नवी दिल्लीः पंजाब व महाराष्ट्र को-ऑप बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आह
नवी दिल्लीः पंजाब व महाराष्ट्र को-ऑप बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेली ही तिसरी नोटीस असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे वर्षा राऊत यांनी पूर्वीच्या दोन नोटीसा टाळल्या होत्या.
दरम्यान आपल्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत शिवसेना भवनात एक पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. ईडीचा वापर राजकीय सूड घेण्याकरता होत असून भाजपच्या १२१ नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्याची फाईल आपल्याकडे आहे, त्यातील नेत्यांचा घोटाळा शोधायला ईडीला पाच वर्षे पूर्ण काम करावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. ही फाईल आपण ईडीकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी ईडी असो की प्राप्तीकर खाते वा सीबीआय यांच्याकडून एखाद्याच्या मालमत्तेवर धाड घातल्यानंतर ते प्रकरण गंभीर वाटायचे. पण आता या संस्था केवळ राजकीय हेतूसाठी वापरल्या जातात. या संस्थांचे महत्त्वच लयास गेल्याचा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना भवनाजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी व भाजपविरोधात जोरदार निदर्शने केली त्याचबरोबर शिवसेनेने ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलकही लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही पुण्यातील एका जमीन घोटाळ्याप्रकरणात गेल्याच आठवड्यात ईडीची नोटीस आली होती. त्यांना ३० डिसेंबर रोजी मुंबईत ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. तर वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला बोलावण्यात आले आहे.
मूळ बातमी
COMMENTS