राम मंदिरावरून हाणामारी

राम मंदिरावरून हाणामारी

राम मंदीरावरून मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आज समोरासमोर आले आणि तूफान हाणामारी झाली. शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली.

राम मंदिराच्या जमीन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त आल्यानंतर शिवसेनेकडून राम मंदीर प्रकरणावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर जमा झाले त्या दरम्यान ही हाणामारी झाली. यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना भवनाच्या बाहेर भाजपाचे आंदोलन सुरु झाल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते जमा झाले. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आले. घोषणाबाजी आणि तुफान हाणामारी झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

“भाजपाचे कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती,” असा आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला.

दरम्यान शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राम मंदीर घोटाळ्याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही खुलासा करण्याची मागणी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आपचे खासदार संजय सिंग यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा करुन माहिती दिली. प्रभू श्रीराम आणि अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांनी त्याचं राजकारण केलं असेल पण आम्ही नाही. ट्रस्टचे सर्व सदस्य भाजपाच्या आणि सरकारच्या वतीने नेमण्यात आले आहेत. आमच्यासारख्या संघटनेचाही सदस्य असावा असं आम्ही सांगत होतं. पण त्यांनी तसं केलं नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचं काम सुरु होतं. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आपल्यातर्फे एक कोटींची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून निधी गोळा करण्यात आला. संपूर्ण जगातून शेकडो कोटींचा निधी राम मंदिरासाठी लोकांनी दिला आहे. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा झाला नाही पाहिजे. पण जे जमिनीचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

COMMENTS