ऐशींच्या दशकात पुकारण्यात आलेले राममंदिर निर्माण आंदोलन किंवा अलीकडे पार पडलेला काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ हिंदूच्या श्रद्धा जपणुकीचा कार्यक्रम नक्कीच नव्हता. यामागे जसे एकगठ्ठा हिंदू मतांचे गणित होते, तसेच पुरोहितशाही-ब्राह्मणशाहीला बळकटी देण्याचाही सुप्त हेतू होता. आज आता रा. स्व. संघाने माध्यमांत पेरलेले लेखक-पत्रकार याच ब्राह्मणशाहीच्या चश्म्यातून राष्ट्र संकल्पनेची चढ्या आवाजात व्याख्या करू लागले आहेत. याला ना इतिहासाचा आधार आहे ना तर्काचे अधिष्ठान. तरीही तटस्थतेचा आव आणणारे मालक-संपादक अशांना सन्मानाने जागाही देताहेत आणि धर्मरुपी अफूची मात्रा चटावल्याने समस्त जनता आपल्या तारेत मस्त आहे याची खात्री असल्यामुळेच हे तथाकथित विचारवंत आपला कार्यभाग साधून सहीसलामत निसटूनही (हिट अँड रन) जाताहेत...
रावणाला दहा डोकी होती असे म्हणतात. ही दहा डोकी एकत्रितपणे योजनाबद्ध काम करत होती की नव्हती, हे समजायला मार्ग नाही. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (संघ) ही संघटना मात्र एकाच वेळी अनेक डोक्यांनी एकत्रितपणे योजनाबद्ध पद्धतीने आणि एकाच विचाराने कार्य करते ही गोष्ट स्पष्ट आहे. संघ परिवाराने सोयीसाठी आणि आपल्या विचारांना पूरक असणार्या वा होऊ शकणार्या लोकांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या संस्था-संघटनादेखील एकाच पद्धतीचे कार्य संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठरवून दिलेल्या पद्धतीने करतात. अर्थात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्थाही याला अपवाद नाही, ही गोष्ट रवींद्र माधव साठे यांचा ‘भारत एक पुरातन राष्ट्र’ (लोकसत्ता, ४ फेब्रुवारी २०२२) हा लेख वाचल्यावर स्पष्ट होते.
अज्ञान आणि दारिद्य्राचा वारसा
संघाचे उद्दिष्ट सध्याचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि सेक्युलॅरिझम या आधुनिक मूल्यांवर निर्माण केलेले भारत हे राष्ट्र नष्ट करून त्याजागी हिंदुराष्ट्र निर्माण करणे हे आहे. अर्थात हिंदुराष्ट्र निर्माण करायचे म्हणजे नेमके काय करायचे, हे संघाने कधीही स्पष्ट केलेले नाही आणि तसे करणे सध्या सोयीचे नसल्याने संघ करणारही नाही. संस्कृत सुभाषिते, श्लोक, अलंकारिक भाषा आणि काही थोड्या लोकांकडे असणारे वैभव या सार्याचे प्रचंड धुके निर्माण करायचे आणि कधी काळी असे गौरवशाली हिंदुराष्ट्र या भूतलावर अस्तित्वात होते, असा भ्रम जोपासायचा, अशी योजना जाणीवपूर्वक राबवली जात आहे. कधी अस्तित्वातच नव्हता अशा एका वैभवसंपन्न देशाचे चित्र सामान्य जनतेच्या मनावर ठसवत, पूर्वीचे राष्ट्र कसे श्रेष्ठ आणि आदर्श होते हे सांगत 15 ऑगस्ट 1947 रोजी निर्माण झालेल्या राष्ट्राचे, भारत राष्ट्राचे महत्त्व कमी कमी करत जायचे हे संघाचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरूनच साठे यांनी सदर लेख लिहिला आहे. आणि म्हणूनच यावर लिहिणे भाग झाले आहे.
असे पुरातन राष्ट्र भारतात होते, असे साठे म्हणतात -आणि तसाच संघाचा दावाही आहे- त्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमा सांगून त्या भूखंडाला भारत आणि प्रजेला भारती म्हणतात, असे विष्णू पुराणातील एका श्लोकाचा आधार घेऊन साठे म्हणतात. परंतु या नद्या, पर्वत आणि वृक्षांवर प्रेम करत, त्यांचा आदर बाळगत, त्यांची पूजा करत साठेंचे पुरातन राष्ट्र साकार करणार्या प्रजेला या राष्ट्राबद्दल प्रेम वाटावे, हे राष्ट्र आपले वाटावे यासाठी राष्ट्रचालक काय करत होते, ते मात्र साठे लिहीत नाहीत. त्या राष्ट्रात समाजाच्या पन्नास टक्के भाग असणार्या स्त्रियांना पूर्ण शिक्षणबंदी होती. शूद्रांना तर केवळ शिक्षणबंदीच नव्हे तर वरिष्ठांची सेवा करत कोणतीही तक्रार न करता मिळेल त्यावर समाधान मानून जगणे भाग होते, हे मात्र सांगितले जात नाही. ज्या राज्यात बहुसंख्य प्रजेला अज्ञानात आणि दारिद्य्रात ठेवण्याची खास तरतूद असते हे राष्ट्र कोणत्या प्रकारचे असते, यावर प्रकाश टाकला गेला असता तर फार बरे झाले असते.
बेपर्वा राजे-महाराजे
राष्ट्राला केवळ सीमाबद्ध भूभाग असून चालत नाही, त्या राष्ट्रावर प्रेम करणारी, त्या राष्ट्रीयत्वाची ममत्वाने जोपासना करणारी आणि प्रसंगी राष्ट्राच्या रक्षणार्थ प्राण देण्यास सिद्ध असणारी प्रजाही गरजेची असते. इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या आक्रमणाचा समाजाच्या विचारविश्वावर व भावविश्वावर अनिष्ट परिणाम झाला असा लेखकाचा दावा आहे. म्हणूनच ब्रिटिशांचे दीडशे वर्षांचे राज्य सुरू होण्यापूर्वी या देशात कोणती राष्ट्रीयता होती आणि कोणते राष्ट्रप्रेम नांदत होते हे सांगणे भाग आहे. 1757मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीची लढाई जिंकून ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेला प्रारंभ केला. रॉबर्टचे युरोपियन सैन्य अगदी थोडे होते आणि एकंदरीत सैन्यही कमीच होते. पण भारतीय राजे एकत्र नसल्याने आणि त्यांच्या सैन्यात फूट पडल्याने ब्रिटिश विजयी झाले. या विजयात फारसे आश्चर्य नाही. खरे आश्चर्य स्वतः रॉबर्ट क्लाईव्हने नोंदले आहे. तो म्हणतो, प्लासीची लढाई जिंकल्यानंतर मी त्या गावात जायला निघालो त्यावेळी आम्हाला बघायला रस्त्याच्या दुतर्फा इतके लोक जमले होते की त्यांनी एक एक दगड जरी फेकला असता तर मी सैन्यासह गाडला गेलो असतो. याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ हा होतो, की या देशातील सर्वसामान्यांना आपल्या राज्यकर्ता कोण आहे, याच्याशी काहीच पडलेलं नव्हतं. राज्यकर्ता कुणीही असला तरी त्यांच्या सुखदुःखात काही फरक पडणार नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सन्माननीय अपवाद विरळा. राज्यकर्त्यांना लोकांशी काही देणं-घेणं नव्हतं. मग लोकांनाही आपला राज्यकर्ता कोण आहे याचा विचार करायची गरज नव्हती.
