वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, हाच छद्मविज्ञानाचा पराभव

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, हाच छद्मविज्ञानाचा पराभव

सन २०१३ मध्ये नाशिक शहरातील तपोवनात ३० मे ते सहा जून या कालावधीत पर्जन्यवृष्टीची इच्छापूर्ती होण्यासाठी यज्ञ-याग विधी पार पडला. यज्ञ करून निसर्गनियमात बदल करण्याचा अवैज्ञानिक दावा केल्यामुळे या प्रकाराला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध केला. ‘यज्ञ संस्कृती’ विज्ञानविरोधी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असल्याने राज्यघटनेची तत्त्वे उघडपणे पायदळी तुडविण्याचा हा प्रकार असल्याची भूमिका ‘अंनिस’ने घेतली. संतांच्या आणि समाजसुधारकांच्या सत्यशोधकी व पुरोगामी कृतिशील विचारांचा ‘पर्जन्यवृष्टीसाठी यज्ञ’ हा अपमान होता अशी भावना ‘अंनिस’ने व्यक्त केली. त्यानंतर काही दिवसातच म्हणजे २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात खून झाला. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या या तर्कनिष्ठ सुधारकाला आपले बलिदान द्यावे लागले. त्या घटनेनंतर दरवर्षी भारतातील अनेक सामाजिक संघटना, ज्यांचा वैज्ञानिक जीवनपद्धतीवर आणि संविधानातील मूल्यांवर गाढ विश्वास आहे, त्या सर्व संस्थांनी २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे मे २०१४ मध्ये भारतीय लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर अभूतपूर्व असे सत्तांतर झाले. हे सत्तांतर लोकशाहीच्या शक्तीस्थानांना आणि राष्ट्रीय भावना बळकट करण्यासाठी, विकासाचे आधुनिक राजकारण करण्यासाठी आणि बरीच दशके प्रस्थापित अशा सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय व्यवस्थेतील मरगळ झटकण्यासाठी आवश्यक होते अशी भावना बहुसंख्य भारतीयांनी व्यक्त केली. एकविसाव्या शतकात भारताला महासत्ता बनवण्यासाठी कालबाह्य परंपरांनी बुरसटलेल्या समाजाला आणि लोकशाही व्यवस्थेतील खिळखिळ्या झालेल्या प्रक्रिया आणि स्वार्थी हितसंबंधी राजकारणाला असा धक्का बसणे ही आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरोग्यास हितकारक घटना होती. याआधी १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यावर भारतीय जनतेने मतपेटीतून जो आदेश दिला त्यातून लोकशाहीचीच एक प्रकारे पुनर्स्थापना झाली. त्याच अंगाने पण एका मर्यादित अर्थाने २०१४ मध्ये भारतीय लोकशाही आता अधिक प्रगल्भ झाली असे तेव्हा करोडो भारतीय मतदारांना वाटले होते. पण ते खरे होते का असा प्रश्न आज पडत आहे यात शंका नाही.

जीवनातील आवश्यक बदलांचे समाजमानातील विचारांचे स्पंदन मतपेटीतून व्यक्त झाले परंतु हा आनंद काही दिवसच टिकला. गोरक्षकांनी या सत्तांतराचा त्यांना अभिप्रेत असलेला अचूक आणि बिनतोड असा सोयीचा अर्थ काढून आपल्या हिंसेला सारे रान मोकळे असल्यासारखे वागायला सुरुवात केली. यात आणखी मोठी भर म्हणून सरकारचे बहुतांशी मंत्री, संसदेचे खासदार आणि सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारताच्या इतिहासातील- पुराणातील कथांची शहानिशा न करता आपल्या सामूहिक ज्ञानामध्ये अनेक अवैज्ञानिक अफवा सोडल्या आणि छद्मविज्ञानाच्या खोट्या कहाण्या ‘विषारी व्हायरस’ सारख्या सोडण्यात ते यशस्वी झाले.

खरं तर जेव्हा नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हापासूनच संपूर्ण देशाने “भारताच्या इतिहासात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करण्यासाठी झालेला एकमेव हुतात्मा”, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर देशभरात वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आस्था आणि छद्मविज्ञानबद्दल प्रचंड राग व्यक्त व्हायला हवा होता. परंतु ज्या वेगाने २०१४ पासून राजकारणाच्या उन्मादावर स्वार होऊन हिंदुत्त्ववादी विचासरणी असलेल्या संघटना लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये सत्तेवर आल्या, तेव्हापासून तर्कनिष्ठ, विवेकवादी आणि वैज्ञानिक जीवनपद्धतीचा प्रचार करणाऱ्या विचारवंतांचा, लेखकांचा आणि पत्रकारांचा छळ सुरु झाला. याचीच परिणीती पुढे कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या होण्यामध्ये झाली. २० फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड पानसरे, ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश शहीद झाले. आधुनिक वैज्ञानिक विचार-पद्धतीबद्दल आक्षेपार्ह विधाने, जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक मापदंडांना खोटे ठरवणारे खोडसाळ दावे आणि अपुऱ्या सत्यावर आधारित पण एका विशिष्ट अशा बेगडी हिंदुत्त्ववादाला खतपाणी घालणारे प्राचीन भारताचे अति-गौरवीकरण करणाऱ्या सुरस कथा देशासमोर येत गेल्या.

सर्व घटनाप्रक्रियेचा २०१४ नंतरच्या काळाच्या तुलनेत जर आपण आलेख काढला तर या विचारवंतांच्या हत्या झाल्या त्याच्या एकदम समांतर हा प्रवास आहे. हा निश्चितच योगायोग नाही, याची नोंद करायलाच हवी.

विज्ञानाच्या विविध शाखांच्या संदर्भात आणि वैज्ञानिक प्रगतीच्या ढोबळ मानकांच्या अंगाने कोणते कोणते अविश्वसनीय, सिद्ध न होऊ शकणारे आणि कपोलकल्पित दावे केले गेले याचा आढावा घेतल्यास लक्षात येते, की ही यादी एवढी मोठी आहे, की या प्रत्येक दाव्याच्या सभोवताली असलेल्या सांस्कृतिक-सामाजिक-ऐतिहासिक संदर्भचौकटीची येथे विस्तृत मांडणी कदाचित करता येणार नाही. परंतु यानिमित्ताने, अशा सर्व छद्मविज्ञानी उद्घोषणा करण्याचा छंद असणाऱ्या लोकांनी काय काय अतिरंजित घोषणा केल्या होत्या त्याचा व्यापक पट समजावून घेणे आणि त्या सर्व खोट्या दाव्यांचे दस्तऐवजीकरण करणे या घडीला महत्त्वाचे वाटते.

२०२० मध्ये भारतीय प्रजासत्ताक ७० वर्षाचे झाले. भारताचे सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजसत्ताक असण्याचे अनेक ऐतिहासिक अर्थ आहेत. त्यामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या आधुनिक मुल्याना तर प्रमाण मानले आहेच. त्याशिवाय आधुनिक जीवन शक्य करणारे आणि विवेकवादी, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक अशा उन्नतीची बीजे फुलवणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूलतत्त्व सुद्धा या संविधानाने प्रमाण मानले आहे. हे तत्त्व आपल्या संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या स्वरूपात स्थापित करण्यात आले आहे. संविधानाच्या कलम ५१ अ नुसार या कर्तव्याचा आणि त्यायोगे येणाऱ्या कर्तव्यभावनेचा प्रसार करणे हे आपल्या न्यायधर्माचा आग्रह धरणाऱ्या प्रजासत्ताकाचे एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे.

