महापुराने वेढलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची परिस्थिती गुरुवारीही गंभीर होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरात आले आणि नंतर
महापुराने वेढलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची परिस्थिती गुरुवारीही गंभीर होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरात आले आणि नंतर त्यांनी पूरग्रस्त परिसराची हवाई पाहणी केली. खराब हवामानामुळे मात्र ते सांगली जिल्ह्याची पाहणी करू शकले नाही. सरकार सर्व
पूरग्रस्तांना योग्य ती मदत देईल, एनडीआरएफ, लष्कर व हवाई दलाच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्यात येत आहे, कोणीही घाबरू नये. योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे आपल्याला सांगली दौरा रद्द करावा लागल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितले.
पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युद्धपातळीवर केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
पूरग्रस्तांसाठी १५ हजार तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रु.ची मदत
पुराने वेढा दिलेल्या गावातील पुरग्रस्तांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हालविण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांना संक्रमण शिबीरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार लसीकरण आणि औषध पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घरात पाणी शिरलेल्या पूरग्रस्तांसाठी १० तसेच १५ हजार हजार रुपये, पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ५ लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अधिक बोटी मागवणार
पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ६० बोटी उपलब्ध करुन दिल्या असून आणखीन जादा बोटी प्राधान्याने दिल्या जातील, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि पूरग्रस्तांसाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत केंद्र आणि राज्य शासन सतर्क असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्तीश: पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोल्हापूरातील पूरपरिस्थितीबाबत सातत्यपूर्ण केंद्र शासनाचा राज्य शासनाशी संपर्क असून पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी अलमट्टीचा विसर्ग गुरुवारी सायंकाळपर्यंत ५ लाख क्युसेक करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. यापुढील काळातही या दोन्ही राज्यामध्ये आवश्यक तो समन्वय ठेवून पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जाईल. असे ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापुरात पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांची व संक्रमण शिबिरातील लोकांशी त्यांनी चर्चा केली.
कोल्हापुरात गुरुवारीही पूरस्थिती गंभीर होती. जिल्ह्यात १३० गावांमध्ये अजूनही पाणी असल्याने सुमारे २८ हजार नागरिक सुटकेच्या प्रतिक्षेत आहे. या पुरात ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाल्याचे प्रशासनाने सांगितले. ९७ हजार नागरिकांनी पूरस्थिती पाहून आपली गावे सोडली आहेत. १५२ ठिकाणच्या ३८ हजार नागरिकांनी आपल्या मित्र किंवा नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. या पुराने कोल्हापुरात ३ हजार ८१३ घरे पडली असून ८९ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.
नागरिकांचे हाल सुरूच
गेले आठ दिवस विस्कळीत झालेला वीजपुरवठा गुरुवारीही सुरू झाला नसल्याने शहर व उपनगरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकत नाहीत अशी वीज खात्यापुढे अडचण आहे. शहरात औषधांची सेवाही पुरवली जात आहे. नागरिक स्वत:हून पूरग्रस्तांपर्यंत जाऊन मदत करत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारची अन्नधान्य व्यवस्था कोलमडल्याने तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था, नागरिक यांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. शहरातील पेट्रोल पंप बंद आहेत.
पंचगंगेवरील शिवाजी पूल बंद असला तरी पुरात अडकलेल्या लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांची सुटका छोट्या वाहनातून केली जात आहे. हजारोंचे संसार उध्वस्त तर झाले आहेतच पण पीके व जनावरेही गेल्याने एकप्रकारे दु:खाचे वातावरण पसरलेले दिसते.
सांगलीत बोट बुडाल्याने १४ जण बुडाले
सांगली जिल्ह्यात गुरुवारीही पूरस्थिती अतिशय गंभीर होती. संपूर्ण सांगली शहर महापुराने वेढले असल्याने नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अडथळे येत आहेत. त्यात पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट उलटल्याने बोटीतल्या १४ जणांना जलसमाधी मिळाली आहे. त्यापैकी ९ जणांचे मृतदेह मिळाले आहेत तर ७ बेपत्ता आहेत. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना चढवल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. बोटीत पुरेसे लाईफ जॅकेट्सही नसल्याची माहिती समोर येत आहे. बोटीचा पंखा झाडाझुडपात अडकल्याने बोट बुडाली. त्यामुळे बोटीतले सर्वजण पाण्यात पडले अशी माहिती आहे.
दरम्यान कृष्णा व वारणा नदीचे पात्र गुरुवारीही भरले होते. सांगली जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण सांगली शहर पाण्याखाली गेल्याने दूध, पाणी व भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी झालेली दिसत होती.
COMMENTS