वेगळी रेंज, भिन्न प्रकृतीही यशस्वी

वेगळी रेंज, भिन्न प्रकृतीही यशस्वी

आपण सुवर्णकाळाचे (१९५० - १९७०) साक्षीदार असल्याने त्याला आपण कितीही कवटाळून बसलो तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की लता केवळ सुवर्णकाळापर्यंत थांबलेली नाही. तिचा १९७० नंतरचा प्रवासही आनंददायी आहे. या प्रवासाची ही झलक.

गुजरात दंगल चौकशीच्या १० याचिका सुप्रीम कोर्टकडून रद्द
तैवानच्या समुद्र हद्दीत चीनची लष्कराची प्रात्यक्षिके
गहू निर्यातबंदी : विश्वगुरूची कोलांटउडी शेतकऱ्यांच्या मुळावर

आपण खरंच नशीबवान आहोत. आपल्या काळात सुनील गावसकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चनसारख्यांनी आपलं आयुष्य सुखकर केले. कला आणि क्रीडा क्षेत्रातील आपल्या देशाचं नाव समृद्ध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला झेंडा फडकवणाऱ्या आणखी अनेक व्यक्ती आपल्या सभोवती वावरत आहेत. पण अनेकांच्या संपूर्ण आयुष्यात कानाशी सतत गुंजारव करणाऱ्या लता मंगेशकरांचे स्थान कायम अढळ राहिलेले आहे. ‘आयेगा आनेवाला’ च्या ७८ आर.पी.एम. रेकॉर्डपासून आज पाच हजार गाण्यांच्या ‘कारवां’ पर्यंत लता (तिला एकेरी संबोधण्यात खरी आपुलकी वाटते) अजून आपल्यासोबत आहे. अशा लताच्या कारकीर्दीचा शुभारंभ आपल्या डी. डी. म्हणजे दत्ता डावजेकरांनी केला याचा पण अभिमान वाटतो. त्या नंतर तिने खेमचंद प्रकाश आर. सी. बोराल, सज्जाद हुसेन, अनिल विश्वास, नौशाद, वसंत देसाई, बर्मनदा, मदनमोहन आणि शंकर-जयकिशनसारख्या अनेक प्रतिभावान संगीतकारांच्या सुरावटींचं सोनं केलं. कधीही विसरला न जाणारा २०-२५ वर्षाचा सुवर्णकाळ (१९७० पर्यंत) आपण आजही अनुभवत आहोत. पण मला वाटतं केवळ संगीतकार भाग्यवान नाहीत तर लता ही तितकीच नशीबवान आहे. लता व संगीतकार यांचे योगदान एकमेकास पूरक म्हटले पाहिजे.

आपण त्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असल्याने त्याला आपण कितीही कवटाळून बसलो तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की लता केवळ सुवर्णकाळापर्यंत थांबलेली नाही. तिचा १९७० नंतरचा प्रवासही आनंददायी आहे. अर्थात काळाप्रमाणे जसं संगीत बदलत गेलं, त्यातील हळूवारपणा, नजाकत कमी होत गेली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक बुजुर्ग संगीतकार एका विशिष्ट सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांच्या संगीतात पुनरावृत्ती, एकसुरीपणा जाणवू लागला. काहींचा दर्जा खालावू लागला.

उदाहरण द्यायचे तर नौशाद अली यांचं. त्यांच्या ‘मेरे मेहबूब’ नंतर सर्वांगसुंदर म्हणण्यासारखा किंवा सर्वच्या सर्व गाणी दर्जेदार असणारा एकही सिनेमा नाही. ‘दिल दिया दर्द लिया ‘ आणि ‘आदमी’ यांचा अपवाद. ज्यात ४/५ गाणी सुरीली होती. पण त्यात तोचतोचपणा जाणवत होता. ‘साथी’ च्या निमित्ताने करसी लॉर्डसारखा अरेंजर घेऊन नौशाद यांनी थोडफार नावीन्य आणायचा प्रयत्न केला होता. त्याला तात्पुरते यश मिळाल. पण १९७० नंतर तांगेवाला (१९७२), आयना (१९७४), मायफ्रेंड (१९७४) या सिनेमात लताची गाणी असूनही एकही गाणं आठवत नाही. शंकर जयकिशन यांच्या बाबतीत थोडं वेगळं घडलं. १९६६ नंतर लता शंकर-जयकिशन यांच्याकडे गात होती. त्यामुळे काही ठळक अपवादवगळता खास नवीन असं निर्माण झालं नाही. परंतु गाण्याची लोकप्रियता कायम ठेवण्याचं कसब शंकर-जयकिशनना चांगलं जमलं होतं. त्यामुळे ‘गर तुम भुला न दोगे’ (यकीन), ‘तुम मुझे यू भूला न पाओगे’ (पगला कही का) ही गाणी आजच्या काळात टिकून आहेत. शंकरजींना भव्य ऑर्केस्ट्राची आवड तर जयकिशन यांना मृदू वाद्यवृंद आवडायचा. परंतु त्या काळात मेलडीचं माधुर्य थोडेफार कमी झाल्याने शंकर जयकिशन यांची गाणी डल वाटू लागली. उदा. अर्चना, रिवाज, अलबेला या चित्रपटातली गाणी निर्जीव वाटू लागली.

याच काळात म्हणजे १९७१ला जयकिशनचा अकाली मृत्यू झाला. राजकपूरने शंकरजींना आर. के. मधून बाजूला केले. जयकिशनबरोबरच ‘बरसात’ ला संगीत देईन असा आग्रह धरणाऱ्या शंकरजींवर जयकिशनच्या मृत्यूनंतर हा मोठा आघात होता. परंतु १९७५ नंतर एक अनपेक्षित व चांगली घटना घडली. त्यातल्या त्यात ज्युनियर (नवखा) असलेल्या सोहनलाल कंवर या निर्मात्याने लता-शंकर समझोता घडवून आणला. शंकरजींची प्रतिभा पुन्हा उफाळून निघाली. भैरवी रागावर अनेकदा हक्क गाजविणाऱ्या शंकरजींनी ‘संन्यासी’ च्या ‘चल संन्यासी’, ‘सुन बाल ब्रम्हचारी’ या गाण्यांमधून हरवलेली मेलडी पुन्हा परत आणली. लताच्या आवाजाचे माधुर्य तिच्या आवाजाची धार आणि हृदयातली भावना यांचा त्रिवेणी संगम ‘संन्यासी’च्या संगीतातून अनुभवायला मिळाला. माझं भाग्यही थोर की याच काळात आमच्या ‘सिंफनी’ संस्थेच्या ‘याद ए शंकर जयकिशन’च्या कार्यक्रमाला शंकरजी उपस्थित होते. ओळख वाढतच गेली आणि त्यांच्या ‘गरम खून’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगला मला लताला अगदी जवळून पाहायला, ऐकायला मिळालं. ‘एक चेहरा’ हे गाणं लता इतक्या ताकदीने गायली की शंकरजी भलतेच खुश होते. याच वेळी त्या रेकॉर्डिंग रुममध्ये (फिल्म सेंटर ) राहुल देव बर्मन यांचं आगमन झालं. आर.डीं. नी तेही गाणं ऐकलं आणि शंकरजींना मिठी मारली. हे रेकॉर्डिंग संपल्यावर आर.डी. यांचे रेकॉर्डिंग होतं म्हणून मी थांबलो. परंतु एक तासानंतर एकही वादक हजर नव्हता. क्षणातच एक भव्य सफेद पडदा उभा करण्यात आला आणि सकाळचं रेकॉर्डिंग संपवून घरी गेलेल्या लताबाईंचं पुनरागमन झालं. काळोख झाला आणि पडद्यावर हेमामालिनीवर चित्रीत केलेले गाणे सुरु झाले. पण आवाज किशोरकुमार यांचा होता. ‘मेरे नैना सावन भादो’. राजेश खन्ना पडद्यावर दिसल्यावर लता – आर.डीं. मध्ये थट्टामस्करी सुरू झाली. या नंतर एक-दोन वेळा तेच गाणे पूर्ण ऐकून नंतर माईकवर जाऊन तेच गाणं केवळ अर्ध्या तासात डब केलं. ती सहजता, ते परफेक्शन पाहिल्यावर कळलं की लता एवढी आभाळाएवढी मोठी का झाली?

स्टुडिओतून बाहेर पडल्यावर मी आर. डी. च्या यशस्वी कारकीर्दीचा विचार करू लागलो. ‘छोटे नवाब’ मध्ये त्याने ‘घर आजा घिर आये’मधून आपला शास्त्रीय संगीताचा पाया की पक्का आहे हे दाखवून दिलं होतं तर ‘मतवाली आंखोवाले’ मधून चित्रपट संगीतात एक फ्रेश लूक देणारं संगीत निर्माण करणार याचा विश्वास दिला होता व तो पुढच्या ५ वर्षात सिद्ध केला. नासिर हुसेन यांच्या चित्रपटाच्या संगीताचा दर्जा राखून त्याने मजरुह सुलतानपुरी, आनंद बक्षी व त्यानंतर गुलजार यांच्या लेखणीला परिपूर्ण न्याय दिला. केवळ सुवर्णयुगकाळाचं कौतुक करणाऱ्या काही बुजुर्गांना सांगावंसं वाटतं की ‘रैना बिती जाए’ (अमरप्रेम), ‘दिलबर दिल से प्यारे (कारवां), ‘फूलोंका तारोंका’ (हरे राम हरे कृष्ण), ‘मेरे नैना’ (मेहबूबा), ‘आजकल पांव जमीपर’, ‘तेरे बीना जिया, (घर), ‘रिमझिम गिरे सावन’ (मंझिल), ‘ऐ री पवन’ (बेमिसाल), ‘हमे और जीनेकी’ ( अगर तुम न होते), ‘तुझसे नाराज’ (मासूम), ‘नाम गुम जायेगा’ (किनारा), ‘इस मोडसे जाते है’, ‘तेरे बिना जिंदगीसे’ (आंधी) या मेलोडियस गाण्यांमधून लताच्या गायकीचे अनेक पैलू ठळकपणे उठून दिसले आहेत. गुलजारबरोबर जमलेल्या आर. डी. च्या भट्टीतून अनेक हिरे-माणकं निर्माण झाली आणि त्यामुळे १९७० नंतरही चित्रपट संगीत ताजंतवानं राह शकलं.

१९७० नंतर संगीताच्या दर्जामधलं सातत्य हळूहळू कमी होत असतानाच अनेक वर्षे रखडलेला ‘पाकीजा’ १९७१ साली रिलीज झाला आणि इतकी वर्षे नौशादकडे सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या गुलाम महंमदचे टॅलेंट लोकांना कळले. ‘पाकीजा’ तील लताने गायलेल्या प्रत्येक गाण्याची जातकुळी, मूड वेगळाच होता. ‘इन्ही लोगोने’ सारखे मुजरा गीत, ‘चलते चलते’ सारखं हूरहूर लावणारं गाणं, ‘मौसम है आशिकाना’ सारखं प्रियकराला हळूवार साद घालणारं गीत आजही चिरतरुण आहे. त्या काळच्या स्पर्धेत हरवलेल्या ‘खय्याम’सारख्या गुणी संगीतकाराला ‘कभी कभी ‘ने प्रकाशात आणलं. त्यातली गाणी हळूवार, रोमॅटिंक मेलोडीयस असली तरी अविस्मरणीय नव्हती. परंतु १९७७च्या ‘शंकर हुसैन’मधल्या ‘आप यूं ही फासलेसे गुजरते रहे’ व ‘अपने एप रातोंमे’ या लताच्या गाण्यांमधून खय्याम यांची प्रतिभा दिसून आली आणि त्यानंतर ‘रझिया सुलतान’ च्या ‘ऐ दिले नादान’ मध्ये ही खय्याम चांगलाच खुलला.

बंगाली संगीताची कास धरणाऱ्या प्रयोगशील सलिल चौधरींनी ‘अन्नदाता’च्या ‘निसदिन निसदिन’, ‘रातोंके साये बनेट’ ही टिपिकल गाणी दिली. परंतु साचेबंद चित्रपटापासून दूर जाणाऱ्या बासुदांच्या ‘रजनीगंधा’ व ‘छोटीसी बात’ मध्ये लताच्या मेलडीबरोबर पाश्चात्य आधुनिक वाद्यमेळ अचूक साधला. अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या ‘जयदेव’ सारख्या गुणी संगीतकाराने ‘तू चंदा मैं चांदनी’ (रेश्मा और शेरा) लतासाठी राखून ठेवलं होत. ‘प्रेम पर्वत’च्या ‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ या गीताने लोकप्रियतेचा कळस गाठला.

१९७१ साली जयकिशन व १९७५ साली मदनमोहन हे फ्रस्ट्रेशन आणि दारुच्या व्यसनाचे बळी ठरले. शंकरबरोबर आलेले वितुष्ट तसेच अनेक जुने बॅनर्स लक्ष्मीकांत-प्यारेलालकडे गेल्याचं दुःख जयकिशन संपवायला कारणीभूत ठरलं. जयकिशनच्या मृत्यूनंतर लक्ष्मी-प्यारेना ‘बॉबी’ नावाची लॉटरी लागली. ‘अंग लग जा बालमा’ (मेरा नाम जोकर) यातील शब्द अश्लील म्हणून गाणं नाकारणार्या लताची आर. के. मध्ये एंट्री झाली ती ‘हम तुम एक कमरेमें बंद हो’ या गाण्यान हे जरा विक्षिप्तच वाटतं.

खरं म्हणजे सुवर्णकाळातील लता एलपीच्या कॉम्बिनेशनमुळे सती सावित्री, संत झानेश्वर, पारसमणी, आया तुफान, लूटेरासारख्या पौराणिक देमार चित्रपटांना एक वेगळीच संजीवनी मिळाली होती. परंतु नंतर ए ग्रेड चित्रपट मिळाल्यावर तो दर्जा टिकू शकला नाही. परंतु आन मिलो सजना, जीने की राह, शागिर्द, खिलौना, जीवनमृत्यू, शराफतचे संगीत कमालीचे लोकप्रिय ठरले. पण हळूहळू लताची गाणी लाऊड वाटू लागली. ‘बॉबी’मध्ये तर शंकर-जयकिशनच्या संगीताचे प्रतिध्वनी ऐकू आले. परंतु त्यानंतर ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये लक्ष्मी-प्यारेंनी लताच्या गायकीचा सुरेख वापर केला. यानंतर लक्ष्मी-प्यारेंनी कामचलाऊ पण लोकप्रिय संगीताचा घडाका लावला. परंतु २ / ३ वर्षाच्या अंतराने ‘पर्बत के उस पार’, ‘डफलीवाले’ (सरगम), ‘तेरे मेरे बीच में’, ‘सोलह बरसकी (एक दुजे के लिये), ‘मन क्यूं बहका रे’ (उत्सव) सारखी लताच्या आवाजाला चॅलेंज थोडीफार मेलोडियस गाणी लक्ष्मी-प्यारेंनी दिली.

आपल्या कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण झाली तरी लता त्याच ताकदीने, आत्मविश्वासाने गात होती. १९८०च्या आसपास आजच्या व जुन्या गायकांची लोकप्रिय गाणी नवोदित गायक म्हणू लागले व चांगले गायक प्रकाशझोतात आले. संगीतकारांची नवीन पिढी याच काळात तयार होऊ लागली. परंतु याच काळात त्यातल्या त्यात अनुभवी असणाऱ्या रवींद्र जैनसारख्या संगीतकाराने लताकरता ‘दिल में तुझे’ (फकिरा), ‘तेरा मेरा साथ रहे’ (सौदागर) सारखी अवीट गाणी निर्माण केली. त्यानंतर आर.के.मधील प्रवेशानंतर ‘राम तेरी गंगा मैली’ करता ‘तुझे बुलाये’, ‘एक राधा एक मीरा’ सारखी ओरिजनॅलीटी दिली. १९८० पासून नवोदित गायकांना संधी देणारे आनंद – मिलिंद, नदीम-श्रवण तसेच व्हीनस, टिप्स, टी सिरीजसारख्या कॅसेट कंपन्या चित्रपट रसिकांवर राज्य करू लागल्या. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम यांना महत्व आले. या नंतरच्या काळात राम-लक्ष्मण, उत्तमसिंग, ए. आर. रहमान, जतिन-ललित सारख्या संगीतकारांचे योगदान डोळ्याआड करून चालणार नाही. खरं म्हणजे १९८५ नंतर लता फार गाणी गायली नाही, पण जे गायली ते जुन्या नजाकतीने, आत्मविश्वासाने! यापैकी काही ठळक उदाहरणांचा उल्लेख करायलाच हवा. राम लक्ष्मणच्या ‘मैने प्यार किया’ने राजश्री प्रॉडक्शनला सर्वोच्च स्थानावर नेलं. ‘दिल दिवाना’, ‘कबूतर जा जा’ ने एच.एम.व्ही ला अधिक श्रीमंत केलं. ‘हम आपके है कौन’ (१९९४) ही तर एक सांगीतिक व्हिडिओ फिल्म म्हणून गणली गेली. राम-लक्ष्मणचा अरेंजर उत्तम सिंग याने तर ‘दिल तो पागल है’ मध्ये बाजी मारून फिल्मफेअर अवॉर्डही मिळवले. या चित्रपटांमुळे लता – उदित नारायण, लता-बाल सुब्रमण्यम ही सुपरहिट युगलजोडी ठरली. ए. आर. रहमानसारखा अत्यंत वेगळ्या घाटणीचा क्रिएटिव्ह संगीतकार चित्रपटसृष्टीला लाभला. त्याने लताला अगदी वेगळ्या रेंजची व भिन्न प्रकृतीची गाणी दिली. ‘ओ पालनहारे (लगान २००१), ‘एक तू ही सहारा’ (पुकार २०००), ‘लुक्क छुप्पी’ (रंग दे बसंती २००६) ही गाणी याला साक्ष आहेत.

 

जतिन-ललित यांनी सर्व संगीतकार जोड्यांना मागे टाकत सहज सुंदर अवीट गीतांचा वर्षाव केला. ‘हम को हमीसे’ (मोहोब्बते) मधून ऐश्वर्या रायने भाबडे प्रेम व्यक्त केले पण खरे सुपरहिट ठरले ‘मेरे ख्वाबोमे जो आये’! शोभना समर्थ, नूतन – तनुजा आणि आता तिसऱ्या पिढीतील काजोलच्या यशाचा मार्ग खुला झाला तो याच लताच्या गाण्याने. तीन पिढ्या आपल्या आवाजाने समृद्ध करणारी लता आपल्या कारकिर्दीच्या ६०व्या वर्षापर्यंत गात राहिली. शेवटच्या टप्प्यात तिच्या काही गाण्यांमध्ये आवाजातला बदल जाणवू लागला. काही वेळा थकवाही जाणवत होता. तिची सुरावटीमधली जवळीक एखाद्या क्षणाला थोडी कमी झाल्यासारखं सुजाण कानसेनांना जाणवू लागलं होतं. विशेषतः २००४ सालच्या ‘वीरझारा’मधली स्व. मदनमोहन यांची कंपोझिशन ऐकताना हे जाणवत होतं. पण या गीतांना केवळ लताच न्याय देऊ शकत होती. चित्रपट पहाताना लताच्या आवाजातील आर्तता क्षणाक्षणाला डोळ्यांच्या कडा ओल्या करत होती.

‘जिंदगी लेके आयी है बीते दिनोंकी किताब हे तेरे लिये हम जीये’चे या गीतामधले बोल ऐकताना लताच्या प्रवासातील प्रत्येक क्षण आपण शेअर करायलाच हवा असं सच्च्या रसिकाला वाटल्याशिवाय रहाणार नाही.

(मूळ लेख – तारांगण (सप्टेंबर २०१९, संपादक – मंदार जोशी ) या मासिकात प्रसिद्ध झाला आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0