या वृत्त वाहिन्यांचे प्रेक्षक कोण आहेत?

या वृत्त वाहिन्यांचे प्रेक्षक कोण आहेत?

अलीकडे वृत्त वाहिन्यांवर रिया चक्रवर्तीचे चित्र ज्या पद्धतीने रंगवण्यात आले ते पाहून मला चेटकी प्रथेची आठवण झाली.

ती ड्रग्ज घेते, ती त्याचे पैसे वापरते, ती छोटे कपडे वापरते, दारू पिते, पार्ट्या  करते, काळी जादू करते…. रिया चक्रवर्ती.. ती सुशांत सिंग आत्महत्या केसमधील एक दुवा आहे. तिचे आणि सुशांत सिंगचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंगच्या नातेवाईकांनी तिच्याविरुद्ध तक्रार देखील केलेली आहे आणि नुकतीच  नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने रिया चक्रवर्तीला अटक देखील केलेली आहे.

अलीकडे वृत्त वाहिन्यांवर रिया चक्रवर्तीचे चित्र ज्या पद्धतीने रंगवण्यात आले ते पाहून मला चेटकी प्रथेची आठवण झाली. 

चेटकी/ डायन प्रथा हे देखील आपल्या समाजाचे एक अंग आहे. गावात एकट्या राहणाऱ्या, विधवा किंवा पोरक्या मुलीविरुद्ध किंवा एका गरीब, ठराविक जातीतील स्त्रीविषयी तिचं चालचरण चांगलं नाही, ती बदफैली आहे, जादू टोणा करते असं पसरवायचं. तेच तेच खोटं ओरडून ओरडून सांगायचं. पुन्हा पुन्हा सांगायचं. मग गर्दीला ते खरं वाटू लागतं. एकदा गर्दी तिच्या विरोधात गेली की तुम्ही तिची नग्न धिंड काढली काय, तिच्यावर बलात्कार केला काय, तिची जमीन हडपली काय, तिला वाळीत टाकलं काय; तरी ही गर्दी तोंडातून आवाज काढत नाही, विरोध करत नाही, प्रश्न विचारत नाही. किंबहुना गर्दीला असं वाटतं की ‘हिच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे, हिची हीच लायकी आहे.’ मग गर्दीत उभं राहणाऱ्या स्त्रीला आपल्या चारित्र्याचा अभिमान वाटायला लागतो आणि पुढे जाऊन तीच गर्दीतली ‘पवित्र’ बाई अशा वाईट चालीच्या बाईला गावाच्या हवाली करणं हे स्वतःचं कर्तव्य समजायला लागते.

रिया चक्रवर्ती गुन्हेगार आहे, की नाही ते पुढे जाऊन कोर्टात सिद्ध होईल. त्यातही पोलीस आणि न्यायसंस्था अपयशी होत आहेत असं वाटत असेल तर पत्रकारांनी सत्य समोर आणण्यासाठी झटणं अपेक्षितच आहे. पण अशावेळी शोध पत्रकारिता करावी, असं अपेक्षित असताना त्यांनी डोमकावळ्यासारखं लोकांवर तुटून पडणं म्हणजे सामान्य माणसासाठी मोठा अपेक्षाभंग आहे.

भारतामध्ये शेतकरी, विद्यार्थी आणि इतरही कितीतरी नागरिक विविध कारणांनी आत्महत्या करतात. खून होतात, बलात्कार होतात. पण ते सगळे सेलिब्रेटी नसल्यामुळे या वृत्तवाहिन्यांना त्यांच्यामध्ये रस नाही.

मोकळ्या स्वभावाच्या, तथाकथित चालीरीती न पाळणाऱ्या, छोटे कपडे वापरणाऱ्या, दारू-सिगारेट पिणाऱ्या स्त्रियांचे चारित्र्य वाईट असते, ही संकल्पना आली कोठून?

मध्यमांमध्ये रेखाटलं जाणारं हे स्त्रीचं चित्र बघा. त्या स्त्री विषयी आपल्या मनात सहानुभूती उरणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन तिला रेखाटलं जातं. कित्येक सिनेमांमध्ये स्त्रीवर अत्याचार होताना, तिने कसे छोटे कपडे घातले आहेत, ती कशी अश्लील दिसत आहे, ती कशी रात्रीची एकटी परत येत आहे, तिने कसा विनाकारण बड्या ताकदवान माणसाशी पंगा घेतलेला आहे असं दाखवलं जातं. आपल्या सिनेमामधली (काही कौतुकास्पद अपवाद वगळता), टीव्ही वरील मालिकांमधली मुलगी लग्न झालं की लगेच भारतीय पोशाख करू लागते, गळ्यात मंगळसूत्र घालू लागते. मुख्य भूमिकेतील सर्व स्त्रिया अशा कपडे आणि दागिने घालून पतिव्रता असतात. व्हिलन स्त्री मात्र छोटे केस ठेवते, छोटे कपडे घालते. बाई पुरुषाला नादी लावते आणि मग त्याची वाताहत होते, ही भारतीयांची आवडती ‘स्टोरी लाईन’ आहे. आणि पितृसत्ताक व्यवस्थेतला पुरुष इतका तकलादू, बालिश आणि नालायक आहे की एका बाईच्या नादी लागून तो रसातळाला जातो?

मागील २० दिवसांत ३ लहान मुलींवर बलात्कार होऊन त्यांचा खून झालेला आहे.

या आणि अशा घटना नागरिकांपर्यंत पोचवणारी वृत्तव्यवस्था आपली बातमीदारीची जबाबदारी सोडून गॉसिपच्या पायरीवर येऊ लागते तेव्हा एक स्त्री म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून मला पडलेले काही प्रश्न पडतात.