भोंदूगिरी पसरवणाऱ्या पुरावा-शून्य दाव्यांची मालिका

सध्या जगभरात मृत्यूचे थैमान घातलेल्या कोव्हिड-१९ या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावर भारतीय प्राचीन काळापासून उपचार जाणून होते, अशा प्रकारच्या तर अनेक अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बातम्यांची सुनामीच आली आहे. प्राचीन काळात भारतीयांनी कोणकोणते शोध लावले होते, याबद्दलच्या दाव्यांची यादी बरीच मोठी आहे व तिच्यात रोज भरही पडत आहे

भारतीय सायन्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात मागील सहा वर्षांमध्ये पुराण आणि धर्मावर आधारित सिद्धांत किंवा त्यांना समोर ठेवून आधुनिक शोध लागल्याचे खोटे दावे सांगितले जातात आणि खेदाने सांगावे लागत आहे, की अशी परंपराच आता रूढ झाली आहे की अशा दाव्यांशिवाय विज्ञान काँग्रेस पूर्णच होत नाही. त्यातील महत्त्वाचे शोध म्हणजे क्लोनिंग (उदा. शंभर कौरवांचा जन्म), प्लास्टिक सर्जरी (उदा. गणपती – माणसाच्या धडावर हत्तीचे डोके), इंटरनेट (उदा. संजयची दिव्यदृष्टी), प्रक्षेपणास्त्रे इ. याशिवाय भारतीय परंपरेतील अनेक बाबी – आयुर्वेद, आहारविहार आणि ऋतुचर्या-दिनचर्या याविषयीच्या लोकसमजुती, स्थापत्य, धातुविज्ञान (मेटॅलर्जी), पारंपरिक शेतीतील पर्यावरणविषयक विचार, वगैरे आणखी अनेक उदाहरणे सांगता येतील. आणखी काही दावे खालीलप्रमाणे:

  • भारतात पुरातन काळी जनुकीय अभियांत्रिकी (genetic engineering) आणि प्लास्टिक शल्यचिकित्सा पूर्वीपासून अस्तित्वात होते असे मत पंतप्रधान मोदींनी नोंदवले होते.
  • महाभारत काळापासूनच इंटरनेट होते असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केला.
  • ‘माकड पूर्वज नव्हते, डार्विनचा सिद्धांत खोटाच असल्याचा दावा केंद्रीय केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केला होता. या मंत्र्यांनी हा सुद्धा दावा केला आहे, की प्राचीन भारतीय पुराण, रामायण यामध्ये विमानांचा प्रथम उल्लेख आला होता. तसेच राईट बंधूनी विमानाचा शोध लावण्याच्या ८ वर्षे आधी शिवकर बाबुजी तळपदे या माणसाने विमानाचा शोध लावला होता.
  • समलैंगिकता एक जनुकीय दुर्व्यवस्था (जेनेटिक डीसऑर्डर) असल्याचे मत भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले होते.
  • मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांनी हजारो वर्षांपूर्वीच भारतात अणूचाचणी घेण्यात आल्याचा दावा केला होता.
  • एका राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी पुरातन वेदांमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनच्या E = m*c(2) या सिद्धांतांपेक्षा वरचढ अशा सिद्धांतांचा उल्लेख असल्याचा दावा केला होता.
  • काही आठवड्यांपूर्वी, म्हणजे १७ ऑगस्ट २०१८ ला सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर काम करणारे एस. गुरुमूर्ती यांनी एक ट्वीट केलं होतं. “शबरीमला मंदिरात सर्वांना प्रवेशाची मागणी केरळच्या पुराला जबाबदार आहे का, या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी विचार करायला हवा.” “…अय्यपन देवाच्या विरोधात कोर्टाने निर्वाळा करणं लोकांना आवडणार नाही,” असं ते म्हणाले होते.
  • एका विज्ञान काँग्रेसमध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी रामायणातील एका राक्षसी राजाकडे २४ प्रकारची विमाने आणि अनेक धावपट्ट्या असल्याचा दावा केला होता. भारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती, तेव्हाची विमाने पृथ्वीवरच नव्हे, तर परग्रहांवरदेखील जात असत. उलटसुलट कोणत्याही दिशेने उडणारे, आकार बदलणारे किंवा अदृश्य होणारे विमान, आदी या निबंधातील कल्पनेच्या भराऱ्या होत्या. (संदर्भ : जानेवारी २०१५ मध्ये मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय विज्ञान परिषदेतील कॅप्टन आनंद बोडस व अमेय जाधव यांनी सादर केलेला ‘प्राचीन काळातील विमानविद्या’ बद्दल मांडलेला शोध (?) निबंध — लिंक : Loksatta https://www.loksatta.com/vigyan-bhan-news/article-about-aeronautical-study-in-ancient-india-by-ravindra-rukmini-pandharinath-1663225/)
  • प्राचीन भारतात स्टेम सेल संशोधन, धातुविज्ञानापासून अणुविज्ञानापर्यंत आणि विमानापासून क्लोनिंग व प्लास्टिक सर्जरीपर्यंत बहुतेक सारे शोध लागले होते, असा दावा अनेक जण करतात.
  • भूगर्भशास्त्रज्ञ आशु खोसला यांनी असा दावा केला होता, की ब्रह्मदेवाने डायनासोरसचा शोध लावला होता आणि त्याचे दस्तऐवजीकरण पुराणातील धर्मग्रंथांमध्ये करण्यात आलेले होते.

मागील सहा वर्षांच्या केंद्र सरकारच्या राजवटीमध्ये छद्मविज्ञान हे विज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून सोडण्याचे काम या प्रकारच्या दावे करणाऱ्या लोकांनी आणि या प्रकारच्या खोट्या दाव्यांना समर्थन देणाऱ्या संस्थानी केले आहे.

वैज्ञानिक पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समकालीन भूमिका

आपला गौरवशाली इतिहास, परंपरा व संस्कृती आणि त्यांचा आपण विज्ञानात महान शोध लावून प्रगती करण्याबद्दल आपली भूमिका काय असायला हवी.

१) आजच्या काळात आणि विशेषतः २०१४ नंतर आणि त्याही आधी सुद्धा केले गेलेले किंवा त्यांच्यापकी काही असे शोध (किंवा संबंधित वादग्रस्त दावे) जर भारतीयांनी लावले असतील, तर आपल्याला त्याचा अभिमान असेल.

२) या संदर्भातील दाव्यांची सत्यता किंवा त्याचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी आपण आतापर्यंत जी वैज्ञानिक पद्धती शिकलो त्या आणि इतर तितक्याच तार्किक परीक्षा, पुरावे किंवा तपास-पद्धतींचा वापर करायला हवा.

३) एखाद्या वैज्ञानिक शोधाचा संदर्भ धार्मिक, सांस्कृतिक किंवा इतर पौराणिक ग्रंथांत दिला आहे की नाही हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी व्यक्तीने व्यासंगी टिपणी केली नसेल, तर त्याला वैज्ञानिक दृष्टीने काही अर्थ नाही.

४) तज्ज्ञ व्यक्तींच्या बहुसंख्य अशा दाव्यापेक्षा त्याच्यासाठी मांडला गेलेला पुरावा अधिक ग्राह्य धरला जावा. जेवढा पुरावा, तेवढा विश्वास !

५) पुरेशा पुराव्याच्या अभावी एखादा शोध वैज्ञानिक ठरतो का नाही, हे त्याच्या केवळ सांस्कृतिक-सामाजिक चौकटीवर न ठरता त्या पुराव्याची मर्यादा आखून दिलेल्या तार्किक संदर्भ कक्षेवर ठरते.

६) एखाद्या असत्य वैज्ञानिक दाव्यासाठी जसे संपूर्ण संस्कृती-परंपरा अवैज्ञानिक ठरू शकत नाही त्याचप्रमाणे एखाद्या संस्कृती-परंपरेमधील काही वैज्ञानिक पुरावा असलेले शोध असतील तर ती संपूर्ण संस्कृती विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील शोधांनी परिपूर्ण आहे असे समजण्याचे कारण नाही. प्रत्येक दाव्याचा आढावा त्या त्या बाबीमधील तपशिलाचा गुणात्मक आलेख मांडून घेतला जावा आणि केवळ त्या मुद्द्याचा अपघाताने किंवा जाता जाता स्पर्श करणाऱ्या संबंधित मुद्द्यांची नोंद करून त्याच्या सत्यतेचे प्रमाणपत्र देऊ नये.

७) विज्ञान म्हणजे कोणत्याही विषयशाखेचा मुळापासून किंवा कारणमीमांसेसह केलेला अभ्यास. एवढेच नाही तर एखादा नवीन सिद्धांत मांडताना या सिद्धांतानुसार कोणता प्रयोग केल्यास, काय निकाल मिळेल हे देखील आधीच सांगता आले पाहिजे. या शेवटच्या निकषास falsifiabilty असे म्हणतात. म्हणजेच जर नवीन सिद्धांताने केलेले हे भाकीत चुकले तर आपला सिद्धांत चुकीचा आहे हे मान्य करण्याची तयारी वैज्ञानिकांची असते. असा मोकळेपणा वैज्ञानिक चमत्कार किंवा प्राचीन भारतातील विज्ञानाबद्दल अवास्तव दावे करणारे राजकीय-सामाजिक कार्यकर्ते दाखवतील का?

(संदर्भ : https://www.loksatta.com/lokprabha/your-point-of-view-should-be-scientific-rather-than-superstitious-1057093/)

अपूर्ण दावे, फेक बातमी आणि छद्म-विज्ञान यांचे राजकारणाशी नाते  

कोणतीही सत्ता किंवा शक्तीस्थान हे माहितीच्या एकेरी (अपूर्ण) वाहतुकीवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेत असते. या प्रकारच्या कट-कारस्थानामध्ये विज्ञानाबद्दल लोकांची समजूत दूषित करणे हा प्रमुख अजेंडा नसून, आपल्या इतिहासाबद्दल चुकीच्या गौरव-भावना उद्द्दीपित करून नागरिकांना केवळ एकाच प्रकारच्या राजकीय विचारधारेच्या प्रवाहाशी संलग्न करून घ्यायला भाग पाडणे हा मुख्य उद्देश आहे.

वैज्ञानिक विचारपद्धतीचे खच्चीकरण केल्यावर हे करणे सोपे जाते आणि यामुळे कोणत्याही तार्किक, चिकित्सक प्रश्नांची उलटतपासणी टाळता येते. प्रस्थापित सामाजिक-सांस्कृतिक सामंजस्य असलेली उदार मूल्यव्यवस्था आणि ज्ञानव्यवस्था मोडून काढून आपल्या सत्तेच्या ध्येयमार्गावरील (रोडमॅप) अनुकूल अशा विचारशक्तींचे रोपण करणे हा यातील उघड असा डाव आहे. पण त्यासाठी विज्ञानाचा बळी का दिला जात आहे? कारण विज्ञान हे पुराव्याशिवाय कोणताही शक्तिशाली दावा/संकुचित आयडियॉलॉजी सिद्धांत म्हणून मान्य करत नाही. उजव्या विचारसरणी असलेल्या शक्ती जगभर कोणत्याही संवादाशिवाय किंवा कोणत्याही स्पर्धात्मक अशा वाद-विवादाशिवाय जनतेने शिरोधार्य मानाव्यात यामागे विज्ञानाचे शिक्षण (म्हणजेच विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे) आपल्या विचारधारेच्या अंकित असले पाहिजे अशी यामागे धारणा आहे.

अपेक्षित असलेला परिणाम साधण्यासाठी आवश्यक ते समज – गैरसमज पसरवण्यासाठी सत्तेमध्ये असलेल्या लोकांना त्यांच्या विचारधारेचे अंधानुकरण करणाऱ्या तसेच प्रश्न न विचारणाऱ्या लोकांची गरज भासते. त्यासाठी बदलत्या जगाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्यापेक्षा आणि विवेकी दृष्टिकोनाने सर्व जगातील बदल समजून घेण्यापेक्षा सत्तेतील राजकीय विचारधारेला संकुचितपणे स्पर्श करणारे असे अनुयायांचे जगाबद्दलचे त्यांचे पूर्वग्रहदूषित मत घट्ट करणारे इव्हेंट आणि सनसनी घोषणापत्र हवे असतात.या घोषणा बऱ्याच वेळा पुराणातील आपल्या देशाचा (अति)गौरव वाढवणारे आणि आधुनिक जगातील वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या तत्त्वाच्या पूर्णपणे विरोधात असतात. सोशल मीडियामध्ये ज्या प्रकारे संदेश वाहन होते त्यामध्ये या प्रकारच्या भरपूर मल्टिमीडिया आणि दृश्य माध्यमाच्या प्रभावी शक्यता उपलब्ध असतात. नेमका याचाच फायदा प्रचंड आर्थिक-तांत्रिक संसाधने आणि कार्यकर्ता मनुष्य बळ असलेल्या सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाने मागील सहा वर्षांत घेतला.