उच्चवर्णीयांचे राष्ट्र
हे झाले सर्वसामान्य लोकांचे. वरिष्ठ वर्ग, स्वतःला उच्चवर्णीय वगैरे समजत होता तो वर्ग, याहून वेगळा नव्हता. 1818मध्ये एलफिन्स्टनने पेशव्यांचा पराभव केला. शनिवारवाड्यावर युनियन जॅक भगव्याच्या जागी फडकणार होता. एलफिन्स्टनने पुण्याच्या आसपासच्या ब्रह्मवृंदाला बोलावले व त्यांना येथे युनियन जॅक फडकवला जाणार असल्याचे सांगून त्यांचे त्यावर काय म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला. त्या सज्जन ब्रह्मवृंदाने आमच्या दक्षिणेचे काय, असा प्रश्न केला. त्यावर ती त्यांना घरपोच मिळेल, असं एलफिन्स्टनने सांगितलं. आनंद झालेल्या त्या ब्रह्मवृंदाने युनियन जॅक शनिवरवाड्यावर चढवला जात असताना वेदमंत्रांचा घोष केला. हा इतिहास काय सांगतो, तर या देशातले अभिजन देखील अधःपतित झाले होते. राष्ट्रीयत्वाची भावना या देशात नव्हतीच. जी काही थोडीफार होती तिला स्वार्थानं काबीज केलं होतं.
1885मध्ये काँग्रेसने राष्ट्र निर्माण करण्याचा, हिंदी राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. आपण सर्वसामान्य प्रजेच्या भावना प्लासीच्या लढाईत पाहिल्या. पेशवाई संपली त्यावेळेच्या परम आदरणीय तथाकथित उच्चवर्णीयांची राष्ट्रीयता पाहिली. आता सुशिक्षित हिंदुत्ववाद्यांचा राजकीय विचार पाहू या. रावबहादुर लालचंद यांनी पंजाब हिंदू सभेच्या स्थापनेत मोठा पुढाकार घेतला होता. त्यांनी ‘Self Abnegation in Politics’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी काँग्रेसचे वर्णन ‘हिंदूंनी स्वतःवर ओढवून घेतलेले दुर्दैव’ असे केले आहे. पण त्याचबरोबर मुसलमानांना ब्रिटिशांनी झुकतं माप देऊ नये म्हणून हिंदूंनी नेहमीच ब्रिटिशांची साथ द्यायला हवी असंही म्हटले आहे. शिवाय त्यांनी एक महामंत्र हिंदूंना दिला. ते म्हणतात, आपण आधी हिंदू आहोत आणि नंतर भारतीय आहोत यावर प्रत्येक हिंदूने केवळ विश्वासच ठेवू नये तर तो त्याने आपल्या जीवाचा, जीवनाचा आणि वर्तणुकीचा अविभाज्य भाग बनवावा. अशा तथाकथित राष्ट्रीय लोकांचे हे अनादी- अनंत काळापासून अस्तित्वात असलेले राष्ट्र होते.
पेशव्यांचा पराभव करण्यात ब्रिटिशांच्या महार रेजिमेंटने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा विजयस्तंभ भीमा-कोरेगावला उभारला आहे. आज दोनशे वर्षे उलटल्यावरही तो विजय साजरा केला जातो. याचा अर्थ, लेखक साठे यांना नीट समजला पाहिजे. पेशव्यांनी ज्या समाजाला थुंकण्यासाठी गळ्यात मडकं दिलं आणि रस्ता विटाळू नये म्हणून कमरेला झाडू बांधला, तो समाज या राष्ट्राला त्यांचे राष्ट्र कसे मानणार? त्यांच्या दृष्टीने ते ब्राह्मणराष्ट्र होतं आणि आजही संघ तशाच राष्ट्राला हिंदुराष्ट्र म्हणतो.
पुराण हाच इतिहास
लेखकाने देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ऐक्याबाबत काही विधाने करून काही श्लोक उद्धृत केले आहेत. त्या धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे श्रेय लेखक राज्यकर्त्यांना देणार की भोळ्याभाबड्या अन्यायाने टिचूनपिचून गेलेल्या बहुजनांना देणार? हा खरा प्रश्न आहे. रामराज्याला संघ आदर्श राज्य मानतो त्या रामाच्या राज्यात शंभूकाची हत्या खुद्द प्रभूराम करतात, अशी कथा आहे. रामाने आपले राजगुरू वशिष्ठ यांच्याबरोबर संगनमताने शंभूकाचा वर्ण शूद्र असल्याने त्याची हत्या केली कारण शंभूकाला तो शूद्र असल्याने वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता ते त्याने केले होते. (त्याची शिकवणही बुद्धाप्रमाणे होती हा योगायोग समजावा.) वशिष्ठांनी रामाला वर्णव्यवस्थेचे पालन न केल्याने राज्यावर दुष्काळाचे व अन्य संकटे येतील असे सांगितले, म्हणून रामाने शंभूकाची हत्या केली. एकलव्याला शूद्र म्हणून धनुर्विद्या शिकवण्यास नकार देणारे आणि ती त्याने द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानून स्वतः मिळवल्यावर त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागणारे द्रोणाचार्य हे प्रसंग अनुक्रमे रामायण आणि महाभारतात आहेत आणि रामायण आणि महाभारत हे संघाला पुराणग्रंथ वाटत नाहीत तर इतिहास वाटतात. राम आणि कृष्ण या ऐतिहासिक व्यक्ती वाटतात. या कथा पौराणिक असोत की ऐतिहासिक, यातून जो शूद्रांचे दमन करण्याचा आशय व्यक्त होतो त्याचा अर्थ काय लावायचा?
मग प्राचीन आणि अर्वाचीन भारतातील वर्णन केलेली युद्धे कोणत्या राष्ट्रांमध्ये होत होती? तेव्हा त्यांच्या राष्ट्राच्या सीमा कोणत्या होत्या? हे लेखक सांगत नाही. याचं कारण आहे की संघ परिवार भारत हे एक पुरातन राष्ट्र आहे असे ठसविण्याचा प्रयत्न कितीही आटापिटा करून करत असला तरी वस्तुस्थिती ही आहे की इतिहासात काही दशकांचा अपवाद सोडला तर भारत राजकीयदृष्ट्या कधीही एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. दुसर्या सहस्त्रकात प्रथम मोगलांनी भारताचा मोठा भूभाग राजकीयदृष्ट्या एकत्र आणला. पण खर्या अर्थाने राजकीयदृष्ट्या भारताला एका अमलाखाली ब्रिटिशांनी आणले. त्याआधीही भारतावर आक्रमकांचे राज्य होते, पण बरेच आक्रमक येथेच स्थायिक झाले. ब्रिटिश राज्य मात्र वेगळे होते. ब्रिटिशांना भारतावर केवळ राज्य करायचे नव्हते तर व्यापाराच्या निमित्तानं या देशाची लूट करून ब्रिटनची समृद्धी करायची होती. या गोर्या कातडीच्या लुटारू व्यापार्यांनी सरकारी कायद्यांनी देशाची अमर्याद लूट केली, अमर्याद शोषण केले. या शोषणाविरुद्धचा राष्ट्रीय लढा महात्मा गांधींनी संघटित केला. भारत या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. यापूर्वी देशात गरीब, दलित, शोषितांचे लढे संघटित केले गेले नव्हते आणि दिलेही गेले नव्हते. कारण समाजातील वरिष्ठ वर्गातील लोक राज्यकर्ता कुणीही असला तरी त्याच्याशी जमवून घेत आपले हितसंबंध जोपासत होते. जी मंडळी, राजा म्हणजे देव आणि त्याच्या अवज्ञा म्हणजे महापाप असे म्हणत, तसा उपदेश जनतेला करत दक्षिणेच्या रूपाने आपल्या पोळीवर तूप ओढून घेत होती, तीच मंडळी मोगल काळात फारशी शिकून, दरबारात मोगलांना कुर्निसात घालून आपली पोळी तुपाने लडबडून काढत होती. आणि तीच मंडळी ब्रिटिशकाळात इंग्रजी शिकून ब्रिटिश फेकत असलेल्या तुकड्यांवर जगत होती.
