दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पणः अमित शहांवर टीका

दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पणः अमित शहांवर टीका

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून आदिवासी समाजाच्या दुसर्याच नेत्याच्या पुतळ्याला हार घातल्याने प. बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

अमित शहा दोन दिवसांच्या प. बंगालच्या दौर्यावर होते. त्यांच्या हस्ते आदिवासी बहुल बांकुरा येथे स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर हार घालण्याचा कार्यक्रम राज्य भाजपने आयोजित केला होता. पण शहा यांनी ज्या पुतळ्याला बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून हार घातला तो अन्य आदिवासी नेत्याचा पुतळा होता. ही चूक जेव्हा भाजपच्या पदाधिकार्यांना समजली तेव्हा त्यांनी तातडीने बिरसा मुंडा यांची प्रतिमा मागवली व ती पुतळ्याच्या पायाशी ठेवून त्याच्यावर फुले वाहण्याचा कार्यक्रम शहा यांच्या हस्ते उरकून घेतला.

या कार्यक्रमानंतर अमित शहा यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी, “आज प. बंगालमधील बांकुरा येथे प्रसिद्ध आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांना फुले अर्पित केली. बिरसा मुंडा यांनी आपले जीवन आदिवासींच्या अधिकारासाठी, त्यांच्या उत्थानासाठी समर्पित केले होते. त्यांचे साहस, संघर्ष व बलिदान आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील,” असा संदेश लिहिला होता.

पण जेव्हा भाजप नेत्यांची ही बनवाबनवी लक्षात आली तेव्हा भारत जकात माझी परगना महल या आदिवासी संघटनेने या कार्यक्रमावर आक्षेप घेत भाजपने बिरसा मुंडा व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. भाजपने आम्हाला फसवले, त्यांच्या अशा कृतीने आम्ही अत्यंत दुःखित झाल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केली, असेही या संघटनेने सांगितले.

तृणमूल आक्रमक

दरम्यान या वादानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर हल्ला केला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे असे प्रयत्न सुरू असल्याची टीका या पक्षाने केली. अमित शहा हे बाहेरचे असून ते बंगाली संस्कृतीबाबत इतके अनभिज्ञ आहेत की त्यांना भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा माहिती नाही. त्यांनी वेगळ्याच पुतळ्याला हार घालून सर्वांचा अपमान केला. उलट बिरसा मुंडा यांची मूर्ती दुसर्या पुतळ्याच्या पायाजवळ ठेवली. ते बंगालच्या संस्कृतीचा सन्मान करू शकतात का?, असे ट्विट केले.

मूळ बातमी

COMMENTS