अनेक राज्यांमध्ये २ ते ८ तास लोडशेडिंग

अनेक राज्यांमध्ये २ ते ८ तास लोडशेडिंग

नवी दिल्ली/अमृतसर/जयपूरः देशभरात आलेली उष्णतेची लाट व कोळशाच्या टंचाईमुळे देशातल्या अनेक राज्यात लोडशेडिंगची परिस्थिती आली आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांमध्ये  २ तास ते ८ तास वीज गायब झाल्याच्या घटना घडल्या. एप्रिल महिन्यात विक्रमी अशी उष्णतेची लाट आल्याने विजेची मागणीही अभूतपूर्व अशी वाढली आहे. विजेच्या टंचाईचा सर्वात मोठा फटका काऱखाने, रेल्वे सेवेला बसला आहे. देशात एकूण ६२.३ कोटी युनिट विजेची टंचाई भासत असून हा आकडा मार्च महिन्यातल्या एकूण विजेच्या मागणीपेक्षा कमी आहे.

२७ एप्रिलला विजेची एकूण मागणी २००.६५ गीगावॉट इतकी होती. ती २९ एप्रिलला २०४.६५३ गीगावॉट इतकी वाढली. गेल्या वर्षी हा आकडा १८२.५५९ गीगावॉट इतका होता. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उ.प्रदेशात ३००० मेगावॉट वीज टंचाई होती, त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व छोटी शहरे व ग्रामीण भागात लोड शेडिंग दिसून येत आहे.

दरम्यान शुक्रवारी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी वीज टंचाईविरोधात निदर्शने केली. अमृतसर शहरात राज्याच्या वीजमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने झाली. तमिळनाडूतही ७५० मेगावॉट वीज टंचाई असल्याने या राज्यात अनेक भागात लोडशेडिंग दिसून आले. आंध्र प्रदेशात ५ कोटी युनिट वीज कमी पडत असून येथेही लोडशेडिंग दिसून आले. बिहारमध्ये २००-३०० मेगावॉट वीज टंचाई दिसून आली. उत्तराखंड, झारखंड, ओडिशा या राज्यांमधील अनेक शहरे व ग्रामीण भागात गेले काही दिवस लोडशेडिंग दिसून येत आहे.

मूळ बातमी

COMMENTS