‘सपा’वरील हल्ल्यातून ‘बसपा’चे पुनरुज्जीवन

‘सपा’वरील हल्ल्यातून ‘बसपा’चे पुनरुज्जीवन

अखिलेश बाबत मायावतींचा एवढा त्रागा होण्यामागे नेमके काय कारण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.

भाजपला मत देईनः मायावतींची अखिलेशला धमकी
सपाकडून डॉ. कफील खान यांना विधान परिषदेचे तिकीट
उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी

अखेर स्वबळावर राज्यातल्या व देशातल्या आगामी सर्व निवडणूका लढवणार असल्याचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी सोमवारी जाहीर केले. समाजवादी पार्टीसोबत युती करण्याची मोठी चूक आपण केली होती. या युतीमुळे आपल्या पक्षाचे नुकसान झाले, असे मायावती म्हणाल्या. लोकसभेतील दारुण पराभवानंतर जर भाजपचा  फायदा होईल असे वर्तन सपा करत असेल तर त्याने भाजपचा पराभव आपण करू शकू का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नात सपा-बसपातील अंतर्गत वाद लपला असण्याची दाट शक्यता आहे.

मायावतींनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरून समाजवादी पार्टीवर टीका केली. या टीकेत त्यांनी मागील इतिहासाची आठवण करून दिली. ताज कॉरिडोर प्रकरणात मुलायम सिंह यादव यांनी भाजपची मदत केली होती तर सपा सरकारच्या काळात बिगर यादव व अन्य मागास जातींकडे दुर्लक्ष झाले असे आरोप त्यांनी केले.

अखिलेश मुस्लिमविरोधी असल्याचाही त्यांनी आरोप केला. २०१९च्या लोकसभा निवडणूकांत मुस्लिमांना तिकीट देऊ नका असे मेसेज अखिलेशकडून येत होते पण त्याकडे आपण दुर्लक्ष केल्याचे मायावतींनी सांगितले.

लोकसभा निवडणूका हारल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्याला एकही फोन केला नाही. पण मी मोठी असल्याच्या नात्यातून त्यांना २३ मेला फोन केला व त्यांच्या पत्नीच्या पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केल्याचे मायावती यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूका होणार आहेत, त्या सर्व जागा बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचे मायावतींनी स्पष्ट केले.

अखिलेशच लक्ष्य

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या १0 जागा आल्या असल्यातरी केंद्रीय राजकारणात व उ. प्रदेशच्या राजकारणात बसपाचा दबावच राहिला नसल्याचे मायावतींच्या लक्षात आल्याने त्या आपला सगळा उद्वेग अखिलेश यादव यांच्यावर काढत असल्याचे दिसून येते.

अखिलेश बाबत मायावतींचा एवढा त्रागा होण्यामागे नेमके काय कारण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. कारण लोकसभा निवडणुकीत सपाला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना बसपापेक्षा मोठा धक्का बसला होता. शिवाय या पक्षाने मायावतींच्या कुठल्याच भूमिकेवर आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. मायावतींनी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर खुद्ध सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मौन बाळगले होते. बसपाविषयी कोणतीही मत, विधाने करू नका असे पक्षादेश सपाच्या सर्व नेत्यांना उद्देशून काढण्यात आले होते. सपामध्ये आलेल्या या मरगळीचा फायदा घेत सोमवारी मायावती यांनी अखिलेश यांना जोरदारपणे टार्गेट केले, असे म्हणता येते.

पोटनिवडणूकात चाचपणी

मायावतींना आगामी ११ विधानसभा पोटनिवडणूकांतून पुन्हा एकदा आपला जनाधार समजून घेण्याची गरज भासली आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणूकांच्या तुलनेत पक्षाची कामगिरी चांगली आहे. अशा परिस्थितीत सपाची सध्याची अवस्था पाहता आपला गड मजबूत करू असा आत्मविश्वास मायावतींमध्ये आलेला असू शकतो.

पक्षाचे कार्यकर्ते सपासोबत युती झाल्याने अस्थिर झाले होते. अनेकांना यादव समाज बसपाच्या मागे उभे राहणार नाही अशी भीती होती. ती भीती खरी ठरली. कारण खुद्ध यादव समाजाने सपा-बसपाऐवजी भाजपसोबत जाणे पसंद केले. हा दोन्ही पक्षांना झटका होता. सपा-बसपाचे सोशल इंजिनिअरिंग यशस्वी ठरले असते तर भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसला असता कदाचित त्याचे पडसाद पुढील विधानसभा निवडणूकांत दिसून आले असते. पण भाजपचे सर्व जातींना घेऊन जाण्याचे सोशल इंजिनिअरिंग सपा-बसपाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवणारे ठरले.

नव्या राजकीय चाली

सपाचाच मतदार जर भाजपकडे जात असेल तर समोरचा प्रतिस्पर्धी कमकुवत झाल्याचे मायावतींच्या लक्षात आल्याने भाजप व सपाला एकाचवेळी शिंगावर घेऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणात स्वत:ची नवी ताकद उभी करता येऊ शकते असे समीकरण मायावतींचे असू शकते.

म्हणून रविवारी त्यांनी आपला भाऊ व पुतण्या दोघांना पक्षातील महत्त्वाची पदे दिली. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले. कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर आपला विश्वास नसून आपल्या कुटुंबातील कोणालाही पक्षातील पद देणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांनी उलटे केले.

पक्षाची प्रतिमा बदलण्याची निकड

मायावतींना पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे अडथळेही दूर करायचे आहेत. बसपाचे संस्थापक काशीराम यांच्यापासून राजकारणाची सुरूवात करणारे अनेक नेते व गट बसपामध्ये आहेत पण ही मंडळी आता जुनी, कालबाह्य ठरली आहेत. पक्षामध्ये तरुण रक्त आणायचे असेल, पक्षाला तरुण चेहरा द्यायचा असेल तर नवे प्रयोग करावे लागतात हे मायावतींनी ओळखले अाहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होणार हे लक्षात घेऊनही त्यांनी आपल्या नातेवाईकांची वर्णी पक्षात लावली आहे.

मायावतींचे पक्ष पुनरुज्जीवनाचे हे प्रयत्न किती यशस्वी ठरतील हे ११ पोटनिवडणुकांतील निकालांवरून स्पष्ट होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0