बार परवान्यावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस पक्ष व नेत्यांना नोटीस

बार परवान्यावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस पक्ष व नेत्यांना नोटीस

पणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइशा या गोव्यात अवैधपणे बार चालवत असल्याच्या प्रकरणावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आह

एनसीईआरटीने काश्मीरातील चळवळीचा इतिहास वगळला
म्हाडाची २३ ऑगस्टला ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत
उजव्या विचारसरणीचे युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ काश्मीरात

पणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइशा या गोव्यात अवैधपणे बार चालवत असल्याच्या प्रकरणावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. शनिवारी काँग्रेसने स्मृती इराणी यांना लक्ष्य करत अनेक ट्विट केले. त्यानंतर भडकलेल्या स्मृती इराणी यांनी रविवारी अनेक काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीसा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, जयराम रमेश, डिसूजा व काँग्रेस पक्षाला पाठवण्यात आल्या असून काँग्रेसने व या नेत्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे असा इशारा दिला आहे.

स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांच्याकडून गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँतील बारचा परवाना हा एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर गदारोळ वाढला होता. यावर आपले स्पष्टीकरण देताना स्मृती इराणी यांनी आपली मुलगी बार चालवत नसून तिचा या रेस्तराँशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. आपली मुलगी १८ वर्षांची असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत आहे, ती कोणतेही हॉटेल चालवत नाही. तिच्या चारित्र्यावर काँग्रेसने शिंतोडे उडवू नये, असा दम काँग्रेसला दिला. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना निशाणा करत आगामी निवडणुका अमेठीतून जिंकून दाखवाव्यात असेही आव्हान दिले. तुम्हाला दुसऱ्यांदा हरवून दाखवेन असेही त्या राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या होत्या.

त्यावर काँग्रेसने शनिवारी पत्रकार परिषद घेत स्मृती इराणी यांच्याकडून महिला व बाल कल्याण विकास खात्याचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली.

त्यानंतर स्मृती इराणी यांनी आपण न्यायालयात अशा आरोपांचे उत्तर देऊ असे स्पष्टीकरण दिले. जोइशा इराणी यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाचा रेस्तराँशी व दारुविक्री परवान्याशी कसलाच संबंध नसल्याचा दावा केला. आम्हाला गोवा अबकारी खात्याची नोटीसही आलेली नाही, असे वकील कीरत नागरा यांचे म्हणणे होते.

प्रकरण नेमके काय आहे?

२१ जुलैला गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण एम गाड यांनी जोइश इराणी संचालित सिली सोल्स कॅफे अँड बार या रेस्तराँला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ मध्ये झाला असतानाही परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे नमूद केले आहे. या रेस्तराँने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचाही आरोप या नोटीशीत केला आहे.

या रेस्तराँतील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. वास्तविक अँथनी डिगामा यांचा मृत्यू गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. या पत्रात येत्या सहा महिन्यात परवाना हस्तांतरित केला जाईल असे नमूद करण्यात आले होते.

रेस्तराँकडून झालेल्या कागदपत्र घोटाळ्याची तक्रार एक वकील आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली, त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरू लागली.

रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्तराँची माहिती मागवली व एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी अबकारी खात्यातील अधिकारी व आसगाव पंचायतीतील संबंधित कसे सामील झाले व भ्रष्टाचार कसा झाला याची चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.

या संदर्भातील पुढील सुनावणी येत्या २९ जुलैला होणार आहे.

रॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्तराँना देता येतो. पण सिली सोल्स कॅफे अँड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम धुडकावून विदेशी मद्य, भारतीयांनी तयार केलेले विदेशी मद्य व देशी दारु विक्रीचे परवाने मिळवले.

त्याच बरोबर मयत अँथनी डिगामा यांच्या नावाचे आधार कार्ड डिसेंबर २०२०मध्ये बनवण्यात आले होते. या कार्डवर त्यांचा पत्ता विलेपार्ले, मुंबई असा आहे.

रॉड्रिग्ज यांनी हा घोटाळा शोधून काढण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर अँथनी डिगामा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेतून मिळाले. हे प्रमाणपत्र मिळल्यानंतर रॉड्रिग्ज आश्चर्यचकित झाले की गोव्यातल्या १२०० चौ. मीटर क्षेत्रफळ आकारावर उभे राहिलेल्या या आलिशान रेस्तराँशी अँथनी डिगामा यांचा संबंध कुठून व कसा झाला?

यूट्यूबवर प्रसिद्ध खाद्य पदार्थ समीक्षक कुणाल विजयकर यांनी जोइश इराणी यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सिली सोल्स हे गोव्यातील खाद्यपदार्थाचे मोठे आकर्षणाचे केंद्र होईल अशी प्रतिक्रिया जोइश इराणी यांनी एका प्रसंगात दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0