उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधारुन, त्याचे माणूसपण जागे करून त्याला पुन्हा समाजात सोडणे हा हेतू असतो.

असे समजू की हैद्राबादचे एनकाऊंटर अपरिहार्य असेल. पण त्यामुळे तात्काळ न्याय झाला या उन्मादी भावनेत बहुसंख्य समाज जाणे हे महाभयंकर आहे. गोरक्षकांनी गाईची हत्या केल्याचा वहीम ठेवून दलित-मुस्लिमांना ठार करणे, लव जिहादच्या नावाखाली वा खोट्या प्रतिष्ठेपायी आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना जीवे मारणे, मुले पळवतात या संशयाने एखाद्याला झुंडीने चेचून मारणे या वर्गवारीत मोडणारी वा त्यास अप्रत्यक्ष समर्थन देणारी ही लोकभावना आहे.

काहींनी तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना दिली गेलेली ही उचित श्रद्धांजली आहे, असेही म्हटले आहे. कायद्याच्या समर्थकाच्या, संविधानाच्या शिल्पकाराच्या महापरिनिर्वाणदिनी कायदा व संविधान दोन्हीना फाटा देणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. त्या व्यक्त करून आपण एकप्रकारे या महामानवाचा अपमान करतो आहोत, याचा विवेक सुटल्याचे हे लक्षण आहे. याच दिवशी ६ डिसेंबर १९९२ला कट्टरपंथी हिंदुत्वाच्या उन्मादी प्रभावाखालील झुंडीने बाबरी मशीद पाडली. चर्चा वा न्यायालयीन प्रक्रिया धाब्यावर बसवून घटनात्मक मार्गांना न जुमानणारा हा हुमदांडगेपणा घटनाकार बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाला काळिमा फासणाराच होता. त्याच प्रकारे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी व्यक्त झालेली, वर उल्लेखलेली समाजभावना या महामानवाच्या विचारांना बट्टा लावणारीच आहे.

पोलिस तपास व न्यायिक प्रक्रिया लवकर होणे यासाठीच्या मागण्या, सूचना यांचा आग्रह धरणे बरोबर. पण त्यात विलंब होतो, म्हणून कायदा हातात घेऊन समाजाने वा पोलिसांनी अविलंब सजा देणे हे प्रगत, मानवी अधिकारांची बूज राखणाऱ्या, लोकशाही, कायद्याच्या राज्यात अजिबात समर्थनीय नाही. तो समूहाने केलेला वा पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून केलेला गुन्हाच असतो. विशेष म्हणजे, भारतासारख्या विषम समाजरचनेत दलित, अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल असेच लोक याचे भक्ष्य ठरतात, हे विसरता कामा नये.

ज्यांना पकडले गेले ते खरे गुन्हेगार नव्हते, पोलिसांनी लोकक्षोभ आवरण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सल्ल्याने निरपराधांना अटक केले…अशा घटना आपण वाचलेल्या आहेत. अर्थात, हे फार उशीरा कळते. तोवर निरपराध नाहक आत अडकतात. बदनाम होतात. अनेकांचे आयुष्य त्यामध्ये बरबाद होते. म्हणूनच ज्यांना पकडले जाते ते कायद्याने आधी आरोपी असतात. त्यांना कायदेशीर लढाईची संधी दिली जाते. या लढाईनंतर, साक्षी-पुरावे होऊन गुन्हा शाबित झाला तर ते गुन्हेगार ठरतात. न्यायाच्या विविध पातळ्यांवर थेट राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापर्यंत ही कायदेशीर न्यायाची संधी आरोपीला दिली जाते. विवेकी माणसांनी घटना तयार केल्याने हे घडले. हा विवेक आज दुबळा होतो आहे. घटना बनवणाऱ्यांना तो मोडीत काढायला निघाला आहे.

एखादा गुन्हेगार म्हणून सिद्ध होतो. त्याला शिक्षा होते. आणि १५-२० वर्षांनी काही नवे पुरावे मिळाल्यावर कळते की तो निर्दोष होता. अशावेळी त्याने भोगलेल्या शिक्षेचे काय? त्याला फाशी देऊ नये, या म्हणण्यामागे हाही एक तर्क आहे. फाशी देऊन मोकळे झाल्यानंतर जर पुढे कळले तो निर्दोष होता, तर त्यास पुन्हा जिवंत कसे करणार? त्याला न्याय कसा देणार? जन्मठेप असली तर तो मुक्त तरी होऊ शकतो. म्हणून कठोरात कठोर शिक्षा सक्तमजुरी असलेली जन्मठेप हीच असावी, हा आधुनिक विवेकी विचार आहे. भगतसिंगांच्या फाशीनंतर आपले राष्ट्रीय नेते स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा नसावी या मताचे होते. बाबासाहेबही या मताचे होते. पण नथुरामने गांधीजींचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर फाशी नको या मनोभूमिकेत जनमानस आणणे कठीण झाल्याने आपल्याकडे फाशीची शिक्षा राहिली.

गुन्हा करणारा माणूस हा गुन्हेगारी मानसिकता तयार करणाऱ्या परिस्थितीचे अपत्य असतो. म्हणजेच तो गुन्ह्याची अंमलबजावणी करतो. पण त्याच्या नियोजनात समाजातील विषमता, दारिद्र्य, वंचना, भेदभाव आदि विविध घटक असतात. म्हणूनच गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे  संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधारुन, त्याचे माणूसपण जागे करून त्याला पुन्हा समाजात सोडणे हा हेतू असतो. (‘दो आँखें बारह हात’ हा सिनेमा आठवा.) ज्यांना समाजात सोडणे धोकादायक आहे, त्यांना मात्र कैदेतच ठेवावे लागते. संभाव्य गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करणे हा शिक्षेचा एक हेतू असतो. पण तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. जोवर गुन्हेगार तयार करणारी परिस्थिती बदलत नाही, तोवर हे गुन्हे घटत नाहीत, असाच जगातला अनुभव आहे. हैद्राबादच्या घटनेनंतर लगेचच उन्नाव व नंतर मालदा या ठिकाणी पीडितेला जाळून मारण्याच्या घडल्या आहेत. ज्या उजेडात येत नाहीत, अशा कितीतरी घटना असू शकतात, असतात, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

तेव्हा, आपला विवेक शाबूत ठेवूया. तात्काळ न्यायाच्या उन्मादी मोहातून बाहेर पडूया. कायद्याच्या प्रक्रियेतून आज असलेली कठोरात कठोर शिक्षा (आज ती फाशीची आहे) मिळावी, ती लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करुया. विशेष प्रयत्न गुन्हेगार तयार होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करण्यासाठी करुया. ज्यांना लोकशाही, घटना मोडीत काढायची आहे, अशा राजकीय-सांस्कृतिक फॅसिस्टांच्या हुकुमशाहीला बळ मिळेल असा कोणताही प्रतिसाद आपल्या कळत नकळत त्यांना मिळू नये याची दक्षता घेऊया. …उन्मादी भावनेला आवरुन आत्मघाताच्या वाटेवरुन तात्काळ मागे फिरुया.
… तीच घटना निर्मात्या बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.

COMMENTS