यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारने सन्मानित केलेले पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी वेगळ्या शब्दांत, अप्रत्यक्
यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारने सन्मानित केलेले पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी वेगळ्या शब्दांत, अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे.
‘दिमित्री मुराटोव्ह नोबेल पुरस्काराची ढाल करून रशियाच्या कायद्याचे उल्लंघन करत राहतील, तसे ते करत असतातच. पण ते देशाचे कायदे धाब्यावर बसवत असतील तर त्यांना ‘फॉरेन एजंट’ म्हणून घोषित केले जाईल’, अशा शब्दांत पुतीन यांनी धमकी दिली आहे.
नोव्हया गॅझेटा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मुराटोव्ह गेली कित्येक वर्षे यांनी पुतीन यांच्या अधिकारशाही कारभारावर टीका करत आहेत. एकीकडे रशियातील प्रसारमाध्यमे पुतीन यांना धार्जिणी झाली असताना मुराटोव्ह यांचा मात्र पुतीन सत्तेच्या मनमानीविरोधतला लढा, संघर्ष चालूच आहे. त्यांच्या अशा संघर्षमय पत्रकारितेचा गौरव म्हणून २०२१ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार नोव्हया मुराटोव्ह व फिलिपाइन्स नीडर पत्रकार मारिया रेस्सा यांना गेल्या शुक्रवारी विभागून घोषित झाला होता.
मुराटोव्ह यांना नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल पुतीन सरकारने अधिकृतपणे त्यांचे अभिनंदनही केले होते. हे अभिनंदन करताना मुराटोव्ह यांना मिळणारी लाखो डॉलरची बक्षिसाची रक्कम त्यांच्यावर ‘फॉरेन एजेंट’ म्हणून शिक्का मारणारी ठरू नये, याची खबरदारीही त्यांनी घ्यावी असे पुतीन सरकारकडून सांगण्यात आले होते.
रशियाच्या कायद्यानुसार देशातील कोणत्याही प्रसार माध्यम संस्था, कंपन्या व स्वयंसेवी संघटनांनी परदेशातून आर्थिक मदत घेतली असल्यास त्या ‘फॉरेन एजंट’ ठरवल्या जातात. पुतीन सरकारच्या या मनमानी निर्णयावर अनेक बाजूंनी टीका झाली. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य सरकारने आपल्या हातीच ठेवले आहे, असा आरोपही विरोधकांकडून झाला होता. पण पुतीन सरकार आपल्या भूमिकेपासून ढळले नाही.
‘मी पास्तरनाक नाही’
नोबेल पुरस्कार स्वीकारू नये असे आपल्याला रशिया सरकारने सांगितल्यास आपण सरकारची भूमिका मान्य करणार नाही, आपण नोबेल पुरस्कार स्वीकारणार अशी प्रतिक्रिया मुराटोव्ह यांनी नोबेल पुरस्कार घोषित झाल्यानंतर दिली होती.
‘मी पास्तरनाक नाही’, असे विधान त्यांनी केले होते. सरकार त्यांना हवे ते करू दे, मी पुरस्कार स्वीकारणार असून तो परत करण्याचा प्रश्नच येत नाही असे मुराटोव्ह यांनी स्पष्ट केले होते. मुराटोव्ह यांनी आपल्याला मिळालेला नोबेल पुरस्कार सरकारच्या विरोधात पत्रकारिता करत आपला प्राण देणार्या ६ पत्रकारांना अर्पण केला होता.
१९५८मध्ये रशियातील श्रेष्ठ कादंबरीकार बोरिस पास्तरनाक यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार घोषित झाला होता.
पण हा पुरस्कार त्यांनी स्वीकारू नये असा दबाव तत्कालिन रशिया सरकारने पास्तरनाक यांच्यावर आणला होता. त्या दबावामुळे पास्तरनाक यांनी नोबेल पुरस्कार स्वीकारला नव्हता.
त्या इतिहासाची आठवण मुराटोव्ह यांनी पुतीन सरकारला करून दिली.
मूळ बातमी
COMMENTS