्वर हे विश्वाचे आदिकारण आहे’ हा युक्तिवाद तर्कदोषयुक्त आहे, हे ठरवून टाकले आणि ईश्वर ही संकल्पनाही टाकून दिली.”

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे

“गणिताच्या अभ्यासाने निर्माण कंटाळा पुरेसा झाल्यावर मी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे वळली आणि या विवंचना मला आभासात्मकच वाटू लागल्या. एखाद्या परीक्षेत यशस्वी होण्यास जे कौशल्य आवश्यक असते, ते करण्यास करावा लागणारे मनाचे केंद्रिकरण मी बरेच केले असावे आणि त्यातून ..गणिताचा मला कंटाळा आला होता. .. अशा रीतीने केंब्रिजमधे गणिताचा तीन वर्षे अभ्यास करून मी शेवटची परीक्षा दिली आणि पुन्हा या आयुष्यात गणिताकडे ढुंकून पाहणार नाही असे ठरविले. माझी गणिताची सर्व पुस्तके मी बाजारात विकून टाकली.

या सर्वांचा परिणाम असा झाला की, कांटच्या महान तत्वविचारांकरिता मला माझे मन मोकळे करणे सोपे झाले. कांटच्या विचारांनी एक मोठे विचारक्षेत्र खुले झाले; आणि माझ्या त्यापूर्वीच्या शंका विवंचना मला किरकोळ वाटू लागल्या. या मनःस्थितीत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने खरोखरच उल्हसित केले. खोल दरीतून वर चढत असताना चढण संपल्यावर अकस्मात जो विस्तीर्ण निसर्ग आणि खुले मैदान दिसून आल्हाद मिळतो, तो आल्हाद मी त्या वेळी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात अनुभवू लागलो.”

रसेल पुढे लिहितो, ” गणिताच्या अभ्यासातच मी निश्चिततेचा शोध घेतला असे मात्र नाही. देकार्त जरी मी अजून वाचलेला नव्हता तरी पण त्याच्याचप्रमाणे मलाही सतत वाटले की माझे स्वतःचे अस्तित्व अगदी निःशंकपणे स्वीकारायला काहीच हरकत दिसत नाही. बाह्य सृष्टी व तिच्यातील घटना एखाद्या स्वप्नाप्रमाणे मानणे शक्य आहे. पण असे असले तरी हे स्वप्न असे नाही का, की जे प्रत्यक्ष  (स्वप्न म्हणून का असेना) अनुभवले जात आहे, व म्हणून मी कशाचा तरी अनुभव घेत आहे, ही वादातीत वस्तुस्थिती दिसते. अशा प्रकारची विचारदिशा मी सोळा वर्षांचा असताना मला सुचली. नंतर जेव्हा मला कळले की, ही दिशा तत्त्वज्ञानाचा पाया आहे तेव्हा मला विशेष आनंद वाटला. केंब्रिजमध्ये असताना माझ्यातील तत्त्वज्ञानाच्या आस्थेला आणखी एक चालना मिळाली. गणितातील तत्त्वांबद्दल सुद्धा शंका घेण्याइतपत संशयवाद बळावला होता. हाच संशयवाद, जेव्हा मी धर्मातील आग्रही मूलतत्त्वांचा धार्मिक वृत्ती म्हणतात, त्यातील काहीतरी भाग टिकेल-टिकावा, अशी मात्र माझी इच्छा होती. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते अठराव्या वर्षापर्यंत मी या धार्मिक वृत्तीचा, श्रद्धेचा विचार करण्यास भरपूर वेळ खर्च केला. धर्माची आग्रही मूलतत्त्वे मी क्रमाक्रमाने खोल परीक्षणासाठी घेतली. इच्छा हीच होती की, त्यांपैकी काहींचा स्वीकार करण्यास योग्यसे कारण सापडावे. पण तसे कारण सापडले नाही.”

रसेलची ही सारी कथने त्याच्या मानसिक आणि वैचारिक जडणघडण कशा होत गेल्या, त्याची कहाणी स्पष्ट करतात.

ऑक्सफर्ड आणि केंब्रिज

एकोणिसाव्या शतकात ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही विद्यापीठे (आजच्या सारखीच) तेव्हाही प्रसिद्ध, दरारा आणि दबदबा असलेली ज्ञानकेंद्रे होती. दोन्ही विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि गणित या दोन्ही विषयांचा कसून अभ्यास आणि चिंतन होत होते. तरीही त्यांची आपापली वैशिष्ट्ये होतीच.  तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ऑक्सफर्ड विद्यापीठ अग्रगण्य होते आणि गणितात केंब्रिज विद्यापीठ आघाडीवर होते.

केंब्रिजमध्ये चिद्वाद आणि अनुभववाद व तत्त्वज्ञानातील इतर विचारप्रणालींचे अध्ययन होत होते, प्लेटोचा चिद्वादही होताच. तरीही कांट-हेगेलचे चिद्वादी तत्त्वज्ञान हेच तत्त्वज्ञान मानले जात होते.

एफ. एच. ब्रॅडली

एफ. एच. ब्रॅडली

विशेषतः हेगेलचा चिद्वाद अतिशय प्रभावी होता. ऑक्सफर्ड विद्यापीठात ब्रिटीश तत्त्ववेत्ता एफ. एच. ब्रॅडलीचा (Francis Herbert Bradley जन्म: ३०जानेवारी १८४६, मृत्यू: १८ सप्टेंबर १९२४) मोठा प्रभाव होता. ब्रॅडली चिद्वादी (Idealist) आणि एकतत्त्ववादी (Monist) होता.

रसेलने ऑक्टोबर 1890 मध्ये अठराव्या वर्षी केंब्रिजमध्ये प्रवेश घेतला. त्याने गणित आणि तत्त्वज्ञान या विषयात पदवी मिळवली. तेथे त्याने आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड आणि रॉबर्ट वेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यास केला. पण ज्या निश्चित स्वरूपाच्या तत्त्वांचा शोध त्याला घ्यायचा ती तत्त्वे गणितात आढळत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे गणिताचा अभ्यास रसेलने सोडून दिला. आणि तो 1894 साली तत्त्वज्ञानाकडे वळला.

केंब्रिजमधील तत्त्वज्ञान

केंब्रिजमध्ये ट्रीनिटी कॉलेजात त्याला ‘फेलो’ चा सन्मान 1895 साली लाभला आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकपद मिळाले. (तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकपद त्याला पुन्हा 1910 मध्ये मिळाले.) केंब्रिजमध्ये त्यावेळी त्याला जॉर्ज एडवर्ड मूर (G. E. Moore, जन्म: ०३ सप्टेंबर १८६६, मृत्यू: १८ जानेवारी १९२५) या अन्य तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्याची ओळख झाली. तसेच मॅक्टॅगर्ट (John  McTaggart  Ellis McTaggart , जन्म: ०४ नोव्हेंबर १८७३, मृत्यू: २४ ऑक्टोबर १९५८ ) हा तल्लख बुद्धीचा विद्यार्थीही परिचित झाला. तो रसेलपेक्षा सहा वर्षांनी मोठा होता, आणि चिद्वादी होता.       

जॉर्ज एडवर्ड मूर

जॉर्ज एडवर्ड मूर

रसेलने तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा केंब्रिजमध्ये ट्रीनिटी कॉलेजात हेन्री सिज्विक (Henry Sidgwick , जन्म: ३१ मे १८३८, मृत्यू: २८ ऑगस्ट १९००), जेम्स वॉर्ड (James Ward, जन्म: २७ जानेवारी १८४३, मृत्यू: ०४ मार्च १९२५) आणि जी. एफ. स्टाऊट (George Frederick Stout , १८६०-१९४४) हे त्याचे त्याचे शिक्षक होते. शिवाय, सी. डी ब्रॉड, रॅमसे, एडींगटन, रुदरफोर्ड, जे. जे. थोमसन, मार्शल, किन्से, डब्लू. ई.जॉन्सन ही दिग्गज मंडळीही होती.

सिज्विकने जॉन लॉक, जॉर्ज बर्क्ले, डेव्हिड ह्यूम यांचा ‘अनुभववाद’ शिकवला, तर वॉर्डने इमान्युएल कांटचे चिद्वादी तत्त्वज्ञान शिकवले. स्टाऊटने त्या काळी प्रसिद्ध असलेल्या बॅडलेच्या ‘Appearance And Reality’ या ग्रंथातील चिद्वादी मताचा पुरस्कार केला. आणि स्टाऊट आणि मॅक्टॅगर्ट या दोघांनी मिळून रसेलवर हेगेलच्या चिद्वादी तत्त्वज्ञानाचा इतका प्रभाव पाडला, की 1894 मध्ये केंब्रिज सोडल्यापासून ते 1898 पर्यंत तत्त्वज्ञान आणि धर्म या दोन्ही क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची उत्तरे चिद्वाद देऊ शकतो, किंबहुना सिद्ध करू शकतो, असा विश्वास रसेलला वाटू लागला होता.

जी.. मूरचा प्रभाव

मूर हा सुद्धा रसेलप्रमाणेच हेगेलच्या तत्त्वज्ञानाच्या वातावरणात शिकलेला होता. परंतु सामान्य मनुष्य ज्या ज्ञानावर विश्वास ठेवतो, ते केवळ भासमान आहे, सत्य नव्हे, हे बॅडलेचे मत त्याने नाकारले होते. रसेलनेही तीच भूमिका स्वीकारली. उलट ‘सामान्य मनुष्य ज्या ज्ञानावर विश्वास ठेवतो तेच ज्ञान सत्य आहे, भासमान नव्हे’ अशी भूमिका दोघांनी स्वीकारली, त्यातून त्याचा वास्तववाद उदयास आला. (अर्थात मूर व रसेल यांच्या भूमिकेत काही बाबतीत फरक आहे.)

मूर व रसेलप्रमाणे मॅक्टॅगर्ट हाही आधी विद्यार्थी आणि नंतर तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता. तो लायब्नीट्झ (Gottfried Wilhelm (von) Leibniz जन्म: ०१ जुलै १६४६, मृत्यू: १४ नोव्हेंबर १७१६) या जर्मन चिद्वादी विचारवंताचा चाहता होता. एकदा मॅक्टॅगर्टला कामानिमित्त न्यूझीलंडला जावे लागले, तेव्हा त्याने रसेलला लायबनीट्झ शिकवण्याची विनंती केली. लायब्नीट्झने ‘चिद्अणूवाद’ (Monadism) मांडला होता. ते शिकवताना त्याच्या हे लक्षात आले की, असे की लायबनीट्झ, हेगेल, ब्रॅडली या सर्वांचे तत्त्वचिंतन अ‍ॅरिस्टॉटलच्या ‘उद्देश्य-विधेय’ (Subject-Predicate) स्वरूपाच्या तर्कशास्त्रावर आधारलेले आहे. ते हजारो वर्षे परंपरेने शिकवले गेले, म्हणून त्यास ‘पारंपरिक तर्कशास्त्र’ असे म्हटले जाते. त्यानुसार सर्व वस्तूंमध्ये द्रव्य व गुण हे दोन घटक ‘उद्देश्य -विधेय’च्या जागी अनुक्रमे येतात. आणि ते नाकारले तर चिद्वाद कोसळतो!

ज्या तर्कशास्त्राच्या आधारे पारंपरिक तर्कशास्त्र अपुरे आहे हे दाखवून दिले त्या तर्कशास्त्राला ‘गणितीय तर्कशास्त्र’ असे रसेल म्हणतो. यालाच ‘सांकेतिक तर्कशास्त्र’ (Symbolic Logic) असेही म्हणतात. त्याचे गणिताचे गुरु व्हाइटहेड यांच्याबरोबर संशोधन करून गणितीय तर्कशास्त्राचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व विशद करणारा Principia Mathematica हा ग्रंथ रसेलने 1910 साली प्रसिद्ध केला. गणित, विशेषतः अंकगणित तर्कशास्त्रावर आधारित असते आणि म्हणून अंकगणित तर्कशास्त्रावरून निष्पन्न करता येते हे स्वतःचे मत सिद्ध करण्यासाठी रसेलने हा ग्रंथ लिहिला. याप्रमाणे चिद्वादी तत्त्वज्ञानाचा आधार असलेले पारंपरिक तर्कशास्त्र कसे अपुरे आहे आणि त्यामुळेच चिद्वादी दृष्टिकोण मुळातच कसा अतार्किक आहे, हे रसेलने दाखवून दिले.

गणिताकडे

रसेल 1900 साली पॅरिस येथे झालेल्या तत्त्वज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहिला. तेथे त्याला जुझेप्पे पेआनो (Giuseppe Peano जन्म: २७ ऑगस्ट १८५८,मृत्यू: २० एप्रिल १९३२) हा महाप्रज्ञावंत गणिती पंडित भेटला. पेआनो गणिती-तर्कशास्त्रज्ञ होता, त्याने जवळपास २००पुस्तके लिहिली होती. गणिती तर्कशास्त्र आणि संच सिद्धांताचा (founder of mathematical logic and set theory) तो जनक होता. या परिषदेत ‘गणितातील संकल्पनांचे तर्कशास्त्रीय अधिष्ठान’ या विषयावर पेआनोने निबंध सादर केला, रसेल त्याच्या संशोधनाकडे विस्मयचकित होऊन पाहत होता. रसेलने त्याच्याशी अधिक परिचय करून घेतला. पेआनोमुळे रसेल नव्याने गणिताकडे परतला.

आधी रसेल गणितापासून दूर गेला व परत फिरला, पुन्हा गणिताकडे आला आणि गणिताचा संशोधक झाला, याचा प्रोफेसर व्हाइटहेड यांना फार आनंद झाला. पायथागोरस, प्लेटो, थॉमस अ‍ॅक्वायनस, स्पिनोझा, देकार्त हे सारे तत्त्ववेत्ते मूळ गणिती होते. ते नंतर तत्त्वज्ञानाकडे वळले. तत्त्वज्ञानातील चुकीच्या सिद्धांताची त्यांना गणिताच्या वस्तुनिष्ठ पद्धतीने समीक्षा करायची होती. रसेल या  गणिततज्ज्ञांच्या प्रभावळीतून आला.

पुन्हा तत्त्वज्ञानाकडे

रसेलवर ज्याचा प्रभाव पडला तो अन्य गणिती तत्त्ववेत्ता म्हणजे फ्रेग (Friedrich Ludwig Gottlob Frege जन्म: ०८ नोव्हेंबर १८४८, मृत्यू: २६ जुलै १९२५) हा  जर्मन गणितज्ज्ञ. त्याची ख्याती ‘आकारिक तर्कशास्त्राचा जनक’ म्हणून होती. त्याने लिखाण केले ते तत्त्वज्ञानात्मक तर्कशास्त्रावर म्हणजे ‘गणिताचा तात्त्विक पाया’ या विषयावर.

अंकगणित आणि आकारिक तर्कशास्त्र यांच्यात साम्य असल्याचे त्याने दाखवून दिले. आकारिक तर्कशास्त्र कुठे संपते व अंकगणित कुठे सुरू होते हे निश्चितपणे ठरवता येत नाही असा फ्रेगचा सिद्धांत होता. अंकगणिताच्या संकल्पना आणि तर्कशास्त्रातील संकल्पना यावरील त्याच्या संशोधनामुळे रसेलला तत्त्वज्ञानाच्या विषयाला अधिक चालना मिळाली. रसेलने फ्रेगपासून केवळ स्फूर्ती घेतली, असे नव्हे तर त्याच्या काही सिद्धांताचा त्याने अनुवाद केला. फ्रेगचा प्रभाव इतका झटितीप्रत्ययाचा ठरला की रसेलने नंतरच्या काळात फ्रेगच्या विचारप्रवाहाच्या प्रभावाखाली तत्त्वज्ञानाची वाट चोखाळली. पारंपरिक तत्त्वज्ञानाला आधुनिकतेचे वळण दिले आणि त्यामुळे केवळ तत्त्वज्ञानातच नव्हे तर विज्ञानात -सामाजिक आणि नैसर्गिक विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली.

तर अर्थशास्त्राकडे ..!?

My Mental Development मध्ये रसेल लिहितो, “१८९४ ते १८९८ दरम्यान धार्मिक भावनांच्या पगड्याखाली आल्यामुळे मला असे वाटू लागले होते की ब्रह्मांडाबाबतच्या काही प्रश्नांची तत्त्वज्ञानाच्या अंगाने उत्तरे देणे शक्य आहे. माझ्यात पुरेशी क्षमता असेल तर मी तत्त्वज्ञानाला वाहून घ्यायचा निर्णय घेत होतो. पण ‘भूमितीचा पाया’ (the foundations  of geometry) या माझ्या लघुप्रबंधाचे वार्ड आणि व्हाईटहेड यांनी प्रचंड कौतुक केले. हे कौतुक झाले नसते तर मात्र मी तत्त्वज्ञान हा विषय न घेता अर्थशास्त्र या विषयाला वाहून घेतले असते. अर्थशास्त्रावर मी बर्लिनमध्ये असताना बरेच काम केले होते. पण वार्ड आणि व्हाईटहेड यांनी कौतुकामुळे मी तत्त्वज्ञानाकडे झुकलो.”

तो सदैव बोलतच राहात असे!

रसेल आणि मूर एकत्र होते तो काळ १८९५ पासून पुढचा. त्यांनी एकत्रितपणे “विश्लेषणाचे तत्त्वज्ञान’ मांडून तत्त्वज्ञानात क्रांती केली. त्यांच्या केंब्रिजमधील वास्तव्यात तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा एक चर्चा गट होता, जवळपास तो गुप्तच होता. कारण तात्त्विक चर्चेला तेव्हाही कोणी कसलीही किंमत देत नसत. त्याचे नाव होते “The Society” किंवा “The Apostles“(येशूचे पहिले बारा अनुयायी). व्हाईटहेडने रसेलला ह्या गटात प्रवेश मिळवून दिला. तेथे रसेल सहाजिकच चमकला. अलन वूड हा तत्कालिन प्रसिद्ध वार्ताहर लेखक व समीक्षक १९५७ साली लिहितो, ” रसेल आणि मूर एकत्र शिकत असण्याला साठ वर्षे झाली होती. बराच दीर्घ काळ गेला होता, आठवणी धूसरच झाल्या होत्या; तरीही मी एकदा मूरला रसेलच्या आठवणी सांगण्याचा आग्रह धरला, तेव्हा तो म्हणाला ‘फारसं आठवत नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे आठवते की ‘तो सदैव बोलतच राहात असे!’ ”

तत्त्वज्ञानरसेलनंतर 

अर्थात असे नव्हे की रसेलनंतर तत्त्वज्ञानात नवीन काही घडलेच नाही, तसे समजणे ही अंधश्रद्धा मानली पाहिजे. तत्त्वज्ञान सतत प्रश्न विचारते, म्हणून ते जिवंत राहाते. पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानात ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?” हा प्रश्न सातत्याने विचारत ठेवणे, तो जिवंत ठेवणे ही परंपरा आहेच. भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा हा प्रश्न १९५० नंतरच्या दशकात अनेक तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला आणि आपापल्या परीने उत्तरे दिली. प्रो.देबीप्रसाद चट्टोपाध्याय, प्रो. सुरेंद्र बारलिंगे, प्रो.. राजेन्द्रप्रसाद, प्रो.सच्चिदानंद मूर्ती इत्यादींनी ह्या प्रश्नाचा खोलवर उहापोह केला आहे.

रसेलचा प्रश्न पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात असल्याने या पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानात हा प्रश्न कसा जागता राहिला आहे, ते पाहाणे उचित राहील. या परंपरेत अनेकांनी तो प्रश्न उपस्थित केला. उदाहरणार्थ गिल्बर्ट राईल किंवा  सायमन ब्लॅकबर्न इत्यादींनी यथार्थपणे हे अन्वेषण केले आहे. तत्त्ववेत्त्यांच्या मांदियाळीत सर्वात जास्त चर्चिले गेलेले उत्तराधुनिक तत्त्ववेत्ते म्हणजे गिलेस देल्युज (Gilles Deleuze, जन्म: १८ जानेवारी १९२५, मृत्यू : ०४ नोव्हेंबर १९९५) फेलिक्स गुतारी (Pierre-Félix Guattari ( जन्म: ३० मार्च १९३० मृत्यू : २९ ऑगस्ट १९९२). त्यांचे मत थोडक्यात पाहाणे योग्य ठरेल.

जगातील तत्त्ववेत्त्यांनो, निर्माण करा

देल्युज आणि गुतारी या अत्याधुनिक उत्तराधुनिक फ्रेंच तत्त्ववेत्त्यांचा “What ls philosophy?” हा ग्रंथ १९९१ साली प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी एक घोषणा केली. “जगातील तत्त्ववेत्त्यांनो, निर्माण करा” (Philosophers of the world, create!).

ग्रंथाच्या शीर्षकापेक्षा त्या पुस्तकाच्या रूपाने गाजलेली घोषणाचं जास्त प्रसिद्ध झाली. तत्त्वज्ञान ही संकल्पना, विविध तत्त्ववेत्त्यांची आणि परंपरागत तत्त्वज्ञाने आणि तत्त्ववेत्ते यांच्याबद्दलचा तात्त्विक चिकित्सात्मक उहापोह ह्या ग्रंथात करण्यात आला आहे.

देल्युज आणि गुतारी टीका करतात की,  तत्त्वज्ञानाचे स्वरूप सुस्पष्ट करणाऱ्या ग्रंथांची आजपर्यंत निर्माण झालेली यादी फार काही विशेष उल्लेखनीय संख्येची नाही. जी आहे तीत्या त्या व्यक्तीचे किंवा तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूपस्पष्ट करणारी पुस्तकांची यादी असते, त्यातून केवळ त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजतो; किंवा ती ज्या परंपरेचा पुरस्कार करते त्या परंपरेचा पूर्वेतिहास आणि अपेक्षित विकासाची दिशा सूचित होते.

परिणामीतत्त्वज्ञानाचे साधारणम्हणा किंवासमग्र स्वरूपखरे तर आकलनाच्या कक्षेत येईल, असे असेलच असे नाही. “तत्त्वज्ञान म्हणजे काय?हा प्रश्न अतिशय अस्वस्थ मनोदशेत सुचणारा, कोणीही आपले लक्ष विचलित करून मनस्वास्थ्य घालवण्याची शक्यता नसलेल्या वेळी अथवा अगदी प्रशांत मध्यरात्री मनाच्या तळातून उद्भवणारा असतो.

हा प्रश्न मानवी इतिहासात पूर्वी विचारला गेला आहे, आणि सतत विचारला गेला आहे, पण अनेकदा तो अप्रत्यक्षपणे किंवा कशाचा तरीकोणत्या तरी प्रश्नाचा पर्यायी प्रश्न या स्वरुपात विचारला गेला आहे. हा प्रश्न खूपच कृत्रिम, अतिशय अमूर्त आहे. हा प्रश्न प्रश्नकर्त्याने कह्यात घेण्याऐवजी त्यांनी केवळ प्रश्नाचा आरंभ केला आणि वैचारिक प्रवास करता करता त्यावर नियंत्रण आणले. ते लोक तितके काही सौम्य स्वभावाचे नव्हते.

देल्युज आणि गुतारी अधोरेखित करतात की ते  काय असू शकेल, ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणे हीतत्त्वज्ञान करणे (to do philosophy) ह्या कृतीची प्रश्नकर्त्यांची प्रचंड उत्कट इच्छा होती. पण केवळ त्यांची लेखनशैलीची कवायत होती ती!” . त्यांच्या मते, आविष्कारशैली प्रेमपूर्वक बाजूला सारूनअरे, हे काय करत आलोय मी माझ्या आयुष्यभर!? ” या प्रश्नाकडे कोणी येतच नाही, ही शोकांतिका नव्हे का?” 

तुकोबांचा रोकडा सवाल: उत्तराधुनिक अर्थाने 

देल्युज आणि गुतारी यांनी उपस्थित केलेलाअरे, हे काय करत आलोय मी माझ्या आयुष्यभर!? ” या प्रश्नाकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहाता येईल काय? तसे कुणी पाहिले आहे काय? केल्यास त्याचा यथार्थ नेमका कोणता असू शकेल? त्याच्याअर्थपूर्णअसण्याचे निकष कोणते असू शकतील? असे प्रश्न आणि अनुषंगिक प्रश्न उपस्थित करता येईल, असे मला वाटते.

भारतात ईश्वर चिंतन ही आयुष्याच्या अखेरीस करण्याची बाब आहे, असे समजले जाते. भारतीय पुरुषार्थ व्यवस्थेने तो दृढ केला आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थापैकी ‘मोक्ष’ म्हणजेच ‘तत्त्वज्ञान’ असे समजले गेले. आणि ती आयुष्याच्या शेवटी केली जावी, असा समज आहे. काहीजण अखेरपर्यंत तेही करत नाहीत, ही शोकांतिका आहे. अशा लोकांवर तुकोबा कठोर शब्दात आणि काहीशा रांगड्या शैलीत टीका करतात. क्षेपकाच्या दोन अभंगात (अभंग क्र. ४४३८ आणि ४४३९) ते म्हणतात,

वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा  आयुष्य गेले हे कळेना स्मरा वेगे पंढरी राणा  //
दात दाढा पडल्या ओस  हनुवटी भेटे नाकास  हातपायराहिले कान नेत्रे पाझरे हाले मान //
अंगकांती परतली / चिरगुटा ऐसी झाली आड पडे जिव्हा लोटे / शब्द ये मुखावाटे //
लांब लोंबताती अंड / भराभरा वाजे गांड तुका म्हणे आता तरी / स्मरा वेगी हरी हरी //
                                                                                (अभंग क्र. ४४३८)

हाच आशय थोड्या वेगळ्या भाषेत अभंग क्रमांक ४४३९ मध्ये व्यक्त झाला आहे. दोन्ही अभंगात हरीम्हणजेविठ्ठल असा असला तरी त्याचा आधुनिक विचार करावयाचा झाल्यासअमूर्त तत्त्वाचा विचार करणेअसा लावता येईल. ‘हरीम्हणजेविठ्ठल म्हणजेच ईश्वराचा विचार करणे. हा तत्त्वज्ञानाचे एक कार्य आहे. ‘ईश्वरहा तत्त्वज्ञानात्मक विचार आहे, तो केवळ धार्मिक किंवा धर्मशास्त्रीय विचार नाही.

ईश्वराचा विचार करणे, याचा अर्थ ईश्वराचे अस्तित्व स्वीकारणे, त्याची भक्ति करणे, असे नाही. रसेलनेही ईश्वराचा विचार केला आहे, पण तो केवळएक अमूर्त तत्त्वज्ञानात्मक संकल्पना या अर्थाने. रसेल निरीश्वरवादी आहे, पण विश्वातीलमंगलभावनेवर त्याचा विश्वास आहे. त्याची तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची एक प्रेरणा ‘मनातील धार्मिक स्वरूपाच्या चेतनांना जरा जमले तर तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने शांत करावे’ ही होती, आपण लक्षात घेऊ शकतो. संशयवाद व्यक्त करतानाही  “धर्मातील आग्रही मूलतत्त्वांचा ज्यांना धार्मिक वृत्ती म्हणतात, त्यातील काहीतरी भाग टिकेल-टिकावा, अशी मात्र माझी इच्छाही तो व्यक्त करतो. रसेल ईश्वरचिंतन नाकारत नाही. त्यामुळे येथे तुकोबांच्या अभंगातीलहरी म्हणजेएक अमूर्त तात्त्विक विचारअसा करणे शक्य आहे. अनुषंगानेतात्त्विक विचार करणेकिंवातत्त्वज्ञानाचा विचार करणे हे वृद्धपणी करण्याचा चाळा नसून गंभीर गोष्ट आहे, असे म्हणता येईल. रसेलचे जीवनचरित्र पाहाता त्याला अकराव्या वर्षी तात्त्विक प्रश्न सुचत असतील तर सामान्यीकरणाने ते कोणत्याही माणसाला सुचणारे प्रश्न आहेत, असे म्हणता येईल. त्यासाठी वयाची अट, पर्यायाने म्हातारपण येण्याची अट असू नये, अशी रास्त अपेक्षा योग्य ठरू शकते.      

श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

(मुक्तसंवाद’, १५ ऑगस्ट २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

COMMENTS