अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ

अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ

आपले स्थान कोणी बळकावेल अशी दूर दूरपर्यंत परिस्थिती दिसत नसतांना संघटनेवर घट्ट बसलेली पकड सोडून अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याची घाई का केली असेल हा सर्वाना पडलेला प्रश्न आहे. या घाईचे समर्पक उत्तर कोणाला मिळत नाही आणि मिळणारही नाही. कारण घाई अमित शाह यांनी केली हे गृहितकच चुकीचे आहे. अमित शाह मंत्रिमंडळात आले ते मोदींची गरज म्हणून !

सीएए नियमावलीसाठी मुदतवाढ द्याः केंद्राची विनंती
चेंजमेकर ‘ नंदीग्राम’
जम्मू व काश्मीर आणि लडाखचे नवे (वादग्रस्त) नायब राज्यपाल

२०१४मध्ये मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्याची तुलना आधीच्या सरकारांशी व्हायची. या तुलनेतून ते बरे की वाईट ठरवले जायचे. मोदी सरकार आता दुसऱ्यांदा सत्तारूढ झाल्यावरही अशी तुलना होत राहील, पण त्या आधी तुलना होईल ती ‘मोदी-१’ आणि ‘मोदी-२’ या राजवटीतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपासून अशी तुलनात्मक चर्चा सुरूही झाली आहे. ‘मोदी-१’मध्ये नरेंद्र मोदी सबकुछ होते. ‘मोदी-१’मध्ये मोदींचा त्यांच्या मंत्रिमंडळातील अरुण जेटली यांचेवर सर्वाधिक विश्वास होता. अरुण जेटली मोदींच्या प्रत्येक निर्णयाचे हिरीरीने समर्थन करण्यासाठी धावून जायचे. जेटली विश्वासपात्र होते, मोदी त्यांचेवर विसंबूनही असायचे तरी जेटलींची ओळख ‘दबंग मंत्री’ अशी निर्माण झाली नाही. ते कायम मोदींच्या मदतनीसाच्या भूमिकेत राहिले.“मोदी-१’मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह हे क्रमांक २चे मंत्री होते. भाजप अध्यक्ष आणि मोदींच्या सर्वाधिक जवळचे म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा ‘मोदी-२’मध्ये मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतरही तांत्रिकदृष्ट्या राजनाथसिंह हे क्रमांक दोनचे मंत्री म्हणून कायम आहेत. क्रमांक दोनचे मंत्री असले तरी मंत्रिमंडळातील त्यांचे ज्येष्ठत्व नामधारीच होते आणि आताही ते वेगळे असण्याची शक्यता नाही. ‘मोदी-१’मध्ये क्रमांक दोनच्या पदाचे नामधारित्व त्यांनी बिनबोभाटपणे स्वीकारले होते. ‘मोदी-२’मध्ये त्यापेक्षा वेगळे घडणार नसतांना ते नामधारीच आहेत हे जाणूनबुजून आणि ठसठशीतपणे दाखविण्याचा प्रयत्न झाला हे खरे ‘मोदी-१’ आणि ‘मोदी-२’ मधील वेगळेपण आहे! ‘मोदी-१’मध्ये अरुण जेटलींना अधिक महत्त्व दिले गेले असले तरी त्यामुळे पक्षात आणि सरकारात जेटली हे राजनाथसिंह यांचेपेक्षा मोठे आहेत, असा समज कधीच निर्माण झाला नाही. ‘मोदी-२’ मध्ये अरुण जेटली यांची जागा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घेतल्यानंतर मात्र सुरुवातीलाच राजनाथसिंह क्रमांक दोनचे मंत्री असतील पण मोदी मंत्रिमंडळातील ‘प्राईम’ मिनिस्टर हे अमित शाहच आहेत हे जगजाहीर करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या कामकाजासाठी ज्या आठ मंत्रिमंडळ समित्या नेमल्या त्यातील नियुक्त्यांवरून स्वत: मोदींनीच ही बाब जगजाहीर केली. नेमलेल्या आठही समित्यात अमित शाह यांना स्थान देण्यात आले तर मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री राजनाथसिंह यांना फक्त दोन समित्यात स्थान देण्यात आले होते. राजनाथसिंह यांच्या नाराजीनंतर त्यांना अधिक समित्यांवर स्थान देण्यात आले असले तरी मोदी मंत्रिमंडळात मोदीनंतर अमित शाह यांचेच स्थान आहे हे समित्यांवरील नियुक्त्यातून स्पष्ट झाले होते ते वास्तव मात्र बदललेले नाही.

ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांनी पक्षात आणि सरकारात दुय्यम भूमिका मुकाटपणे मान्य केली असतांना ते जाहीरपणे ठसवून त्यांना अपमानित केले गेले याची चर्चा पुष्कळ झाली पण त्यामागच्या कारणांवर प्रकाश मात्र पडला नाही. भारतीय जनता पक्षाच्या क्षितिजावर अमित शाह यांचा झपाट्याने झालेला उदय हेच कारण गृहीत धरण्यात आले. अमित शाह यांना मोदीनंतर आपणच सबकुछ आहोत हे दाखवण्याची घाई होणे शक्य आणि स्वाभाविक असले तरी हेच एकमेव कारण नाही. ज्याप्रकारे राजकारणाच्या मुख्य धारेतून आणि पक्षपटलावरून मोदी उदयानंतर पक्षाच्या मुख्य नेत्यांना बाजूला सारण्याचा यशस्वी प्रयत्न झाला त्याचाच हा पुढचा अध्याय मानला तर या घटनाक्रमाचा अर्थ उलगडतो. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांसोबत मोदींना काम करणे जड जाते, संकोच होतो कारण त्यांच्यासोबत काम करतांना न्यूनगंड डोके वर काढतो हे या मागचे कारण असले पाहिजे. मोदी दीर्घकाळ मुख्यमंत्री असतांना त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाचा कोणताही प्रयत्न केला नाही याचे कारण त्यांच्या कार्यशैलीत सापडते. आपल्यापेक्षा राजकीयदृष्ट्या कमी उंचीच्या लोकांबरोबर ते काम करू शकतात, जास्त उंचीच्या लोकांसोबत नाही. अडवाणी हे मोदींचे ‘गॉडफादर’ असले तरी आपण सर्वोच्चपदी पोचल्यानंतरही आपली तीच ओळख कायम राहणे हा मोदी यांच्या अहंकाराला धक्का होता. त्यामुळे ‘मोदी-१’मध्ये त्यांनी पहिले काम अडवाणींना बाजूला सारण्याचे केले. पक्षातील मोदींच्या कृत्रिम उदयाला अडवाणी यांचा असलेला विरोध बाजूला सारत पक्षाध्यक्ष म्हणून राजनाथसिंह यांनी मोदीच्या पक्षातील आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयाला मोठा हातभार लावला होता. अडवाणी आमचे आदरणीय नेते आहेत असे म्हणत राजनाथसिंह यांनी २०१३मध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचे घोडे पुढे दामटले होते. पूर्वार्धात मोदींना राजकारणात स्थान देवून मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे आणि वाजपेयींच्या रोषापासून त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचविण्याचे श्रेय जसे अडवाणींचे आहे तसेच अडवाणींच्या विरोधाला न जुमानता मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचे श्रेय पक्षाध्यक्ष म्हणून राजनाथसिंह यांचेकडे जाते. या त्यांच्या कामगिरीच्या बळावरच ते मोदी मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री आहेत. अमित शहा यांचेसाठी पक्षाध्यक्ष पद सोडतांना त्यांनी सौदेबाजी करून गृहमंत्रीपद मिळविले होते. अशा वरचढ लोकांसोबत त्यांच्या वरच्या पदावर राहून काम करणे मोदींसाठी सहज नसल्याने संधी मिळताच गृहमंत्रीपद काढण्यात आले. आपल्यावर उपकार असणाऱ्या सोबत काम करण्यात मोदीजींचा न्यूनगंड आडवा येतो असा याचा अर्थ होतो. आपण उपकार करून मोठे केले त्यांचे सोबत काम करणे मोदींसाठी सहज आणि सोपे जाते. मागच्या मंत्रिमंडळात अशी व्यक्ती अरुण जेटली होती. या मंत्रिमंडळात अमित शाह आहेत! म्हणजे मोदी दाखविले जातात तितके खंबीर नसून मनाने कमकुवत आहेत, असा निष्कर्ष निघतो.