 • बातमीदारी करताना ‘रिया चक्रवर्ती गुन्हेगार आहे’ वा ‘रिया चक्रवर्ती गुन्हेगार नाही’ यापैकी एकही विधान तथ्य म्हणून गृहीत धरणे गरजेचे आहे का आणि योग्य आहे का?
 • सुशांत सिंगच्या डान्स टीचरने एक विधान केले की ‘मला वाटले की हा खून आहे’. अंकित आचार्य नावाच्या व्यक्तीला वाटले की ‘रिया जादूटोणा करायची’. करणी सेनेच्या सुरजित सिंह राठोडने दिलीप सिंह आणि सुरज सिंह यांना बोलताना ऐकले. त्यांच्या बोलण्यात ‘दुबई’ शब्दाचा उल्लेख आला त्यावरून त्याला वाटले, की यांचे काहीतरी दुबई कनेक्शन आहे! कंगना राणावतला असे वाटते की ‘सुशांत सिंह हा बॉलीवूड मधील नेपोटीझमचा बळी आहे’ वैयक्तिक पातळीवर या माणसांची अशी मतं असणं हा हरकतीचा मुद्दा नाही. स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या या वृत्त वाहिन्यांच्या निवेदकांना त्या लोकांची अशी मते बातमीयोग्य वाटतात. हा हरकतीचा आणि चिंतेचा मुद्दा आहे.
 • जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असलेल्या देशात रिया जादूटोणा करायची अशी बातमी दाखवणे योग्य आहे का? ‘दुबई’च्या उल्लेखाने ‘दुबई कनेक्शन’ सिद्ध होते का?
 • ज्या देशात न्यायालय देखील ‘उत्तर न देता शांत राहण्याचा अधिकार’ आरोपींना देते (The Constitution of India Article 20 (3): “No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself”), तिथे रियाच्या नातेवाईकांना, वॉचमनला , घरकाम करणाऱ्या मुलाला, डिलिवरी करणाऱ्या व्यक्तीला, शेजाऱ्याला, वडिलांना, एटकेच काय पोस्टमनला अडवून, घेरून, घरात घुसून, अंगावर जाऊन प्रश्न विचारणे अशा पद्धतीची पत्रकारिता आपल्याला हवी आहे का?
 • मुळात या वृत्त वाहिन्यांनी आधीच निकाल लावलेला आहे. त्यांनी रिया चक्रवर्तीला गुन्हेगार ठरवलेलं आहे आणि ते गृहीत धरून त्या जीवावर तिच्या चारित्र्याचं प्रमेय मांडलं जात आहे. त्यांनी आज तिचा निकाल लावला उद्या माझा लावतील. जी गर्दी आज तिच्यावर तुटून पडलेली आहे ती उद्या कुठल्याही सामान्य माणसावर तुटून पडणार नाही कशावरून?
 • या सगळ्यात ‘रिया चक्रवर्ती गुन्हेगार नसूही शकते’, या शक्यतेचा विचारही आपल्या मनात येणार नाही याची या वृत्त वाहिन्या पुरेपूर काळजी घेत आहेत. ती निर्दोष असेल असं आपण एका क्षणासाठी गृहीत धरलं तर ही बातमीदारी किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल.
 • पूर, महामारी, बेरोजगारी आणि आर्थिक संकटांमध्ये या तथाकथित राष्ट्रीय वृत्त वाहिन्या सुशांत सिंगच्या किंबहुना रिया चक्रवर्तीच्या बातमीला जास्तच महत्व देत आहेत असे वाटत नाही का? जर हिशोब मांडायचा झाला तर मार्च २०२० पासून ड्रग्स, नेपोटीझम, आर्थिक फसवणूक या कारणांनी सिने सृष्टीतील किती जणांचे जीव घेतले आणि पूर, महामारी, बेरोजगारी, वाढते बलात्कार आणि आर्थिक संकटांनी किती भारतीयांचे जीव घेतले?
 • की या सगळ्या इतर प्रश्नांवरून आपले लक्ष विचलित व्हावे म्हणूनच रोज उठून हे रिया चक्रवर्तीच्या चर्चांचे दुकान मांडले जाते?
 • उदाहरणादाखल एनडीटीव्ही ने घेतलेली रियाची मुलाखत बघायला हरकत नाही. रिया विषयी चर्चेत असलेले ड्रग्ज पासून आर्थिक फसवणुकीपर्यंतचे सर्व मुद्दे अत्यंत परखडपणे, तिच्याविषयी कुठलीही सहानुभूती न दाखवता एनडीटीव्हीच्या या महिला पत्रकाराने विचारलेले आहेत. मुलाखत बघताना आपल्या लक्षात येते, की रियाने पोलोटीकली करेक्ट राहून उत्तरं दिलेली आहेत. पण मुलाखतीची ती मर्यादा आहे. तुम्ही मुलाखत घेताना अंगावर ओरडून, वाक्यं समोरच्याच्या तोंडात कोंबून, समोरच्याला बोलायची संधी न देता आणि हवेत विधाने करून मुलाखत वा चर्चा घडवून आणू शकत नाही. तुम्हाला हवे तेच उत्तर समोरचा देईल असेही नाही. तुमच्या विधानांवर तुम्हाला एवढी खात्री असेल तर पुरावे समोर आणा, शोध पत्रकारिता करा.
 • वर्तमानपत्रांनी आपल्याच बिरादरीतल्या वृत्त वाहिन्यांनी चालवलेल्या या दर्जाहीन पत्रकारितेविषयी मौन का पाळलेले आहे?
 • अशा घटनांमुळे भारतीय पत्रकारिता आणि वृत्तवाहिन्यांचे भारताबाहेर काय चित्र तयार होत आहे?

चिंता पत्रकारितेच्या घसरत्या दर्जाची वाटत नाही. या वृत्त वाहिन्यांचे प्रेक्षक कोण आहेत, ही चिंता वाटते. आणि एक स्त्री म्हणून  या प्रेक्षकांच्या गराड्यात  असुरक्षित वाटायला लागतं.

लेखाचे छायाचित्र – मीर सोहेल 

COMMENTS