पत्रकाराचं काम असतं ” महत्वाचं आणि लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगून देश अधिक ज्ञानी करणं. “ हे अवतरण आहे सिमोर हर्श यांच्या रिपोर्टर : अ मेमॉयर (Reporter:A Memoir) या आठवणींच्या पुस्तकातलं.
अमेरिका या देशाच्या सरकारनं आणि लष्करानं व्हियेतनाम या देशावर विनाकारण आक्रमण केलं. लाखो व्हियेतनामींना विनाकारण मारलं. विषारी औषधं फवारून व्हियेतनाममधली लाखो एकर शेती आणि पिकं नष्ट केली. निष्पाप नागरी वस्त्यांवर बाँब टाकून हज्जारो माणसं, बायका-मुलं-वयस्कं मारले. हे सारं लोकांपासून लपवून ठेवलं. माध्यमांमधे खोटा प्रचार केला, थापा मारल्या, जुमले पेरले. माध्यमांवर दबाव आणला आणि माध्यमंही नांगी टाकून सरकारची तळी उचलत राहिली.
सिमोर हर्श पेंटॅगॉनमधे जात असत. संरक्षण मंत्री मॅक्नामारा पत्रकार परिषदा घेत, ते जे जे सांगत ते ते बातमीदार उतरवून घेत आणि दुसऱ्या दिवशी तशीच्या तशी बातमी देत. एकदा त्यांनी नौदलासाठी ७० कोटी डॉलर्स खर्च करून नवी लढाऊ विमानं व्हियेतनाममधे उतरवली जाणार आहेत असं सांगितलं. त्याच पत्रकार ब्रीफिंगमधे अमेरिका व्हियेतनाममधे कशी जिंकतेय तेही सांगितलं.
हर्शना प्रश्न पडला की जर जिंकत आहेत तर नवी विमानं कां उतरवावी लागत आहेत? इतकी नवी विमानं उतरवावी लागत आहेत याचा अर्थ अमेरिकेची खूप विमानं नष्ट होत आहेत, पाडली जात आहेत असाही अर्थ निघत होता.
दुसऱ्या दिवशी देशभरच्या वर्तमानपत्रांनी ठळक बातमी दिली की अमेरिका जिंकत असून लढाई जिंकण्यासाठी आणखी विमानं अमेरिका लढाईत उतरवणार आहे. हर्शनी तशी बातमी दिली नाही.
हर्श संरक्षण मंत्री सांगतील तसं छापणारे नव्हते. हर्श बातमीदार होते, स्टेनोग्राफर नव्हते. ते नौदल आणि हवाई दलातल्या अनेक वरिष्ठ जनरलना भेटले. निवृत्त होणाऱ्या पायलटना ते भेटले. अनेक पायलट नौदलातून बाहेर पडत होते, अकाली निवृत्ती घेत होते. निवृत्त आणि मारले गेलेले पायलट यांची संख्या येवढी होती की नौदल आणि हवाई दलाला पायलट कमी पडू लागले होते. चौकशी करता करता त्यांना कळलं की विमानांचा तुटवडा होत होता.
माहिती मिळवण्यासाठी हर्शना जनरल्स उपयोगी पडले. व्हियेतनामधे सरकारनं केलेली बेकायदेशीर, अमानुष कृत्य यांची माहिती जनरल्सनी हर्शना दिली.अमेरिकेत कोणीही सैनिक जेव्हां सैन्यदलात प्रवेश करतो तेव्हां तो राज्यघटनेची शपथ घेत असतो. आपण कोणा प्रेसिडेंटशी इमानदार नाही तर आपण अमेरिकन राज्यघटना, अमेरिका या देशाशी इमादार आहोत असं ती शपथ म्हणते. थोडे पण तरीही किती तरी अधिकारी कर्तव्य बजावत असताना सरकारची री ओढत नाहीत, लष्करात चुकीचं आणि बेकायदेशीर घडत असेल तर तसे अधिकारी त्यावर टीका करतात, त्या बद्दल कधी जाहीर किंवा कधी छुपेपणानं लष्करी धोरणावर टीका करतात, त्यातले दोष दाखवतात. सत्य शोधण्यासाठी अशा विवेकी अधिकाऱ्यांचा उपयोग होत असतो.
नौदलाच्या वैमानिकांची बाँबफेक सदोष होती. एक पूल उडवायचा होता. कित्येक वेळा बाँबहल्ले करूनही तो पूल उडवता आला नाही. त्या खटाटोपात अमेरिकेची अनेक विमानं व्हियेतकाँगनं पाडली, त्यातले पायलट मेले. लक्ष्य हेरणं, शत्रुच्या हालचाली अचूक कळणं यात गडबड होत होती. गरज नसतांना घाईगर्दीनं, माजोरीगिरीमुळं, उधळमाधळ करण्याच्या वृत्तीमुळं जास्त विमानं, जास्त बाँब, जास्त सैनीक वापरले जात होते. अधिकाऱ्यांचे निर्णय चुकीचे असत आणि त्यात पायलट विनाकारण मरत. बाहेरच्या लोकांना हे कळत नसलं तरी वैमानिकांच्या वर्तुळात ते तो दैनंदिन अनुभव होता. म्हणूनच वैमानिक नोकऱ्या सोडून परतत होते.
एका अधिकाऱ्याला त्याची लायकी नसताना बढती दिली होती, याचा सुगावा हर्शना लागला. सखोल चौकशी केल्यावर त्याना कळलं, की त्या अधिकाऱ्याच्या घोडचुकांमधे फार अमेरिकन सैनिक नाहक मारले गेले होेते. त्याला शिक्षा दिली तर बोंब होईल म्हणून त्याला बढती देऊन परत बोलावण्यात आलं होतं.
लक्ष्य एक रेलवे स्टेशन असताना स्टेशनापासून काही किमी अंतरावर बाँबफेक झाल्याचे, मुलकी लोकांची घरं उध्वस्थ झाल्याचे फोटो हर्शनी मिळवले.
दोन लेखांमधे, हर्शनी अमेरिकेची होणारी हानी, निष्पाप माणसांना क्रूर रीतीनं कसं मारलं जात होतं या गोष्टी लिहिल्या. बोंब झाली. अमेरिकन वाचकांना असलं वाचायची सवय नव्हती. अमेरिकन लष्कर आणि सरकारला तर ते सहन होण्यासारखं नव्हतं. हर्शची नोकरी गेली, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला, ते शत्रूला मदत करतात असा आरोप झाला.
प्रेसिडेंट केनेडीनी रासायनीक शस्त्रं वापरायचं ठरवलं होतं. त्यासाठी अमेरिकाभर अनेक विद्यापीठं आणि प्रयोगशाळात संशोधन सुरु केलं होतं. व्हियेतनाममधे लाखो हेक्टर शेतांवर वनस्पतीनाशक विषाचे फवारे मारायचं ठरलं होतं आणि त्यासाठी आवश्यक विषं तयार केली जात होती. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ते विरोधात होतं. ते अमानुषही होतं.व्हियेतनामी प्रजेला उपाशी मारण्याचं धोरण केनेडी अवलंबत होेते. अनेक शास्त्रज्ञांचा याला विरोध होता. पण कोणी बोलत नव्हतं. कारण बोलणं म्हणजे देशद्रोह होता.
जिथं हे वायू तयार करत होते त्या कारखान्यात, गावांत हर्श पोचले. विषारी वायू तयार करणाऱ्या कारखान्यातल्या कामगारांवरही त्या रसायनांचा दुष्परिणाम होत होता. कारखान्यातून बाहेर पडणारा गाळसाळ आसपासच्या शेतजमिनीत पसरून पिकं विषारी होत होती, नागरिकांना त्रास होत होता. गावकरी, नागरीक, बोलायला तयार नव्हते.
हर्शनी रासायनीक शस्त्राच्या प्रकरणाला वाचा फोडली.
ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं मारलं. ही घटना कशी घडली तेही अमेरिकेनं जनतेला खोटंच सांगितलं. हर्श यांनी ओसामा मरणाची हकीकत तपशीलवार पुस्तकात मांडली. हर्श यांचं म्हणणं असं की ओसामाला मारून टाकलं त्या ऐवजी त्याच्यावर न्यूरेंबर्ग खटल्याप्रमाणं खटला भरून दहशतवादी कारस्थानं जगासमोर आणायला हवी होती. आईकमनला जर्मनीनं कट करून मारलं नाही, त्याच्यावर खटला भरला. तसंच करायला हवं होतं. त्यामुळं कायद्यानं चालणारा समाज आणि कायदा धाब्यावर बसवणारे दहशतवादी यातला फरकही लोकांना समजला असता.
हर्श न्यू यॉर्कच्या मिश्र वस्तीत वाढले. त्यांच्या सभोवताली काळी माणसं होती. पत्रकार म्हणून वाढत असताना काळ्यांवर होणारा अन्याय, माध्यमं आणि समाजात खोलवर रुतलेला वर्णद्वेष हर्शनी अनुभवला. पोलिसानं काळ्या माणसाला तो दोषी नसतानाही पाठीमागून गोळी घालून ठार मारलं. चोरीचा आरोप ठेवला. पुरावे स्पष्ट होते. पोलिसाचं वागणं बेकायदेशीर आणि वर्णद्वेषाचं होतं. घटनास्थळी हजर असणाऱ्या एका माणसानं पोलिसाचं बोलणं ऐकलं होतं, हर्श यानी तेही नोंदवलं होतं. पण हर्श यांनी लिहिलेल्या बातमीतला वर्षद्वेषाचा भाग गाळून संपादकानं बातमी प्रसिद्ध केली. एका चोराला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी घातली अशी एकदम चुकीची बातमी प्रसिद्ध झाली. हा हर्श यांचा उमेदवारीचा काळ होता. नंतर हर्श वर्णद्वेषाच्या घटना, दंगली यांचं वार्तांकन स्वतःच्या जबाबदारीवर करू लागले, आपली बातमी त्यांनी संपादित होऊ दिली नाही.
पोलिस आणि बातमीदारांचं गूळपीठ असे. पोलीस देतील तशीच बातमी बातमीदार, संपादक छापत. या बदल्यात बातमीदारांना नाना प्रकारचे फायदे पोलीस आणि सरकार देत असत. पेंटॅगॉन, सरकारचं परदेश खातं, लष्कर या संस्था आणि वॉशिंग्टनमधले बातमीदार यांच्यातही गूळपीठ असे. त्यामुळं खोट्या बातम्या, सरकार धार्जिण्या बातम्या बातमीदार सर्रास छापत असत.
वरील दुष्टचक्र हर्श यांनी भेदलं.
सिमोर हर्श म्हणतात ” आज देश आणि माध्यमं पक्षपाती आणि कर्कश्श झाली आहेत. पत्रकारीमधे अराजक माजलं आहे, पत्रकारी उसवलेली आहे. वेळ खर्च करून, संशोधन करून, सर्व बाजू तपासून, अभ्यास आणि वाचन करून बातमी द्यायची असते, हे आता पत्रकारी जगाला मान्य नाही. पत्रकार या माणसाचा विकास घडवावा लागतो, त्यावर खर्च करावा लागतो, त्यावर गुंतवणूक करावी लागते, त्याला त्याच्या कलानं स्वतंत्रपणे व्यक्त होऊ द्यावं लागतं, हे संपादकांना आणि मालकांना आता मंजूर नाही.”
”पत्रकारीतेत चिखल झालाय. तो दूर करणं हे काही आपलं काम नाही, ते आपल्याला जमेल असंही नाही. परंतू आपण काय पद्धतीनं पत्रकारी केली, कसे वाढलो, कशा चुका केल्या, कशा त्या निस्तरल्या येवढं तरी लोकांना सांगावं”, या उद्देशानं सिमोर हर्शनी त्यांच्या आठवणी लिहिल्यात.
शोध पत्रकारीतलं सिमोर हर्श हे एक ठळक, मोठं नाव. त्यांना पुलित्झरसह अनेक आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन पुरस्कार मिळाले आहेत. अगदी अलीकडं इराक युद्ध, सीरियातलं सिविल वॉर, ओसामा बिन लादेन मारलं जाणं या विषयावर त्यांनी बातम्या दिल्या, त्या विषयावर पुस्तकं लिहिली.
आज सिमोर हर्श ८२ वर्षाचे आहेत. आठवणी लिहून ते थांबलेले नाहीत. अजूनही ते बातम्या देत असतात.
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
हर्श यांची काही प्रसिद्ध पुस्तकं. Reporter: A Memoir, My Lai, Cover Up, The Price of Power, The Dark Side of Camelot, Chain of Command, The Killing of Osama Bin Laden
मूळ लेख
COMMENTS