भारतीय लोकशाही प्रजासत्ताकासाठी वैज्ञानिक भान का गरजेचे आहे ?

गोविंद पानसरे एका लेखात म्हणाले होते, “भारतीय राज्यघटनेने प्रतिपादलेला वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय नागरिकांच्या अंगी बाणवण्यासाठी खास व वेगळे प्रयत्न व्हायला हवेत. आपला अभ्यासक्रम तसे प्रयत्न तर करीत नाहीच; उलटा प्रयत्न करताना दिसतो. आपली प्रसारमाध्यमे अवैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा हेच शिकवितात. कार्यकारण भाव म्हणजे प्रत्येक परिणामामागे काही तरी कारण असतेच असते. प्रत्येक परंपरेची चिकित्सा करावयास शिकवले, तर वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हायला फार मोठी मदत होईल. विज्ञानाची प्रगती होतच राहते. विज्ञानावर आधारलेले तंत्रज्ञान तयार होतच असते. या तंत्रज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष अनुभवास येते, म्हणून तंत्रज्ञानाचा वापर होतो. परंतु असे का, हे न विचारण्याच्या शिकवणुकीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यास अडथळा तयार होतो. योग्य शिक्षणाचा अभाव, योग्य दृष्टिकोन न शिकवणे यातून अवैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. तंत्रज्ञानाचा वापर होतच राहतो, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होत नाही.” (साभार : साधना साप्ताहिक, ३० ऑगस्ट, २०१४)

गोविंद पानसरे यांच्या या विवेचनानुसार विचार केला तर समजून येईल, की भारतीय प्रजासत्ताक टिकून राहण्यासाठी आधुनिक उदारमतवादी मुल्याना रुजणे खूप आवश्यक आहे. ही मूल्ये शिक्षण, आर्थिक प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने आपल्या जगण्यात उतरतील या गोड गैरसमजात आपण राहू नये. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चिकित्सक वृत्तीची जोपासना करणे ही वैज्ञानिक विचारपद्धती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या विकासासाठी आवश्यक आहेतच. पण त्याचबरोबर लोकशाहीतील मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी, मागासवर्गीय (आर्थिक व सामाजिक) वर्गाच्या विरोधातील अन्याय दूर करण्यासाठी आणि लिंग-धर्म-जात-प्रदेश-भाषा या भेदभावाच्या पलीकडे जाऊन एक समताधिष्ठित समाजाकडे वाटचाल करणे हे आपल्या प्रजासत्ताकाच्या संविधान उद्देशिकेमध्ये प्रकट झालेली भावना आहे. त्यासाठी सुद्धा दैनंदिन जीवनात चिकित्सक, विवेकी आणि सुसंवादी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. ज्याप्रमाणे लोकशाही उदारमतवादी चळवळ, समाज सुधारणा आणि विकासाचे राजकारण हा अखंड चालणारा प्रवास आहे. त्याचप्रमाणे चिकित्सक दृष्टिकोन दररोजच्या जीवनात आपल्या वागण्यामध्ये आणून सतत मुक्त नजरेने शिकत राहून प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आपण दररोज वापरले पाहिजे. निर्भयपणे आपली लोकशाही पुढे जाऊन आपली प्रजासत्ताक मूल्ये टिकवण्यासाठी म्हणूनच छद्मविज्ञानाचा पराभव करणे हे आपले दररोजच्या जगण्याच्या लढाईतील एक महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हाच छद्मविज्ञानाचा पराभव आहे.

राहुल माने, विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS