शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये शिवसेनेचे खासदार आता विरोधी जागेवर बसणार आहेत.

संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप यांचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर बोलणी सुरु झालेली आहेत. या तिनही पक्षांनी एकत्र बसून किमान सामान कार्यक्रमावर चर्चा केल्याची छायचित्रे प्रसिध्द झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच नागपूर येथे बोलताना या तिनही पक्षांचे सरकार लवकरच स्थापन होणार असल्याचे म्हंटले होते.

गेल्या आठवड्यात शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. भाजप बरोबरची युती तुटली का, असा प्रश्न पत्रकारांनी सावंत यांना विचारला होता. त्यावेळी बोलताना सावंत म्हणाले, की माझ्या राजीनाम्यावरून तुम्हाला काय समजायचे ते समजून घ्या.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)च्या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे.

‘अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ते एकप्रकारे एनडीएतूनच बाहेर पडले आहेत. सहाजिकच, त्यांना लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसवले जाईल, असे प्रल्हाद जोशी म्हणाल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे. शिवसेनेचे हे दोन्ही खासदार आता विरोधी पक्षात बसणार आहेत. शिवसेनेचे लोकसभेतील १८ खासदारही विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार आहेत.

COMMENTS