नवी दिल्ली : चेन्नईमधील इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली २३ वर्षीय तरुणी सुभश्री हिच्या गाडीवर रस्त्यावर उभा केलेला होर्डिंग बोर्ड पडून मृत्यू प्रकरणात शुक
नवी दिल्ली : चेन्नईमधील इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली २३ वर्षीय तरुणी सुभश्री हिच्या गाडीवर रस्त्यावर उभा केलेला होर्डिंग बोर्ड पडून मृत्यू प्रकरणात शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या देशात माणसाच्या जीवाचे मोल उरलेले नसून अशा दुर्घटना या निव्वळ नोकरशाहीच्या बेजबाबदारपणातून घडत असल्याचे मत न्या. सत्यनारायणन व न्या. शेषशायी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांनी स्वत: अवैध होर्डिंग हटवण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे, असेही सुनावले.
दोन दिवसांपूर्वी चेन्नईतील पल्लीकरनाई भागातील कामाक्षी हॉस्पिटल जवळ वाहतुकीची कोंडी असल्याने सुभश्री तिच्या गाडीसह रस्त्यावर थांबली असता रस्त्याच्या दुभाजकावर उभा केलेला लग्न समारंभाचा होर्डिंग बोर्ड खाली पडला. हा बोर्ड सुभश्रीच्या गाडीवर पडल्याने तिचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या एका टँकर लॉरीखाली ती सापडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अवैध होर्डिंगच्या विरोधात मोहीम हाती घेतलेल्या के. आर. रामस्वामी यांनी पोलिसांत तक्रार केली.
शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारच्या बेजबाबदारपणावर तीव्र नापसंती व्यक्त करत या देशात माणसाच्या जीवाला मोल उरलेले नसल्याचे मत व्यक्त केले. सरकार अशा बेजबाबदार वागण्यातून किती जणांचे रक्त सांडणार आहे, असाही सवाल न्यायालयाने केला. आमचा सरकारवरचा विश्वासच उडाला असून राजकीय पक्षांनी अवैध होर्डिंगच्या विरोधात मोहीम उघडावी असेही न्यायालयाने सांगितले. राजकीय नेते स्वत:च्या कुटुंबातील लग्न समारंभ बॅनरशिवाय साजरा करू शकत नाहीत का, असाही प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाने अवैध होर्डिंग लावणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिस व शहर प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही हजर राहण्यास सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी चालू राहणार आहे.
सुभश्रीवर पडलेला बोर्ड अण्णाद्रमुक पार्टीच्या एका नेत्यांच्या मुलाच्या लग्नसमारंभाचा होता. चेन्नईमध्ये अवैध होर्डिंग बोर्डच्या विरोधात के. आर. रामस्वामी यांनी अनेक वर्षांपासून मोहीम हाती घेतली आहे. त्यांना चेन्नईची जनता ‘ट्रॅफिक रामास्वामी’ म्हणून ओळखते.
सुभश्रीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर रामस्वामी यांनी पाल्लीकरनाई पोलिस ठाण्यात जाऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून ३०२ कलमाखाली संबंधित पोलिस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, ज्यांनी परवानगी दिली त्या पक्षाचा नेता व त्याचे होर्डिंग आहे त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंद केली. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी अण्णाद्रमुकचे माजी नेते एस. जयगोपाल यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.
COMMENTS