सफाई कामाचे व्यवहार्य उपाय?

सफाई कामाचे व्यवहार्य उपाय?

भारतात पाच दशलक्ष लोकांची उपजिविका साफसफाईशी निगडित कामावर अवलंबून आहे. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचा शासनाचा आग्रह व यशानंतरही भारतात अद्यापही हाताने मैलासफाई काम केले जाते. सध्या आपल्या देशात पाच दशलक्ष सफाई कामगार असून त्यापैकी २ दशलक्ष कामगार ‘अतिधोक्याच्या’ स्थितीत काम करत आहेत.

भारतातील स्वच्छतेसंदर्भात असणारी स्थिती, त्यातील गुंते आणि भारतीय सफाई कामगारांच्या समस्येवर व्यवहारात आणता येईल असा उपाय शोधण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
सफाई कामगारांच्या प्रश्‍नांवर उपाय शोधताना दोन प्रकारच्या गुंतागुंती दिसतात.
पहिली ही की सध्या अस्तित्वात असणाऱ्या सफाईच्या पायाभूत सुविधांमध्ये स्वच्छतेच्या कामासाठी कामगार असतीलच असे गृहित धरले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी यंत्रे विकसित करणे आणि ती खरेदी करणे यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. शिवाय यासाठी बराच कालावधी लागेल. दुसरी अधिक चिंतेची बाब अशी की पाच दशलक्ष कामगारांचा उपजिविकेचा मुख्य स्त्रोतच सफाईकाम हा आहे.
सफाई कामाच्या काही पद्धतींवर कठोर प्रतिबंध असतानाही त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. त्यामागे अशंत: हेच कारण आहे की या कामगारांची उपजीविकाच या कामावर अवलंबून आहे. शिवाय या सफाईचे काम कोणी करावे यामध्ये जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सध्या काम करत असलेले सफाई कामगार विशेषत: ज्यात अधिक धोका आहे, जे अमानवी आहे ते काम करणाऱ्या कामगारांचे अन्य कामधंदा देऊन पुनवर्सन करणे फारच अवघड आहे.
सफाई कामगारांच्या मते कामगार अड्डयांवर जाऊन काम मिळवण्यात त्यांना फार अडचणी येतात कारण कामगार अड्डयांवर इतर जातींकडून त्यांना भेदभाव सोसावा लागतो. बहुतांश कामगारांच्या जवळचे लोकही याच प्रकारच्या सामाजिक आर्थिक प्रश्‍नांना तोंड देत असल्यामुळे त्यांना सामाजिकदृष्टया कुठल्याही प्रकारचे ‘सपोर्ट नेटवर्क’ नसते, त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनते.
अल्प ते मध्यम कालावधीत, जेव्हा पायाभूत सुविधांमध्ये बदल घडण्याची प्रक्रिया सुरू होते त्याच सुमारास सफाई कामगारांच्या कल्याण व उपजीविकेतील धोके कमी करण्यास मदत करणे आवश्यक आहे.
सफाई कामगारांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प
ही सगळी पार्श्‍वभूमी मनाशी ठेवून जागतिक स्तरावर सल्लागार संस्था म्हणून नावारूपास आलेल्या ‘डलबर्ग अडव्हाजर्स’ या संस्थेने कामगारांच्या समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे व त्यासाठी संकल्पनांच्या पातळीवर उपाय विकसित करणे या उद्देशाने सफाई कामगारांसाठी नाविन्यपूर्ण उपायांबाबतच्या शिखर परिषदेचे आयोजन केले. या परिषदेतून पुढे विकसित होण्याची क्षमता असलेल्या चार संकल्पना पुढे आल्या. या संकल्पना कामगारांच्या संपूर्ण जीवनचक्रातील समस्यांची हाताळणी करण्याचे वचन देतात – सर्वात पहिल्यांदा कामगार हे काम स्वीकारतो तेव्हापासून ते त्यांना कामात येणाऱ्या नेहमीच्या समस्या तसेच सफाई काम सोडून अन्य कामधंदा करू पाहणार्‍या प्रत्येकाच्या समस्यांचा त्या विचार करतात.
कल्पना– सफाई कामगारांची नोंदणी
बहुतांश वेळा सफाई कामगारांची नियुक्ती ही अधिकृत नोंद न करता अनौपचारिक पद्धतीने होते. यामुळे कामगाराच्या कल्याणाच्या बाबतीतले धोके अधिक असतात. कुठल्याही प्रकारचा जीवन आणि आरोग्य विमा नसतो. कमीत कमी किंवा प्रलंबित पगार, आजारी पडल्यावर कुठल्याही प्रकारची रजा मिळत नाही किंवा कुठल्याही गरजेसाठी सुट्टी मिळत नाही आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारची अधिकृत तक्रार ते कुणाकडेच करू शकत नाहीत.
त्यामुळे सफाईकामगारांची जर डिजिटल पद्धतीने डेटाबेसमध्ये नोंदणी करून घेतली तर कामागार म्हणून किमान एक मान्यता मिळेल, शिवाय कामगारांच्या गुणवैशिष्टयांचाच शासन, एनजीओ आणि नागरी सहकारी संस्था संघटनांकडे एक महत्त्वाची संदर्भयादीही तयार होऊ शकते. त्यामुळे पहिल्या पथदर्शी प्रकल्पात सफाई कामगारांचा डाटाबेस तयार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सफाई कर्मचार्‍यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्तर समजून घेणे आवश्यक आहे. हा डेटाबेस तयार करून त्यांना कल्याणकारी योजनांसह जोडून घेणे यासाठी शासकीय कर्मचार्‍यांसोबत कार्यशाळा आयोजित करणे असा प्रकल्प असेल.
कल्पना कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे वातावरण आणि त्याची प्रक्रिया
दुसर्‍या पथदर्शी प्रकल्पामध्ये सफाई कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असावी ही बाब ठसवण्यावर भर राहणार आहे. बहुतांश वेळा सफाई कामगारांना कुठल्याही प्रकारची आर्थिक सुरक्षा नसते, त्यांची सर्व चिंता पैशांची चणचण दूर करणे एवढीच असते आणि म्हणूनच ते कुठल्याही वैयक्तिक सुरक्षेच्या साधनांशिवाय गटारीत उतरण्यासारखी अवघड आणि असुरक्षित कामेही करण्यास तयार होतात.
या समस्येच्या मुळाशी गेल्यावर असे दिसते की कुठल्याही नियोक्ता कंपन्या कामगारांना कामाच्या ठिकाणीच प्रशिक्षण देण्यासाठी वेळ राखीव ठेवत नाहीत. अनेकदा व्यावसायिक धोक्यांची माहिती कामगारांना ऐकीव गोष्टींवरूनच समजते. त्यामुळेच या प्रकल्पामध्ये  सफाई कामाचा महत्त्वाचा घटक म्हणून सुरक्षा वाढवण्यासाठी काय काय करता येईल व त्याबाबत सफाई कामगार आणि नियुक्त करणार्‍या कंपन्या या दोन्ही घटकांमध्ये कशी जागरुकता निर्माण करता येईल याचा विचार केला आहे.
या प्रकल्पात सफाई कामगार, कॉन्ट्रॅक्टर, संबंधित सरकारी अधिकारी अशा सफाई कामाच्या संरचनेतील विविध प्रतिनिधींची कार्यशाळा घेणे अशी कल्पना आहे. त्या कार्यशाळेत मुख्यत्वेकरून आरोग्यासाठी सर्वसाधारण धोके कोणते, सुरक्षेसाठी काळजी काय घ्यायची, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, एखाद्या असुरक्षित जागी जायचे असेल तर त्यासाठी कुठला पर्याय चांगला राहील याबाबत जनजागृती करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
कल्पना कामगारांशी न्याय्य आणि सोप्या पद्धतीने कळतील असे करार करणे.
तिसर्‍या पथदर्शी प्रकल्पामध्ये महापालिका, कंत्राटदार आणि सफाई कामगार यांच्यामध्ये करार करण्याचे एक प्रारूप विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
अनेकदा कामगारांना कराराबाबत माहिती नसते. त्यांचे जीवन आणि कल्याणाशी निगडित करारातील अटींबाबत आणि नेमक्या किती पगारावर त्यांचा हक्क आहे याबाबत ते अनभिज्ञ असतात. मुळातच काम मिळण्याची कुठलीही हमी नसल्याने सामूहिक वाटाघाटींसाठी एखादे संघटित व्यासपीठ तयार करण्याची इच्छाही कामगारांमध्ये नसते.
कामाच्या ठिकाणी जर एखाद्याला इजा झाली तरी  ती कंपनीची जबाबदारी समजली जात नाही आणि कामगार जर आजारपणामुळे कामावर आला नाही तर त्याला मजुरीही मिळत नाही. विशेष म्हणजे, अतिधोकादायक व जोखमीच्या सफाई कामांसाठी बहुतांश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मार्गदर्शिका तयार केल्या आहेत. कंत्राटदारांनी त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक मानले जाते मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यावरची देखरेख ही फारच कमी प्रमाणात होते.
त्यामुळे एक आदर्श करारपत्र तयार करण्यास इथे वाव आहे. ज्यामध्ये सफाई कामाशी संबंधित अटी-शर्ती, कामगारांसाठी विविध कल्याणकारी व सुरक्षेच्या योजनांचा विचार आणि सफाई कामगारांच्या उपजीविकेशी संबंधित जोखीम असणार्‍या बाबींचा विचार केला जाईल. शिवाय सफाई कामगारांमध्ये आपल्या हक्कांबाबत आणि कंपनीच्या जबाबदारीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींच्या दृश्य सारांशाचे वाटप करावे, असाही एक अतिरिक्त भाग या प्रकल्पात समाविष्ट केला आहे.
कल्पना सफाई कामांची उद्योजकता
शेवटचा पथदर्शी प्रकल्प हा सफाई कामागारांची उद्योजकता वाढविण्यासाठी निर्माण केला आहे. या प्रकल्पामध्ये सफाई कामगारांना सफाईकामाच्या संसाधनांच्या खरेदीसाठी कर्जाची सोय करणे आणि उद्यम व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण देणे, अगदी महापालिकेच्या निविदांना प्रतिसाद कसा द्यायचा वगैरे बाबी अंतर्भूत केल्या आहेत. तसेच सफाई कामगारांकडून येणाऱ्या प्रतिसादांना प्राधान्य देणार्‍या सफाई कंत्राटी निविदा जारी करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांना जोडून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उपेक्षित घटकांचा प्राधान्यक्रमाने विचार करणार्‍या निविदा या वैध असल्याचे स्पष्ट करून दिल्ली उच्च न्यायालयाने मे २०१८ मध्ये एक कायदेशीर पायंडाच प्रस्थापित केला आहे.
सध्या या प्रकल्पांची स्थिती काय आहे?
सध्या या पथदर्शी प्रकल्पांची प्रारूपे राष्ट्रीय स्तरावर यशस्वी करण्यासाठी अ‍ॅडिमिनिस्ट्रेटीव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अर्बन अफेअर्स यांचे सहकार्य घेतले जात आहे. भारतात हळूहळू असुरक्षित सफाई कामासाठी यंत्रांची व्यवस्था करण्यास सुरुवात होईल मात्र त्याचवेळी ज्यांचा उदरनिर्वाहच या कामावर अवलंबून आहे त्यांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. सफाई कामाला विशिष्ट सन्मान लाभावा आणि सफाई कामाची वर्तमानातील स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा प्रश्‍न स्वतंत्रपणे हाताळण्याचा व्यवस्थात्मक दृष्टिकोन यांची आज तातडीने गरज आहे.

अनंत लल्ला हे डलबर्ग अ‍ॅडव्हायजर्स येथे वरिष्ठ सल्लागार आहेत.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद : हिनाकौसर खान-पिंजार

COMMENTS