पूर्वी जो वर्ग राजांकडे सैनिकी नोकर्या करत होता, तोच वर्ग मोगलांकडेही सैनिकी करत होता आणि ब्रिटिश फौजेतही त्याच लोकांचा भरणा अधिक होता. गरिबांना कोणी वालीच नव्हता. महात्म्याने चंपारण, बारडोली, खेडा, अहमदाबादचा गिरणी कामगारांचा संप अशा माध्यमातून आणि स्वदेशी, हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि अस्पृश्यता निवारण या स्वराज्याच्या त्रिसूत्रीतून आणि वेगवेगळ्या सत्याग्रह आणि आंदोलनांनी देश जागृत केला, एक केला. गांधीजींच्या कृश हातांनी मूठभर मीठ उचलले आणि बलाढ्य, गौरवशाली ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचून गेला, कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तनमनधनाची ताकद, तनमनधनाची प्रेरणा गांधीजींच्या कृश हातामध्ये एकवटली होती. भारताच्या स्वातंत्र्याचा, भारताच्या उत्थानाचा आशय त्यांनी सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्य आणि उत्थानाशी जोडला. त्यांच्यात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली आणि एका होऊ घातलेल्या राष्ट्राची (Nation in making) संकल्पना जन्मास घातली. ही भारत राष्ट्र संकल्पना (Idea of India) हे गांधीजींचे योगदान त्यांना राष्ट्रपिता बनवते.
मनुचे राष्ट्र हाच अजेंडा
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी साकारलेले हे भारत राष्ट्र संपवण्यासाठी त्यांची हिंदुत्ववाद्यांनी हत्या केली. त्यांना हे नव्यानं निर्माण झालेले, सर्वांना समान नागरिकत्व देणारे राष्ट्र संपवायचे होते. राष्ट्रपित्याला संपवले पण राष्ट्र संपवण्याचा, समान नागरिकत्व संपवून मनुचे हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा उद्देश अद्याप सफल झालेला नाही. त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी अनादि-अनंत काळापासून येथे एक आदर्श राष्ट्र होते, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच हे उदात्तीकरण सुरू आहे.
लेखाच्या शेवटी काही लोक या देशातली भाषा, उपासनापद्धती, राहणी वगैरे बाबतीतील विविधता पाहून आजही असे म्हणतात की भारतात अनेक राष्ट्रे आहेत. परंतु, अगदी सामान्य बुद्धीचा माणूसही याची अनुभूती घेऊ शकतो की भाषा अनेक असल्या तरीही त्यांच्यातले भाव एक आहेत, त्यांचा आत्मा एक आहे, पंथ अनेक असले तरी त्यांचे उद्दिष्ट समान आहे, त्यासाठी आवश्यक गुणसंपदेचा विचार एक आहे. आसेतुहिमाचल ही एक कर्मभूमी आहे, अशी भावना सहस्त्रावधी वर्षे जनमानसात एका सहज स्वाभाविक अनुभवाच्या रुपाने अस्तित्वात आहे. आपल्या संतांनी, महापुरुषांनी विद्वानांनी साहित्य, तीर्थयात्रा, मेळे, प्रवचने, कीर्तने इत्यादी माध्यमातून या अनुभूतीला सांस्कृतिक चेतनेचे स्वरूप दिले आहे. आद्य शंकरचार्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद डॉ. आंबेडकर. स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार आदींनी या चेतनेस जागवले. असे लेखक म्हणतो. लेखकाच्या या भारदस्त आणि अलंकारिक भाषेचे कौतुक करून एक गोष्ट स्पष्टपणे सांगावी लागते, ती म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्याही भारत हे एक राष्ट्र नव्हते. जैन, बौद्ध, शीख या धर्मांची स्थापना वेदांच्या विरोधातून झाली ही गोष्ट विसरता येणार नाही.
लेखकाने संघाच्या परंपरेला जागून आद्य शंकराचार्य यांच्यापासून पासून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ. आंबेडकर, सावरकर, डॉ. हेडगेवार यांना एकाच पंक्तीत बसवले आहे. यात महात्मा गांधींचे नाव सावरकर आणि हेडगेवार यांच्याबरोबर घेतले नाही यासाठी लेखकाचे आभार मानावे तितके थोडेच आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यापातून वेळ काढून लेखकांनी उपरोक्त सर्वांच्या विचारांचा अभ्यास करावा, इतकीच अपेक्षा सध्या व्यक्त करतो. तसा अभ्यास केला तर लेखकाकडून शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या पंक्तीला सावरकर आणि हेडगेवार यांना बसविण्याचा प्रमाद कळत-नकळत का होईना, पुन्हा घडणार नाही.
डॉ. विवेक कोरडे, समाजअभ्यासक, शिक्षण व्यापारीकरण विरोधी चळवळीचे कार्यकर्ते आहेत.
COMMENTS