‘ग्रेप्स ऑफ रॉथ’चा प्रयोगशील अनुवाद

‘ग्रेप्स ऑफ रॉथ’चा प्रयोगशील अनुवाद

‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ (१९३९) ही जॉन स्टाइनबेक यांची विस्थापनाच्या व्यापक समस्येवर लिहिलेल्या कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध झाला. अनुवादक म्हणून मराठीतून तिचा अनुवाद करताना कादंबरीच्या प्रमुख वैशिष्ट्यांची विशेष दखल घेऊन एकतर कथन प्रमाणभाषेत आणि व्यक्तिरेखांचे संवाद मिश्र-वऱ्हाडी बोलीभाषेत असा प्रयोग केला आहेच, पण परिणाम साधण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी प्रदीर्घ अशा अनुवाद-प्रक्रियेतून जाणं भाग होतं. १९३९मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही अक्षर साहित्यकृती आज ऐंशी वर्षानंतर अनुवादित स्वरुपात वाचकांसमोर येत आहे. त्या निमित्ताने या सर्जनशील साहित्यकृतीला अनुवादाद्वारे न्याय देण्याच्या दृष्टीने गेली पाच वर्षं ज्या अनेक स्तरांवर प्रयत्न केले, त्याबद्दल उपरोक्त तीन वैशिष्ठ्यांच्या अंगाने हितगूज साधण्याचा हा एक प्रयत्न.

बालगृहातील २०९ विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण
संकटग्रस्त ग्रेट अंदमान जातीलाही कोरोना लागण
वेतन कपातीस व भाडे घेण्यास मनाई

‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ (१९३९) ही लोकाभिमुख अमेरिकन लेखक जॉन स्टाइनबेक यांची विस्थापनाच्या व्यापक समस्येवरील जगप्रसिद्ध कादंबरी. आज आठ दशक झाली तरी तिचं महत्त्व कमी झालेलं नाही. कारण, विस्थापनाच्या समस्या काळाबरोबर आणखी वाढल्या आहेत आणि त्यामुळे, ती अधिकच महत्वाची ठरते.

लोकांना या विस्थापनाच्या समस्येचं आकलन राजकीय-सामाजिक संदर्भासह आणि मानवी दृष्टिकोनातून साध्य व्हावं, यासाठी लेखक जॉन स्टाइनबेक यांनी आपली प्रतिभा पणाला लावली. एक पत्रकार म्हणून विस्थापितांच्या जत्थ्यांमध्ये जाऊन त्यांनी या समस्येचा बहुअंगाने अभ्यास केला आणि नंतर आशय वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवण्यासाठी या कादंबरीद्वारे मुळात कादंबरी प्रकाराच्या आकृतीबंधातच सर्जनशीलतेने अनेक प्रयोग साध्य केले.

पहिलं म्हणजे, कादंबरीची वैशिष्ट्यपूर्ण रचना. प्रत्येक दीर्घ प्रकरणानंतर एक लघु प्रकरण, यानुसार एकूण ३० प्रकरणांची ही दीर्घ कादंबरी. दीर्घ प्रकरणांतून प्रातिनिधिक अशा विस्थापित कुटुंबाची कथा पुढे जाते, तर लघु प्रकरणांतून बदलतं सामाजिक-राजकीय वातावरण चित्रित होतं व त्यातील कोलाहल, हुंकार, ध्वनी परिणाम यातून समूहजाणीव व्यक्त होते. या बहुपेडी कादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य असं, की कादंबरीतील कथन जरी अमेरिकन प्रमाणभाषेत असलं, तरी यांतील वंचित विस्थापित-स्थलांतरितांच्या व्यक्तिरेखांच्या परस्पर संवादासाठी एका विशेष अशा ‘वर्गबोली’ची अर्थात ‘आऱ्गो’ची (argot) योजना केलेली आहे – लेखकाने याद्वारे परिणामकारक ठरेल अशी खास संवादशैली साध्य केली. तिसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, स्थळकाळाचं सूक्ष्म आणि जिवंत वर्णन. या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ही कादंबरी अमेरिकन नव-साहित्यामध्ये नवे मानदंड निर्माण करणारी ठरली आणि तिला ‘पुलित्झर पुरस्कार’ प्राप्त झाला. पुढे १९६२मध्ये स्टाइनबेक यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ‘नोबेल पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आलं.

स्थळकाळाचं सूक्ष्म आणि जिवंत वर्णन

ग्रेप्स ऑफ रॉथ चित्रपटातील हडसन ट्रक

ग्रेप्स ऑफ रॉथ चित्रपटातील हडसन ट्रक

या कादंबरीत घडणाऱ्या विस्थापनाच्या घटनांना १९३०च्या दशकाची पार्श्वभूमी आहे. तेव्हा अमेरिकेतील सामान्यजनांना तीन अरिष्टांना सामोरं जावं लागलं होतं – एक म्हणजे, आर्थिक महामंदी; दुसरं म्हणजे, दक्षिण व मध्य अमेरिकेत आलेलं धुळीचं प्रदीर्घ वादळ (डस्ट बोल), ज्यामुळे शेतजमिनींची नासाडी झाली; आणि तिसरं म्हणजे, मोठ्या प्रमाणावरील भांडवल-केंद्री शेती व यांत्रिकीकरणाचा पुरस्कार, ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांवर विस्थापनाची कुऱ्हाड पडली. त्या काळात कॅलिफोर्नियात नव्याने द्राक्षं-संत्र्यांची बागायती, कापसाची लागवड सुरु झाली होती – तिथे तुम्हाला काम मिळेल, आपली ‘प्रॉमिस्ड लँड’ मिळेल, नवजीवन लाभेल, अशी आशा प्रस्थापितांनी त्यांना दाखवलेली होती. या पार्श्वभूमीवर मध्य व दक्षिण अमेरिकेतील खेडेभागातील लाखो विस्थापित शेतकरी, खंडकरी, शेतमजूर आदी भूमिहीनांनी ‘रूट सिक्स्टी सिक्स’ या जुन्या महामार्गाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने केलेला दोन हजार मैलांचा खडतर प्रवास, प्रत्यक्षात वाट्याला आलेली उद्ध्वस्तता आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या जाणीवेत झालेले सूक्ष्म बदल असा सर्व एक विशाल पट स्टाइनबेक यांनी या कादंबरीतून अत्यंत परिणामकारकतेने उलगडून दर्शवला आहे.

जुने लेबर कँप

जुने लेबर कँप (छायाचित्र – मिलिंद चंपानेरकर )

स्टाइनबेक यांनी मध्य अमेरिकेतील ओक्लाहोमा व इतर खेडेभागातील विस्थापित लोकांचं, ‘रूट ६६’ महामार्गालगतच्या परिसराचं आणि ‘लेबर कॅम्प’च्या आसऱ्याने राहणाऱ्या स्थलांतरित-विस्थापितांचं अत्यंत सूक्ष्म व जिवंत चित्रण केल्यामुळे कादंबरी वाचताना ते सर्व डोळ्यासमोर उभं रहात असलं, तरी ते सर्व तपशील अनुवादात नेमकेपणाने उतरण्यासाठी तो परिसर, तेथील माती, स्थलांतरितांसाठी प्रवासात जीवघेणी ठरलेली ‘ब्लॅक माउंटन्स’सारखी ‘भयावह’ पर्वतराजी आणि तेथील लोक, खेडुतांची जीवनशैली, पोशाख (तत्कालीन आणि सांप्रत) आदी सर्व एकदा डोळ्याने पाहणं आवश्यक वाटत होतं आणि ती संधी मला २०१५ मध्ये मिळाली.

तीन आठवड्यांच्या त्या प्रदेशातील वास्तव्यात ‘रूट ६६’लगतचा परिसर, तत्कालीन ‘रोडसाईड हॉटेल्स’, ‘जतन’ केलेले जुने ‘लेबर कॅम्प्स’ पाहणं, ‘स्टाइनबेक कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील खेडेभागात वास्तव्य करणं, तेथील लोकांशी संवाद करणं आणि स्टाइनबेक यांच्या सलिनास या जन्मगावी असलेलं ‘स्टाइनबेक म्युझियम’ पाहणं, अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या आणि कादंबरीच्या अनुवादाच्या दृष्टीने अंतःदृष्टी लाभली. त्याबाबतचे सर्वच तपशील इथे नमूद करणं शक्य नसलं, तरी उदाहरणादाखल, इथे दोन अनुभव नमूद करतो.

इतिहासाचा साक्षीदार: ‘आर्विन लेबर कॅम्प’

नवे लेबर कँप

नवे लेबर कँप (छायाचित्र – मिलिंद चंपानेरकर )

लॉस एंजलीसच्या उत्तरेकडे सुमारे पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या वीडपॅच येथील ‘आर्विन लेबर कॅम्प’चा अनुभव आगळाच होता. तत्कालीन सरकारने विस्थापित-स्थलांतरितासाठी आदर्श कॅम्प कसा असावा ते दर्शवण्यासाठी १९३६मध्ये नमुन्यादाखल हा कॅम्प उभारला होता. तिथेच, जुन्या खासगी कॅम्प्समध्ये विस्थापितांना कशा अमानवी स्थितीत रहावं लागत होतं, ते दर्शवण्यासाठी तशा कॅम्पमधील लाकडी खुराडावाजा घरांचे नमुने तिथे ‘जतन केलेले आहेत (‘स्टाइनबेक म्युझियम’मध्येही त्याचे नमुने आहेत). हे सर्व पाहिल्यावर कादंबरीतील अनेक प्रसंग डोळ्यासमोर लख्ख उभे राहिले.

मातीचा गंध!

या ‘लेबर कॅम्प’मध्ये पोहोचण्याआधी, म्हणजे, मोटारगाडीने त्या कॅम्पचा शोध घेत असताना विलक्षण अनुभव आला. आता लॉस एंजेलीसला वास्तव्यास असलेली स्टाइनबेक-प्रेमी मैत्रीण तिच्या मोटारगाडीतून मला तिथे घेऊन चालली होती. ‘ओल्ड कार्स ऑन हायर’चे मोठमोठे फलक दिसू लागले आणि हंगामी मजूर (मेक्सिको व इतर ठिकाणांहून कमी मजुरीत उपलब्ध होणारे) इथून जुन्या गाड्या भाड्याने घेऊन कामाला जात असतील हे स्पष्ट झालं (कादंबरीत अशा गोष्टींचा विस्तृत उल्लेख आहे) आणि कॅम्पच्या जवळपास आल्याचेही संकेत मिळाले. परंतु, बराच वेळ धुंडाळूनसुद्धा ‘जीपीएस’च्या आधारे कॅम्पचं नेमकं ठिकाण सापडत नव्हतं आणि आम्ही गोलगोल फिरत होतो. पण एके ठिकाणी द्राक्षाच्या ‘महामळ्या’जवळून जाताना मी मैत्रिणीला तात्काळ गाडी थांबवायला सांगितलं आणि म्हटलं, ‘बस्स, इथे अगदी जवळपासच तो कॅम्प असेल’. आश्चर्य वाटून ती म्हणाली, ‘कशावरून?’ मी म्हटलं, ‘कारण हा रस्ता, इथे दिसणारी माणसं आणि हा मातीचा गंध माझ्या परिचयाचा आहे,’ असं म्हणून मी जोराने हसलो. आश्चर्य म्हणजे, कॅम्प खरोखरच तिथून अवघ्या ३०० मीटरवर होता!

मिश्र वऱ्हाडी बोलीभाषेची योजना का?

मी हसलो त्याला संदर्भ होता वीस वर्षांपूर्वी मला आलेल्या अनुभूतीचा. तेव्हा विदर्भातील वऱ्हाड प्रांतातील द्राक्ष-संत्र्याच्या पट्ट्यात फिरत होतो (जो महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हटला जातो) आणि मला पुन्हापुन्हा या कादंबरीची आठवण येत होती. जवळपास तोडणीसाठी हंगामी मजूर म्हणून आलेल्या शेतमजुरांच्या राहुट्या उभारलेल्या दिसत होत्या. कादंबरीतील ‘लेबर कॅम्प्स’ची आठवण करून देत होत्या. परंतु त्याचवेळी, इथली माती काळी, तिथली (अमेरिकेतील) करडी वा लालसर; इथले लोक वेगळे, त्यांची राहणी, पोशाख सर्वच भिन्न; असं सर्व असूनही ‘तोच’ नाद कानात का गुंजतोय, साधर्म्य नक्की कशाबद्दल वाटतंय, असे प्रश्न पडत होते. परंतु, आता प्रत्यक्षात अमेरिकेतील खेडेभाग पाहिल्यावर एक वर्तुळ पूर्ण झालं होतं आणि प्रश्नांची उत्तरंही मिळू लागली – वऱ्हाड प्रांतातील आणि अमेरिकेतील समस्याग्रस्त विस्थापित-स्थलांतरित दोहोंच्या बोलीभाषेचे काही गुणधर्म समान आहेत – म्हणजे विभिन्न प्रांतातील बोलीचे प्रभाव संभवून त्यांची संमिश्र बोली घडलेली आहे. दुसरं म्हणजे, दोहोकडील विस्थापित-स्थलांतरितांच्या वर्गीय जाणीवेचा ‘अंतःप्रवाह’ मिळताजुळता आहे आणि त्यामुळेच दोहोंमध्ये दुवा असल्याची अनुभूती येत असावी, याची खात्री वाटली.

मूळ कादंबरीतील ‘स्लँग’ भाषेतील मजकूरासाठी बोलीभाषेची निवड करण्यासाठी प्रामुख्याने दोन निकष पक्के केले होते – एकतर, त्या भाषेमध्ये लवचिकता असावी आणि दुसरं म्हणजे, अनेक ‘संस्कार’ संभवून मूळ बोलीभाषेला मिश्र भाषेचं स्वरूप प्राप्त झालं असावं. आता वरील अनुभवानंतर सर्वांगाने विचार करता अमरावती-यवतमाळच्या शहरी भागात बोलली जाणारी मिश्र वऱ्हाडी भाषा वर्गबोली म्हणून अपेक्षित परिणाम साधेल याबाबत माझी खात्री झाली. तसं का, त्याबाबत थोडं अधिक सविस्तर सांगणं आवश्यक वाटतं.

मूळ कादंबरीतील वर्गबोली

वर म्हटल्यानुसार, मूळ कादंबरीत लेखकाच्या निवेदनाचा, कथनाचा भाग जरी संपूर्णतः अमेरिकन इंग्रजीत अर्थात तेथील प्रमाणभाषेत असला तरी, या कादंबरीतील बहुतांश व्यक्तिरेखा परस्परांशी ‘स्लँग’ (अशिष्ट, अशुद्ध) अमेरिकन भाषेत बोलतात; उदाहरणार्थ –

They’s plenty of ‘emWe gonna run ‘em outa the country. Man wanta work, O.K. If he don’t – the hell with him.”

किंवा

“Come a time when I could a did somepin an’ took the big sin off my soul… Gimme two dollar.”/  “There ya are… A fella got to do what he got to do. Nobody don’t know enough to tell ’im…  He done just what I’d do. Sons-a-bitch got no right.”

वरील संभाषणं वाचल्यावर वाचकांच्या सहजी लक्षात येईल, की यातील विस्थापित स्थलांतरितांची बोली व्याकरणदृष्ट्या अशुद्ध आहे. बहुधा, बरीचशी अक्षरं वा क्रियापदांची रूपं यांचे उच्चार करणं जमत नसल्याने ते त्यांच्या बोलीभाषेत सहजी जमतील तसे उच्चार साधतात आणि ते रूढ होऊन जातात. उदा. ‘समथिंग’च्या ऐवजी ‘समपिन’, ‘गोइंग’ च्याऐवजी ‘गोइन’; ‘गिव्ह मी’ च्याऐवजी ‘गिम्मी’; ‘वॉन्ट टू’च्या ऐवजी ‘वॉन्टा’; ‘हिम’च्याऐवजी ‘इम’; किंवा, नोबडी डोन्ट नो इनफ’ – या प्रकारची ‘नकारार्थी द्विरुक्ती’सुद्धा त्यांच्या बोलीभाषेत रूढ झालेली दिसून येते.

‘स्टाइनबेक म्युझियम’

‘स्टाइनबेक म्युझियम’ (छायाचित्र – मिलिंद चंपानेरकर )

त्यांची भाषा अशी का? त्याला अमेरिकेतील विशिष्ठ परिस्थिती कारणीभूत आहे. मुळात १५व्या ते २०व्या शतकापर्यंत युरोप व इतर अनेक देशांतून वेगवेगळे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यामुळे, विशेष करून खेडेभागात वसलेल्या छोटे शेतकरी, सामान्यजन यांची भाषा संमिश्र असल्याचं आढळतं. जोड परिवार हा तीन-चार पिढ्यांपूर्वी मध्य-दक्षिण अमेरिकेतील ओक्लाहोमा इथे येऊन वसलेला; तेथील मूलनिवासी चेरोकींना हुसकावून त्यांनी तिथे बस्तान बसवलेलं. त्यामुळेच त्यांच्या भाषेवर चेरोकीसह अनेक भाषांचा प्रभाव आहे.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन लेखकाने केवळ ओक्लाहोमाचीच बोली वापरलेली नाही, तर एक आगळी वर्गबोली तयार केली. स्वाभाविकच अशा संवादांचा प्रमाणभाषेत अनुवाद केल्यास कादंबरीत अंतर्भूत असलेला नाद, लय, ध्वनी-परिणाम वाचकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार नव्हतं आणि त्यासाठी, मिश्र वऱ्हाडीच अनुरूप ठरणार होती. तसं का?

अनुवादित कादंबरीतील वर्गबोली

अमेरिकेला पार्श्वभूमी वसाहतदारीची, तर इथे वऱ्हाड प्रांतात सरंजामशाहीची आणि ब्रिटीश वसाहतवादाची. वऱ्हाडचा भाग (ज्यात आता अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या चार जिल्ह्यांचा समावेश होतो) पूर्वी निजामाच्या अधिपत्त्याखाली होता. त्यानंतर, ‘वऱ्हाड व मध्य प्रांता’त (सी.पी. अँड बेरार) समाविष्ट होता आणि पुढे स्वातंत्र्यानंतर १९६०मध्ये महाराष्ट्र राज्यात त्याचा समावेश झाला. अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमारेषा मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश लगत आहेत आणि राज्यांना जोडणारे जुने व्यापारी मार्गसुद्धा याच पट्ट्यातून जातात. अशा ऐतिहासिक-भौगोलिक-राजकीय कारणांमुळे लगतच्या राज्यांतून श्रामिकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांची स्थलांतरं आणि आदान-प्रदान संभवून मराठीसह आजूबाजूच्या प्रदेशातील हिंदी, उर्दू, हिंदुस्तानी आदी अनेक भाषांचा मूळ वऱ्हाडी बोलीवर प्रभाव होऊन एक मिश्र वऱ्हाडी बोली शहरी भागात स्वीकृत झाल्याचं दिसून येतं. म्हणजे, क्रियापदं, नामांची रूपं आणि उच्चारण बऱ्याच गोष्टींवर उपरोक्त भाषांचा प्रभाव जाणवतो. त्यामुळेच या भाषेचा नाद मूळ कादंबरीतील ‘स्लँग’साठी अनुरूप वाटला.

यातील ओक्लाहोमाव्यतिरिक्त ‘कन्सास’ येथील काही दुय्यम व्यक्तिरेखांसाठी आणखी एका बोलीभाषेची आवश्यकता होती. त्यांच्यासाठी चंद्रपूरकडील झाडी बोलीची योजना केली. त्याचप्रमाणे, स्थलांतर करत असताना जोड परिवाराचा ट्रक ड्रायव्हर, हॉटेलवाले, टोल-नाक्याचे कर्मचारी, पोलीस अधिकारी ते बागायतदारांचे एजंट, गुंड अशा विविध प्रकारच्या दुय्यम व्यक्तिरेखांसाठी काही वेळा हिंदी-मिश्रित भाषेचाही वापर केला.

आणखी काही महत्वाच्या गोष्टी

मात्र बोलीभाषेचा वापर केलेला असला, तरी यातील घटना अमेरिकेत घडत आहेत, याचं वाचकाला सतत भान रहावं, या दृष्टीने अनेक गोष्टी जाणीवपूर्वक केल्या आहेत व टाळल्या आहेत. उदाहरणार्थ, एक म्हणजे, कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या जीवनातील ‘लेबर कॅम्प’चं महत्व लक्षात घेता ‘कॅम्प’ हाच शब्द त्यांच्या बोलीभाषेत रूढ झालेला आहे, असं कल्पून तोच शब्द कायम ठेवला आहे; छावणी असा प्रतिशब्द जाणीवपूर्वक वापरलेला नाही, त्याचप्रमाणे, घरगुती वापरातील अनेक गोष्टींची, पदार्थांची सामान्यनामं आहे तशीच ठेवली आहेत – उदा. केटल, बकेट, ब्लँकेट, गाउन, स्ट्यू, मूस, स्टोव्ह इत्यादी; दुसरं म्हणजे, अमेरिकेतील आणि येथील स्थानिकांच्या धर्माधिष्ठित धारणा आणि त्यावर आधारलेली अभिव्यक्ती यात फरक असतो हे लक्षात घेऊन शक्यतो, आभार, अभिवादनाचे, अश्चार्योद्गाराचे, दुःख व्यक्त करणारे शब्दप्रयोग मूळ इंग्रजीत आहेत तसेच कायम ठेवले आहेत. उदाहरणार्थ, ‘ओह गॉड!’ ‘जीझस!’, ‘हॅलेलुइया!’. वऱ्हाडी भाषेत ‘बाप्पा’, ‘देवा’ असे सहजोद्गार उपलब्ध असले तरी ते टाळण्याचा मोह जाणीवपूर्वक आवरला आहे. थोडक्यात, भाषा वऱ्हाडी असली तरी सर्व प्रसंग अमेरिकन सामान्यजनांच्या जनजीवनातले आहेत, याचं वाचकाला सतत भान राहावं, या उद्देशानेच तसं केलं/टाळलं आहे.

एक अपवाद

जोड परिवारातील सर्वांसाठी मिश्र वऱ्हाडी बोलीभाषेची योजना केलेली असली, तरी कादंबरीचा नायक टॉम याच्याबाबतीत अपवाद केला आहे; त्याचे सर्व संवाद प्रमाणभाषेतच ठेवले आहेत. टॉम हा विस्थापित परिवारातील एकमेव साक्षर, लिहू-वाचू शकणारा असा आहे – त्याचा ‘फायदा’ घेऊन त्याच्या भाषेबाबत ‘सर्जनशील स्वातंत्र्य’ घेतलं आहे – अर्थात सोय म्हणूनच. टॉम या प्रमुख व्यक्तिरेखेच्या तोंडी लेखकाला अभिप्रेत असलेली बरीच महत्वाची विधानं व कळीचे संवाद आहेत; ते सर्वप्रकारच्या वाचकांपर्यंत प्रमाणभाषेत स्पष्टपणे जावेत, हाच त्यामागील प्रमुख हेतू.

‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ शीर्षकाबद्दल

स्टाइनबेक यांनी या कादंबरीला ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ हे नाव दिलं, ते त्यांच्या पहिल्या पत्नी कॅरोल यांच्या सूचनेवरून. या शीर्षकाची प्रेरणा दोन गोष्टीतून घेतली होती – एकतर, अमेरिकेतील १८६१च्या ‘सिव्हिल वॉर’नंतर नव्या प्रजासत्ताकाची पुढील वाटचाल सकारात्मक होईल, अशी अशा व्यक्त करणारं ‘ज्युलिया वॉर्ड हाव’ लिखित गीत – ‘दि बॅटल हिम ऑफ द रिपब्लिक’ आणि दुसरं म्हणजे बायबल मधील मिथक-कथा (‘न्यू टेस्टामेंट’मधील – ‘रिव्हिलेशन’ १४:१९-२० आणि ‘ओल्ड टेस्टामेंट’मधील ‘इसाया’ ६३) – देवदूताने पृथ्वीवर आपला विळा (पृथ्वीवर) फेकला / आणि जमिनीतील पिकलेल्या द्राक्षाच्या साठ्याचा गर काढून घेतला / आणि ईश्वराचा कोप व्यक्त करत महान द्राक्षकुंडात फेकला  – मतितार्थ, पृथ्वीतलावर दुष्ट शक्तींचा अन्याय वाढल्यावर ईश्वराच्या कृपेने त्यांच्या निर्दालनासाठी द्राक्षाचा रक्तवर्णी रसाचा प्रकोपदर्शक उद्रेक झाला.

मात्र, असा संदर्भ असला, तरी स्टाइनबेक यांना ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’चा रूपकात्मक अर्थ अभिप्रेत होता. मुळात स्टाइनबेक हे विचाराने पुरोगामी, डावीकडे कल असलेले होते, आणि एकंदर, कादंबरीतून त्यांना ईश्वरी ‘कोप’ सूचित करायचा नव्हता; उलट, विस्थापित लोकांच्या मनातील अन्यायाविरुद्धचा रोष वाढता चालला होता आणि त्यांच्या नजरेत बंड करण्याचे क्रांतिकारी विचार झळकू लागले होते, हेच सूचित करायचं होतं, हे स्पष्टच दिसून येतं – लोकांच्या नजरेतला रोष वाढत चाललेला आहे. लोकांच्या आत्म्यांमध्ये रोषाची द्राक्षं भरली जात आहेत आणि ती संपृक्त होऊन जड होत आहेत – लोकांच्या बाजूने न्याय होण्याची वेळ येण्यासाठी ती भारित होत आहेत (प्रकरण २५).

त्यामुळेच, मराठीत अनुवाद करताना ‘रॉथ’साठी रोष याच शब्दाची योजना केली आणि मूळ शीर्षकाचा अनिच्छित अर्थ ध्वनित होऊ नये, म्हणून मराठी अनुवादित कादंबरीचं शीर्षक ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ असंच कायम ठेवलं.

आज प्रकाशित होण्याचं महत्त्व

सात दशकांच्या भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत विस्थापन आणि पुनर्वसनाशी निगडीत समस्यांबाबत एकंदरीत केवळ उदासीनताच नाही, तर धनाढ्यांना सोयीस्कर अशी धोरणं अमानुषपणे राबवली गेल्याचं  अनेक वेळा दिसून आलेलं आहे. आता तर सांप्रदायिक अजेंडा राबवण्यासाठी आक्रमकतेने विस्थापन घडवून आणू पाहणारं धोरण दिसून येतं. त्यामुळेच, विस्थापनाच्या व्यापक समस्येबाबत डोळे उघडणारी ही कादंबरी अनुवादित स्वरुपात येणं, खूप आवश्यक वाटलं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याचं मनोज्ञ दर्शन या कादंबरीतून घडतं – ते जाणून घेणं विशेषतः आज जरुरीच आहेच ना?

मिलिंद चंपानेरकर, हे लेखक आणि पत्रकार असून, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुवादक आहेत. त्यांनी ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’चा मराठी अनुवाद केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0