स्त्रियांच्या इच्छा व आकांक्षांचे दमन

स्त्रियांच्या इच्छा व आकांक्षांचे दमन

मी कुठल्याही टपरीवर एकटी बसून चहा पिते किंव्हा काही खाते, त्यामुळे मी कधीही हा विचार केला नव्हता की स्त्रियांच्या हॉटेलमध्ये जाऊन काही खाण्याची इच्छा त्यांच्या वयाच्या पन्नास वर्षे होईपर्यंत अपूर्ण राहिलेली असेल!

 काही दिवसांपूर्वी गावातल्या एका बचत गटाच्या बैठकीला गेले.  तेंव्हा तिथे महिलांनी कोल्ड्रिंक आणले आणि आम्ही सर्वजणींनी ते मस्त पित मिटिंग केली. त्यावेळी सर्व महिला म्हणाल्या, “आम्हाला अशा प्रकारे बचत गटाच्या कारणाने फक्त एकत्र येता येते आणि त्यामुळे थोडावेळ मोकळेपणाने जगता येते.” म्हणजे इच्छा असते पण गावातल्या हॉटेलमध्ये बसून त्या कोल्ड्रिंक पिऊ शकत नाहीत.

अनेकदा येणारा आणखी एक अनुभव आहे. तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन असेल तर महिलांचे वेगवेगळे गट माझ्याकडे येतात आणि हॉटेलमध्ये जाऊन काही खाण्याची विनंती करतात. सुरुवातीला मला वाटायचं की त्यांना मला काहितरी खाऊ घालायचय इतकंच. पण नंतर एक कार्यकर्तीकडून कळालं की एका आंदोलनाच्यावेळी ती काही पन्नाशी पार केलेल्या महिलांना हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्यावेळी त्या म्हणाल्या की डोसा की काय असत ते खायचंय. मग डोसा मागवला तर त्यांनी पोटभर खाल्ला आणि म्हणाल्या आम्ही याचं नाव खूपवेळा ऐकलं पण ते  खायला कधी भेटलं नव्हतं. आज खाऊन खुप छान वाटलं. तेंव्हा मला लक्षात आलं की महिला मला हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचा आग्रह यासाठी करतात की मी असले की त्यांना संकोच वाटत नाही आणि आयुष्यभर जी इच्छा अपूर्ण आहे ती पुर्ण करता येते.

मी कुठल्याही टपरीवर एकटी बसून चहा पिते किंव्हा काही खाते, त्यामुळे मी कधीही हा विचार केला नव्हता की स्त्रियांच्या हॉटेलमध्ये जाऊन काही खाण्याची इच्छा त्यांच्या वयाच्या पन्नास वर्षे होईपर्यंत अपूर्ण राहिलेली असेल! कदाचित काहींची आयुष्यात कधीच ही इच्छा पूर्ण होत नसेल. मी विद्यार्थी चळवळीत काम करत असतांना अशा कार्यकर्त्या मुली होत्या की त्या संघटनेचे सगळी कामं करायच्या. मग संघटनेची सभासद नोंदणी असो की पत्रक वाटणं असो की कार्यक्रम, आंदोलनांचा प्रचार करणं असेल किंव्हा अगदी रात्रीचे पोस्टर चिकटवणे, वॉल रायटिंग करणे, त्या खूप उत्साहाने कामं करायच्या. आंदोलनात सहभागी व्हायच्या. पण मागे थांबायच्या. जेणेकरून फोटोत त्या दिसणार नाहीत. न चुकता त्या आम्हाला सूचना करायच्या की बातमीत आमचे नाव टाकू नका. त्याचं  कारण होतं की पेपर गावाकडे पण जातात आणि जर आमच्या घरच्यांनी किंवा नातेवाईकांनी आमचा फोटो किंवा नाव पेपरमध्ये पाहिलं तर आमचं शिक्षण बंद होईल. खरं तर पेपरमध्ये नाव किंवा फोटो आलेलं कुणालाही आवडेल, परंतु त्यांना ती इच्छा बाळगता येत नव्हती.

मला आठवतं, मी आणि माझ्या मैत्रिणी बी.कॉम.च्या  दुसऱ्या वर्षात असताना पहिल्यांदा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलो होतो. तसं तर अकरावीपासून आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होतो, पण आम्हाला भीती होती की सिनेमागृहात चित्रपट पाहायला गेलो म्हणून कुणी आपल्याला पाहिलं तर घरी कळेल आणि आपलं शिक्षण बंद होईल. म्हणून आम्ही कितीही ईच्छा झाली तरी टॉकीजमध्ये जाऊ शकत नव्हतो. जेंव्हा गेलो तेंव्हा पण ‘चक्रव्यूह’ नावाचा चळवळीवर आधारित चित्रपट पाहिला! तो पाहिला होता कारण कुणी आपल्याला इथे पाहिलच तर सांगता येईल की आम्ही रोमँटिक चित्रपट पाहिला नाही, तर चळवळीवर आधारित पहिला. ही होती अवस्था वयाच्या विसाव्या वर्षी.

माझी एक मैत्रीण चांगली डान्सर आहे. त्याशिवाय तिला आणि आम्हा सर्व मैत्रिणींना सहज नाचायला खूप आवडतं, पण मनसोक्त नाचता येत नाही. मुलं, पुरुष कोणत्याही वरातीत नाचू शकतात, पण ग्रामीण मुलींना इच्छा असली तरी नाचता येत नाही. आम्ही हॉस्टेलवर राहत असताना बाहेर बँड किंवा डी. जे. वाजत असेल तर आमची रुम बंद करून नाचायचो.

हे झाले मला प्रत्यक्ष आलेले अनुभव. याशिवाय अशा किती असंख्य गोष्टी असतील की ज्या स्त्रियांना करायची इच्छा असूनही त्या ते करू शकत नाहीत. मला आठवतं. मी पदवी करत असतांना शासकीय वसतिगृहात राहत होते, तेंव्हा बारावी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सर्व मुली घरात संघर्ष करून, लग्नाला तीव्र विरोध करून आलेल्या होत्या. नाहीतर सर्रास हे ऐकायला मिळतं की लग्न झाल्यावर शिक शिकायचं ते. लग्न झाल्यावर घरातलं सगळं काम तिने करायचं. वर्षभरात मुल पाहिजे. या सगळ्यामध्ये शिक्षणाची इच्छा तशीच राहून जाते. एखादी फारच लाऊन धरत असेल, तर मुक्त विद्यापीठ वगैरेंच्या माध्यमातून घरीच राहून अभ्यास करणे आणि आग्रह धरते म्हणून नावापुरतं परीक्षा देता देणे. शैक्षणिक परिसरात नियमित गेल्यास मुली बिघडतील म्हणुन शिकण्याची आकांक्षा असणाऱ्या अशा मुलींना ‘खुल्या’ विद्यापीठात प्रवेश देऊन घरीच ‘बंदिस्त’ केले जाते. मला लहान असतांना माझे मामा कांदा खाऊ देत नव्हते म्हणजे मी खात असेल तर आडवत होते. तेंव्हा मला खुप राग यायचा पण हे कांदा खाऊ देत नाहीत ते मला कळत नव्हतं. नंतर लक्षात आलं की कांदा, लसुण खाल्याने माणूस तामसी-तापट बनतो अशी धारणा होती आणि मुलींनी, महिलांनी आक्रमक असता कामा नये म्हणून लहानपणापासूनच खबरदारी घेतली जात होती.

माझी एक मैत्रीण पोस्टात नोकरी करते. एकदा ती पावसामुळे टपाल घरपोच देऊ शकली नाही तर तिच्याबरोबर भांडण करत एकजण तिला भर रस्त्यात म्हणाला, “आमच्या घरच्या महिला अशा गावभर फिरत नाहीत आणि चौकात उभ्या राहून वाद घालत नाहीत.” तिच्या चारीत्र्यावर हल्ला करून तिच्या धाडसावर, कर्तृत्वार पाणी फेरले जाते.

वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना टेरेसवर जाण्यास बंदी असते. तीच बंदी मुलांना नसते. शिक्षण, नोकरी, आरोग्य, कपड्यांची निवड, बोलणे, हसनणे, उठणे, बसणे या सगळ्याच बाबतीत स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार व्यवहार करताच येतो असं नाही. प्रत्येक स्त्री तिच्या शेकडो इच्छा मारून जीवन जगत असते.

ही केवळ उदहरणांची जंत्री वाटू शकेल. पण ही उदहरणेच फार बोलकी आहेत. त्यावर विश्लेषणाची फार गरज भासू नये.

आज वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया पुढाकार घेत आहेत. नेतृत्व करत आहेत. ग्रेटा थनबर्ग, मलाला, जमिया मिलिया, जेएनयू विद्यापीठातील लोकशाही अधिकारांसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या असंख्य मुली, जगभरात स्त्रिया विविध आंदोलनांचे नेतृत्व करत असताना दिसत आहेत. हे सगळं एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूचं वास्तव हे असं आहे. आजही पावलोपावली बहुसंख्य स्त्रियांच्या इच्छा आणि आकांक्षांचे दमन होत आहे.

COMMENTS