नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याचे माजी आयएएस अधिकारी व पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैजल यांना बुधवारी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्य
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याचे माजी आयएएस अधिकारी व पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैजल यांना बुधवारी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. ते इस्तंबुल येथे जाणार होते अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली असली तरी शाह फैजल यांच्या मित्राने ते हार्वर्डला जाणार होते असे द हिंदू या वर्तमानपत्राला सांगितले आहे.
शाह फैजल यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी दुपारीच काश्मीरमध्ये पुन्हा पाठवण्यात आले. तेथे त्यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम संसदेत रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. अनेक राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात शाह फैजल यांनाही आता नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शाह फैजल यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली होती. त्यांनी फेसबुकवर काही मजकूरही प्रसिद्ध केला होता. त्यांनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन केंद्र सरकारने काश्मीरच्या जनतेचा विश्वासघात केला असल्याची तिखट शब्दांत टीका केली होती. त्यामुळे ते सरकारच्या रडारवर होते.
बुधवारी ते दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असताना त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात आले. त्यांना कोणत्या आरोपाखाली ताब्यात घेतले हे पोलिस सांगत नव्हते. पण नंतर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले. या कायद्यानुसार सरकार कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात हजर न करता तीन ते सहा महिने इतक्या कालावधीसाठी तुरुंगात ठेवू शकते.
वादग्रस्त कायदा
राजकीय आंदोलने चिरडण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा हा जम्मू व काश्मीरमध्ये अत्यंत वादग्रस्तरित्या पोलिसांकडून वापरला गेला आहे. या कायद्यामुळे राजकीय नेत्यांना कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात येत आहे याची माहिती न देता पोलिस हा कायदा अत्यंत निष्ठूरपणे राज्यात राबवत आहेत. या आंदोलनामुळे कोणतेही जनआंदोलन चिरडले जात असून त्याच्या सर्वाधिक झळ खोऱ्यातील तरुण मुलांना होते. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत सार्वजनिक सुरक्षा कायद्यातंर्गत १५ ते २८ वयोगटातील अटक केलेल्या तरुणांची संख्या एकूण अटक केलेल्यांपैकी ५५ ते ६० टक्के आहे.
COMMENTS