सोव्हिएत नेते मिखाईल गर्बाचोफ यांचे निधन

सोव्हिएत नेते मिखाईल गर्बाचोफ यांचे निधन

मिखाईल गर्बाचोफ, १९८५ ते १९९१ दरम्यान सत्तेत असताना, अमेरिका-सोव्हिएत संबंधांना शितयुद्धातून बाहेर काढण्यात त्यांनी मदत केली. सोविएत संघराज्य संपविण्याचे कामही त्यांनी केले.

बसपाची उ. प्रदेशातील आजपर्यंतची खराब कामगिरी
साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय
इस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद

मॉस्को: सोव्हिएत संघराज्याच्या पतनाला कारणीभूत ठरलेले आणि इतिहासाची दिशा बदलणारे २० व्या शतकातील महान नेते मिखाईल गर्बाचोफ यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी मॉस्को येथे निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांच्या मृत्यूची घोषणा रशियन वृत्तसंस्थांनी केली. गर्बाचोफ यांचे मॉस्कोमधील मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर आणि दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

१९८५ ते १९९१ या काळात सोविएत संघराज्याचे अध्यक्ष असताना गर्बाचोफ यांनी शीतयुद्ध संपविण्यास मदत केली आणि अमेरिका-सोव्हिएत संबंधांना शितयुद्धातून बाहेर काढले. शीतयुद्ध काळातील ते शेवटचे नेते होते.

सोव्हिएत नेता म्हणून त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे त्यांच्या रशियाचा कायापालट झाला आणि त्यांनी पूर्व युरोपला सोव्हिएत राजवटीपासून मुक्त होऊ दिले.

त्यांनी जे बदल घडवून आणले त्यामुळे त्यांना पश्चिमेत गौरविण्यात आले. त्यांना १९९० चे नोबेल पारितोषिक मिळाले. मात्र सोविएत पतनाला कारणीभूत ठरल्याने त्यांचा अनेकांनी तिरस्कारही केला.

५ जुन १९९१ मध्ये ओस्लो येथे नोबेल पुरस्कार समारंभात मिखाईल गर्बाचोफ.

५ जुन १९९१ मध्ये ओस्लो येथे नोबेल पुरस्कार समारंभात मिखाईल गर्बाचोफ.

२०१४ मध्ये रशियाने क्राइमियाचा ताबा घेतल्यानंतर आणि या वर्षाच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्यानंतर शीतयुद्धाच्या पातळीपर्यंत तणाव वाढल्याने त्यांनी क्रेमलिन आणि व्हाईट हाऊसला संबंध सुधारण्यासाठी आवाहन केले होते.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्थांना सांगितले, की सकाळी रशियाचे अध्यक्ष पुतिन गर्बाचोफ कुटुंबीयांना आणि मित्रांना शोक व्यक्त करणारी तार पाठवतील.

गर्बाचोफ यांनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे रुग्णालयात जाऊन येऊन घालवली. कोरोनाव्हायरसच्या काळात त्यांनी खबरदारी म्हणून स्वत:ला वेगळे ठेवले होते.

गर्बाचोफ यांना पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच सन्मान आणि प्रेम मिळाले. तिथे त्यांना प्रेमाने गोर्बी म्हणून संबोधले जात होते. १९८० च्या दशकातील अमेरिका-सोव्हिएत आण्विक तणाव कमी करण्यासाठी तसेच पूर्व युरोपला सोविएत प्रभावातून बाहेर काढल्याबद्दल ते प्रसिद्ध होते.

अमेरिकेचे नेते रोनाल्ड रीगन यांच्याशी ऐतिहासिक अण्वस्त्रांच्या करारावर वाटाघाटी केल्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाले आणि त्यानंतर एक वर्षातच बर्लिनची भिंत पडली तेव्हा सोव्हिएत सैन्याला रोखण्याचा त्यांचा निर्णय शीतयुद्धातील शांतता टिकवण्यासाठी महत्त्वाचा मानला गेला. पारदर्शकता आणि खुलेपणा (ग्लासनोस्त आणि पेरोस्त्राईका ) ही धोरणे त्यांनी आणल्यानंतर सोव्हिएत साम्राज्याचे विघटन झाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0