सध्याच्या कठीण काळात आपल्याच भूतकाळात साद घालून आपली अंतरंग तपासावीत, कोरोनाच्या सावलीत घरात एकत्र बसून ती एकमेकांकडे खुली करावीत, किती भाग अजून जुळतात ते पाहावं आणि हातात हात घालून पुढे जाण्याचा विचार करावा.
कोरोनाचा बहिरंग अजून कोणालाही कळलेला नाही; अंतरंग दूरच राहिलयं. शिवाय नुकतंच टीव्ही वरून कळलं की कोरोनाचे साधारण १८ प्रकार आहेत. भारतातला आणि चीनमधला कोरोना अजिबात सारखा नाही म्हणे! टीव्ही सोडल्यास, आमच्या घराजवळच राहणारे छोटे जुळे भाऊ मला खूप माहिती देतात. आजही मी भाजीवाल्या गाडीची घंटा ऐकून बाहेर पडले होते. जुळे छोटे मास्क घालून गेटच्या आतल्या बाजूने गजांना धरून उभे होते. मला पाहताच एक म्हणाला, “आजी, सॉरी बरं का,” आणि भावाला म्हणाला, “तूही म्हण सॉरी” दुसरा म्हणाला, “म्हणणारच होतो. आजी सॉरी.” “अरे, कशाबद्दल?”. एक भाऊ म्हणाला, “आम्ही तुम्हांला त्यादिवशी म्हणालो ना, की कोरोनाबद्दल अजिबात बोलू नका म्हणून, तर आर्इ रागावली आणि म्हणाली, आजी दिसल्या की त्यांना सॉरी म्हणा. मी म्हटलं, मी कोरोनाबद्दल बोलणारच नव्हते. कारण मलाच फारसा माहीत नाही तो कोरोना. दोघांना मनापासून हसू आलं. एक हसू लपवत म्हणाला, “आजी तुम्ही एनडीटीव्ही बघा ना,” मग मान जरा खाली घालून म्हणाला, म्हणजे इंग्लिश येत असेल तर!” दुसरा लगेच सल्ला द्यायला सरसावला, नाहीतर मराठी चॅनेल बघा. मराठीतही छान माहिती देतात ! आणि आजी, एका बार्इंनी टीव्हीवरून सांगितलं, आमचा मोठा दादा आहे ना, बापू काकांचा, त्यालाही परीक्षा नाही. दादानं खूप चॉकलेटं दिली आम्हांला.” भाजीवाला जास्त वेळ थांबेना म्हणून या गोड जुळ्यांचा मोह सोडून मी त्याच्या गाडीकडे वळले.
टीव्हीवरच्या त्या बार्इचं म्हणजे आपल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मला फार कौतुक आहे. मुलांचं मन आणि शिक्षकांची दैना जाणणार्या त्या पहिल्याच शिक्षणमंत्री असाव्यात. एका फटक्यात त्यांनी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. मुलांपेक्षा मला जास्त आनंद झाला होता. सगळीकडे कोरोनाची आणि लॉकडाऊनची ‘धमाल’ असतांना या कारट्यांच्या मागे आर्इवडिलांनी अभ्यासाचा कचाटा लावला होता ! त्यातून आपल्या शिक्षणमंत्र्यांनी मुलांची मुक्तता केली त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन ! नंतर नववी, अकरावी आणि दहावीची भूगोलची परीक्षा रद्द करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला म्हणून पुनश्च अभिनंदन !
शिक्षणमंत्री म्हणून येणा–या अनंत जबाबदा–या आणि अडचणी पेलून वर्षाताईंनी मुलांचं मन जाणण्याचा एक प्रयत्न केला. अर्थात त्यांच्या निर्णयात इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं भान त्यांना ठेवावंच लागलं असणार. पण मुलांचा विचार होताच, असं मला वाटतं. अजिबात बाहेर न पडता, घरांत बसून अभ्यासाचा प्रयत्न करणारी ही मुलं! घरात पत्ते, ल्युडो, कॅरम वगैरे खेळांचं वातावरण. त्या कश्शात भाग न घेता यांनी आपलं घटं च पटं च करत बसायचं हे तर बरं. घरं आणि अभ्यासाला निदान डायनिंग टेबल असलेल्यांची कथा. गरीबांनी किंवा निम्न मध्यमवर्ग असलेल्यांनी कसला नी कुठे अभ्यास करायचा ? शाळा ही एकच जागा त्यांना उपलब्ध आणि तीही बंद !
दुसरी एक गोष्ट माझ्या मनांत येते. (परीक्षा असूच नये असं माझं मत नाही.) जे शिक्षक- शिक्षिका त्यांच्या वर्गातल्या मुलाला वर्षभर पाहतात, त्यांना त्याची तयारी पाहायला एका अमुक दिवशी तीन तास का लागतात? शालेय सहवासात त्यांना ह्या मुलांबद्दल काहीच उमगत नाही का ? असो. परंतु मुलांच्या अंतरंगात कोणीतरी डोकावून पाहायला प्रयत्न केला, हे लयभारी आहे !
या कोरोनाच्या खेळांत आपण काही करू शकतो कां ? घरातल्या इतरांसाठी, बाहेरच्या समाजासाठी किंवा स्वत:साठी ?
खूप नवरेमंडळी स्वयंपाक करण्यात भरपूर इंटरेस्ट घेताहेत. काहीजण झाडूपोछाही करताहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर तुमची कामकरी मंडळी परत येतीलच. त्यांना गेल्या दिवसांचा पगार तुम्ही द्यालच. आणखी एक गोष्ट करा. त्यांच्या गैरहजेरीमुळे तुम्हां सर्वांची किती धांदल उडाली होती हे कबूल करून त्यांचं स्वागत करा. त्यांच्या डोळ्यातील समाधान आणि चेह–यावरील आनंद पाहून तुम्हालांच धन्य वाटेल.
कोरोनामुळे आर्इ मंडळींना मदतीचे बळकट हात मिळतायत. माझ्या एका शिक्षिका मैत्रिणीची मुलगी खूप म्हणजे प्रचंड धनवान असलेल्या घरात पडलीय; लग्नामुळे अर्थात. ती माहेरी म्हणून आली आणि लॉकडाऊन सुरू झाला. पुण्यातल्याच पण जरा दूर असलेल्या सासरी तिला जाता येर्इना. साताठ वर्ष ‘एक्स्ट्रीम लक्झरीत’ राहून आलेली आपली कन्यका कोरोनाला कसं काय तोंड देणार म्हणून आर्इ जरा काळजीत होती. परंतु या कन्यकेनं आम्हांला सर्वांना चकित केलं. घरचा सगळा केरकचरा काढणं, फरशी पुसणं, बाथरूम स्वच्छ ठेवणं आणि आर्इला स्वयंपाकात मदत करणं ही सगळी कामं तिनं आपल्या हातात घेतली. जन्मभर कष्ट करणा–या आपल्या आर्इला कोरोनाचे चार किंवा चाळीस दिवस जरा आरामात काढता यावेत म्हणून ! कोरोनाने असेही बदल केलेत.
कोरोनामुळे तुमच्यात काही बदल झालाय् का असे प्रश्न सेलिब्रिटीजना आणि सामान्य माणसांनाही विचारले जाताहेत. सेलिब्रिटीजची उत्तरं तुम्ही मीडियामध्ये वाचत – ऐकत – पाहात असता. त्यातले खूपच अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, कवी, नृत्यकलाकार कोरोनाग्रस्तांना अन्नधान्यापासून, कपडे, पैसे आणि सामानापर्यंत मदत करताहेत. त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन ! पण सामान्य इतरेजनही मदत करताहेत.
कोणी ग्रुपने स्वयंपाक बनवून रोज १५-२० माणसांना जेवण पाठवतायेत; तर कित्येक संघटना ५००-१००० जणांना रोज दोन वेळ जेवण देतायेत. कोरोनाइतकीच ही बाब आश्चर्यजनक आहे, आणि कोरोना जितका कुरूप तितकीच ही गोष्ट सुंदर आहे. हजारो जणांचं अंतरंग सुस्वरूप करून टाकले आहे.
भुकेल्या जिवाला अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. त्या भुकेल्या जिवाला काय वाटतं हे मला स्वानुभावानं माहीत आहे; पण देणा–याला काय वाटत असेल ? धन्यता, समाधान, दानांच पुण्य (!), स्वाभाविक दानशूरता, वचनपूर्ती, कर्तव्यपूर्ती ? दानशूर माणसांची अपकीर्ती किंवा निंदा करण्याचा माझा हेतू नाही. पराकोटीचा स्वार्थत्याग करून कोणत्या प्रेरणेने माणूस इतरांच्या मदतीला धावून जातो, याचं गूढ कळावंसं मला वाटतं एवढंच. (ते मला स्वत:ला अगदी माहितीच नाही असं नव्हे.) परंतु गडगंज संपत्तीतून काही दान देणारा माणूस आणि आयुष्याचा सगळा प्रॉव्हिडंट फंड कोरोनामुळे बाधित माणसांवर उधळून देणारी शिक्षिका यांच्यात फरक आहेच. तो कळायला हवं असं मला वाटतं.
याहून जास्त मला जाणावंसं वाटतं ते म्हणजे माणसा–माणसातल्या नात्याचं किंवा इतर संबंधांचं अंतरंग कोरोनामुळे जर काही बाह्य आणि आंतरिक संबंध बदलले असतील तर ते कसे असतील ? तो बदल टिकेल कां ? किती काळ ? आता माझं मलाच हसूं आलं. ‘बदल टिकेल’ का हा वद्तोव्याघात आहे हे लिहून झाल्यावर लक्षात आलं ! असो.
कोरोनाने सगळ्या जगाला ढवळून पिळून काढलं आहे. मूर्ख, बालिश आणि स्वार्थी नेता असलेल्या तथाकथित बलाढ्य अमेरिकेचं अंतरंग जगासमोर उघडं झालंय . हीन राजकारण, धनपिपासा, दादागिरी, सत्तालालसा, कहर स्वार्थीपणा आणि इतर कोणाही विषयी तुच्छता हे अमेरिकेचे गुण (!) जगाला माहीत नव्हते, असं नाहीच; कोरोनाने ते या काळात सगळ्या जगासमोर सगळं जग भयग्रस्त केलं, आणि कोणालाही सुखाची झोप घेता येऊ नये असा ‘आशिर्वाद’ दिला. पृथ्वीवरच्या सगळ्या मानवांना तो सुरक्षित सोडेल कां ? सुदैवानं ते त्याच्या हातात नसेलच. अहोरात्र कष्ट करणा–या नर्सेस, घरदाराचा, मुलामाणसांचा विचार न करता कामाचे डोंगर उपसणारे डॉक्टर्स, पोलिस, हॉस्पिटल कर्मचारी, स्वच्छता कामगार यांची पुण्यार्इ, त्यांचा स्वार्थत्याग आणि त्यांचे अष्टौप्रहर कष्ट अगदीच वाया जातील का ? हे जरा भावनिक झालं. पण या सर्वांचा पक्ष सत्याचा पक्ष आहे. एका मानवाने कोणत्याही फलाची अपेक्षा न धरता इतर मानवांना दिलेला आधार आहे. यातील प्रत्येकाच अंतरंग हा एक स्वयंप्रकाशित तेजस्वी सूर्य आहे.
एक क्षुद्र विषाणू अशा असंख्य सूर्यांना किती काळ वेठीस धरेल ?
…………………….
नीतातार्इंना दोन मुलगे. अर्जुन आणि यश. मुलांचे वडील माधवराव एका अपघातात लौकर गेले. मुलगे पाच आणि दोन वर्षाचे. अर्जुनबद्दल बोलताना पत्नीला ते म्हणायचे, ‘याचे डोळे बघ, हा अतिशय हुशार होणार, मोठा डॉक्टर होणार, अमेरिकेला जाणार.’ नीतातार्इंना ते आठवत आणि त्या गोंधळून जात. हे शब्द आपल्याला खुपताहेत असा भास त्यांना होर्इ आणि काही कळत नसे. मग त्या धाकट्या यशला कवटाळून बसत, त्याचे खूप पापे घेत आणि त्याला घट्ट मिठीत धरत. अर्जुन हे पाहून नाराज नाही, पण अस्वस्थ होत असे.
मोठा होता होता अर्जुन अभ्यास, खेळ, वक्तृत्व अशा सगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवीत स्वत:च्या हिमतीवर डॉक्टर झाला. त्याचा धाकटा भाऊ यश त्याला जीव की प्राण! सोसायटीतले वयस्कर लोक त्यांना रामलक्ष्मण म्हणत आणि तरूण पोरं सोरं त्यांना जय – वीरू की जोडी म्हणत.
इंटर्नशिप पूर्ण करून घरी आलेल्या अर्जुनला नीतातार्इ म्हणाल्या, “आता तू अमेरिकेला कधी जाणार?” तो म्हणाला, “आर्इ, तुला आणि यशला सोडून मला कुठेही जायचं नाही. मी डॉक्टर झालोय तो आधी तुम्हा दोघांसाठी; जगासाठी नंतर !” मला माहीत आहे, तुझं यशवर फार प्रेम आहे आणि माझ्यावर फारसं नाही, तरीही माझ्या कर्तव्यात मी चुकणार नाही.” बोलता बोलता त्याचा कंठ रूद्ध झाला आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. त्याला थांबवावं, त्याच्या पाठीवर हात फिरवावा असं नीतातार्इंच्या मनात आलं, पण त्यांचं पाऊल काही हललं नाही.
नीतातार्इ सावकाश उठल्या आणि नुसत्या बसून राहिल्या. अशावेळी माधवरावांचे शब्द त्यांच्या मनात पिंगा घालीत आणि त्यांना काही सुचत नसे. नकळत त्यांनी आपली सगळी मायाममता, प्रेम, काळजी फक्त यशच्या मागे लावली. यश प्रेमळ, साधारण बुद्धीचा पण अतिकष्टाळू होता. व्यवस्थित पासबिस होत असे. अर्जुनची इंटर्नशिप संपण्याच्या सुमारास त्याला ब–यापैकी नोकरीही लागली. नीतातार्इ कृतकृत्य झाल्या.
मात्र, आज पहिल्यांदा त्यांना अर्जुनच्या मनाचा थोडासा अंदाज लागला आणि त्यांना कसली तरी खंत वाटली. ती कशामुळे वाटतेय ते त्यांचं त्यांनाच कळेना ! आत्मपरीक्षण वगैरे त्यांच्या कक्षातील गोष्ट नव्हतीच; पण त्यांना झेपेल इतपत विचार त्यांनी केला.
मग त्यांच्या मते त्यांनी खूप विचार करून असं ठरवलं की नाहीतरी अर्जुन खूपच हुशार असल्यानं त्याला कोणाची गरज नाही. उलट यश थोडासा भित्रा, थोडासा दुर्बल असल्यामुळे त्या सतत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. यशला त्याची गरज होती, अर्जुनला फारशी नव्हती. एवढ्या विचारानं स्वत:च समाधान करून घेऊन त्या शांत झाल्या.
अर्जुन कितीही हुशार, खेळकर आणि शहाणा असला तरी तो हळव्या मनाचा आहे ही गोष्ट त्यांनी मनाआडच करून टाकली.
असं का व्हावं नीतातार्इंचं? आपलं स्वत:चं हृदय, मन निरखून पाहायची क्षमता असते का सर्वांमध्ये ? का भीती वाटते सत्याची ? कोरोनाची वाटते तशी ? उलट, कोरोनाच्या भीतीचा सहारा घेऊन या निष्क्रीय काळात आपलं मन स्वच्छ, खुलं करायला नको का एकमेकांकडे ? भूतकाळातल्या गोष्टी एकदा स्पष्ट उच्चारून, समजून घेऊन त्यांचं अंतरंगातून उच्चाटन करायला नको का ? पण ते नाही जमत. आपलंच मन स्वत:कडेसुद्धा उघडंवागडं करायला झेपत नाही. त्याला कोरोना काय करणार? नीतातार्इंचं उदाहरण अगदी बाळबोध म्हणण्याइतकं साधं आहे. काही गोष्टी फार विद्रूप आणि असहनीय असतात.
…………………….
माझ्या एका मैत्रिणीच्या १४ वर्षाच्या मुलीवर तिच्या सख्ख्या मामाने बलात्कार केला होता ! आर्इला शॉक बसेल किंवा कदाचित तिला खरंच वाटणार नाही किंवा कसं सांगणार म्हणून असेल, पण ती गप्प राहिली. मात्र त्यावेळी तिचा मामा तिच्याविषयी जे घाणेरडं बडबडला होता, ते शब्द तिच्या मनातून जन्मभर जाणार नाहीत असं तिला वाटायचं. तीनएक वर्षांनी मी तिला माझ्या एका मानसशास्त्रज्ञ मैत्रिणीकडे नेलं. परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. मात्र तिला धीर आला. आता जर तो माणूस दिसला तर ‘मी त्याला हातात असलेल्या वस्तूनं हाणीन किंवा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीन’ असं ती आता म्हणते. मी म्हणते, “बयो, दुर्लक्षच कर.”
ह्या गोष्टीला आता १७ – १८ वर्ष झाली, मधे तिचे वडील गेले, नंतर आर्इ गेली; ती एकटीच वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालून तिचं आयुष्य छान जगते आहे. पण आपल्या सुंदर आयुष्याची कोणीतरी नासाडी केली ही भावना तिचा पिच्छा सोडत नाही. आता ती कोरोनाबाधितांसाठी एका ग्रुपमधून काम करतेय, सांपत्तिक स्थिती चांगली असल्याचा सदुपयोग करते. रोज २० माणसांसाठी डाळ, तांदुळ, ज्वारी, गहु आणि तेल यांचे पुडे बांधते. तिच्या ग्रुपमधून ते कोरोनाग्रस्तांकडे किंवा इतर गरीबांपर्यंत पोचवते. “मावशी, आता मी खरी आनंदात आहे”, असं सांगायला मला तिने घार्इघार्इत एक फोन केला होता. मला आशा वाटली. स्वत:चं जळतं अंतरंग विसरून इतरांना मदत करतांना काही आनंदाचे क्षण वेचता येतात !
…………….
हल्लीच्या (म्हणजे कोरोनापूर्व काळात) तरूण मंडळींना कशालाही वेळ नसतो. सगळ्यात वार्इट म्हणजे बिचा–यांना धड पूर्ण झोपही घेता येत नाही. त्यांची काळाबरोबर चाललेली स्पर्धा पाहतांना आपण हतबुद्ध होतो. अधेमधे टपकणार्या वृत्तपत्रात एक बातमी अशी होती की कोरोनामुळे जास्त वेळ एकत्र राहिल्याने कित्येक लोकांनी मॅरेज कौन्सलरकडे लॉकडाऊननंतर ताबडतोब अपॉईन्टमेंटस् मागितल्या आहेत आणि त्याही घटस्फोट घेण्यासाठी !
मला वाटे, कोरोनामुळे अष्टौप्रहर एकमेकांजवळ राहायला मिळाल्यामुळे किती आनंदात असतील ही जोडपी. एकमेकांची अंतरंग पुन: नव्यानं जाणून घेत असतील. कुठलं काय !
माणसं (पुरूष किंवा बाया) ऑफिसमधल्या सहका–यांशी जुळवून घेतात. बॉसशी तर जुळवून घ्यायलाच लागतं, घरी सासू – सास–यांशी जुळवून – जमवून घेतात; नोकर – मंडळींशी जुळवून घ्यायलाच लागतं, मग किराणेवाले, भाजीवाले, फळवाले या सर्वांशी जमवून घेतात. फक्त जुळवून घ्यायला येत नाही ते नव–याला बायकोशी आणि बायकोला नव–याशी !
नवरा – बायकोचं नातं इतर गौण नात्यांशी मी एकाच तराजूत तोलत नाही. माणुसकी आणि इतर मानवांबद्दल आदर ही कोणत्याही नाते संबंधातली दोन प्रमुख मूलतत्त्वं आहेत अस मला वाटतं. माणसा – माणसांमधले नातेसंबंध तुटू नयेत असंही वाटतं; ते तुटतात हेही माहीत झालंय.
तरीसुद्धा आपल्याच भूतकाळात साद घालून आपली अंतरंग तपासावीत, कोरोनाच्या सावलीत घरात एकत्र बसून ती एकमेकांकडे खुली करावीत, किती भाग अजून जुळतात ते पाहावं आणि हातात हात घालून पुढे जाण्याचा विचार करावा. चुकलं माकलं माफ करावं. हे सगळं अत्यंत अवघड आहे. पण एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? कोरोनाच्या कृपेने अत्यंत मौल्यवान वेळ तुमच्या हातात आहे; तो तुमच्या अंतरात पोचेल का ? कोरोनाला ‘खूप खूप धन्यवाद’ असं म्हणता येर्इल का ?
मीना चंदावरकर या बालशिक्षणतज्ज्ञ असून, पुण्यातील अभिनव विद्यालय (इंग्रजी माध्यम) व न्यू इंडिया स्कूलमार्फत त्यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ४० वर्षे विविध उपक्रम चालवले आहेत.
COMMENTS