तैवानचे कोरोना नियंत्रण

तैवानचे कोरोना नियंत्रण

जगात कोरोना विषाणूने सध्या कहर केला आहे. वैद्यकीय सुविधा देण्यात अव्वल मानलेले जर्मनी, इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांनी कोरोना समोर हात टेकलेले असताना आशियातील काही छोट्या देशांनी मात्र कोरोनाला प्रतिबंध करण्यात कोणतीच कसर राहू दिलेली नाही.

आशियातील प्रगत परंतु जागतिक पटलावर दुर्लक्षित असलेल्या तैवानने दिलेल्या कोरोनाच्या महामारीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलेल्या जागितक आरोग्य संघटने (WHO)ला आता, त्याच तैवानचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. WHO चे अध्यक्ष डॉ. टेड्रोस घेब्रियेसास यांनी याआधी तैवानने दिलेला महामारीचा इशारा डावलून लावत कोरोनाचा प्रसार सांसर्गिक नाही, असा डळमळीत अहवाल जगासमोर मांडत अप्रत्यक्षरीत्या जगाची दिशाभूलच केली होती. मात्र तैवान WHO चा सदस्य नसल्याने त्याने आपल्या परीने प्रयत्न करत या महामारीला रोखून धरल्याने जगाचे लक्ष तैवानच्या ‘कोरोना पॉलिसी’कडे वेधले गेले आहे. सध्या WHO , तैवानच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधून त्यांनी केलेल्या प्रगतीचा अभ्यास करत आहे असे वृत्त लंडनस्थित “रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

या पार्श्वभूमीवर तैवानने कशाप्रकारे या संकटाचा सामना केला आहे हे जाणून घेणं महत्वाचं असून, लॉकडाउन न करता तैवानने कशाप्रकारे हे संकट थोपवून धरलं आहे, हे पाहणं देखील तितकंच आवश्यक आहे. २.३८ कोटी लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये आजघडीला केवळ ४२२  कोरोनाग्रस्त असून त्यातील ६ जण दगावले आहेत, तर जवळपास २०३ जण बरे देखील झालेले आहेत. त्यामुळे इथे केवळ २०० च्या आसपास रुग्ण आहेत. यातील केवळ ५५ जण स्थानिक पातळीवर संक्रमित झालेले असून, ३४३ जण परदेशात आणि अन्य ठिकाणी संक्रमित होऊन तैवानमध्ये दाखल झालेले आहेत. चीनच्या बाजूलाच थोड्या अंतरावर तैवान वसला असून देखील कोरोनाला इथे यशस्वीरीत्या थोपवून धरण्यात आले आहे.

२००३ च्या ‘सार्स’ मधून धडा

२००३ ला चीनच्या ग्वान्गडोंग प्रांतातून पसरलेल्या सार्स (सीव्हीयर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ) या विषाणूमुळे हाहाकार उडाला होता. त्यावेळी याचा प्रसार कोरोना इतका व्यापक नव्हता परंतु मृत्यदर जास्त होता. चीनमध्ये या विषाणूमुळे जवळपास ३४९ लोकांचा मृत्यू झाला होता. तर हॉंगकॉंगमध्ये २९९ आणि तैवानमध्ये ७३ लोक बळी पडले होते. यातून धडा घेत तैवानने २००४ साली तैवान सेंटर फॉर डीसीस कंट्रोलच्या (सी.डी.सी.) नियंत्रणाखाली “राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण विभाग“(एन.एच.सी.सी.) स्थापन केला. ‘सावध ऐका पुढल्या हाका’,  या म्हणीप्रमाणे, ज्यावेळी चीनच्या वूहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तेंव्हाच तैवानने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली. एवढ्यावरच न थांबता एखादा प्रवासी चीन व्यतिरिक्त दुसऱ्या देशातून जरी येत असेल, तरी तो गेल्या काही दिवसात चीनला जाऊन आलाय का याची देखील पडताळणी केली जाऊ लागली. चीनमध्ये जेव्हा कोरोना विषाणू सर्वदुर पसरायला लागला त्यावेळी मात्र नियम कठोर करण्यात आले. चिनी नागरिकांना तैवानने प्रवेशबंदी केली. इकडे तैवान चिनी नागरिकांना प्रवेशबंदी करत होता, तर दुसरीकडे चिनी नागरिक इतर काही देशांमध्ये मनसोक्त प्रवास करू शकत होते. बाकीचे पाश्चिमात्य देश यावर नजर न ठेवता विषाणूची टिंगल-टवाळी करण्यात मश्गुल होते आणि याचा जबर फटका आता बसताना दिसत आहे.

राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वन

राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वन

तैवानने विदेशी नागरिकांसोबतच स्वतःच्या नागरिकांना देखील, जर ते चीन मधून येत असतील तर १४ दिवस विलगीकरणात किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवले व चीन आणि विशेषतः वुहानशी संपर्क टाळला. ज्यावेळी हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, जपान, आणि सिंगापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढायला लागली त्यावेळी तैवानने सर्वात आधी  त्या प्रदेशातून येणाऱ्या किंवा तिथल्या विमानतळावरून फक्त निर्गमन किंवा ट्रान्सीट केलेल्या प्रवाशांवर देखील विलगीकरणाची सक्ती केली.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंगवन यांच्यावर चीनचा प्रचंड दबाव आहे. पण त्या अतिशय आत्मविश्वासाने सर्वांना विश्वासात घेऊन काम करीत असून, त्यांनी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी आहे. तसेच कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यासाठी तैवान सदैव जगाच्या मदतीसाठी तयार असेल, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

तैवानमधील विलगीकरण (होम क्वारंटाईन)

तैवानमध्ये कोरोनाला आळा घालण्यात प्राथमिक टप्प्यावर आलेल्या यशात इथल्या लोकांचं योगदान फार मोठं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी विषाणूबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ. आस्थापना विषाणूचा प्रसार होण्याच्या प्राथमिक काळातच बंद करण्यात आली.

विलगीकरणाचे नियम:

१. विलगीकरण केलेल्या कोणत्याही प्रवाशाने विमानतळापासूनच काही नियम पाळत गेले पाहिजे. विमानतळापासून अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

२. विलगीकरण करण्यात आलेल्याचे हाल होऊ नयेत यासाठी केवळ विलगीकरण करण्यात आलेल्या प्रवाशांना वेगळी टॅक्सी सुविधा पुरविण्यात आली आहे.

३. घरी गेल्यावर प्रवाशाला किंवा संशयित रुग्णाला घराबाहेर पडता येणार नाही. यासाठी एन.एच.सी.सी. द्वारा संबंधीत व्यक्तीला दिवसाला काही व्हिडीओ किंवा साधा कॉल करून त्याच्या प्रकृतेची माहिती घेतली जाते.

४. संबंधित व्यक्तीच्या तब्येतीत बदल दिसून आल्यास त्याला ताबडतोब विलगीकरणातून रुग्णालयात दाखल केले जाते.

५. एखाद्या व्यक्तीने विलगीकरणाचे नियम तोडल्यास त्याला जवळपास २५ लाख ( दशलक्ष तैवान डॉलर्स) रुपयांचा दंड लागू करण्यात येईल, असे ‘तैवान सीडीसी’ने बजावले आहे.

६. विलगीकरणात राहणाऱ्यांना सरकार मार्फत प्रति दिन १००० तैवान डॉलर्सचा (२५०० रुपये) विलगीकरण भत्ता देण्यात येत आहे.

७. मोबाईलवर आधारित “इलेक्ट्रॉनिक फेन्स”व्दारे विलगीकरणात असलेल्या व्यक्तीवर २४ तास एन.एच.सी.सी., सी.डी.सी. आणि पोलीस यंत्रणेची नजर आहे.

विलगीकरणादरम्यान एखाद्या व्यक्तीचा मोबाईल फोन बंद झाला किंवा त्याच लोकेशन निवासाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आढळल्यास, फोनला उत्तर न मिळाल्यास, घराबाजूच्या किंवा इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्यास ताबडतोब १५ ते २० मिनिटात पोलीस यंत्रणा घरी पोहचलेली असेल. तसेच ती व्यक्ती जबर दंड भरण्यास पात्र राहील. असे काही कठोर आणि उपयुक्त नियम जारी करून सरकारने विषाणूला प्रतिबंध करण्याचे ठरविले असून, देशातील सार्वजिनक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  तैवान सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार हाताळण्यासाठी अनेक तंत्रज्ञानयुक्त साधनांचाही उपयोग केला असून, यात काही मोबाईल ऍप्स,डेटासायन्स तंत्रज्ञान, मोबाईल कंपन्यांची मदत घेऊन रुग्णाचा मोबाईल ट्रॅक केला जातो. ‘तैवान सीडीसी’ने ‘एच.टी.सी.’(HTC) या ‘लाईन’ ऍपच्या निर्मात्या कंपनीबरोबर करार करत विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय माहिती ‘लाईन’ ऍपद्वारे भरता येईल याची व्यवस्था केली आहे.

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये  खबरदारी

तैवानमध्ये शाळा आणि महाविद्यालयांचे प्रमाण मोठं असून, या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची आवश्यकता असते हे जाणून सरकारने एक नियमावली तयार केली आहे. एखाद्या

तैपेई: शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष सोशल- डिस्टंसिंग ची व्यवस्था

तैपेई: शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष सोशल- डिस्टंसिंग ची व्यवस्था.

शाळेत एका वर्गात एक विद्यार्थी कोरोनाग्रस्त असेल, तर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना विलगीकरणात (होम क्वारंटाईन) पाठवले जाते. जर दोन पेक्षा जास्त विद्यार्थी आढळत असतील, तर पूर्ण शाळा बंद करून १४ दिवस विलगीकरण पाळले जाईल असे ‘सीडीसी तैवान’ने जाहीर केले आहे. तसेच आजूबाजूला देखील सतर्कता पाळण्याचे आदेश दिले जातील. प्रत्येक विद्यार्थ्यांचे दररोजचे दोन वेळचे शारीरिक तापमान नोंद करणे बंधनकारक आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशद्वारावरच तापमान नोंद करून प्रवेश दिला जातो. काही विद्यापीठामध्ये ठिकठिकाणी थर्मल सेन्सर्स देखील बसवण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात विषाणूच्या लक्षणांसंबंधी जागृती करण्यात आली असून, सर्वसामान्य नागरिकांना विषाणूची माहिती विविध माध्यमांद्वारे दिली जाते.

डेटाबेसचा प्रभावी वापर

तैवानने राष्ट्रीय आरोग्य विमा कार्ड (एन.एच.आय.कार्ड), रहिवासी प्रमाणपत्र (रेसिडेन्शियल कार्ड) आणि कस्टम विभाग यांच्या सहभागातून आलेल्या माहितीचा वापर करत संशयित रुग्णांची

नानगांग-तैपेई: अकॅडेमिया सिनीका ने तयार केलेलं टेस्टिंग किट.

नानगांग-तैपेई: अकॅडेमिया सिनीका ने तयार केलेलं टेस्टिंग किट.

माहिती घेतली. एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास त्याच्या एन.एच.आय. कार्डवर त्याला झालेल्या आजारासंबंधीची लक्षणं आणि  इतर माहिती नोंद केली जाते. एखाद्या रुग्णामध्ये कोरोना सदृश लक्षणं आढळल्यास त्याला सहज एन.एच.आय. कार्डव्दारे ट्रॅक केले जाते व त्याला रुग्णालयात दाखल करून पुढील कोरोना संक्रमण रोखले जाते. एखादा व्यक्ती कोणत्या देशातून किती तारखेला प्रवास करून तैवानमध्ये आलाय, याची माहिती त्याच्या रहिवासी प्रमाणपत्रावर किंवा एलियन रेसिडेन्शियल कार्डवर (ए.आर.सी.) नोंद केली जाते. याच माहितीचा प्रभावी वापर रोग नियंत्रण करण्यासाठी करण्यात तैवानने तत्परता दाखवत जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. खरंतर तैवानमध्ये लोक आपल्या वैयक्तिक माहिती-हक्कांबद्दल जागरूक आहेत. परंतु या डेटाबेसचा वापर चांगल्या कार्याकरिता केला जात असल्याने लोकांनी देखील त्याला विरोध केलेला नाही.

औषध निर्मिती

तैवानला चीनच्या प्रभावामुळे जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) स्थान नाही. त्यामुळे WHO च्या निर्देशांची वाट न पाहता तैवानने स्वबळावर कोरोनाशी लढण्याची तयारी केली. तैवानची केंद्रीय संशोधन संस्था असलेल्या तैपईतील अकॅडेमिया सिनिकामध्ये रेमडेसीविर (Remdesivir) हे अँटीव्हायरल ड्रग स्वबळावर निर्माण केले गेले आहे. हे औषध कोरोनासाठी निर्माण करण्यात आले असून, त्याची क्लिनिकल चाचणी काही कोरोनाग्रस्तांवर चालू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या औषध निर्मितीमध्ये दोन भारतीय संशोधकांचा देखील सहभाग आहे.

तैपेई: अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करण्यात येत आहे

तैपेई: अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करण्यात येत आहे.

जनसहभाग महत्वाचा

तैवान मधील जनता या विषाणू संदर्भातील नियमांचं पालन करण्यात कुठंही कमी पडलेली नसून बहुतेक सर्व ठिकाणी आवश्यक ती काळजी घेणयात येत आहे. बस, मेट्रो, सार्वजिनक ठिकाणांमध्ये जाताना मास्कचा वापर, बाहेरून आल्यावर किंवा जेवणाआधी, तोंडाला हात लावण्याआधी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. बऱ्याच ठिकाणी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायजर ठेवलेले आहेत. मास्कचा तुटवडा आणि काळाबाजार होऊ नये याकरिता सरकारने मास्कच रेशनिंग सुरु केलं. एन.एच.आय कार्डवर आठवड्याला एका व्यक्तीला केवळ ठराविक मास्क किफायतशीर दरात मिळतील याची व्यवस्था केली गेली आहे. सध्या एका व्यक्तीला त्याच्या एन.एच. आय. कार्डवर १४ दिवसांकरिता ९ मास्क मिळतील, असं तैवानचे आरोग्य मंत्री चेन शिह-चुंग यांनी जाहीर केलं आहे. तर शाळकरी मुलासांठी दोन आठवड्यांसाठी १० मास्क मिळतील. एका मास्कची किंमत केवळ ५ तैवान डॉलर्स इतकी आहे. तर मास्क खरेदीसाठी झुंबड उडू नये याकरिता कार्ड नंबर प्रमाणे सम-विषम (ऑड -इव्हन) पद्धत अंमलात आणलेली आहे. तसेच हे मास्क ठराविक मेडिकल्स आणि मार्ट्समध्ये उपलब्ध आहेत. या महिन्यापासून ऑनलाईन द्वारे मास्क ऑर्डरची व्यवस्था देखील करण्यात आली असून तैवानच्या या व्यवस्था शेजारील द. कोरिया, सिंगापूर सारखे देश देखील अवलंबत आहेत. याला नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत सरकारच्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता न लावता त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे.

सध्या तैपेई शहरांतर्गत चालणाऱ्या सरकारी तसेच खाजगी बसेस, मेट्रो, रेल्वे, हायस्पीड ट्रेनमध्ये मास्कचा वापर सक्तीचा असून मास्क नसल्यास प्रवेशबंदीचा आदेश देण्यात आला आहे. हा नियम तोडल्यास तब्बल १५,००० तैवान डॉलर्सचा दंड आकाराला जाऊ शकतो, असे तैवान सीईसीसी(CECC) ने बजावले आहे. ज्यांचं शारीरिक तापमान ३८ डिग्रीच्या वर असेल त्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार नाही, असं देखील सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक हे सगळे नियम काटेकोरपणे पाळत आहेत आणि म्हणून सध्या तैवानकडे एक आदर्श म्हणून पाहिलं जात आहे. जे भल्या भल्या देशांना जमलं नाही ते चिमुकल्या तैवानने स्वतःच्या बळावर करून दाखवलं आहे.तैवान पाठोपाठ सिंगापूर, चीनचा स्वायत्त प्रांत असलेला हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, जपान या देशांनीही कोरोनाला नियंत्रणात ठेवले आहे.

रोहन पाष्टे, अकॅडेमिया सिनीका- तैपेई, येथे मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनीअरिंग या विषयात पीएचडी करीत आहेत.

COMMENTS