नवी दिल्लीः सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या वादग्रस्त कार्यक्रमावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्
नवी दिल्लीः सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या वादग्रस्त कार्यक्रमावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. न्या. चंद्रचूड म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे एका समाजाला बदनाम करण्याचा कपटी प्रयत्न असून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मुस्लिम सनदी सेवेत घुसखोरी करत आहेत असा प्रचार करण्यास आम्ही पत्रकारांना परवानगी देणार नाही.
गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला बिंदास बोल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सनदी सेवांमध्ये मुसलमान युवक मोठ्या प्रमाणात भरती होत असून ते देशविरोधातील षडयंत्र आहे व त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केला होता. त्यावरून वादही निर्माण झाला होता. जामियातील आयएएस कोचिंग क्लासच्या माध्यमातून सनदी सेवेत मुस्लिम युवकांना पाठवून देशाला धोका निर्माण करत असल्याचे चव्हाणके यांचे म्हणणे आहे. त्यांनी या क्लासेसला जामियातील जिहादी असेही म्हटले होते.
त्यावर प्रतिक्रिया म्हणून २८ ऑगस्टला प्रसारित होणार्या या कार्यक्रमातील पहिल्या भागावर स्थगिती आणावी अशी जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने त्याच दिवशी या कार्यक्रमावर स्थगिती आणली होती.
पण ९ सप्टेंबरला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे दोन भाग प्रसारित करावे, यासाठी परवानगी दिली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस पाठवली होती.
या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी या कार्यक्रमाचे दोन भाग प्रसारित होणार होते.
या कार्यक्रमाचा दुसरा भाग मंगळवारी व बुधवारी होणार असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली आहे.
मूळ बातमी
COMMENTS