बीजिंग : कोणत्याही ठिकाणचा लॉकडाऊन उठवताना तो टप्प्याटप्प्याने उठवण्यात यावा, तो एकदम उठवला गेला तर कोरोना विषाणूची साथ पुन्हा पसरण्याची भीती कायम राह
बीजिंग : कोणत्याही ठिकाणचा लॉकडाऊन उठवताना तो टप्प्याटप्प्याने उठवण्यात यावा, तो एकदम उठवला गेला तर कोरोना विषाणूची साथ पुन्हा पसरण्याची भीती कायम राहते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सर्व देशांना दिला.
अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचे परिणाम सकारात्मक आल्याचे दिसून येत आहे आणि लोकही नव्या जगण्याच्या पद्धतीला आत्मसात करून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत, अनेकजण घरातून ऑफिसचे काम करत आहेत, त्यामुळे आपल्या जगण्याला ही सवय लावून घेतली पाहिजे, नवी आरोग्य व्यवस्था या निमित्ताने तयार केली पाहिजे. जोपर्यंत कोरोनावरचे निर्णायक असे औषध वा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण जगण्याची पद्धत बदलून घेणे महत्त्वाचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पश्चिम प्रशांत विभागाच्या प्रादेशिक संचालक ताकेशी कसाई यांनी मत व्यक्त केले.
ताकेशी कसाई यांनी लॉकडाऊन उठवण्याच्या काही पद्धतींवर भाष्य करताना तो उठवताना खूप काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी क्रमाक्रमाने उपाययोजना हाती घेतल्या पाहिजे, असे मत व्यक्त केले. कोरोना हद्दपार करणे हेच अंतिम उद्दीष्ट असले पाहिजे, आणि ते डोळ्यासमोर ठेवून लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात निर्णय घेतले पाहिजेत, असे ताकेशी कसाई म्हणाले.
अमेरिका व युरोपला कोरोना विषाणूची महासाथीने जेवढा तडाखा दिला आहे, त्या तुलनेत पश्चिम प्रशांत विभागातील जपान, सिंगापूर व अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या महासाथीवर नियंत्रण आणण्यात तेथील प्रशासनाला यश आहे, ही सकारात्मक बाजू असली तरी पोलिओ, गोवर, रुबेला यासारखे आजार रोखणारे देशव्यापी आरोग्य लसीकरण कार्यक्रमही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे या काळात दुर्लक्ष करणे महागात पडेल अशी भीतीही ताकेशी कसाई यांनी व्यक्त केली. पश्चिम प्रशांत विभागातील आरोग्य व्यवस्थेवर अधिकच ताण पडला आहे, तो दृष्टीआड करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS