नवी दिल्लीः कोविड-१९वरच्या लसीच्या (कोविड शील्ड) चाचण्यांदरम्यान लस घेतल्यानंतर त्याचा आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम झाला अशी तक्रार करणार्या चेन्नईतल्या ४० वर्षीय रुग्णाचा आरोप सोमवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)ने फेटाळून लावला. असे आरोप लावणार्या व्यक्तीवर बदनामीचा खटला दाखल करण्यात येईल, अशी धमकीही या संस्थेने त्या व्यक्तीला दिली आहे.
आपल्या आरोग्यावर परिणाम झाल्याने सीरम इन्स्टिट्यूटने नुकसान भरपाई म्हणून आपल्याला ५ कोटी रु. द्यावेत आणि या लसीच्या चाचण्या थांबवाव्यात अशीही मागणी या रुग्णाने केली होती.
सोमवारी सीरम इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चेन्नईस्थित रुग्णाने केलेले सर्व आरोप बेजबाबदार व चुकीचे असल्याचे स्पष्ट करत आमची संस्था रुग्णांच्या शरीराची सर्वप्रकारे काळजी घेत असते. त्या रुग्णाच्या मनस्वास्थ्याविषयी आमची सहानुभूती आहे पण या लसीच्या चाचणीत त्यांच्या मनावर असा काही परिणाम झालेला नाही, असे स्पष्ट केले. आमची कंपनी सर्व प्रकारच्या आरोपांचे प्रत्युत्तर देईल व खोटे आरोप करणार्यांवर १०० कोटी रु.चा मानहानीचा गुन्हा दाखल करेल असेही या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
चेन्नईस्थित रुग्णाच्या आरोपानंतर डीसीजीआयने लगेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
१ ऑक्टोबर रोजी चेन्नईतील के श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत या रुग्णाला कोविड शील्डचा डोस देण्यात आला होता.
या व्यक्तीने आयसीएमआर, औषध महानियंत्रक, केंद्रीय औषध प्रमाणक व नियंत्रण संस्था, एस्ट्राजेनेका युकेचे सीईओ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. अँड्र्यू पोलार्ड व श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या कुलपतींना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मूळ बातमी
COMMENTS