कोल्हापूरमध्ये चुरशीची कुस्ती !

कोल्हापूरमध्ये चुरशीची कुस्ती !

विधान परिषदेच्या एका जागेवरून राज्यमंत्री सतेज पाटील आणि एकेकाळचे सर्व सत्ताधीश असलेल्या महादेवराव महाडिक गटाचे अमल महाडिक यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे.

‘दिग्विजय सिंहांनी जे करायला हवं होतं ते मी केलं’
पात्र मतदारांकडून सरपंच पदाची निवडणूक
वाराणसी निवडणूकः सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल राखीव

‘आमचं ठरलं’ असे ब्रीदवाक्य असलेल्या अस्सल तांबड्या पांढऱ्या रश्श्याप्रमाणे झणझणीत आणि लवंगी मिरचीप्रमाणे ठसकेबाज व तिखटजाळ मिसळीचा राजकीय आस्वाद कधी कोणाच्या नशिबात येईल याची खात्री कोल्हापूरमध्ये कोणालाच नसते. इथे कोण कोणाचा? आणि कधी कोणाचा काटा किर्रर्र होईल याची खात्री नसते. आता विधान परिषदेच्या एका जागेवरून राज्यमंत्री सतेज पाटील आणि एकेकाळचे सर्व सत्ताधीश असलेल्या महादेवराव महाडिक गटाचे अमल महाडिक यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक गटात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीत ६ वर्षांपूर्वी सतेज पाटील यांनी महादेव महाडिक यांचा पराभव केला होता. तेव्हा महाडिक हे भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते तर पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे महाडिक आणि पाटील यांच्यात त्यावेळी जोरदार लढत झाली होती. या लढतीत सतेज पाटील यांनी महाडिक यांचा पराभव केला. आता ६ वर्षानंतर पुन्हा पाटील हे याच स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते पालकमंत्री असल्यामुळे आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे त्यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. कारण तीन पक्षाची मते सध्या त्यांच्या सोबत आहेत. विरोधात भाजपचे अमल महाडिक असल्याने आता साम, दाम, दंड आणि भेद या सर्व अस्त्रचा वापर या निवडणुकीत खुले आम होणार आहे.

सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्याबरोबरच गोकुळसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पाटील यांच्या सोबतीला राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आहेत. परिणामी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरूद्ध सर्व अर्थाने सक्षम उमेदवार कोण, याची चाचपणी गेले काही दिवस भाजपकडून सुरू होती. अमल महाडिक यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची नावे आघाडीवर होती. परंतु सतेज यांच्याविरूद्ध लढत देण्यासाठी महाडिक हेच पर्याय असू शकतात, असे ग्राह्य धरून भाजपच्या कोअर कमिटीने अमल महाडिक यांचे नाव निश्चित केले.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक असताना पहिल्या टप्प्यात सतेज पाटील यांनी भेटीगाठी घेत प्रचारातही बाजी मारलेली आहे. त्यांनी जिल्ह्यातील कुरूंदवाड नगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची भेट घेत आपला मतांचा दावा पक्का केला आहे. ही भेट भाजपसाठी अनपेक्षित अशीच ठरली आहे. येथील जालंदर पाटील हे भाजपचे महापौर असले तरी सतेज पाटील यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. या पालिकेत भाजपच्या २० नगरसेवकांचा समावेश असून काँग्रेसचे ६ नगरसेवक आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्यासाठी मतांची ही बेगमी फायद्याची ठरू शकते.

महादेवराव महाडिक यांनीही शिरोळला जाऊन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावक्रर गटाचे जयसिंगपूर नगरपालिकेत १८ नगरसेवक आहेत. महादेवराव महाडिक हे स्वतः जातीने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.  त्यामुळे यंदा अनेक थैल्या रिकाम्या होणार असून अनेकाना लक्ष्मी दर्शनाचा लाभ होणार यात शंका नाही. तसेच त्यामुळे पक्षीय चुली बाजूला ठेवून पाहुण्यांरावळ्यांचे राजकारण या चुरशीच्या निवडणुकीत शिजणार आहे. महाडिक यांना विनय कोरे तसेच प्रकाश आवडे यांची मिळणारी साथही महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाविकास आघाडीची पकड मजबूत आहे. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अशावेळी भाजप पुरस्कृत असणाऱ्या महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव केला होता. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सतेज पाटील विधानपरिषदेची ही निवडणूक सहज जिंकतील अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदार संख्या ४१७ इतकी असून पक्षीय बलाबल चा विचार केला तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमुळे सतेज पाटील यांचे पारडे तूर्तास जड आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता जिल्ह्यातील  जयसिंगपूर पालिकेत  २७ मतदार असून त्यात  शाहू आघाडी यड्रावकर गट -१६ आणि  ताराराणी भाजप ११ असे संख्याबळ आहे. इचलकरंजी  पालिकेत ६२ मतदार असून त्यात काँग्रेसचे १८, भाजप १४,  राष्ट्रवादी ७ कारंडे गट ९, ताराराणी आघाडी आवडे गट ११ आणि  शिवसेना १ असे संख्याबळ आहे. शिरोळ पालिकेत १७ मतदार असून शाहू आघाडी (राष्ट्रवादी)१०,  भाजप ६ तर एक जागा रिक्त आहे. हुपरी पालिका १८ मतदार असून त्यात  भाजप ७, ताराराणी गट(आवडे) ५,  मनसे २ शिवसेना २ आणि अपक्ष२.  आजरा पालिकेत १७ मतदार असून भाजप ९, राष्ट्रवादी-काँग्रेस ६ आणि अपक्ष २. मलकापूर पालिकेत १७ मतदार, असून त्यामध्ये  जनसुराज्य-भाजप-९ आणि  राष्ट्रवादी-सेना ८. पन्हाळा पालिकेत १७ मतदार असून जनसुराज्य १२ तर स्थानिक आघाडी ५. मुरगुडमध्ये १८ मतदार असून शिवसेना १५ आणि राष्ट्रवादी ३. गडहिंग्लजमध्ये १९ मतदार असून जनता दल १२, राष्ट्रवादी ६ आणि शिवसेना १. पेठ वडगाव मध्ये १७ मतदार असून युवक क्रांती १३, यादव आघाडी ४. कागल पालिकेत २० मतदार असून राष्ट्रवादी ९, भाजप ९ आणि शिवसेना २. चंदगड मध्ये १७  मतदार असून त्यात भाजप ५, राष्ट्रवादी २, काँग्रेस ६ आणि  शिवसेना ४. हातकणंगलेमध्ये १७ मतदार असून भाजप ५, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे.

२०१४ मध्ये सतेज पाटील यांना अमल महाडीक यांनी  विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच २०१५ मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडिल व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडीक यांना पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहीली. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने ते २०१४ मधील विजयाची पुनरावृत्ती करणार? की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार? याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे.  त्यामुळे या निवडणूकीतील रंगत वाढली आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0