ज्ञानाची लढाई अटीतटीची आणि मध्यवर्ती – प्रा. बगाडे

ज्ञानाची लढाई अटीतटीची आणि मध्यवर्ती – प्रा. बगाडे

महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष राहिलेल्या डॉ. विश्राम रामजी घोले यांच्यावर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी लिहिलेल्या ‘सत्यशोधक डॉ. विश्राम रामजी घोले : विचार आणि कर्तृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात महात्मा फुले वाड्यात झाले. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. उमेश बगाडे यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्यास जेष्ठ स्त्रीवादी अभ्यासक डॉ. विद्युत भागवत, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समीक्षक रणधीर शिंदे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. उमेश बगाडे यांनी केलेले भाषण.

यंदाही मोदी सरकारकडून आंबेडकर पुरस्कारांची घोषणा नाही
बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा

विद्युत भागवत यांनी आत्ता बोलताना ’प्रतिमाच्या बोलण्यात धार कुठून येते?’ हा जो मुद्दा उपस्थित केला आहे, तो महत्वाचा आहे. ही धार आपण स्विकारलेल्या- आत्मसात केलेल्या तत्वज्ञानातून येत असते. आणि लेखिकेने स्विकारलेली अब्राह्मणी अन्वेषण पद्धती हे त्याचे मुख्य कारण आहे. आणि म्हणूनच घोलेंचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी तिला डॉ. बाबा आढावांकडून दिली गेली, त्याचं मुख्य कारण तिच्याकडे असलेली ही अन्वेषण पद्धती आहे. ती तिने कष्टाने मिळवली आहे. कॉ. शरद पाटील यांची पुस्तके कठीण आहेत, दुर्बोध आहेत म्हणून अनेकजण न वाचता केवळ त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. ती पुस्तके वाचणं, ती समजून घेणं आणि त्या अनुषंगाने सत्यशोधक वारसा आपल्यात भिनवणं व एका विशिष्ट पातळीवर संशोधकी पिंड घडवणं या गोष्टी प्रतिमा परदेशींनी केलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पानापानावर त्यांनी केलेले कष्ट दिसत आहेत. वेगवेगळी वर्तमानपत्रे ज्ञानप्रकाश, केसरी, ज्ञानोदय या वर्तमानपत्रातल्या नोंदी, सरकारी दप्तरे म्हणजेच अभिलेखागारातल्या नोंदी, वेगवेगळे ग्रंथ चरित्रे यांचा आधार घेऊन हे ’सत्यशोधक डॉ. विश्राम रामजी घोले’ चरित्र तयार झाले आहे. ’संशोधक’ म्हणून ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी त्यांनी या ग्रंथात साकार केलेल्या आहेत. एक महत्त्वाच्या महापुरूषाचे दर्शन त्यांनी घडवले आहे. डॉ. घोलेंची माहिती, कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक मुद्दा आहेच. दुसरे म्हणजे कोणत्याही ग्रंथाचे किंवा संशोधनाचे अजून एक सुत्र म्हणजे निदानात्मक पातळीवर विवेचन करणे हे असते. इतिहासातील कालपटाचा त्यातील एका महापुरूषाचा समकालीन संदर्भ उकलणं याला म्हणतात डायग्नॉस्टीक डिजाइन! या ग्रंथाचं डायग्नॉस्टीक डिजाइन काय आहे असं मला विचारल्यास मी तुमच्यासमोर एकदोन प्रश्न उपस्थित करेन. दिल्लीत आजमितीला लाखो शेतकरी आपले म्हणणे मांडण्यासाठी बसले आहेत. इतके दिवस ऊन, वारा, पाऊस, थंडी सर्व प्रकारची जाखीम पत्करून ते ठाण मांडून बसले आहेत. भारतात शेतकरी बहुसंख्याक असताना शेतकर्‍यांचं बहुमत का होत नाही व भांडवलदार अल्पसंख्याक असताना त्यांचे बहुमत कसे काय होते? ५० टक्के स्त्रिया असतानाही त्या बहुमत सिद्ध करू शकत नाही. असं का घडतं? स्त्रिया आणि शुद्रातिशुद्र बहुसंख्य असतानाही त्यांचे बहुमत होऊ शकत नाही. अल्पमतात असलेल्या मूठभर उच्चजातीयांचे – ब्राह्मणांचे बहुमत कसे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ग्रंथात सापडतील.

ज्ञान, संस्कृती, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रांपैकी केवळ ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रावर नजर फिरवली तरी ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रात अल्पमत हे बहुमत कसे होते? अशी खंत हे चरित्रलेखन प्रसिद्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणारे अजीत घोले जे आज आपल्यात नाहीत त्यांनी व्यक्त केली होती ती महत्वाची गोष्ट आहे. विश्राम रामजी घोलेंचा याआधी प्रकाशित झालेला डॉ. अरूणा ढेरे लिखित ग्रंथ त्यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देत नाही. आणि तो का न्याय देत नाही यासंबंधातील खुलासे प्रतिमा परदेशींच्या या ग्रंथात येतात. त्या खुलाशांवरून तुमच्या लक्षात येईल की ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रात अल्पमत बहुमत करण्याचा नेमका प्रकार काय असतो आणि योजना काय असते. ज्ञानव्यवहारात किती कष्ट करावे लागतात आणि असे कष्ट करणारे लोक किती मर्यादित आहेत, त्यांची प्रभावक्षमता किती मर्यादित ठेवली जाते हेच यातून स्पष्ट होते. प्राच्चविद्यापंडीत कॉ. शरद पाटलांसारखा महापंडीत आमच्या एकूणच ज्ञानविश्वात चर्चिलादेखील जात नाही इतपत हे दुर्लक्ष आहे. तीस वर्षांपूर्वी फुले आंबेडकर विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नव्हते. आणि त्यामुळे अल्पमत हेच बहुमत होते. यासंबंधातील पहिली महत्वाची गोष्ट  या ग्रंथात हाताळली गेली आहे ती म्हणजे ’ज्ञानव्यवहाराचं राजकारण’.

विश्राम रामजी घोले यांच्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे अरूणा ढेरे यांना उपलब्ध असतानाही इतिहासकार, अभ्यासक यांनी विशिष्ट भूमिकेतून, तटस्थ भूमिकेतून चरित्र लेखन करण्याच्या अपेक्षेला ढेरेंनी तडा दिला आहे. त्यामुळे त्यांनी लिहलेले चरित्र ज्ञानव्यवहारात अनेक गफलती करताना दिसतं. त्यातल्या काही गफलती प्रतिमाताईंनी या ग्रंथात सांगितल्या आहेत. चरित्रनायक जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळी चरित्रनायकाच्या संदर्भातील कार्याचे एक विशिष्ट पातळीवरून विधान गरजेचं असते. उदा. महात्मा फुलेंच्या विचाराचं सार मृत्यूच्या वेळी येणे गरजेचं असतं. मात्र ढेरेबाईंनी त्या वर्णनातील कथनतंत्र तुमच्या-माझ्यावर, वाचकांवर लादलं आहे. तुम्ही विचार करत नाही. तुम्हाला सांगितलं जातं- निबंध लिहा ’माझी गाय! ’ तुम्ही सर्वांनी एक आकृतीबंध घेतला आहे, त्याच्या साच्यात तुम्ही निबंध लिहिता. असाच निबंध का लिहायचा हा प्रश्न तुम्ही-आम्ही कधीच विचारला नाही. त्याचाच उपयोग ढेरेंनी या मृत्युच्या कथनतंत्रात केलेला आहे. तो फार इंटरेस्टींग आहे. त्या लिहितात, अनेक मान्यवर आले. ’अनेक अतिसामान्य आले. लोकमान्य टिळक त्यांच्यामध्ये सामील झाले आणि स्मशानामध्ये त्यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले’. शब्दांची रचना बघा. ज्ञानव्यवहाराच्या एकंदरीत राजकारणाचीच कल्पना तुम्हाला येईल. शब्दांचा ठेहराव पहा. अतिसामान्य आणि मान्यवर यांच्यात टिळक सामील झाले. म्हणजे मान्यवर आणि अतिसामान्य यांच्या पलिकडचे टिळक आहेत. इतिहासाची शिस्त म्हणून ढेरेबाईंनी टिळकांचे पुर्ण भाषण देणे गरजेचे होते मात्र त्यांनी त्यांच्या पुस्तकात ते दिले नाही. मात्र त्यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले, की त्यांचे बोलणे औपचारिक नव्हते. एका उदार मानवतावादी, सार्वजनिक जीवनातल्या उग्र विद्वेषावर, वैरभावनेवर आणि विघटनापोटी जन्मलेल्या कडवटपणावर मात करीत कसा जगतो आणि त्याच्या सह्रदय विधायक भुमिकेने सार्वजनिक जीवनात करूणेचे झरे कसे फुटत असतात याचा अनुभव २५ वर्षे त्यांनी स्वतः घेतला होता. चरित्रनायक आहेत विश्राम रामजी घोले. विश्राम रामजींच्या चरित्रलेखनात त्यांचे एक महत्त्वाचे कर्तेपण, त्यांचे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून काम करणे आणि सत्यशोधक विचारांची धुरा वाहून आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी कष्ट करणे या विश्राम रामजींच्या सत्यशोधक वारशाविषयी ढेरेबाईंनी नकारात्मक नोंदी केलेल्या आढळतात.

सार्वजनिक जीवनातल्या उग्र विद्वेषावर- यात उल्लेख कोणाचा आहे? तो जोतीराव फुल्यांबद्दल आहे, हे आपण सर्वजण जाणतो. तत्कालीन कालखंडातील लोकहितवादींचे वाड़मय वाचल्यास समजते की एक कुणबी माणूस साधा कारकून जरी झाला तरी त्या काळात प्रशासनात बहुल असलेल्या ब्राह्मणांना राग यायचा आणि ते संतापून जात. तत्कालीन कालखंडातील सर्व बहुजनांना ब्राह्मणी वर्चस्वाचा जबरदस्त फटका बसला होता. या संदर्भात घोलेंनी मानवी हक्काचा उठाव केला. महात्मा फुलेंच्या समतेच्या, मानवी अधिकारांच्या तत्वज्ञानाच्या भुमिकेतून घोलेंचे बंड उभे राहिले. मात्र ढेरेबाईंनी ते बंड उग्र विद्वेषावर आधारित असून विश्राम रामजी कसे सत्यशोधक समाजापासून दुर होते असे सांगून सत्यशोधक वारसा खोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे व २५ वर्षे ते टिळकांसोबत राहिले म्हणून विश्राम रामजींचा गुणगौरव केला आहे.

आपण जर बारकाईने पाहिले तर त्या असे म्हणतात, की  ‘म्हणून त्यांचे बोलणे प्रत्ययाचे होते. परस्पर संवादाचा अर्थ समजलेली अशी माणसे महाराष्ट्राच्या जनजीवनात टिळकांना अत्यंत गरजेची होती आणि त्यांच्या जीवनकाळात त्यांना ती मिळणारी नव्हती, हे सत्य मात्र त्यांनी उच्चारले नव्हते. पण ते सत्य त्यांना पुर्णपणे समजले होते.’ मला हे सांगा – इतिहासाचा तटस्थ अभ्यासक म्हणून या प्रकारची टिपण्णी वाचक म्हणून आपण जेव्हा महापुरूषाच्या मृत्यूचे वर्णन ऐकून व्याकुळ होतो, सद्गदित होतो त्याचवेळी लेखिकेने का करावी? सर्वजण एका विशिष्ट पातळीवर सद्गदित होतात. अनेक चरित्रांमध्ये जेव्हा मृत्युचे वर्णन येते तेव्हा लोकांचा खरोखर कंठ दाटून आला आहे. इथे त्यांनी जे कथनतंत्र वापरले आहे  हे कथनतंत्र कसे आहे? अरूणा ढेरेंनी विश्राम रामजी घोलेंचे चरित्र सांगताना त्यात विश्राम रामजी घोलेंचे नव्हे ब्राह्मण कर्तेपणाचं विश्व उभे केलं, म्हणजे विश्राम रामजी घोले यांचे स्वतःचे कार्यकर्तृत्व काय होते याचे कथन करण्याऐवजी ते प्रामुख्याने ब्राह्मणी कर्तेपणाचे विश्व या चौकटीत सांगितलं जातं. प्रतिमा परदेशींनी या संदर्भातले अनेक प्रयत्न सांगितले आहेत. यापूर्वी कोणीकोणी प्रयत्न केले आहेत आणि हे जे प्रयत्न केले आहेत त्यात दिग्गज लोकं आहेत. सार्वजनिक सत्यधर्मीय असलेल्या विश्राम रामजी घोलेंचं वर्णन हे स्वजातीसाठी काम करणारे असे विपरित करण्यात आलेले आहे.

प्रतिमा परदेशींनी ज्या महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे आणि हा ज्ञानव्यवहारात नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये अत्यंत ईर्ष्येने लढण्याचा मुद्दा आहे. ज्या स्त्रिया, कामगार, आदिवासी, शुद्रअतिशुद्रांचे बहुमत असले पाहिजे, ते बहुमत ज्ञानविश्वात सिद्ध करणे, ज्ञानाची लढाई अटीतटीची लढाई आहे. ज्ञानाची लढाई मध्यवर्ती लढाई आहे. त्या चौकटीत या लेखिकेने आपल्या सर्वांना उतरवले आहे. ज्ञानाच्या लढाईत आपले बहुमत नाही ही जी भुमिका आहे, त्यासाठी सर्वात महत्त्वाचे सुत्र आहे – सत्य! जो सत्याचा विचार फुलेंनी दिला तो बहुमतात रूपांतरीत करणे गरजेचे आहे. महात्मा फुलेंनी सत्याला सार्वजनिक म्हंटले आहे. हे जे सार्वजनिक सत्य आहे त्यालाच मध्यवर्ती करणे आणि त्याचंच बहुमत सिद्ध करणे हा ज्ञानव्यवहारातला एक महत्त्वाचा पाया आहे. या अनुषंगाने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डायग्नोस्टीक, निदानात्मक चौकटीतूनच पाहिली पाहिजे हा आग्रह. विश्राम रामजी घोले यांनी सत्यशोधक समाज का सोडला? चरित्र लेखिकेने यासंबंधात काही महत्त्वाचे खुलासे केलेले आहेत. त्यातील एक खुलासा प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी आहे. विश्राम रामजी घोलेंची चिकित्सक वृत्ती येथे रेखाटली आहे. चरित्रकार हा निस्पृहपणे चरित्रनायकाचे दोष सांगणारा असला पाहिजे. त्यासंदर्भात प्रतिमा परदेशींनी केलेले विश्लेषण फार महत्त्वाचे आहे. एकोणिसाव्या शतकात मलबारींनी प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित केले- बालविवाहाचा आणि विधवाविवाहाचा. या दोन प्रश्नांमधील विश्राम रामजी घोलेंचे चिंतन फार इंटरेस्टींग आहे. त्यातील तपशील यापूर्वी कुठेही आलेले नाहीत. ते पहिल्यांदा या ग्रंथातून आपल्यासमोर आलेले आहेत. यापूर्वी कोणीही ते मांडलेले नाहीत जे लेखिकेने स्वतः मांडले आहेत. विश्राम रामजी घोलेंनी सत्यशोधक समाज सोडला. त्याच्यामागे असलेले राजकारण या ग्रंथात आलेलं आहे. पण त्या सोडण्याचा संबंध कशाशी आहे याचं सुत्र त्या ग्रंथात आलेलं आहे. राष्ट्र म्हणून एक विशिष्ट प्रकारचा डिस्कोर्स प्रभावित करतो आहे. महात्मा फुलेंच्या कालखंडात एक राष्ट्रवादाचं चर्चाविश्व प्रबळपणे पुढे आलेलं आहे. महात्मा फुलेंनी ज्याला जात्यांतक किंवा अब्राह्मणी राष्ट्रवाद म्हणतो त्याची मांडणी केली. पण तरीदेखील एक महत्त्वपूर्ण स्थित्यंतर विश्राम रामजी घोलेंच्या चरित्रात घडत आहे. त्याचं सुत्र तुम्हाला या स्त्रीविषयक चिंतनात मिळेल. त्यांचा एक विचार टिळकांच्या विचारधारेला शिरोधार्य मानणारा आहे. विश्राम रामजी घोले हे सत्यशोधक होते, जातिविद्रोहाचे ते प्रतिक होते. संपुर्ण आयुष्य त्यांनी शुद्रअतिशुद्रांच्या उत्थानासाठी खर्च केलं आहे. पण काही प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका कास्ट पॅट्रीआर्कल चौकटीतील आहे. ब्रिटिश सरकारने आमच्या घरात, आमच्या धर्मात हस्तक्षेप करू नये ही भूमिका त्या काळात वर्चस्वशाली होती. राष्ट्रवादाचं तुणतुणं जे टिळकांनी उभं केलं ते प्रामुख्याने आमच्या घरामध्ये आणि आमच्या धर्मात परक्याचा हस्तक्षेप करू नये. तुम्हाला यातील तर्क लक्षात येऊ शकतो. तत्कालीन कालखंडात जातीच्या चौकटीत जगणार्‍या माणसाला अपील होणारी ही परिभाषा आहे. ही परिभाषा काय आहे – कुटुंब, घर हे पवित्र आहे. त्या घरातल्या – स्त्रीप्रश्नासंबंधी परपुरूषाने हस्तक्षेप करता कामा नये. आणि ब्रिटीशांचा हस्तक्षेप आमच्या घरगुती परिघातला हस्तक्षेप आहे. आमच्या धर्मातला हस्तक्षेप आहे. आणि त्यामुळे विश्राम रामजी यांनी ही जी परिभाषा आपल्या म्हणण्यात मांडली त्याची पार्श्वभुमी, ती मते, ही रचना, योजना यासंबंधात चरित्रलेखिकेने अनेक गोष्टी पुढे आणल्या आहेत. विश्राम रामजी घोले सत्यशोधक समाजापासून ते दुर व्हावेत यासाठीची एक योजना पुण्यात काम करत होती. आणि त्या योजनेच्या चौकटीत तत्कालीन कालखंडातील अत्यंत प्रतिभावंत आणि जनोपयोगी, सर्वांना आदरणीय होईल असे कर्तृत्व असणारे विश्राम रामजी घोले अडकल्यासारखे वाटतात. त्यामुळे सत्यशोधक उठाव, विद्रोह जो आहे त्याला नामोहरम करायचे असेल तर त्याचा अध्यक्षच आपण उडवला पाहिजे असं राजकारण चाललेलं होते. जेव्हा एखाद्या समाजाचा अभ्यास केला जातो, मांडणी केली जाते, तेव्हा फुले आणि घोले यांच्या मतभेदाकडे लक्ष दिले जाते. पण या मतभेदाच्या मागे एक योजना- स्कीम चालू आहे. तत्कालीन कालखंडातील सर्व सत्यशोधक अत्यंत प्रज्ञावंत होते. बुद्धीवान तरूण होते. त्यांना ब्राह्मण वर्चस्व आणि ब्राह्मण शोषणाचा जो अनुभव येत होता तो अनुभव त्यांना उग्र जात्यांताच्या बाजूने उभा करत होता. शुद्रअतिशुद्रांची एक मोठी फळी फुलेंच्या कालखंडात उदयाला आलेली दिसते. त्या फळीचे आव्हान परतवून लावायचे असेल तर प्रामुख्याने संस्कृतीचा, प्रभुत्वाचा जो आयाम आहे तो पुढे आणला पाहिजे. असा विचार तेव्हापासून चालू आहे. जातीच्या पायावर सत्यशोधक समाज पुढे नेण्याचा तेव्हापासून एक प्रयत्न सुरू आहे, त्यात जातीसंस्थेबरोबर एक विशिष्ट प्रकारचा तह काही सत्यशोधक करतात. सत्यशोधकांचा व्यवहार आणि तत्त्व यात एक विसंगती आहे. त्या विसंगतीवर लेखिकेने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. जर आपल्याला खरोखरच जातीअंताचे राजकारण करायचं असेल तर जातपितृसत्तेच्या चौकटीत विचार करण्याची मर्यादा जी जातीआधारित चळवळींमुळे निर्माण होते, त्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. जर ती चौकट असेल तर समतावाद्यांचे मत हे बहुमत होणारच नाही. तुम्ही तत्कालीन कालखंडातील एका अल्पमताचाच भार वाहणार आणि हे कर्तेपण निम्नजातीयांजवळ ब्राह्मणवादाने उभे केलेलं आहे. ब्राह्मणवादाला स्वीकारून अशा कर्तेपणाच्या रचना संपुर्ण महाराष्ट्रात आणि भारतात काम करत आहेत हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हा मुद्दा उपस्थित करता येईल की जर यासंबंधातील मूलगामी परिवर्तनाचे, समतेचे राजकारण आपल्याला करायचं असेल तर स्पष्ट स्वरूपात जातिव्यवस्थेचं शासनशोषण आणि पितृसत्तेचं शासनशोषण याच्या परिभाषेतच बोलावं लागेल.

या ग्रंथातील एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतीचा प्रश्न. फुले मांडत असलेल्या एका मुद्द्याकडे विश्राम रामजी घोले दुर्लक्ष करतात आणि फुल्यांचाच दुसरा मुद्दा मात्र ते प्रबळ करतात. भारतातील शेतकर्‍यांचं जे दुःख, दारिद्र्य, हालअपेष्टा आहेत त्या प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान न स्विकारल्यामुळे आहेत हे शंभर टक्के खरं आहे. पारंपारिक पद्धतीच्या शेतीव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य नव्हते आणि आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीच्या चौकटीत उत्पादनवाढ करायची असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विकसित तंत्रज्ञान आणि विज्ञान स्विकारले पाहिजे. त्यामुळे या दोन गोष्टींचा आग्रह ते धरतात. अनेक लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही त्यांची लुट थांबली नाही. त्यामुळे फुलेंनी शेतकर्‍यांच्या शोषणामागे जातिव्यवस्था आहे हा जो आकृतिबंध दिलेला आहे. जातीच्या विषमतेमुळे हे शोषण होत आहे. जेव्हा शेतकरी तत्कालीन कालखंडातील सावकाराकडे किंवा सध्याच्या काळात या धनिकांकडे जातो तेव्हा तो याचक असतो. तेव्हा तो अधीन असतो, या अवलंबित असलेल्या शेतकर्‍यांचं शोषण करणं सोपं जातं. प्रामुख्याने शेतकर्‍यांना अवलंबित ठेवून शोषण केलं जातं आणि ज्ञानाच्या पसार्‍यामध्ये शेतकरी कायमच अज्ञ, फुलेंच्या भाषेत अविद्येने ग्रस्त असतो. दुसर्‍या बाजुला अवलंबित रहाणं, तो धर्मभोळा, व्यवहारभोळा राहिल याची दक्षता घेऊन त्याचे शोषण केले जाते. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या मुलगामी विचाराचे प्रतिबिंब विश्राम रामजी घोलेंच्या या शेती विचारात पुरेसे उमटत नाही. फुलेवादाच्या इतिहासात फुलेंचे अनेक अनुयायी शेतीशोषणावर खुपच मुलगामी पद्धतीने चिंतन करत असतात. मुकुंदराव पाटील, पाळेकर, भालेकर किंवा अन्य सत्यशोधकांची शेतीच्या प्रश्नासंबंधी शासनशोषणावरील मुलगामी मीमांसा ही सतत विकसित झालेली आढळते. फुलेवादाचा महत्त्वाचा वारसा म्हणजे शोषणतंत्र उलगडून सांगणे. हे शोषणतंत्र उलगडून सांगण्याऐवजी विकासाच्या चौकटीत शेतीप्रश्नाची मांडणी विश्राम रामजी घोले करीत. या त्यांच्या मर्यादेवर प्रतिमा परदेशी यांनी बोट ठेवले आहे. सरतेशेवटी सत्यशोधक तत्वज्ञान होते, सत्यशोधक कर्तेपण निभावणारे अनेक अपरिचित लोक- हरी रावजी चिपळूणकर, गंगाराम म्हस्के, धामणस्कर अशा अनेक बिनीच्या कार्यकर्त्यांची माहिती, त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय, त्यांचे समालोचन या ग्रंथात वाचायला मिळेल हे या पुस्तकाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे मी नोंदवत आहे.

सत्य की जय हो!

प्रा. डॉ. उमेश बगाडे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख आहेत.

(छायाचित्रात डावी कडून प्रा प्रतिमा परदेशी, डॉ पी टी गायकवाड, डॉ विद्युत भागवत, डॉ रणधीर शिंदे, डॉ उमेश बागडे आणि दत्ता काळबेरे)

सत्यशोधक डॉ विश्राम रामजी घोले 
म जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे व सृजन प्रकाशन , मुंबई
किंमत 200 रु फक्त
पुस्तक मिळण्याचे ठिकाण – सत्यशोधक कार्यालय, ७५४ कसबा पेठ, पुणे ११ 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0