ती शिकली, ती पुढे निघाली!

ती शिकली, ती पुढे निघाली!

हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि वडिलांच्या जुनाट विचारांमुळे तिचं शिक्षण बारावीपर्यंतच झालं होतं. बारावीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही तिला अनंत अडचणींमुळे पुढील शिक्षण घेता आलं नाही, पण ती डगमगली नाही. फुले-आंबेडकर, सावित्रीबाई या साऱ्यांचा आदर्श ठेवत संजना यादव शिकतच राहिली. प्रसंगी लग्नातले सोन्याचे दागिने विकून, तिनं कायद्याचा अभ्यास केला. एल.एल.बी करूनही ती थांबली नाही, तर एल.एल.एम.ला प्रवेश घेतला. नुकतीच वकिलीची सनद मिळवण्याची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे.

संविधानाचा बचाव, हाच संदेश
तीन प्रकारच्या हुकूमशाहींविरुद्ध आंबेडकरांनी दिलेले इशारे
पुण्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

संजना राहते मुंबईतल्या चेंबूर परिसरातल्या झोपडपट्टीत. पार्टिशन टाकलेलं अवघ्या एका खोलीचं तिचं लहानसं घर. मैला सफाई कर्मचारी असणारा तिचा पती सुनील यादव सध्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पीएच.डी. करतो आहे. याच लहानशा खोलीत राहून संजनाने बी.ए. केलं, तेही बराच खंड पडून गेल्यानंतर! २०११ मध्ये शिकायला सुरुवात करून, पुढे एल.एल.बी. झालं आणि आता ती एल.एल.एम. करते आहे

संजनाचा जन्म आणि बालपण बदलापूरमधल्या एका लहानशा गावातलं. जुनाट विचाराच्या वडिलांचा, दहावीच्या पुढे शिकण्यास विरोध होता. पण बहिणीच्या पाठिंब्यानं तिनं बारावीपर्यंत शिक्षण घेतलं, पुढे शिक्षण सुटल्यावर वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. मुंबईत आल्यावर, संसारात पडल्यावर पती सुनीलनं तिच्या शिक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिलं. त्याचा परिणाम म्हणून तिनं बी.ए.ला प्रवेश घेऊन शिकण्याची सुरुवात केली.

तिच्या या प्रवासात अनेक आव्हानं आहेत. दोन मुलींचा सांभाळ, त्यांचं शिक्षण, चाळीतल्या लहानशा घरात अभ्यासासाठी जागेचा अभाव, पावसाळ्यात घर गळणं, घरात पाणी आलं तर पुस्तकं भिजू नयेत म्हणून जपून ठेवण्याची कसरत तर अंगवळणी पडलेली, पण तरीही तिचा हा प्रवास सुसह्य झाला तो पती सुनीलच्या प्रोत्साहन आणि कृतीशील सहभागामुळे. सुनील संजनाला घरातली सगळी कामं, मुलींचा सांभाळ करायला मदत करतो. त्यामुळे तिला सकाळी कॉलेजला जाणं शक्य होतं. विक्रोळीच्या राजर्षी शाहू लॉ कॉलेजमधून एल.एल.बी पूर्ण करून सध्या ती एस.एन.डी. टी. कॉलेजमध्ये एल.एल.एम.च्या शेवटच्या सत्राचा अभ्यास करत आहे. आता सनद मिळवल्यावर वकिली करता करता पुढे पीएच.डी देखील करण्याचा तिचा विचार आहे.

कायद्याचाच अभ्यास का करावासा वाटला? या प्रश्नावर संजना सांगते,

“मी माझ्या पतीसोबत, त्यांच्या रिसर्चसाठी अनेकदा फिल्डवर जायचे. तेंव्हा महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी जवळून पाहिल्या. पण त्या महिला मोकळेपणाने कुणाला त्यांच्या अडचणी सांगत नव्हत्या,  कारण तिथं त्यांना समजून घेणारं, शिकलेलं बाईमाणूसच नव्हत आणि पुरुषांशी त्यांना मोकळेपणाने बोलता येत नव्हतं. त्याचवेळी या महिलांसाठी काही तरी करावं, असं वाटलं. आपल्याकडे योजना, तरतुदी खूप आहेत, तरी गरिबांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतंच, त्यामुळे यावर कायमस्वरुपी मार्ग काढायचा असला तर कायद्याचं शिक्षण हवंच असं वाटलं म्हणून मी एल. एल. बी. केलं. भविष्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या खटल्यांसाठी मला काम करायचं आहे, तसंच या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित करावं, असंही वाटतं.”

सफाई कामगार महिलांच्या वास्तव परिस्थितीमुळे संजनाला शिकण्याची प्रेरणा मिळाली, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणानं तिच्यात प्रचंड आत्मविश्वास आला. लग्नाआधी चारचौघांत बोलायलाही बिचकणारी संजना आता ठामपणे कोणत्याही अधिकाऱ्याशी सहज संवाद करू शकते. कायद्याच्या अभ्यासानं तिला सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांकडे, घडामोडींकडे सजगपणे बघण्याचं भान दिलं. अशिक्षित असलेल्या आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे घरकाम करून जगणाऱ्या तिच्या सासुलाही, त्यांच्या नातेवाईकांनी जमिनीच्या व्यवहारात फसवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्टही संजनाच्या लक्षात आली, “माझ्या अशिक्षित सासुबाईंना, त्यांच्या भावांनी, जमीन नावावर करून देतो, म्हणत काही कागदपत्रांवर अंगठा मागून फसवलं. मला संशय आल्यावर मी याबद्दल खूप चौकशी केली, मी आणि नवरा तलाठी ऑफिसमध्ये वगेरे जाऊन आलो. तेव्हा कळलं की सासुबाईंच्या भावांनी, फसवून त्यांच्याकडून हक्कसोडपत्रावर अंगठा घेतला होता. मग आम्ही त्या भावांविरोधात केस केली.” संजना सांगते.

कायद्याच्या शिक्षणामुळे स्वत:च्या हक्क-अधिकारांबाबत जागृत झालेली संजना दलित, कष्टकरी वर्गातल्या इतर स्त्रियांपर्यंत हे पोहोचावं यासाठी प्रयत्नशील आहे. करोना महामारीच्या काळात शेजाऱ्या-पाजाऱ्यांना केलेली मदत असो की कुणी एखादी गरीब स्त्री घरी आली तर तिला स्वत:च्या घरचं धान्य देण….संजनानं समाजाचं आपण काही देणं लागतो, ही जाणीव मनात पक्की कोरून ठेवली आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतूनच ही प्रेरणा मिळाल्याचंही ती आवर्जून नमूद करते.

ज्योतिबा-सावित्रीचा वसा आणि वारसा शब्दश: चालवणारं संजना-सुनील हे जोडपं, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या त्रिसूत्रीचं तंतोतंत पालन करत आहे, पण सध्या करोनासारख्या महामारीनं त्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे.

सुनीलने पी.एच.डी.च्या अभ्यासासाठी पाठ्यवृत्ती मिळवूनही, त्याला मोठ्या मुश्किलीने अडीच वर्षांची ‘विनापगारी’ रजा मिळाली. अशा स्थितीत, त्यांच्या कुटूंबाला आणि दोघांच्या शिक्षणाला पाठ्यवृत्तीच्या रकमेचाच मोठा आधार होता. मात्र ही पाठ्यवृत्ती याआधी अनियमित तर होतीच पण कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून त्याचा एकही रुपया त्याला मिळालेला नाही. आधीच हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणारी ही एका दलित कुटूंबातली पहिली पिढी, त्यात आता आर्थिक अडचणींत वाढ झाली.

दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च, घराचं भाडं, किराणा याची जुळवाजुळव करता करता संजनानं काही सोन्याचे दागिने कायमचे मोडूनही टाकले. त्यात सध्या न्यायालयं अर्धवेळ त्यातही अतिमहत्वाच्या केसेससाठी सुरु असल्याने बऱ्याच वकिलांनी, त्यांच्याकडे आधीच असलेला स्टाफ कमी केल्यानं, संजनाला इतक्यात तरी लहानशी नोकरीसुद्धा मिळण्याची आशा नाही.

तिच्यापुढच्या अडचणी केवळ आर्थिक, कौटूंबिक नाहीत तर लग्न, मुलं-बाळं झाल्यानंतर बराच मोठा खंड पडल्यावर शिक्षण पुन्हा सुरु करायचं, आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुला-मुलींमध्ये जाऊन शिकायचं. त्यांच्याशी जुळवून घेत अभ्यास करायचा, इंग्रजीची समस्या असली तरी शिकवलेलं समजून घेणं, अभ्यासासाठी स्वत: नोट्स तयार करणं, हे सगळंच तिच्यासाठी अवघड होतं. कॉलेजच्या वयातली मुलंमुली अल्लड-मजा मस्ती करणारी, त्यांच्याच विश्वात रममाण असणारी…त्या सगळ्यांपेक्षा आपला कॉलेजात जायचा उद्देश आणि परिस्थिती कितीतरी वेगळी, पण दबून न जाता, कोषात न जाता, मिळेल त्याच्याकडून मदत घेत ती शिकत राहिली. पहिल्या सेमिस्टरला पार गोंधळ उडालेली ती नंतर आत्मविश्वासाने इंग्रजीत पेपर लिहू लागली.

कायद्याच्या शिक्षणामुळे संजनाच्या एकूणच व्यक्तिमत्वात झालेला बदल, तिची सफाई कामगार महिलांना न्याय मिळवून देण्याची तळमळ आणि तिच्या पतीनं तितक्याच खंबीरपणे दिलेली कृतीशील साथ हे सारं केवळ दलित समूहातून येणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीसाठीच आदर्श नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाबाबतच्या विचारांनी प्रेरित झालेल्यांसाठी एक उत्तम वस्तुपाठही आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0