फिलिपिन्समध्ये दंडेलशाहीची राजवट सत्तेवर

फिलिपिन्समध्ये दंडेलशाहीची राजवट सत्तेवर

मे महिन्यात फिलिपिन्समध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या दरम्यान बाँगबाँग मार्कोसने साम- दाम-दंड भेद याचा वापर करत ही निवडणूक जिंकली.

हिंदुत्ववादी हुकूमशाहीच्या मर्यादा
‘भारतात लोकशाही नव्हे, अधिकारशाही’
आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे

इंटरनॅशनल कोलिएशन फॉर हुमन राइट्स फिलिपिन्स(ICHRP), इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर मिशन (IOM) आणि आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क यांच्या माध्यमातून फिलिपिन्समध्ये मे महिन्यात झालेल्या निवडणुकांसाठी निरीक्षक (ऑब्झर्व्हर) म्हणून सहभाग झाले होते. या सगळ्या निरीक्षणाच्या अंतिम अहवाल २८ जून २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे.

इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर मिशन (IOM) ची स्थापना फिलिपिन्समधील मानवाधिकार उल्लंघनाच्या संदर्भात काम करणारी  स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून झाली आहे. आयओएमसोबत १ एप्रिलपासून फिलिपिन्समध्ये ११ देशांतील ६० हून अधिक कार्यकर्त्यांनी निरीक्षक म्हणून आपले योगदान दिले. या निरीक्षकांनी फिलिपिन्समधील सेंट्रल लुझोन, नॅशनल कॅपिटल रिजन, सदर्न टागालोग यासह विविध भागात प्रचार, मतदान आणि निवडणुकांनंतरच्या परिणामांचे बारकाईने निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले आहे. यासोबतच आयओएमच्या निरीक्षकांमध्ये दक्षिणी लुझोन, मध्य व्हिसाया, वेस्टर्न व्हिसाया, ईस्टर्न विसायस आणि मिंडानाओ येथे आयओएमचे राष्ट्रीय संसदेचे सदस्य, वकील, ट्रेड युनियनिस्ट, चर्चमधील लोक, तरुण आणि विद्यार्थी, शिक्षक, वैज्ञानिक आणि मानवाधिकार वकिलांचा समावेश होता. हे काम करत असतांना वेळी अवेळी आयओएम निरीक्षकांना पोलिस आणि लष्कराकडून त्रास आणि रेड-टॅगिंग (रेड टॅगिंग म्हणजे दहशतवादी किंवा आतंकवादी, देशद्रोही) करण्यात आले. यातील काही कार्यकर्ते अजूनही पोलिस आणि लष्कराच्या ताब्यात आहेत

मे महिन्यात फिलिपिन्समध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या दरम्यान बाँगबाँग मार्कोसने साम- दाम-दंड भेद याचा वापर करत ही निवडणूक जिंकली. निवडणुकीच्या पूर्वी आणि प्रचारादरम्यान बाँगबाँग मार्कोसच्या विरोधात फिलिपिनो लोकांनी, तेथील सामाजिक संस्था, मानवी हक्क कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसाराचे काम केले. या निरीक्षकांनी निवडणुकामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन यासंदर्भातील घडलेल्या अनेक बाबीचे दस्तावेजीकरण केले आहे. यात प्रामुख्याने मत खरेदी करणे, ईव्हीएम मशीनमधील घोटाळे, ईव्हीएमद्वारे मत मोजणी बंद पडणे, मतदान केंद्रावर होणारे गोंधळ, अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम फेल होणे. कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाकडून धमक्या देणे, लोकांवर बेकायदा बळाचा वापर करणे अशा बाबी नोंदवल्या आहेत. बीबी मार्कोसच्या (बीबीएम) प्रचारासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच वापर करून खोटी, फसवी माहिती पसरविण्याचे काम केले गेले.

बीबीएमचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्याची जीवनशैली अमेरिकी आहे. त्याचे व्यक्तिमत्व बेफिकीर, चैनी आणि विलासी पद्धतीचे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्याला राजकारण, समाजकारण देशाचे अर्थशास्त्र आणि राज्यकारभार यातलं काहीच कळत नाही. त्याच्या वडिलांच्या काळात जी लोक सल्लागार होती पुढे तेच त्याचे सल्लागार झाले. तेथील नोकरशाही म्हणेल त्याप्रमाणे ऐकून निर्णय घेणार म्हणजेच तेथील नोकरशाही स्थानिक जनतेवर राज्यकर्ते म्हणून काम करत आहेत. बीबीएमच मुख्य आधार फिलिपिन्समधील पोलिस आणि लष्करी सैन्य आहेत. गेल्या पाचसहा वर्षात बीबीएमने लष्कराचे बजेट मोठ्या प्रमाणात वाढवले आहे.

बीबीएमने जनतेसमोर  भाषणं केली नाहीत, जाहीरनामा मांडला नाही. बीबीएमने सोशल मीडिया प्रामुख्याने टिकटॉकचा वापर करत एकच आश्वासन दिलं, ‘फिलिपिन्स पुन्हा बलशाली करेन’. फिलिपिन्समध्ये शेतीत मुख्य उत्पादन तांदूळाचे आहे. ‘भाताचा भाव आज आहे, त्याच्या अर्ध्यावर आणेन’. पण भाताचा भाव कमी करत आणणं किंवा कमी करणे याविषयी कोणतेही धोरण त्याच्याकडे नाही. स्थानिक जनता त्याला याबद्दल प्रश्न विचारू शकत नाही कारण बीबीएम कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत, विचारवंत किंवा पत्रकारांना भेटत नाहीत. प्रचारासाठी त्यांची मार्केटिंगची टीम आहे. ही टीम बीबीएमच्या प्रचाराचे काम करते.  प्रचार टीमचा भर घोषणांवर होता. मुख्य घोषणा एकच होती ‘पुन्हा एकदा फिलिपिन्सचा विकास.’

इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर मिशन, इंटरनॅशनल कोलिशन फॉर ह्युमन राइट्स, फिलिपिन्सने (ICHRP) ९ मे २०२२ रोजी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात गोंधळ, घोटाळे झाल्याची नोंद केली आहे. अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएममशीन अर्ध्याहून अधिक वेळा बंद असल्याची माहिती स्थानिक जनता देते. ज्यांनी मशीन बंद का आहे हा प्रश्न विचारला त्या लोकांना कॉम्युलेटने (निवडणूक अधिकारी / मतदान केंद्र प्रमुख) चुपचाप बसण्याचे सांगितले अन्यथा मतदानाच्या कामात अडथळा आणण्याचा आरोप लावून पोलिस किंवा लष्कराच्या ताब्यात देईल अशी धमकी नागरिकांना दिली गेली. अनेक नागरिकांची नावे मतदान यादीतून गायब झाली आहेत. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कॉम्युलेटकडे निवडणुकांच्या सहा-सहा महिने आधीच नावे नोंदवली होती. त्यांच्या नावाची मतदान यादीत नोंद झाली आहे हे कॉम्युलेट त्यांना कम्प्युटर स्क्रीनवर दाखवले पण मतदानाच्या दिवशी त्यांची नावे यादीत नव्हती. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.    नागरिकांना नाईलाजाने कॉम्युलेटचे ऐकावे लागले. कारण जर कॉम्युलेट ऐकले नाही तर आपल्याला ‘रेड टॅगिंग’ केले जाईल.

या दंडेलशाहीमुळे आणि परिस्थितीमुळे ही निवडणूक “मुक्त आणि निष्पक्ष”च्या मानकांची पूर्तता करत नाही. ही निवडणूक “मुक्त आणि निष्पक्ष” म्हणून घोषित केली जाऊ शकत नाही, कारण निवडणुकीत बीबीएमने साम-दाम-दंड भेद याचा पुरेपूर वापर केला आहे. स्थानिक जनता, गरीब जनता, कामगार वर्ग, स्त्रिया मोठ्या प्रमाणात जगण्या-मरण्याच्या प्रश्नाने त्रस्त आहेत. ह्या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात ‘Information, Misinformation, Disinformation आणि  Propaganda’ याचा विकृत पद्धतीने वापर केला गेला, म्हणून ही निवडणूक “मुक्त आणि निष्पक्ष” म्हणून घोषित केली जाऊ शकत नाही.

निरीक्षकांनी लोक मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत पण दुसरीकडे मतमोजणी सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मार्कोस-डुटेर्टे संघाला मोठा विजय मिळवून देणारा निकाल अनधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मार्कोस-डुटेर्टे युनिटीमने विद्यमान अध्यक्षांच्या अमानवी धोरणांची प्रशंसा केली हे लक्षात घेऊन फिलिपिन्समधील मानवी हक्काची परिस्थिती चिघळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनांनी लक्ष देण्याची गरज आहे.

बीबीएमच्या धोरणाला स्थानिक जनता त्रस्त झाली आहे. यासाठी फिलिपिन्समध्ये अनेक सामाजिक संस्था, संघटना एकत्र येत त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. ३० जून रोजी मार्कोसचा शपथविधी आहे.  शपथविधी पूर्वीच अनेक मानवी हक्क कार्यकर्त्यांनी, वकील, सामाजिक संस्था यांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. या संदर्भात २४ जून रोजी पहिली प्रेस कॉन्फ्ररन्स आयोजित केली गेली, २५ जून रोजी दुसरी आणि २८ जून रोजी तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आहे आहे. २५ जून रोजी एलजीबीटीक्यू समुदायाचा प्राइड मार्च फिलिपिन्समध्ये आयोजित केला होता त्यामध्येही पहिली मागणी, घोषणा ‘रिजेक्ट मार्कोस-डुटेर्टे’ ‘रिजेक्ट यूएस आर्मी’ अशा होत्या. शपथविधी पूर्वी मार्कोसच्या  बेबंदशाहीला विरोध करणार्‍या २५ हून अधिक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सामाजिक संस्थांच्या फेसबुक पेजला ब्लॉक केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फिलिपिन्सच्या मार्कोस घराण्यातील पुढल्या पिढीला यश मिळाले ते ठोस कार्यक्रमामुळे नव्हे, तर कथानकामुळे आणि दुसऱ्या प्रभावी राजकीय घराण्याशी संधानामुळे. जे लोकशाहीला घातक आहे ही बेबंदशाही रोखण्याचे आव्हान लोकशाहीसमोर आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0