अमित शाह यांचा मंत्रिमंडळ प्रवेश या निष्कर्षाची पुष्टी करणाराच आहे. सरकारवर मोदींचे नियंत्रण आणि पक्षावर अमित शाह यांचे नियंत्रण ही व्यवस्था उत्तम प्रकारे काम करीत असल्याचे निवडणूक निकालाने दाखवून दिले असतांना अमित शाह यांचा मंत्रिमंडळ प्रवेश अनेक राजकीय विश्लेषकांना बुचकाळ्यात टाकणारा ठरला आहे. मंत्रिमंडळात नसतानाही सरकारात त्यांचे स्थान मोदी नंतरचे मानले जायचे. सरकारी निर्णयात त्यांचा अदृश्य हात असायचाच. मोदींचा वारस म्हणून राजनाथसिंह किंवा नितीन गडकरी यांना न समजता शाह यांचेकडेच पाहिले जात होते. आपले स्थान कोणी बळकावेल अशी दूर दूर पर्यंत परिस्थिती दिसत नसतांना संघटनेवर घट्ट बसलेली पकड सोडून अमित शाह यांनी मंत्रिमंडळात येण्याची घाई का केली असेल हा सर्वाना पडलेला प्रश्न आहे. या घाईचे समर्पक उत्तर कोणाला मिळत नाही आणि मिळणारही नाही. कारण घाई अमित शाह यांनी केली हे गृहितकच चुकीचे आहे. अमित शाह मंत्रिमंडळात आले ते मोदींची गरज म्हणून. मोदी ज्या कारणासाठी पत्रकार परिषदेला सामोरे जावू शकत नाही त्याच कारणाने ते बाजूला विश्वासू साथीदार असल्याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीला किंवा मंत्रिगटाच्या बैठकीला सामोरे जाणे त्यांना अवघड वाटत असणार. मागच्या मंत्रिमंडळात अशा विश्वासू साथीदाराची भूमिका अरुण जेटली यांनी समर्थपणे पार पाडली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आता ते मंत्रिमंडळात नाहीत. जगातील सर्वात मोठा पक्ष असण्याचा दावा असणाऱ्या भारतीय जनता पक्षात मोदींचा विश्वास असणारे फक्त शाह आणि जेटलीच आहेत. जेटली मंत्रिमंडळात नाही म्हटल्यावर शाह यांनी असणे ही मोदींची अपरिहार्य गरज आहे. शाह आणि जेटलीशिवाय मोदींचा दुसऱ्या कोणावर विश्वास नाही असे नाही. बाकी ज्यांच्यावर विश्वास आहे ते अजित डोवलसारखे नोकरशाह आहेत. ज्यांना आपल्या हातात सत्ता केंद्रित ठेवायची असते त्यांचा फक्त बोटावर मोजण्या इतक्याच लोकांवर विश्वास असतो आणि आपल्या इतर सहकाऱ्याबद्दल असुरक्षिततेची भावना असते हे इतिहासातील अनेक प्रसंगात दिसून आले आहे. ‘मोदी-२’मध्ये याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.

सुधाकर जाधव, राजकीय विश्लेषक असून त्यांनी व्यक्त केलेली मते व्यक्तिगत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0