‘तरीही आमचा लढा सुरूच’ : शाहीनबाग आंदोलकांचा निर्धार

‘तरीही आमचा लढा सुरूच’ : शाहीनबाग आंदोलकांचा निर्धार

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला शाहीनबागेच्या गल्ल्यांमध्ये दोन आणि तीनच्या गटात उभे असणारे लोक चिंताग्रस्त दिसत होते. कालिंदीकुंज मार्गावरील शा

मोदींचे उथळ भाषण व जमिनीवरील वास्तव
४२ टक्के स्थलांतरीत मजुरांच्या घरात अन्नधान्याची वानवा
महासाथ कराराला विरोध आवश्यक का आहे?

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला शाहीनबागेच्या गल्ल्यांमध्ये दोन आणि तीनच्या गटात उभे असणारे लोक चिंताग्रस्त दिसत होते.

कालिंदीकुंज मार्गावरील शाहीनबाग आंदोलनात ठिय्या देऊन बसलेल्या शेकडो स्त्रियांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी कोरोनाविषाणूच्या साथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर तेथून उठण्याची सक्ती केली. यावेळी परिस्थिती फारच वाईट झाली, तर ती हाताळण्यासाठी  हजारांहून अधिक पोलिस या भागात हजर होते, असे एका पोलिसानेच सांगितले.

मात्र, परिस्थिती वाईट होणे म्हणजे नेमके काय हे त्याने स्पष्ट केले नाही. त्याचवेळी आणखी एक पोलिस तेथे आला आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शाहीनबागेच्या गल्ल्यांमध्ये शिरू नये असे त्याने फर्मावले. संवेदनशील स्थानिकांना चिथावण्यासाठी माध्यमेच जबाबदार आहेत, असे तो म्हणाला.

पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी सातच्या सुमाराला आंदोलक महिलांना जबरदस्तीने तेथून उठवले असे पहाटे चार वाजता आंदोलनस्थळावरून परतलेल्या एका स्त्रीने सांगितले. “पोलिस आंदोलनस्थळावर येऊन स्त्रियांना बळजोरीने उठवत आहेत असा फोन आल्यानंतर आम्ही आंदोलनस्थळी धाव घेतली. मात्र, तेथे हजारो पोलिस होते आणि त्यांनी आम्हाला आत जाऊ दिले नाही. त्यांनी आम्हाला अटक करण्याची धमकी दिली.”

“पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी स्त्रियांना स्पर्श केला. ते असे कसे करू शकतात? त्यांनी या भागातील एका मुलालाही उचलले आहे,” असे गल्लीत उभ्या असलेल्या एका स्त्रीने सांगितले.

पोलिसांनी अर्थातच सगळे दावे फेटाळले आहेत. “आंदोलक महिला राजधानीत कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन” करत असल्याने त्यांना उठवले असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आंदोलकांना तेथून हाकलण्यापूर्वी किंवा ताब्यात घेण्यापूर्वी त्यांना स्वत:हून आंदोलनस्थळ मोकळे करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता, असेही पोलिस म्हणाले.

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अन्य शहरांप्रमाणेच दिल्लीतही गेल्या सोमवारपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. सर्व प्रकारच्या सार्वजनिक संमेलनांवर बंदी घालण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. या संमेलनांमध्ये आंदोलनांचाही समावेश होता.

सुतारकाम करणारे मोहम्मद जमील म्हणाले, “मी आंदोलन सुरू झाल्यापासून दररोज आंदोलनस्थळावर जात होतो. आंदोलन उखडून टाकले जात आहे हे कळल्यावरही मी तेथे पोहोचलो. आम्ही आत्तापर्यंत पोलिसांना सर्व प्रकारे सहकार्य करत आलो होतो. या स्त्रियांनी तीन महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांवर अशा पद्धतीने पाणी पडल्याचे बघून मला खूप वाईट वाटले. कोरोनाविषाणूची साथ पसरली आहे म्हणूनच पोलिस आंदोलकांना हटवू शकले. अन्यथा आंदोलक जागचे हललेच नसते.”

आमचा लढा सुरूच राहील.

आमचा लढा सुरूच राहील.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये शिकणाऱ्या मोहसिदचाही या आंदोलनात सुरुवातीपासून सहभाग होता. तो म्हणाला, “आता बघा या स्थळाकडे. सगळीकडे पोलिस आहेत. आमचे प्रयत्न त्यांनी धुळीला मिळवले.”

स्वत:ला या आंदोलनाचे “माध्यम समन्वयक” म्हणवणारे शोएब जमाई म्हणाले की, पोलिसांनी आंदोलकांशी दगलबाजी केली आहे. आंदोलन गेले शंभर दिवस सुरू होते आणि पूर्ण भरात होते. अनेक राज्यांनी एनपीआरच्या विरोधात ठराव संमत केले होते आणि सरकारचा एनआरसीबद्दलचा सूरही बदलू लागला होता. सीएए मात्र अजूनही मागे घेतला गेला नव्हता. आमचा लढा आत्ता कुठे सुरू होत होता.

करोनाविषाणू साथीच्या चिंतेमुळे सरकारने राजधानीत लॉकडाउन जाहीर केल्यामुळे शाहीनबागेतील आंदोलकांनी प्रतिकात्मक निषेध करण्यास सहमती दाखवली. त्यांनी आपापल्या चपला आंदोलनस्थळी ठेवल्या आणि त्यांचा तंबू, इंडिया गेट कॅरिकेचर आणि भारताचा नकाशा यापैकी काहीही उद्ध्वस्त केले जाणार नाही या अटीवर आंदोलनस्थळ सोडले.

मात्र, पोलिसांनी आंदोलकांच्या या अटींचा मान राखला नाही, असे मत जमाई यांनी व्यक्त केले. “पंतप्रधानांनी २२ मार्चच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यापूर्वीच पोलिस आणि शाहीनबाग आंदोलकांची इंडिया इस्लामिक कल्चर बिल्डिंगमध्ये बैठक झाली होती. आंदोलनस्थळावरील कोणतीही रचना मोडणार नाही अशी हमी पोलिसांनी दिली होती. त्यांनी आम्हाला प्रतिकात्मक निषेधाचीही परवानगी दिली होती. मात्र, सकाळी त्यांनी आपले वचन मोडले,” असे जमाई म्हणाले.

आंदोलक महिलांपैकी काहींना पोलिसांनी बळजोरीने तेथून उठवल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सगळे पहाटेच्या वेळात केल्याने शाहीनबागेतील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. यामुळे लोकांचा जमाव आणखी वाढेल आणि सर्वत्र अनागोंदी निर्माण होईल. कोरोनाविषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे वागणे अत्यंत बेजबाबदार होते, असा आरोप जमाई यांनी केला. अनेक राज्यांनी एनपीआरविरोधात ठराव संमत केले आहेत ते शाहीनबाग आंदोलनामुळे प्रभावित होऊनच, असाही दावा त्यांनी केला.

एकदा का करोनाविषाणूची साथ आटोक्यात आली की पुन्हा हे आंदोलन जोरात सुरू होईल, असा निर्धार आंदोलनाच्या सुरुवातीपासून यात सहभागी असलेल्या मध्यमवयीन गृहिणी आफ्रीन जमाल यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आम्ही आमचे प्रयत्न व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही काही गोष्टी साध्य केल्या आहेत पण हा लढा दीर्घकाळ चालणारा आहे.”

आंदोलन बंद केल्यानंतर आता या भागातील वयोवृद्ध लोकांनी तरुणांना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. त्यातले एक जण म्हणाले, “आम्ही सकाळपासून येथे बसलेलो आहोत. कोठेही गट जमताना दिसला की आम्ही त्या लोकांना दूर होऊन गट तोडायला सांगतो. शाहीनबागेतील लोक संतप्त आहेत. येथील प्रत्येक घरातील कोणी ना कोणी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आंदोलनाचा भाग होते. त्यांना निराश वाटत आहे. परिस्थिती कोणत्याही क्षणी हातातून निसटू शकते. म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिक येथे बसून त्यांना शांत करण्याचे काम करत आहोत.”

अर्थात याबाबतही लोकांच्या भावना संमिश्र आहेत. चाळीस फूटी रस्त्याबाहेर उभे असलेले आणखी एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले की, सरकारने हे आंदोलन हटवून चांगलेच केले, कारण, कोरोनाविषाणूची साथ रोखण्यासाठी ते आवश्यक होते. एकदा का ही वैद्यकीय आपत्ती आटोक्यात आली की, स्त्रिया पुन्हा आंदोलनासाठी बसू शकतात.

एकूण ज्येष्ठ नागरिक तरुणांना शांत करून “हे आपल्याच भल्यासाठी आहे” हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. दुपारनंतर पोलिसांनी द वायरला सांगितले की, परिस्थिती “नियंत्रणात” आहे आणि या भागात संघर्षाची कोणतीही शक्यता नाही.

इस्मत आरा ही जामिया मिलिया इस्लामियामधील एजेकेएमसीआरसीमध्ये जनसंवादाचे शिक्षण घेत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0