न्या. एम. आर. शहांकडून मोदींचे कौतुक

न्या. एम. आर. शहांकडून मोदींचे कौतुक

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत लोकप्रिय, सर्वांचे आवडते, दूरदृष्टीचे नेते आहेत, असे कौतुक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.आर. शहा यांनी केले. शनिवारी झालेल्या गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवात ते बोलत होते.

गुजरातच्या उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवाला मला बोलावल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे पण या कार्यक्रमाला सर्वात लोकप्रिय, सर्वांना आवडणारे, व्हायब्रंट व दूरदृष्टीच्या नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित असल्याने मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया न्या. शहा यांनी दिली.

संसद, कार्यकारी मंडळ व कायदे मंडळाच्या सत्ता विभागणीवर भारताची लोकशाही उभी राहिल्याचे सांगत न्या. शहा यांनी गुजरात उच्च न्यायालयाने स्वतःची लक्ष्मण रेखा कधीही ओलांडली नाही, असे गौरवास्पद उद्गार काढले. गुजरात उच्च न्यायालय आपली कर्मभूमी असून या राज्यात २२ वर्षे वकिली केली व १४ वर्षे न्यायदानाचे काम केले, असे न्या. शहा म्हणाले.

यावेळी मोदी यांच्या हस्ते गुजरात उच्च न्यायालयाचे चित्र असलेले टपाल तिकिट जारी करण्यात आले. आपल्या भाषणात मोदी यांनी देशाची न्यायव्यवस्था आपल्या नागरिकांचे मूलभूत अधिकाराचे, व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण करत असल्याचे मत व्यक्त केले.

गेल्या वर्षी माजी न्या. अरुण मिश्रा यांनीही पंतप्रधान मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दूरदृष्टीचे नेते आहेत, असे विधान केले होते. त्यावेळी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

मूळ बातमी

COMMENTS