भगतसिंग कोश्यारी यांना तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे

भगतसिंग कोश्यारी यांना तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून, या पदावर बसलेल्या व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी, त्यांना केवळ घरी नव्हे तर तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरे म्हणाले, की राज्यपाल हे मानाचे पद आहे. मी त्या पदाचा अवमान करू इच्छित नाही. मात्र त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने त्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. यांना कोरोनामध्ये सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असेच विचित्र हिणकस उद्गार काढले होते.

ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहून सगळे काही ओरबाडले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे घी देखा पण कोल्हापूरचा जोडा बघितलेला नाही. हे जोडे किंवा वहाण त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे.”

राज्यपालांनी केलेले ते विधान अनवधानाने आलेले नाही. हा आज कहर झाला आहे., त्यांना भाषण कोण लिहून देते. कदाचित दिल्लीवरून येते का, मला माहीत नाही. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडून राज्य आणि मुंबई मिळवली आहे. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत आहेत. त्यांनी जात, धर्म, प्रांत याच्याबाहेर जाऊन काम करणे गरजेचे आहेत. मात्र त्यांनी हिंदुंमध्ये फुट पाडण्याचे काम, आग लावण्याचे काम केले आहे, असे ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की राज्यपालांना केवळ घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे? त्यांनी फुट पाडण्याचे नीच काम केले आहे. ३ वर्षात महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे मीठ खाल्ले, त्याच्याशी नमकहरामी केली आहे. कोश्यारी या व्यक्तीला या पदावर बसण्याचा काही अधिकार नाही. आता महाराष्ट्रात आलेल्या नवहिंदूत्ववाद्यांनी यावर निर्णय घ्यावा. त्यांच्या मनातला हेतू समोर आला आहे. मुंबईतील पैसा यांना दिसत आहे. दिल्लीतील अनेकांचा जीव मुंबईत आहे, हे आता दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावमध्ये बोलताना म्हणाले, “राज्यपालांचे विधान वैयक्तीक आहे. आम्ही त्याच्याशी सहमत नाही. मुंबईत मराठी माणसांचे योगदान आहे. राज्यपालांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी कोणाचाही अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

COMMENTS