सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश

सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विधिज्ञ सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंजूर केली आहे. सौरभ कृपाल हे समलैंगिक असून देशातील समलैंगिकांच्या अधिकाराची दखल घेण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचे हे मोठे पाऊल समजले जाते.

कृपाल यांच्या नावाला केंद्राचा दोन प्रकारे विरोध होता. एक तर त्यांच्या लैंगिकतेचा मुद्दा सरकारने पुढे केला होता तर दुसरा मुद्दा कृपाल ज्या व्यक्तीसोबत राहात आहेत ती व्यक्ती युरोपियन असून ती स्वीस दुतावासात काम करते, त्याला सरकारची हरकत होती. सरकारच्या मते अशा नात्याने हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो.

पण सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे हे आक्षेप बाजूला ठेवत कृपाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

गेले काही वर्षे सौरभ कृपाल समलैंगिकांच्या अधिकारासंदर्भात, हक्कांविषयी न्यायालयात अनेक खटले लढवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०१७मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या तत्कालिन मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त करावे असा प्रस्ताव संमत केला होता. या प्रस्तावालाही सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती.

त्यानंतर आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. यू. यू. ललित, ए. एम. खानविलकर यांच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी कृपाल यांच्या नावाच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केल्याने भारतीय न्यायव्यवस्थेत सामाजिक बदलाचे चित्र दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कृपाल यांच्या नियुक्तीशिवाय तारा वितस्ता गंजू, अनिश दयाल, अमित शर्मा, मिनी पुषकर्ना या वकिलांच्या नावावरही दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS