एसपीजी दुरुस्ती विधेयकावर अखेर संसदेची मोहोर

एसपीजी दुरुस्ती विधेयकावर अखेर संसदेची मोहोर

नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळात मंगळवारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) दुरुस्ती विधेयक आवाजी बहुमताने संमत झाले. या विधेयकावर सरकारतर्फे बाजू मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाहीत कायदा हा सर्वांना समान असतो, एका कुटुंबासाठी कायदा वेगळा करता येत नाही. आम्ही कुटुंबाच्या नव्हे तर घराणेशाहीच्या विरोधात असून केवळ गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली नसून ती बदलली असल्याचा दावा केला.

ते म्हणाले, या पूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग, नरसिंह राव, आय. के. गुजराल व डॉ. मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था बदलून त्यांना झेड प्लस दर्जाची सेवा दिली आहे. त्यावेळी काँग्रेसने नाराजी प्रकट केली नव्हती. ती आता गांधी कुटुंबियांची काढून घेतल्यावर का प्रकट केली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.

अमित शहा यांनी, केवळ गांधी कुटुंबीयच नव्हे तर देशातल्या १३० कोटी नागरिकांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकार दहशतवादी गटांच्या धमक्यांचे प्रमाण पाहून वेळोवेळीची परिस्थिती पाहून नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत बदल करत असते. गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा व्यवस्था बदलून ती झेड प्लस दर्जाची केली आहे. ती काढून घेतलेली नाही. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देशाचा गृहमंत्री व उपराष्ट्रपतीलाही दिली जाते असे स्पष्टीकरण दिले.

राज्यसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयक संमत होताना काँग्रेसने घोषणा देत सभात्याग केला.

सुरक्षा रक्षकांच्या चुकीमुळे प्रियंका गांधींच्या घरात घुसखोरी

राज्यसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या घरात झालेल्या घुसखोरीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, प्रियंका गांधी यांच्या घरात प्रवेश करताना राहुल गांधी व रॉबर्ट वाड्रा यांची तपासणी न करता त्यांना प्रवेश दिला जातो. राहुल गांधी हे काळ्या रंगाची सफारी गाडी वापरतात. ते येणार असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या गाडीला प्रवेश दिला. पण ती काळ्या रंगाची गाडी राहुल गांधी यांची नव्हती तर मेरठमधील काँग्रेस नेत्या शारदा त्यागी यांची होती. माहितीतील देवाणघेवाणीत चूक झाल्याने ही घटना घडल्याचे अमित शहा यांनी सभागृहाला सांगितले. या प्रकरणात तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित केल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS