सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !

सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !

२८-२९ डिसेंबर रोजी पुण्यात एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना असगर वजाहत यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सागर सरहदी यांचे जीवन व कलात्मक योगदान याचा एक आढावा.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा घटनापीठाकडे
अर्णव गोस्वामी : हायकोर्टाने जामीन फेटाळला
दानिश यांची तालिबानकडून क्रूरपणे हत्या

१५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तो दिवस गोऱ्या  साम्राज्याच्या जोखडापासून मुक्ती मिळाल्याचा दिवस म्हणून साजरा करतात. त्यादिवशी मिळालेलं स्वातंत्र्य हे मुक्ती देणार होतं, की नव्हतं. ते खरं स्वातंत्र्य होतं की फक्त सत्तांतर होतं असे बरेच वाद विवाद आहेत. मात्र त्याने आपल्याला किंवा आपल्यापैकी कुणाच्या पूर्वजाला देश सोडायला भाग पाडलेलं नाही. प्रसिद्ध लेखक,नाटककार,चित्रपट दिग्दर्शक सागर सरहदी यांना मात्र १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र होत असताना झालेल्या फाळणीने पाकिस्तान मधलं त्यांचं गाव सोडायला  भाग पाडलं. त्यांना त्यांचा देश,त्यांच सुंदर दर्या-खोऱ्यात वसलेलं

बफा हे गाव सोडून भारतातल्या दिल्ली शहरात रिफ्युजी कॅम्पात आपलं तारुण्य घालवायला भाग पडलं.

पाकिस्तानातल्या अबोटाबाद जिल्ह्यातल्या बफा या गावी ११ मे १९३३ रोजी  सागर सरहदी यांचा जन्म झाला. बालवयात गंगासागर तलवार असलेले सरहदी फाळणी, रिफ्यूजी कॅम्पातले आयुष्य,जीवन संघर्ष यातून  सागर सरहदी झाले.

प्रेम त्रिकोण असलेल्या आणि त्याकाळी म्हणजेच १९८१ साली मॉडर्न समजल्या गेलेल्या सिलसिला या चित्रपटाचे पटकथा संवाद सागर सरहदी यांनी लिहिलेत . रोमांसचा बादशाह मानल्या गेलेल्या यश चोपड़ा यांनी दिग्दर्शित केलेल्या कभी कभी , सिलसिला , फासले आणि चांदनी या चित्रपटांच पटकथा /संवाद लेखन सागर सरहदी यांनी केले आहेत. राजेश तलवारच्या ‘नूरी’ची कथा सागर सरहदी यांचीच. रोमांटिक संवाद लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. चांदनी चित्रपटाच्या वेळेसची एक गंमत अशी की काही कारणांमुळे यश चोपड़ा यानी संवाद लेखक म्हणून दुसऱ्या  कुणालातरी कामावर घेतले होते. त्यांनी लिहिलेल्या संवादासमवेत आउट  डोअर शूटिंगला जेव्हा चित्रपट गेला तेव्हा यश चोपडा यांच्या लक्षात आलं, की आपल्याला हवे तसे रोमांटिक संवाद यात नाहीयेत. त्यांनी सागर सरहदी यांना एक मेसेज पाठविला, की जर ते या चित्रपटाची कथा लिहिणार नसतील, तर ते हा चित्रपटच करणार नाहीत. हा एक यशस्वी चित्रपट म्हणून गणला गेला हे सांगायची गरज आहे असे नाही.

मुलत: कथाकार असलेला हा माणूस दोन वेळच्या रोजी रोटीसाठी सिनेमा लिहायला लागला. चित्रपटांचा छंद असला तरी ते काही चित्रपटाकड़े मुद्दामहून वळलेले लेखक नव्हते. नाटक, कथा लिहिणारे ते लेखक होते आणि उदरनिर्वाह म्हणून ते एक दोन ठिकाणी शिकवायला जायचे. भगतसिंग की वापसी हे इप्टा साठी त्यांनी  लिहिलेल एक प्रसिद्ध नाटक आहे. फाळणीचे दु:ख अभिव्यक्त करणारी ‘राखा’ नावाची त्यांची एक कथा आहे ज्यावर नंतर नूरी हा चित्रपट आला. आधी दिल्लीतल्या किंग्स वे कॅम्पात नंतर दिल्लीच्या मोरीगेट भागात आणि भाऊ कामधंद्यासाठी मुंबईला आल्यावर त्यांच्यासोबत मुम्बई असा त्यांचा प्रवास झाला. मुंबईत यश चोपड़ा भेटले आणि कमर्शियल सिनेमा मध्ये लिहिण्याचा प्रवास सुरु झाला.

रंग,अनुभव,दूसरा आदमी,कर्मयोगी,कहो ना प्यार है, दीवाना सारखे एकापेक्षा एक सुंदर चित्रपट त्यांनी लिहिले. भारतीय क्लासिकमध्ये स्थान प्राप्त केलेला ‘बाजार’, हा चित्रपट त्यांची खास ओळख. माझ्या पीढ़ीला कहो ना प्यार है माहित नाही असे होणार नाही. मात्र बाजार कुणीतरी माहित करून दिला म्हणून आवर्जुन पाहिला गेला. जीवनात अत्यंत हलाखी भोगलेल्या,आपल्या सोबतचे हजारो लोक फाळणीत गमावलेल्या लेखकाने त्या काळच्या पिढीला रोमांसचा अनुभव आपल्या शब्दातून ताकदीने मिळवून दिला.

यश चोपड़ा,सिनेमा यांनी त्यांना भरभरून दिले. सिलसिला सारख्या चित्रपटानी प्रसिद्धी,पैसा,मान-सन्मान असे सगळे सागर सरहदी यांना मिळत गेलं. एका रिफ्यूजी असलेल्या व्यक्तीला जेव्हा पैसा,मानमरातब मिळत होता. व्यावसायिक सिनेमाने त्यांना नाकारलेल नव्हतं. कामाची त्यांच्याकड़े कमतरता नव्हती, तरी ते समांतर सिनेमाकडे वळले. प्रसंगी आपली मिळवलेली संपत्ती पणाला लागली, तरी बेहत्तर मात्र इर्षेला पेटून त्यानी बाजार हा चित्रपट केला. हे असं का घडल..? त्यांनी आपली कथा,आपलं म्हणणं जोरदारपणे समोर आणायचे म्हणून  समांतर चित्रपट  निर्मितीची वाट चोखाळली. बाजार नावाचा एक चित्रपट त्यानी स्वत: लिहिला,दिग्दर्शित केला व त्याची निर्मिती केली. ’बाजार’ ला ‘बाजार’ मिळावा म्हणून ते फिरलेही.

सेन्स ऑफ़ बिलॉंगिंग ,इप्टा आणि समांतर सिनेमा

मुंबईत शिकत असताना त्यांचा प्रगतीशील लेखक संघ व इप्टा या संघटनेशी संपर्क आला आणि त्यात ते सक्रीय झाले. मार्क्सवादाशी त्यांचा परिचय याच काळात आला. इप्टामध्ये त्यानी बलराज साहनी,चेतन आनंद,ए.के.हंगल यांच्यासोबत काम केलं. मार्क्सवाद,समाजवाद आणि मानसशास्त्र ह्या विषयाचे ते विद्यार्थी झाले. भरपूर वाचायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे या विषयावरील भरपूर पुस्तके आहेत. मानवी मनात तीन हजार वर्षाचा इतिहास साठलेला असतो आणि तो वाचन,लेखन,निसर्ग निरीक्षण,संगीत इत्यादी मधून परत आठवणीत येतो, असे ते एका मानसशास्त्रज्ञाचा हवाला देऊन सांगत असतात. एखाद्याला त्याच्या मुळापासून बेदखल करणाऱ्या शक्ती कोण आहेत?  एखाद्याने तो हिंदू आहे म्हणून किंवा मुस्लिम आहे, म्हणून आपल्या मातीपासून बेदखल होणं का स्वीकारावं? ह्या प्रश्नांनी सागर याना नेहमी अस्वस्थ केलं आहे. राज्यकर्त्यांनी लोकांना विभाजित केलं, त्यांना दारोदार भटकायला लावलं. फाळणीच्या अनुभवाने त्यांना दु:ख दिलं. त्यांच्या बाजूचे हजारो लोक मेले, देशोधडीला लागले मात्र जिवंत वाचलेल्या व आपल्या जमीन, जायदाद, शेती, घर गमवलेल्या आणि निर्वासित हा शिक्का कपाळावर मारलेल्या हजारो लाखो लोकांपैकी ते एक होते. बाकीच्यांच्या वाट्याला जास्तीच दु:ख आलं याची जाणीव त्याना स्वस्थ बसू देत नव्हती.  त्यानी दु:ख नावाच्या गोष्टीकडे समग्रपणे बघायला सुरुवात केली. फाळणीमुळे झालेल्या विस्थापनाची जाणीव त्यांना हैद्राबादमधील लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या मुस्लिम  महिलांच्या विक्रीच्या प्रश्नावर लक्षवेधक चित्रपट  तयार करण्याच्या दिशेने घेऊन गेली आणि बाजार नावाचा चित्रपट त्यांनी दिला.

चित्रपटसृष्टित स्टार, सुपर स्टार अशा सिनेमांच्या चलतीचा काळ होता. त्याला नाकारत, मानवी जीवनातल्या वास्तवाचे दर्शन सिनेमातून यायला हवे, असे म्हणत समांतर चित्रपट चळवळीची सुरुवात झाली होती. पश्चिमेत या प्रकारची चळवळ आधी सुरु झालेली होती ती इथे आली. कुठल्याही कृत्रिमतेशिवाय मानवी संवेदनाना, सामाजिक परिस्थितीला नीडरपणे लोकांसमोर प्रस्तुत करणे हे समांतर चित्रपटाच्या चळवळींनी केले. सामाजिक जाणीवा जागृत करणे, मानवी जीवनातील समस्यांना कलात्मक प्रकारे उपस्थित करणे, चित्रपट निर्माणाच्या नव्या संस्कृतीची निर्मिती करणे ज्यामध्ये नव्या टेक्निक असतील पण टेक्निकलाच महत्व नसेल तर कथा, दिग्दर्शनाला, कथा जे सांगू पाहतेय त्याला महत्व असेल, समाजाचा त्याच्या भूगोलाचाही प्रत्यक्ष सहभाग असेल या बाबी या ‘नया  सिनेमात’ केन्द्रस्थानी होत्या. वास्तविक समस्या चित्रित करीत असताना त्यांचं चित्रीकरण सुद्धा सबंधित भौगोलिक प्रदेशात व्हावं याकडे लक्ष देणे. स्त्री पुरुष सबंधाच्या जटिल प्रक्रियेला पडद्यावर आणणे. उपेक्षित विषयांना स्थान देणे, आकर्षक नसलेल्या प्रतिभाशाली कलाकारांना अवकाश मिळवून देणे, सशक्त कथा व संवादाचे महत्व केंद्रस्थानी असणे, ही समांतर चित्रपट चळवळीची काही वैशिष्ठे होती. समांतर चित्रपटांनी स्त्री शोषण,स्त्री पुरुष सबंध, शेतकरी जीवनाच्या समस्या, फाळणीने निर्माण केलेले प्रश्न, साम्प्रदायिकता, अंधश्रद्धा, काश्मीर प्रश्न, भ्रष्टाचार, लोकसंस्कृती इत्यादी प्रश्न पडद्यावर आणले.

चित्रपटात स्त्रीवादी चर्चाविश्वाला जो काही अवकाश मिळाला तो समांतर चित्रपटाची देण आहे. समांतर चित्रपटात स्त्रियांच्या ज्या समस्यांना अनैतिक,बिनमहत्वाच्या म्हणून टाळले जात होते त्यांना स्थान  मिळाले. विधवा, वेश्या ज्यांना माणूसही समजले जात नव्हते. त्यांच्या प्रश्नाला अवकाश मिळाला. सभ्यता आणि नैतिकतेच्या नावावर परिघावर असलेल्या स्त्रियांमध्ये असलेल्या मनुष्याला नाकारत हिंदी सिनेमा आदर्शवादी माता-भगिनी, पत्नी वगैरेच्या रुपात त्यांची महिमा उभी करण्यात व्यस्त होता. समांतर चित्रपटाने हे नाकारले. परिघावरील स्त्रियांचे प्रश्न चित्रपटसृष्टी व समाजाच्या केंद्रस्थानी आणले. निकाह, मंडी, भूमिका इत्यादी सिनेमे या प्रकारचे आहेत. ‘बाजार’ अशा नया सिनेमापैकी एक असूनही तो मेन स्ट्रिम सिनेमाच्या भाषेत ‘ सिल्वर ज्युबली ‘ साजरी करणारा ठरला हे महत्वाचं.

बाजार चित्रपट घडण्याची थोड़ी कहाणी

चित्रपटाच शूटिंग संपल की पार्ट्या व्हायच्या,नाच-गाणी, महागडी दारू वगैरे सगळ असायच. एकदा कभी-कभी चित्रपटाच्या दरम्यानच्या अशाच एका पार्टीत गाणी होती,दारू होती, कश्मीरी मुली नाचत होत्या. हे सगळे पाहून त्यांना प्रश्न पडला की एक प्रगतीशील लेखक, मार्क्सवादी कार्यकर्ता जो निर्वासित म्हणून या शहरात आला. तो कुठे रमत चाललाय ? ते पार्टीतून बाहेर पडले, काम सोडून द्याव असं वाटलं मात्र ते थांबले. एकएकी काम सोडून देणं इतकं सोपं नव्हतं.  दोन वेळेच्या जेवणाच्या भ्रांतीने त्यांना तिथे धरून ठेवलं. ‘कभी कभी’ नंतरच्या काळातच मुख्य प्रवाहातली फ़िल्मी दुनिया सोडून दुसरं काहीतरी करावं असं त्याना वाटत होतं. ‘सिलसिला’ होईपर्यंत दोन वेळच्या जेवणाच्या भ्रांतीचा प्रश्न ते सोडवत आले होते. नव्या कथेला घेऊन स्वतः चित्रपट लिहू, दिग्दर्शित करू, असे त्यांच्या मनी ठरत चालले होते. नया सिनेमा –  समांतर चित्रपट करण्याची मनात आखणी होत होती. सागर सरहदी यांनी  वर्तमानपत्रात हैद्राबाद मध्ये गरीब आई-वडिल पैशासाठी अरबांशी लग्न लावून देताहेत अशा आशयाची एक बातमी वाचली. ही बातमी त्यांना  बाजारच्या निर्मितीकड़े घेऊन गेली.

त्यांना या बातमीने अंतर्बाह्य हलवून सोडलं. अरब लग्न करून मुली घेवून जात आणि शोषण करून भारतात परत आणून सोडून देत. त्या काळात श्रीमंत अरबांसाठी  हैदराबाद हे मुलींच्या अशा

‘शिकारीची’ जागा बनले होते. लग्नाला अशा प्रकारच्या घाणेरड्या व्यापारात बदलले जाण्याने त्यांना अस्वस्थ केल.  स्वत:च्या घरच्या गरीबीमुळे सरहदी यांनी स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला होता. जेंडर सेन्सेटिव्ह असलेल्या सागर यांना त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांबद्दल राहिलेला आदर यामुळे ते हलून गेले. अधिक माहीती करुन घेण्यासाठी ते हैदराबादला गेले. पत्रकाराच्या भेटी घेतल्या, लेखकाना, तेथील सामान्य लोकाना भेटून लग्नाच्या बाजाराची माहिती  घेतली.  भूतपूर्व निजाम स्टेट मधल्या हैदराबाद मधली गरीबी, नवाब वगैरे असण्याचा वृथा अभिमान वगैरे बाबी त्यानी प्रत्यक्ष जावून माहिती करून घेतल्या अश्या एका लग्नाला हजर राहिले . आणि मग त्यांनी या भयाण वास्तवावर आधारलेली  बाजारची कथा लिहायला घेतली.

हिंदी चित्रपटाचा दृष्टिकोण पुरुषी राहिला आहे. हिंदी चित्रपटातुन  दाखविल्या जाणाऱ्या  स्त्रिया या कुणाच्या तरी अधीनस्थ म्हणून, सामाजिकदृष्ट्या दुर्बल म्हणून दाखविल्या जातात आणि पुरुष तारणहार म्हणून.  स्त्री मुस्लिम असेल तर ती सर्वप्रथम स्त्री  म्हणून अबला आणि नंतर धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून शोषित अशा पद्धतीने चित्रित केली गेली. बाजार चित्रपटाने हे सर्व नाकारले . बाजार चित्रपटाने स्त्री नायिकेला प्रधानता दिली. मुस्लिम महिलेच्या स्टीरियोटाइप प्रतिमांना छेद दिला. शोषित-अंकित समाजातल्या ,  आर्थिकदृष्टया गरीब. आपल प्रेम,आपली ओळख मिळविण्यासाठी जागरूक सोबतच आपल्या आर्थिक स्थानाबद्दल जाणीव ठेवून असणारी नायिका त्यांनी पडद्यावर आणली . भारतीय सिनेमात हे पहिल्यांदाच झालं होत . आपल प्रेम आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व धर्माच्या चौकटीचा हवाला देवून नाकारल जात आहे ह्याची त्यांना जाणीव होत असणाऱ्या ,आपला स्वत:चा समाज सोबतीला नसल्याने नजमा आणि शबनम मानसिक, भावनिक पातळीवर स्पष्टपणे भिडताना बाजार सिनेमात दिसतात . स्त्री ला वस्तू मानून तीचा धर्म,विवाह या चौकटी वापरून होणारा व्यापार हा चित्रपट अधोरेखित करतो. स्त्रीला तिच स्वतंत्र व्यक्तिमत्व हे तिच्या आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होण्यातुन मिळणार आहे व तिने स्वत:ला स्वतंत्र व्यक्ती म्हणून क्लेम करीत जाण हेच जास्त महत्वाचं आहे, हे तो अधोरेखित करतो. सलीम या पात्राच्या  एकूण संवादातून  सरहदी आपल म्हणणं आपल्यापर्यंत पोचविताना दिसतात.  अल्पसंख्यांक समाजातील स्त्रियांचे प्रश्न ह्या पद्धतीने हा चित्रपट पुढे सरकत नाही, तर त्या पलीकडेही हा सिनेमा काही सांगू पाहतो. ही या चित्रपटाची मला मजबूत बाजू ठरते. स्त्रीयांची व्यक्ती होण्याची, स्वयंपूर्ण व्यक्ती होण्याची धडपड चित्रपटातुन सरहदी यानी अधोरेखित केली  आहे. अनेक अडचणीतून त्यानी तो चित्रपट केला.मित्रांकडून पैसे उधार घेतले. स्मिता पाटिल, नसीरुद्दीन शाह, फारुख शेख यांच्याकडून उधारीवर अभिनय करवून घेतला. खय्याम याना घेवून गाण्याबाबतीत अभिनव प्रयोग केले. चित्रपट तयार झाला. लवकर वितरक मिळाले नाहीत. एव्हढ्या सगळ्या अडचणीतुन जेव्हा बाजार रीलिज झाला त्यानंतर मात्र भरपूर चालला. बाजारला यश मिळालं. त्यावेळी जर मी बाजार नसता केला तर मी कमर्शियल सिनेमे लिहून मरून गेलो असतो असे त्यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले आहे.  वो कौनसी ताकद है जो इन्सानको रिफ्युजी बना देती है ?’ या त्यांना छळणाऱ्या प्रश्नाचीच ‘बाजार ‘ही  स्त्री संदर्भातली अभिव्यक्ती होती.

जीवन जीने की कला.. 

अमेरिकन नाटककार युजीन ओ निल (eugene o neill ) ज्याच्या नाटकांना क्रातिकारी मानले गेले तो म्हणतो की जगात दु:ख आहे  आणि दू:खाला टाळत  तुम्ही काही चांगल काम करण्याचा प्रयत्न करता.नाटक लिहिता,कथा लिहिता,आणखी काही कलाकृती निर्माण करीता,राजकारण  करता ,व्यवसाय करता किंवा अभिनय करता वगैरे. त्याच्या आणि अमेरिकन अभिनेते लेखक ,नाटककार  चित्रपट निर्माते,संगीतकार वुडी एलन (woody allen ) याच्या एकूण यासबंधातल्या लेखनाचा सागर सरहदी यांच्यावर  प्रभाव असल्याच त्यांनी एका मुलाखतीत म्हटल आहे आणि ते  दु:ख मुक्तीचा एक प्रयत्न म्हणून चित्रपट लिहितात-विणतात असे त्यांनी म्हटले आहे.

जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम रिच (Wilhem Reich), सिमोन द बोवुआर (simone de beauvoir) इत्यादिंच्या जीवनविषयक दृष्टीचा खोलवर परिणाम त्यांच्यावर आहे.  सिमोनचे आपले खर्च कमी करा, हे म्हणणे त्यांना महत्वाचे वाटते. सृजनशील माणसाला आपले खर्च कमी करता आले तरच टिकाव धरता येणे शक्य आहे अन्यथा खर्च सांभाळण्याच्या दडपणाखाली आपण मरून जाऊ असे त्यांना वाटते. ते मुंबईत कोळीवाड्यात राहतात जी मुबंईतली तुलनेने स्वस्त जागा आहे. दोन वेळच्या भ्रांतीपुरते व्यावसायिक लिहिणे आणि उरल्या वेळात वाचन-लेखन, लोकांपर्यंत नाटक,सिनेमा पोचायला हवा यासाठी प्रयत्न करणे हे सर्व सागर सरहदी गेली अनेक वर्षे करताहेत.

महाविद्यालयात शिकताना, लेखक म्हणून घडताना त्यांना प्रगतीशील लेखक संघ,इप्टा मध्ये अनेक स्नेही मिळाले. ‘ हे  जग बदलायला हवं , जग बदलता येतं ‘  या विचाराला मानणारी राजिंदर सिंग बेदी,इस्मत चुगताई,के.ए.अब्बास सरदार जाफरी, कैफ़ी आजमी,सज्जाद जहीर यासारख्या मित्रांमुळे, मार्क्सवादाने त्यांना जगाला आणि स्वत:लाही प्रश्न विचारायला शिकवलं ,जीवन जगण्याचा एक दृष्टिकोण दिला. त्यांच जीवन समृद्ध केल . रिफ्यूजी ही ओळख जावून एक व्यक्ती ,एक लेखक ही ओळख या मित्राच्या सहवासातुन त्यांनी मिळाली .आपले दुःख,आपल्या मनातला राग ते  सिनेमा , साहित्यातून  सातत्याने मांडत आले . आजूबाजूचे  जग विशाल आहे ते समजून घ्यायला अधिकाधिक वाचत राहिले पाहिजे,ऐकले पाहिजे,समजून घेतले पाहिजे या विचाराने ते वाचत-लिहित असतात. गरजा कमी कमी करीत आणण्याचा प्रयत्न करीत जातायत , ‘ प्रशंसा होते आहे ,आपण प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत ‘ अशा समयी  मार्क्सवाद आत्मटिका नावाची गोष्ट सांगतो तिचा अवलंब वैयक्तिक जीवनात करणं, एकटेपणात खंबीर राहणं,नाटक भेंडीबाजारातल्या सामान्य मुस्लिमांना सुद्धा पाहता आलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणं, स्त्रीवादी भूमिकेतून जगाकडे व स्वत:कड़े  पाहण,स्वत:मध्ये बदल करीत जाणं म्हणजे सागर सरहदी . हा  अफलातून तरीही आपल्यापैकीच साधा सुधा वाटणारा जगायच का ते कळालेला माणूस आहे .

अशी माणसं थोडी असतात , सागर सरहदींसारखी अशी माणसं सांभाळायची असतात कारण ती समाजाचा, मानवी संस्कृतीचा ‘ शहाणपणा ‘सांभाळत असतात. अशा माणसांनीच हे जग भलं होण्याच्या शक्यता जिवंत ठेवल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0