४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू

 ४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ग्रामीण भागातील ५वी ते १२वी तर शहरी भागातील ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहेत.

संपूर्ण राज्यामध्ये ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की राज्यात ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. शाळांमध्ये मुले जाताना तयार केलेले नियम महत्त्वाचे असतील. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाल्या, “७ जुलै २०२१ रोजी सरकारने जीआर काढला होता, की ज्या ग्रामीण भागात कोविडमुक्त झाला आहे, तिथे ८ वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार सूचनाही  दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १० ऑगस्ट रोजी त्याच्या सूचना देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर अजून काही सूचना दिल्या. ”

हा निर्णय निवासी शाळांना लागू नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

COMMENTS