भूमी कोणालाही वापरू देणार नाहीः तालिबान

भूमी कोणालाही वापरू देणार नाहीः तालिबान

काबूलः आम्हाला शेजारी देशांशी व आंतरराष्ट्रीय समुदायाशी शांततेचे व मैत्रीचे संबंध हवे असून आम्हाला अंतर्गत व बाह्यही शत्रू नकोत, आम्ही सूडाचे राजकारण करणार नाही, स्त्रियांना त्यांचे इस्लामिक कायदे शरीयानुसार हक्क मिळतील, त्या शिक्षण घेऊ शकतात, नोकरी, व्यवसाय करू शकतात, स्त्रियांनी सरकारमध्ये सामील व्हावे, असे प्रतिपादन तालिबानने मंगळवारी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केले.

रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल हाती आल्यानंतर तालिबानची नवी राजवट कशी असेल याचे अनेक तर्कवितर्क जगभरातील प्रसार माध्यमांमधून, राजकीय विश्लेषकांकडून लावले जात होते. बहुतांश जणांचे अफगाणिस्तानात सूडाचे राजकारण सुरू होईल, यादवी होईल व अफगाणिस्तानातील स्त्रियांवर अमानुष अत्याचार होतील असे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर तालिबानची पहिली पत्रकार परिषद महत्त्वाची होती.

मंगळवारची पत्रकार परिषद तालिबानचे प्रवक्ते झाबिउल्लाह मुजाहिद यांनी घेतली. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमे व देशातील प्रसार माध्यमांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, तालिबानची अफगाणिस्तानवर सत्ता आली असली तरी आम्ही अफगाण लष्करातील सैनिक, सरकारमधील कर्मचारी, अधिकारी, पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर तयार झालेल्या संस्थांमधील कर्मचारी यांच्याविरोधात कोणतेही सूडाचे राजकारण करणार नाही. आम्ही देशातल्या सर्व लष्करी अधिकारी, सैनिकांना माफी दिली असून अफगाणिस्तान कार्यरत असलेले परदेशी मदतीवरचे कंत्राटदार व अनुवादक यांनाही ही माफी असेल. आम्ही कोणालाही कोणतीही इजा करणार नाही, कोणीही तुमच्या घराचे दरवाजे वाजवणार नाही. महिलांचे सर्व हक्क इस्लामिक कायद्यांनुसार अबाधित राहतील. महिलांचे समाजातील योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना काम करू दिले जाईल पण हे सर्व इस्लामच्या चौकटीत असेल, असे झाबिउल्लाह मुजाहिद यांनी अल-जझिरा या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत एकमेव महिला पत्रकार उपस्थित होती, ती अल-जझिरा या वृत्तवाहिनीची होती.

हमिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर मंगळवारी १७ तारखेला झालेली गर्दी.

हमिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर मंगळवारी १७ तारखेला झालेली गर्दी.

झाबिउल्लाह मुजाहिद यांनी अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी वापरू दिली जाणार नाही, असेही ठामपणे सांगितले. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला तसे आश्वासन देतो, विशेषतः अमेरिकेलाही की आम्ही कुणालाही इजा करणार नाही. आम्हाला शेजारील देश व आंतरराष्ट्रीय समुदायाशी शांततापूर्ण, मैत्रीचे संबंध हवे आहेत. ते राहावेत यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील, असे झाबिउल्लाह मुजाहिद म्हणाले.

अफगाणिस्तानात कार्यरत असणार्या स्वतंत्र प्रसार माध्यमांबद्दल मुजाहिद म्हणाले, ही माध्यमे देशात कार्यरत राहण्यास आमची काही हरकत नाही पण या माध्यमांना देशाच्या हिताच्या विरोधात काम करता येणार नाही.

तालिबानचे प्रमुख कंदाहारमध्ये दाखल

तालिबानचे प्रमुख मुल्ला बरादार हे कंदाहारमध्ये मंगळवारी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत एक शिष्टमंडळ असून या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानातील सत्तांतर शांततेत व्हावे यासाठी दोहामध्ये चर्चा केली होती.

मुल्ला बरादार हे तालिबानचे संस्थापक मुल्ला ओमर यांचे सर्वात निकटचे समजले जातात. २०१०मध्ये बरादार यांना कराचीत अटक करण्यात आली होती. पण नंतर २०१८मध्ये त्यांची सुटका झाली होती.

दरम्यान अफगाणिस्तानाचे उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी आपण अफगाणिस्तानातच असून देशाच्या राज्य घटनेनुसार आपण देशाचे काळजीवाहू अध्यक्ष असल्याचा दावा केला. सालेह यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पाठिंबाही मागितला आहे.

COMMENTS