तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा

तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा

नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केल्याची

‘अम्मा वोदी’ – चेहरामोहरा बदलणारी शिक्षण व्यवस्था
सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन
विशाखापट्टणममध्ये विषारी वायूने ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केल्याची बातमी येऊन थडकली. पोलिसांनी या एन्काउंटर प्रकरणात आपली बाजू मांडताना सांगितले की, चार आरोपींनी गुन्हा कसा केला हे जाणून घेण्यासाठी सायबराबाद पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पहाटे आले आणि तेथे गुन्ह्याची रंगीत तालीम सुरू असताना आरोपींनी पोलिसांचे पिस्तुल खेचले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या वेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी चार आरोपींवर गोळ्या झाडल्या व त्यांना ठार मारले.

या एन्काउंटरच्या घटनेने पूर्वी अशाच प्रकारे झालेल्या दोन घटनांची आठवण झाली. पहिली घटना डिसेंबर २००८मध्ये आंध्र प्रदेशात वारांगळ येथे घडली होती. वारांगळमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणींवर अँसिड फेकण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले पण त्यांचे एन्काउंटर केले गेले. ज्या पोलिस पथकाने हे एन्काउंटर केले होते त्यावेळी वारंगळचे पोलिस अधिक्षकपदी व्ही. सी. सज्जनार हे होते. हेच सज्जनार आज सायबराबाद पोलिस कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखालील टीमने चार जणांचे शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केले.

२००८मध्ये सज्जनार यांनी अशी बाजू मांडली होती की, गुन्हा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळी तीन आरोपींना नेण्यात आले होते पण आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ तीन आरोपींना ठार मारण्यात आले.

आताही हीच थेअरी सज्जनार यांच्याकडून सांगितली जात आहे.

या घटनेनंतर एप्रिल २०१५मध्ये तेलंगणमध्ये नालगौंडा जिल्ह्यात तहरीक गल्बा ए-इस्लाम या संघटनेचा सदस्य विकारुद्दीन अहमद व त्याच्या चार अन्य साथीदारांचे पोलिसांनी एन्काउंटर केले. पोलिसांनी हीच थेअरी सांगितली की, आरोपींनी पोलिसांच्या जवळची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांना गोळ्या घालून ठार मारणे अपरिहार्य होते.

जेव्हा या एन्काउंटरचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा या सर्व आरोपींचे हात चेनने बांधलेले होते. त्यावेळी विकारुद्धीन याच्या वडिलांनी हात बांधलेल्या अवस्थेतला आरोपी पोलिसांवर कसा हल्ला करू शकतात आणि त्यांची शस्त्रे कशी घेऊ शकतात असा सवाल केला होता. लेखक वारावर राव यांनीही हेच प्रश्न उपस्थित करून हे एन्काउंटर पूर्वनियोजित होते असा आरोप केला होता.

माओवादी व नक्षलवाद्यांचे एन्काउंटर

त्यानंतर एक वर्षाने तेलंगण राज्याची स्थापना झाली. या राज्याने त्वरित नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहिमा हाती घेतल्या.

जून २०१५मध्ये १९ वर्षाचा युवक विवेक कोडामगुंडला व सप्टेंबर २०१५ मध्ये श्रुती उर्फ महिथा व विद्यासागर रेड्‌डी या दोन नक्षलवाद्यांना तेलंगण-छत्तीसगड सीमेवर ठार मारण्यात आले. विवेकच्या वडिलांनी त्यावेळी आरोप केला होता की पोलिसांनी एन्काउंटर होण्याअगोदर विवेकला ताब्यात घेतले होते आणि नंतर त्याला ठार मारले. श्रुती व विद्यासागरच्या कुटुंबियांनीही पोलिसांनी एन्काउंटर केले असा आरोप केला. या प्रकरणावेळीही वारावर राव यांनी हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला. त्यानंतर वारावर राव यांना भीमा-कोरेगाव प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ते अद्याप तुरुंगात आहेत.

आदिवासी व लम्बाडाच्या हत्या

डिसेंबर २०१७मध्ये तेलंगणमधील भद्रादी कोथागुंडेम जिल्ह्यात ८ आदिवासींचे ते नक्षलवादी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्या वेळी दावा केला या ८ आदिवासींकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेच्या मुळाशी जाणारे वृत्तांकन द वायरमध्ये पत्रकार सुकन्या शांता यांनी केले होते. या वृत्तांकनात, ठार मारण्यात आलेल्या आदिवासींच्या शरीरावर गोळ्या मारण्यात नव्हत्या पण त्यांना जबर मारहाण करून त्यांचे चेहरे फोडण्यात आले होते असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.

अशीच पटकथा अनेक बनावट एन्काउंटरच्या निमित्ताने दिसून आलेली आहे. गेल्या जुलै महिन्यात तेलंगण पोलिसांनी लिंगाणा या आदिवासीला ठार मारले होते. पोलिसांच्या मते लिंगाणा हा बंदी घातलेल्या सीपीआय(एमएल) या नक्षलवादी संघटनेचा सदस्य होता व तो चकमकीत मारला गेला. पण लिंगाणाचा मुलगा हरीचा दावा होता की, त्याचे वडिल आदिवासींच्या जमीन हक्कासाठी व्यवस्थेशी लढा देत होते. मानवाधिकार आयोगाने तेलंगण पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. कारण लिंगाणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्याला जबर मारहाण करून ठार मारण्यात आले होते.

खबरी नयीमची हत्या

ऑगस्ट २०१६मध्ये पूर्वाश्रमीचा नक्षलवादी असलेल्या व नंतर पोलिसांचा खबरी बनलेल्या नयीमची अशीच पोलिस चकमकीत हत्या करण्यात आली होती.

१९९३मध्ये आयपीएस अधिकारी के. एस. व्यास यांच्या हत्येप्रकरणात नयीम तुरुंगात होता. २००० साली त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर तो पोलिसांसाठी खबरीचे काम करत होता. त्याच्या माहितीमुळे पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेतील अनेक कुख्यात नक्षलवाद्यांना पोलिसांनी मारले होते. पण एका चकमकीत तो मारला गेला. नयीम मेल्यानंतर तो २० खून व १०० गुन्ह्यांमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याला अनेक राजकीय नेत्यांची गुपिते माहिती होती. तो सोहराबुद्दीन बनावट चकमकीबाबतही महत्त्वाची माहिती बाळगून होता असे बोलले जात होते.

नयीम याच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती पण याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: