सेक्स आणि जोखमींचे जोखड

सेक्स आणि जोखमींचे जोखड

लैंगिक संबंधांसारख्या विषयाकडे सहजपणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, नैतिकतेचा बाऊ न करता पाहता येत नसल्याने दबाव वाढतो आणि जोखमीही वाढतात.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला; निकाल २१ जुलै रोजी
आरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के!
गुजरातमध्ये पराभवाचा केजरीवालांचा भाजपला इशारा

‘युथ  इन ट्रान्झिशन’ हे संशोधन आजच्या समाजाचे लहानखुरे चित्र म्हणून पाहिले तर एकीकडे सेक्सविषयीच्या दबलेल्या कल्पना, अपराधी भाव, नैतिकता, योग्य-अयोग्य काय यांना ही तरुण मंडळी बळी पडत आहेत तर दुसरीकडे त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक जोखमीकडे, शास्त्रीय तथ्यांकडे त्यांचे दुर्लक्षच होते आहे. संशोधनादरम्यान ह्या  दोन्ही बाबी एकमेकींशी थेट प्रमाणात जोडलेल्या आहेत हे जाणवत होते.

‘जोखीम’ (risk) या शब्दाचा इथला अर्थ आपल्या शारीरिक व भावनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणारी कृती. ती टाळायची आहे अथवा नाही याचा माहितीपूर्ण, सारासार, चौफेर विचार करण्याची संधीच स्वतःला न देता कृती करणे, म्हणजे जोखीम घेणे.

परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवणे, ही जरी अत्यंत वैयक्तिक गोष्ट असली, तरीदेखील समाजाला त्याबद्दल काय वाटते याला आपल्यासारख्या समाजात फार महत्त्व दिले जाते. यात कुटुंब हा महत्वाचा भाग असतो.

घरच्यांच्या परवानगीच्या अंगणातच आपल्या आयुष्याचा खेळ मांडायची कल्पना तरुण पिढीवर लादली तर त्यांना आपल्या मनाला एकतर मुरड घालावी लागणार किंवा चोरी छुपे आपल्याला हवे ते करावे लागणार. वर पुन्हा घरच्यांना अंधारात ठेवतोय याबद्दलचा अपराधी भाव, आपण ‘चुकीचे’ वागतोय की काय आणि सापडलो, तर काय होईल याबद्दलची भीती मनात सतत भरून राहाणार.

या सगळ्या नादात काही अनावश्यक आणि शारीर दुष्परिणामांची जोखीम स्वीकारण्याची शक्यता वाढून बसते.

एकविसावे शतक आले, तंत्रज्ञान पुढे गेले, माहिती मिळवण्याची साधने हातात आली. तरीही अनेक सामाजिक दंतकथा, मिथके व गैरसमजुती मनामनांमध्ये रुंजी घालतच असतात. त्यांचा बागुलबुवा खोटा आहे हे कळूनही आपल्याला भीती घालतच असतो. उदाहरणच द्यायचे तर ‘विवाहापूर्वी गरोदर राहणे म्हणजे जोखीम’ किंवा ‘विवाहानंतर गरोदर न राहणे म्हणजे जोखीम’ ही कल्पना!

वास्तवतः लग्नानंतर मूल व्हायलाच हवे किंवा लग्न झाले नाही म्हणजे मूल व्हायलाच नको असा काही नियम नाही, तो प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. नात्यामधून अपत्याची जबाबदारी घ्यायची असेल किंवा नसेल तर ती एक खाजगी बाब आहे. अर्थात अपत्याच्या संगोपनाची जबाबदारी ही काही साधी गोष्ट नाही. त्यातल्या जबाबदाऱ्या आणि कौशल्यांची आठवण मात्र ज्याने-त्याने ठेवायला हवी हे आलेच.

आजकाल होणार्‍या बाळाचे पालक आम्ही प्रेग्नंट आहोत असा शब्द्प्रयोग करतात. ती दोघा पालकांची जबाबदारी आहे हे त्या वाक्यातून व्यक्त होते. ते चांगलेच आहे तरीही गर्भारपणाचा निर्णय घेतला गेलाच तर त्याचे थेट परिणाम हे गरोदर स्त्रीच्या शरीर-मनावर होत असतात, म्हणून मूल हवे की नको हा त्या स्त्रीचाच  निर्णय असायला हवा. तिला विवेकी निर्णय घेण्यासाठी इतर लोकांनी मदतीस असावे.

यामध्ये वरती उल्लेखल्याप्रमाणे माहितीपूर्ण, सारासार, चौफेर विचार अपेक्षित आहे.

…आणि गरोदर राहायचे नसताना, शरीरास गरोदरपण, गर्भपाताचा प्रवास करायला लावणे, ही नक्कीच  जोखमीची कृती आहे. गरोदरपण राहण्याआधीच ते टाळण्यासाठीचे मार्ग सहजपणे उपलब्ध आहेत.

मात्र त्यांचा वेळेवारी उपयोग करणे घडत नाही, असे या संशोधनामध्ये आढळले.

लैंगिक आरोग्याचा विषय केवळ लैंगिक कृतीपुरता मर्यादित नाही, त्यामुळे या संशोधनामध्ये आम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्याच नव्हे, तर नात्यामध्ये असून लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या किंवा नात्यामध्ये कधीच नसलेल्या अश्या सर्वच व्यक्तींशी बोललो.

या अभ्यासामध्ये  सहभागी  झालेल्यांपैकी (१२४०)  एकूण  ४२% मुलामुलींनी लैंगिक संबंध केलेले होते. या ४२% पैकी २४% मंडळींनी कन्डोमसारख्या साधनाचा वापर अनियमितपणे केलेला होता. त्यांच्यातले बरेच जण (६०%) विड्रॉवल आणि सेफ पिरीयड या फसव्या पद्धतींवरच निर्भर राहिले होते. (विड्रॉवल म्हणजे लैंगिक संबंध ठेवत असता वीर्य बाहेर येण्यापूर्वी शिश्न बाहेर काढणे, जेणेकरून वीर्य योनीमार्गात जाणार नाही व सेफ पिरीयड म्हणजे स्त्रीचे अंडबीज पक्व होऊन बीजनलिकेत येण्याचा काळ सोडून इतर वेळी संबंध करणे.) गरोदरपण टाळण्याच्या या खात्रीशीर पद्धती  नाहीत. तसेच संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण तर त्यात नाहीच नाही .

गर्भनिरोधनाचे कुठलेच साधन न वापरता योनिमार्गाद्वारे लिंगप्रवेशी संबंध आले, तर गर्भ राहू नये यासाठी त्यानंतरच्या ७२ तासांमध्ये इमर्जन्सी कॉंट्रासेप्टिव्ह पिल घेता येऊ शकते. जिला गर्भारपण नको अशा स्त्रीला ती घेण्याचा सल्ला जरूर  दिला जावा. ही गोळी औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. मात्र ती रोज घेण्याची गोळी नाही, हे देखील सांगायलाच हवे. ती केवळ इमर्जन्सीसाठी आहे. या अभ्यासातील लैंगिक संबंध केलेले असणारांपैकी  सुमारे ३३% लोकांनी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळीचा वापर स्वतः किंवा  जोडीदाराने केल्याचे  घेतल्याचे सांगितले. त्यातल्या काहींनी एका महिन्यात दोन किंवा त्याहून जास्त वेळा या गोळ्या घेतल्या होत्या. संप्रेरके असलेली औषधे वारंवार घेण्याचे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जोखीमही यामध्ये आहे.

गर्भधारणा झाल्यास व  ती नको असल्यास वैद्यकीय साहाय्याने २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करवता येतो. आमच्या अभ्यासात एकूण २३ सहभागींनी त्यांना अथवा त्यांच्या जोडीदारांस गरोदरपण राहिल्याचे सांगितले.  सर्व २३ जणींनी गर्भपाताचा निर्णय घेतला होता.

गर्भपात करून घेताना तो तज्ज्ञ व्यक्तींमार्फत, स्वच्छ व सुरक्षितरित्याच केला पाहिजे, अन्यथा स्त्रीच्या जीवाला त्यातून  धोका उत्पन्न  होऊ शकतो. तसेच वारंवार गर्भपात करणेही बाईच्या शरीरासाठी निश्चितच चांगले नाही त्यामुळे  हा काही संततीनियमनाचा मार्ग नाही.

जोखमीचे वर्तन म्हणजे दुषणावह वर्तन नव्हे.  दूषणे देणारे, इतरांच्या निर्णयांबद्दल कुचेष्टा करणारे, इतरांच्या खाजगी गोष्टी चारचौघांत सांगणारे लोक ही येथील सर्वात मोठी ‘अपायकारक’ गोष्ट म्हणता येईल. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक निर्णयांचा आदर न करता, त्याविषयी सवंग चर्चा करणे हे या दृष्टीने तरुणांची ‘जोखीम’ सर्वाधिक वाढवणारे वर्तन आहे.

नियमितपणे घेण्याची गर्भनिरोधक गोळी किंवा निरोध न वापरता आलेल्या संबंधानंतर बहात्तर तासामधली गोळी गरोदर राहणे रोखू शकत असल्या तरीदेखील संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून कोणतेच संरक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या गोळ्या घेणार्‍यांनाही  लिंगसासर्गिक आजारांची जोखीम आहेच.

या  आजारांविषयीदेखील आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. ‘एकाहून अधिक व्यक्तींसोबत संबंध ठेवणाऱ्या किंवा शरीरविक्रय करणाऱ्या व्यक्तींकडे जाणाऱ्या व्यक्तींनाच  हे आजार होतात.’ ही वाक्ये ऐकीव आणि अपुऱ्या ज्ञानातून आणि तीव्र पूर्वग्रहातून येतात व या आजारांना फक्त काहीच समाजगटांशी जोडणारा चुकीचा दृष्टिकोन निर्माण करतात.

एखाद्या व्यक्तीस लैंगिक संबंधांतून पसरणारा/रे आजार आहे/त की नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे असते. हे खात्रीशीरपणे माहीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत कन्डोम न वापरता संबंध ठेवल्यास त्या आजारांची जोखीम ही असतेच. मग जोडीदार एक असो वा अनेक. मग ती व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

एकाहून अधिक व्यक्तींशी संबंध ठेवताना जर सातत्याने व योग्य प्रकारे कन्डोम वापरला तर एचआयव्हीची व बहुतेक लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याचा धोका नसतो.

लैंगिकदृष्ट्या सक्रिय अश्या या ४२% तरुणांपैकी  २४% मुले व २४% मुली  एचआयव्ही  व  लिंगसांसर्गिक आजारांच्या  दृष्टीने जोखीम-गटात होती, म्हणजेच त्यांच्या जोडीदारा/रांसमवेत त्यांनी सातत्याने कन्डोम वापरलेला नव्हता.

ही जोखीम स्वीकारलेल्यांपैकी ९०% पेक्षा अधिक लोकांना असुरक्षित (कन्डोम न वापरता केलेल्या) योनी अथवा गुदसंभोगातून एचआयव्ही वा लिंगसांसर्गिक आजार होण्याची शक्यता असते हे माहीत होते, पण आपल्याला ते होऊ शकतील असे मात्र वाटलेले नव्हते.

एकूण सर्व सहभागींमधील ५०% पेक्षा अधिक जणांनी मुखमैथुन (oral sex) केलेले होते व त्यांपैकी १०% पेक्षाही कमीजणांनीच त्यावेळी कन्डोमचा वापर केला होता. मुखमैथुनातून पसरणाऱ्या काही आजारांची जोखीम असते हे माहीत असूनही त्यांनी ती स्वीकारली होती.

आपल्या कृतीतून आपल्याला जोखीम आहे हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष का करत असतील ही तरूणमंडळी?  ही धोक्याची घंटा आहे काय?

एचआयव्ही तसेच संबंधातून पसरणाऱ्या बऱ्याच आजारांविषयी तरुणांना माहिती असली तरी त्यात काही त्रुटी होत्या.

जात, आर्थिक वर्ग, राहण्याची जागा, राहणीमान, शिक्षण, व्यवसाय, घरातील पार्श्वभूमी अशा जराही संबंध नसलेल्या गोष्टींशी तरुण मुले-मुली एचआयव्हीची जोखीम जोडत होती.

याला अर्थातच सामाजिक धारणा कारणीभूत होत्याच.

बॅगेत कन्डोम सापडला म्हणून आई/वडिलांनी मारले, आपल्या आवडत्या व्यक्तीशी फोनवर बोलताना पाहिल्याबद्दल/ मेसेज पाठवल्याबद्दल फोन जप्त केला या व यासारख्या कितीतरी कहाण्या या संशोधनामध्ये मुलामुलींनी सांगितल्या आणि निश्चितपणे तुम्हीही त्या, तुमच्या आजूबाजूला ऐकल्या असतील.

‘लैंगिकतेच्या राक्षसापासून आपल्या बालकांचा बचाव करण्याची’ या बिचाऱ्या (?) पालकांची इच्छा असावी परंतु प्रत्यक्षात ते मुलामुलींच्या जीवनातल्या अनिवार्य आणि सुरस  अनुभवांना  भीतीने झाकोळत होते व आहेत. त्यांच्या जोखमी वाढवत, त्यांना हतबल बनवत आहेत आणि ह्या सगळ्या व्यवहारात आपल्याला मोकळेपणाने विचार, संवाद वा कृती करण्यासारखे काही नाहीच अशी त्यांची समजूत करून सोडत आहेत.

लग्नासाठीचा जोडीदार स्वतः निवडणं किती मुलांना शक्य आहे, असे विचारले असता सर्व सहभागींमधील ४०% मुलामुलींना ते शक्य नव्हते, लग्न करायचं की नाही हे स्वतः ठरवणं ३०% मुलामुलींसाठी अवघड होते, सेक्समध्ये आपल्याला काय आवडेल, हे मोकळेपणानी जोडीदाराला सांगणे २२% मुलामुलींसाठी अवघड होते.

एचआयव्ही किंवा लिंगसांसर्गिक आजारांच्या शक्यतेबद्दल जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे २५% मुलामुलींसाठी अवघड होते, तर स्वतः दुकानात जाऊन कन्डोम विकत आणणे  ३३% मुलामुलींसाठी अवघड होते. दुकानात जाऊन गर्भनिरोधक गोळ्या आणणे ३७% मुलामुलींसाठी अवघड होते, तर

३८% मुलामुलींना कन्डोम नसताना व सेक्स करण्याची इच्छा असताना स्वतःला थांबवणे अशक्य वाटत होते.

विचारक्षमता, निर्णयक्षमता, कृतिक्षमता, दृष्टिकोन, माहिती हे  सर्व लैंगिक आरोग्याचेच भाग आहेत व

आपल्या मुलांशी लैंगिकतेसंबंधी मोकळी चर्चा न करता त्यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मुस्कटदाबी करणारे पालक त्यांचे ‘भले’ चिंतत असले, तरी भले करत नाहीत. माहिती, मोकळेपणा, अवकाश व अभिव्यक्तीस बांधून घालणारा समाज तरूणांच्या जीवनावरचे जोखमींचे जोखड निव्वळ वाढवित आहे.

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे)

क्रमशः

(या अभ्यासाशी संबधीत वेब सिरीज ‘सेफ जर्नीज’, येथे पाहता येईल.)

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.

‘नातेसंबंध आणि लैंगिकता’, या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी मैत्रेयी असा सर्च द्या किंवा नावावर क्लिक करा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0