ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपची त्यांनी वाट पकडणे हे फार धक्कादायक नव्हतं. कारण म.प्रदेशच्या राजकारणात त्यांना कमलनाथ व द
ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपची त्यांनी वाट पकडणे हे फार धक्कादायक नव्हतं. कारण म.प्रदेशच्या राजकारणात त्यांना कमलनाथ व दिग्विजयसिंह कॅम्पकडून सतत कॉर्नर करणं जगजाहीर होते. पण या दोन नेत्यांना तेवढाच तगडा विरोध करणं ज्योतिरादित्यांच्या राजकीय शक्तीच्या आवाक्याबाहेर होते. जेव्हा त्यांना आपल्या एकेक राजकीय मर्यादांची जाणीव झाली तेव्हा त्यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलम रद्द करण्याच्या मोदी-शहा यांच्या राजकीय निर्णयावर खुशी जाहीर केली. त्यांनी ट्विटरवर आपले काँग्रेस नाव काढून जनसेवक असेही केले होते. तेव्हा ते पक्ष सोडणारेत का, असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. आता खरोखरीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन मोदी-शहांची भेट घेतली आहे.
काँग्रेसमध्ये राहून प्रस्थापितांशी संघर्ष करण्याचा दीर्घ विचार त्यांनी केलेला दिसत नाही. कदाचित काँग्रेसच्या पुढच्या २० वर्षाच्या अस्थिर राजकीय प्रवासाचा त्यांनी अंदाज घेतलेला असावा. त्यामुळे रस्त्यावर उतरून रोज संघर्ष करण्यापेक्षा सत्ताधाऱ्याच्या कळपात जाऊन सत्तेतून येणारे मानसिक समाधान त्यांनी महत्त्वाचे मानले असावे. पण जाता जाता त्यांनी कमलनाथ व दिग्विजयसिंह या विरोधकांना रस्त्यावर आणण्यासाठी भाजपला साथ दिली आहे. आपल्या पक्षातल्या विरोधकाला राजकीय चाली करून नेस्तनाबूत करण्याऐवजी त्याचा एन्काउंटर दुसऱ्याच्या हातातून करावा असा हा ज्योतिरादित्यांचा खेळ आहे.
आता काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात, ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांचा गट खूप छोटा आहे. पण त्याची ताकद कमलनाथ सरकार पाडण्याइतकी शक्तीशाली आहे. पण भाजपच्या बाजूने विचार केला तर ज्योतिरादित्य यांची राज्यातील ताकद कमी आहे. काँग्रेसच्या कमलनाथ यांच्या तुलनेत ती कमी आहे. कारण मध्य प्रदेशच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कमलनाथ यांच्या बाजूने अनेक आमदार उभे राहिल्याने ज्योतिरादित्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा कमजोर ठरला. त्यामुळे ज्योतिरादित्यांची म. प्रदेशमधल्या राजकीय ताकदीची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहेत. त्यामुळे उद्या ज्योतिरादित्यांना कोणतेही मंत्रिपद देताना अथवा पक्षातील प्रमुख पद देताना भाजपच्या नेत्यांना गंभीर विचार करावा लागणार आहे.
मोदी-शहांच्या भाजपात काँग्रेसचे अनेक नेते आले आहेत पण त्यांचे पक्षातील स्थान अगदी यथातथाच आहे. महाराष्ट्रात नारायण राणेंचे उदाहरण पाहता येईल. भाजपमध्ये गेल्यानंतर राणेंचा राजकीय प्रभाव कसा अस्तंगत होत गेला हे सर्वांना लक्षात आले. शिवसेनेच्या विरोधात कायम मांड ठोकून असणारे राणे आता शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्रीपदी असताना एकदम गळून पडलेले दिसते. भाजपकडूनही त्यांचा उपयोग केला जात नाही, हे वास्तव आहे. ज्योतिरादित्य यांचा दुसरा नारायण राणे होण्याची भीती अधिक आहे.
दुसरा मुद्दा केंद्रीय पातळीवरच्या भाजप नेतृत्वाला काँग्रेसच्या एकेक सेक्युलर प्रतिमा फोडायच्या आहेत व त्यांच्या गळाशी काँग्रेसचे अनेक असे नेते लागले आहेत. ज्योतिरादित्य हा काँग्रेसचा एक उमदा, सेक्युलर चेहरा होता. ते मास लीडर नसले तर त्यांची राष्ट्रीय स्तरावर एक चांगली प्रतिमा आहे. ही प्रतिमा आता भाजपमध्ये सामील झाल्यानंतर भाजपचे जे विध्वंसक स्वरुपाचे राजकारण सुरू आहे, त्यात त्यांना मोल्ड करून घ्यावी लागेल. हे कदाचित त्यांना कठीण जाऊ शकते.
तिसरा मुद्दा म. प्रदेशच्या राजकारणात ज्योतिरादित्य यांच्याविरोधात आता दोन नव्हे तर तीन नेते थेट येऊ शकतात. कमलनाथ, दिग्विजय सिंह व भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान. पहिले दोन अजूनही सत्तेत आहेत तर शिवराज सिंह प्रबळ विरोधी नेते आहेत. भाजपची सलग १५ वर्षे सत्ता त्यांनी राखली आहे. आता ज्योतिरादित्यांच्या मदतीने जर म. प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार पडत असेल तर त्याची बिदागी म्हणून केवळ राज्यसभेची खासदारकी ज्योतिरादित्यांना पचणार आहे का? किंवा त्या बदल्यात भाजप त्यांना थेट म. प्रदेशच्या राजकारणात केंद्रस्थानी आणून बसवणार का? हे प्रश्न उपस्थित होता. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत कठीण आहे, कारण शिवराज सिंह यांच्या तुलनेत ज्योतिरादित्य खूप कमजोर नेते आहेत. शिवराज सिंह यांच्यामागे पक्ष व संघपरिवार असा मोठा राजकीय बेस आहे. ज्योतिरादित्य यांना म. प्रदेशातील पक्षाची जबाबदारी द्यायची असेल तर शिवराज सिंह यांना केंद्रात न्यावे लागेल. हा मोठा राजकीय खेळ आहे. कारण जे भाजप आमदार आहेत त्यांना ज्योतिरादित्यांच्या हाताखाली काम करावे लागेल हे कदापी त्यांना पसंत पडणार नाही. बाहेरून आलेल्या नेत्याला आपल्याच पक्षाचे एवढं समर्थन देण्याची वेळ भाजपमध्ये सध्या आलेली नाही. गुजरातमध्ये केशुभाई पटेल एपिसोड वेळी भाजप केंद्रीय पातळीवर कमजोर होता. आता तशी परिस्थिती नाही. भाजपची ताकद अजूनही मजबूत स्वरुपाची आहे. अशा परिस्थिती ज्योतिरादित्य यांची उडी फार लांब पडू शकत नाही.
चौथा मुद्दा भाजपच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत म. प्रदेशची सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या हातातून महाराष्ट्र गेल्यानंतर पक्षातील सर्वच नेते चिंतेत होते. महाराष्ट्रात रोज शिवसेनेच्या दुऱ्या काढण्यातही त्यांना आता लाज वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे विरोधकांवर सूड घेण्यासाठी ज्योतिरादित्य आपला उपयोग शार्पशूटर म्हणून करत असले तरी त्यासाठी ते हसत हसत मदत करण्याच्या तयारीत आहेत. कमलनाथ सरकार अस्थिर आहेच पण ज्योतिरादित्यांना त्यातून फार मोठा राजकीय फायदा मिळेल असे वाटत नाही.
COMMENTS