तापमान वाढतेय, पण आपण सगळे थंडच!

तापमान वाढतेय, पण आपण सगळे थंडच!

भवताल-समकाल - या आठवड्यात महाराष्ट्राच्या काही प्रमुख शहरांमध्ये पसरलेले साथीचे आजार हे स्पष्टपणे वातावरण बदलामुळे झाले होते, पण या तर्काकडे ना कुणा माध्यमाचे लक्ष गेले ना त्याची सरकारला काही काळजी वाटली.

‘एनडीए’चा वन कायद्याचा मसुदा ब्रिटिश कायद्याहूनही निष्ठुर
आरे कॉलनी आंदोलन सुरूच
स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार

अखेर आठवडा संपला. एव्हाना कारगील युद्धाच्या विजयदिनानिमित्त देशप्रेमाने अवघी जनता भारावून गेलेली असेल. हीच जनता गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला घामाने न्हाऊन निघाली होती. भारताच्या पावसाचे चक्र या वर्षी जरा जास्तच बिघडले आहे. ईशान्येकडे मुसळधार पाउस येऊन तिथे महापूर आला आहे तर आग्नेयकडे पावसाचा टिपूसही नसल्याने तलाव कोरडे पडून जयपूरसारख्या शहरांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. हा लेख लिहिला जात असताना केरळमध्ये मान्सूनने कहर मांडला असून त्याने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागात अधूनमधून जोरदार पाऊस होत असून सह्याद्रीच्या घाटांपलिकडे मात्र पावसाचा टिपूसही नाही. विकेंडला धरणक्षेत्रांना फरसाणची पाकीटे घेऊन भेट देणाऱ्या शहरी मध्यमवर्गीयांना आवश्यक असणारी भूरभूर मात्र अधूनमधून सुरू आहे.

अशा भूरभूर पावसात धरणाकाठी बसून दारूच्या बाटल्या फोडण्यात तरुणाई पुढे असून या बाटल्यांच्या फुटक्या काचा पायात गेल्याने दुर्गम भागांतल्या डॉक्टरांकडे ड्रेसिंग करून घेणाऱ्यांची गर्दी वाढते आहे. महिनाभर एसी चालवावा लागल्याने जून महिन्याचे भरमसाट विजेचे बील भरून तंगीत आलेल्या काही मध्यमवर्गीयांना जुलै महिन्यातही एसी लावावा लागल्याने इतर चैनीच्या गोष्टींवर मुरड घालावी लागण्याची शक्यता आहे.

विस्कळित मान्सूनच्या एका विचित्र काळातून देश जात असून या काळात देशप्रेम, शहरी नागरिकांची शेतकऱ्यांविषयीची आस्था, नागरी शिस्त आणि संवेदनशीलता या सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे. पैकी संवेदनशीलता अनेक पातळ्यांवर मोजवी लागेल.

विस्कळीत मान्सूनचा शहरी जनसंख्येवर होणारा पहिला परिणाम म्हणजे दैनंदिन विषम हवामान. रितसर पाहता जुलै महिना हा अखंड पावसाचा आहे. पाऊस नसला तर आभाळ किमान आच्छादित राहतेच. अशा परिस्थितीत भवतालचे तापमान हे थंड आणि साधारणपणे स्थिर असते. या वेळी आकाशातले ढगच भरकटल्याने महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये चक्क ऊन पडलेले होते आणि या उन्हाची तीव्रता मे आणि जूनच्या तीव्रतेइतकीच होती. या ऊन्हाशी अॅडजस्ट होण्यासाठी लोक पंखा, एसी आणि कुलरचा सहारा घेत होते आणि अशातच हवेत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवा एकदमच दहा ते बारा अंश सेल्सियसने थंड होत होती.

गेल्या काही हजार वर्षांपासून असे बदल न पाहिलेल्या या भूमीसाठी हा प्रकार नवा होता. तसा इथे वस्ती करून असलेल्या माणसांसाठी आणि प्राण्यांसाठीही हे हवामान नवे होते. गोष्ट माणसे आणि प्राण्यांपर्यंत थांबली असती तर ठीक. पण हे वातावरण सूक्ष्मजीवांसाठीही वेगळे होते. काही बॅक्टेरिया अशा वातावरणात तग धरू शकत नाहीत तर काही बॅक्टेरियांना हे वातावरण प्रचंड पोषक होते. दिवसातून अनेकवेळा तापमान वरखाली झाल्याने आणि एकाच दिवसात ऊन-थंडी-पावसाचा अनुभव घेऊन मग हजारो लोक आजारी पडले. यातल्या बऱ्याच जणांना दोनेक दिवसात बरेही वाटले आणि पुन्हा कामधंद्यावर वा कॉलेजात गेल्यानंतर बदललेल्या हवामानामुळे ते पुन्हा आजारी पडले.

एरवी लोक पावसाळ्यात आजारी पडतच असतात, त्यात विशेष काय? अशी नेहमीची प्रतिक्रिया इथे येऊ शकते आणि त्यात काही गैरही नाही. पण या आठवड्यात लोकांना झालेले आजार हे फक्त पावसाळ्यामुळे होणारे आजार नव्हते तर ते विषम हवामानामुळे होणारे आजार होते, हे इथे लक्षात घ्यावे लागेल. ‘क्लायमेट चेंज’मुळे होणाऱ्या संभाव्य उलथापालथीचा सध्या जगभर अभ्यास सुरू आहे. पारंपरिक इंधनांचा अमर्याद वापर असाच चालू राहिला तर पृथ्वीचे तापमान आणखी वाढणार आहे, ज्यामुळे शेती, अर्थव्यवस्था, रोजगार आणि एकूण मानवी स्वास्थ्यावर होणारे विपरित परिणाम उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.

या आठवड्यात महाराष्ट्राच्या काही प्रमुख शहरांमध्ये पसरलेले साथीचे आजार हे स्पष्टपणे वातावरण बदलामुळे झाले होते, पण या तर्काकडे ना तर कुणा माध्यमाचे लक्ष गेले ना तर त्याची सरकारला काही काळजी वाटली. येत्या दिवसात हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांवर भारतात अद्याप म्हणावा इतका विस्तृत अभ्यास सुरू झालेला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासंदर्भात माध्यमातली अलिकडची मोठी बातमी शोधल्यास या मंत्रालयाच्या बैठकीदरम्यान बिस्कीटे न देता बदाम व आक्रोड देण्याबाबत चर्चा झाली व तसे आदेश दिले गेले.

बदाम आयात करण्यामध्ये भारत जगातला सर्वात अग्रेसर देश आहे त्यामुळे बदाम-अक्रोडाची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होऊ शकतो, पण आरोग्य मंत्रालयाने जरा विस्तृत परिघात विचार करून व्यापक समस्यांवर निर्णय घेण्याचे काम केले तर ते देशाच्या जास्त हिताचे ठरु शकते असे इथे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

महाराष्ट्र आणि भारताच्या पलिकडे ‘क्लायमेट चेंज’च्या सद्य परिणामांचा विचार केला तर सध्या युरोपात सुरु असलेली उष्णतेची लाट ही जास्त भयानक समस्या ठरते आहे. युरोपातल्या अनेक देशांचे तापमान हे ऐतिहासिक पातळीवर वाढले असून काही देशांनी तापमानाचे नवे उच्चांक स्थापन केले आहेत. नव्याने उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर दोन चार दिवसातच तापमान त्याही पुढे जाऊन नवे उच्चांक गाठत आहे. बुधवारी बेल्जियममध्ये तापमान वाढल्यानंतर युरोस्टारच्या एका ट्रेनमध्ये उष्माघातामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले तर काहींना चक्कर येऊ लागल्याने रेल्वे रद्द करून प्रवाशांना रेल्वेमध्येच सोडून देण्यास भाग पाडण्यात आले.

उष्ण लहरींची सर्वात जास्त झळ फ्रान्सला पोहचली असून तेथील तापमान ४६ अंश सेल्सियसच्याही वरती जाऊ लागले आहे. फ्रान्सला वीजपुरवठा करणाऱ्या दोन अणुशक्ती केंद्रांतील अणुभट्ट्या क्षमतेपेक्षा जास्त तापल्याने बंद करण्यात आल्या आहेत. वातावरणातल्या उष्णतेमुळे पोर्तुगीजच्या जंगलात मोठमोठ्या आगी लागत असून २१ तारखेला कास्टेलो ब्रॉंको भागात लागलेली आग इतकी भयावह होती की ती विझवण्यासाठी आठशेहून अधिक अग्निशमन कर्मचारी, अडीचशेहून जास्त वाहने आणि तेरा विमानांचा वापर करावा लागला.

कधी काळी भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे विणणाऱ्या ब्रिटनच्या रेल्वे व्यवस्थेची उष्णतेच्या लहरीने वाताहत केली असून अनेक ठिकाणी रेल्वे रुळ प्रसरण पावल्याने वा ओव्हरहेड केबल तुटल्याने राष्ट्रीय वाहतूक आणि लंडनची लोकल व्यवस्था कोलमडली आहे.

यथावकाश उष्णलहरीची तीव्रता कमी होईल, यथावकाश भारतात पाऊस नियमित होईल आणि ही समस्या लोक विसरुन जातील. पण समस्या आहे तशीच आहे आणि तिच्यात रोज नव्याने संकटांची भर पडते आहे. या आठवड्यात मानवाला चंद्रावर आपले पहिले पाउल ठेवून ५० वर्षे झाली, त्याच्या आठवणी परत वर आल्यानंतर अनेक जेष्ठ नागरिकांना भरुनही आले. याच आठवड्यात पर्यावरण बदलासंबधी सर्वात पहिले संशोधन ‘शार्ने रिपोर्ट’ प्रकाशित होऊन बरोबर ४० वर्षे झाली. चांद्रमोहिमेच्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही ताज्यातवान्या आहेत पण शार्ने रिपोर्ट काही प्रकरण आहे हे माध्यमांतले लोक सोडल्यास फारसे कुणाला माहिती नाही.

एमआयटीचे महत्त्वाचे शास्त्रज्ञ ज्युल ग्रेगरी शार्ने यांच्या अध्यक्षतेखाली ‘कार्बनडॉय ऑक्साईड आणि पर्यावरण : एक वैज्ञानिक अभ्यास’ हा २२ पानी रिपोर्ताज २३ जुलै १९७९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या रिपोर्ताजमध्ये मांडलेल्या संशोधनातली काही मुलभूत आकडेवारी नंतर बदलली तरी त्यात मांडलेले संभाव्य धोके आणि परिस्थिती आजही तशीच आहे किंबहुना ती आणखी भयानक होत आहे.

चांद्रमोहिमेच्या ५० व्या वाढदिवसाच्या आठवणींदरम्यान वर्तमानात चंद्रमोहिमा आणि मंगळावर स्वारी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शास्त्रज्ञांनी मंगळाच्या ध्रुवात अडकलेले बर्फ वितळवून त्यापासून पाणी बनविण्यावर संशोधनात्म्क निबंध प्रकाशित केले आहेत.

एकीकडे पृथ्वीवरच्या ध्रुवावरचे वितळणारे बर्फ कसे थोपविता येईल यावर वैज्ञानिक विचार करीत आहेत तर दुसरीकडे मंगळावरच्या ध्रुवाचे बर्फ वितळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. एकूण विज्ञानातला हा परस्परविरोध पाहता माणसाची प्रजाती कुठकुठल्या पातळ्यावर जाऊन विचार करू शकते हे खरेच आश्चर्यकारक आहे.

या सगळ्या उलथापालथींचा आणि युरोपात पसरलेल्या उष्ण लहरीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांना वातावरण बदलांच्या प्रश्नाची स्पष्ट जाणीव आहे आणि तिथल्या माध्यमांनी या प्रश्नाबाबत अधिक आक्रमक होऊन व्यवस्थेला प्रश्न विचारणे सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नांनी युरोपची माध्यमे ढवळून निघाली संयुक्त राष्ट्रांच्या आगामी पर्यावरणीय बैठकीत कुठले निर्णय घेणे आवश्यक आहे यावर माध्यमे ऊहापोह करीत आहे.

याच समांतर काळात रानटी शिक्षांसाठी कुप्रसिद्ध असलेला सौदी अरेबिया, पर्यावरण बदलांच्या प्रश्नांकडे पाठ फिरविणारी अमेरिका आणि खनिज तेलांवर राजकारण करू पाहणारा रशिया पर्यावरणासंबधीचे आंतराष्ट्रीय करार मोडू पाहत आहेत. अमेरिकेत येऊ घातलेली अध्यक्षपदाची निवडणूक डेमोक्रॅटिक पार्टीने जिंकल्यास यात बदल होऊ शकतो. अमेरिकेत पर्यावरणाची जाण असणारी व्यक्ती अध्यक्ष झाल्यास उर्वरित जगावर त्याचे बरेचसे सकारात्मक परिणाम होतील.

पर्यावरण बदलाच्या समस्या सोडविण्यासाठी जगाकडे फार कमी वेळ उरला असून योग्य उपाययोजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सुधारणांतून जग या समस्येतून अजूनही मार्ग काढू शकते.

राहुल बनसोडे, हे मानववंश शास्त्राचे अभ्यासक असून ते सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: