’तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण

’तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण

शिवसेनेचे सैनिक ही शिंदेंची समावेशक ओळख आहे. वेगळेपण कोणते हे त्यांना लवकर शोधावे लागणार आहे. अन्यथा ‘बाळासाहेबांचा वारसा असणारी मूळ सेना असताना तुमच्याकडे आम्ही का यावे?’ या मतदारांच्या (दुर्दैवाने आता नागरिक हे केवळ मतदार म्हणूनच उरले आहेत) प्रश्नाला ठोस उत्तर देता येणे अवघड आहे. सध्या तरी ते केवळ बाळासाहेबांचा वारस म्हणून प्रस्थापित होण्याचा आटापिटा करत आहेत.

या वर्षी मे महिन्यामध्ये ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला. विषयाचा विचार करत त्यात हिंदुत्ववादी मंडळींनी त्याला अधिक उचलून धरले हे ओघाने आलेच. त्यांच्यासह इतरांनीही सध्या आलेल्या चरित्रपटांच्या लाटेतील एक चित्रपट इतकेच महत्त्व त्याला दिले. परंतु त्या चित्रपटाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हते किंवा राष्ट्रभक्ती वा धर्मभक्तीच्या प्रचारपटांच्या सध्याच्या प्रवाहाचा तो केवळ एक भागच होता असेही नाही. त्या पलिकडे त्या चित्रपटाला आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्या चित्रपटाचे निर्माते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाद्वारे त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा नारळ फोडला होता हे पुढे स्पष्ट झाले. एखाद्याचा वारसा सांगत आपली वाट सुकर करणे, बस्तान बसवणे याला मानवी इतिहासात खूप मोठी परंपरा आहे. माणूस निसर्गजीवी होता, टोळ्या करून राहात होता, तेव्हापासून याची सुरुवात झाली आहे.

माणूस टोळ्यांमध्ये राहात होता, तोवर भटका वा अस्थिर होता. या काळात जीवनावश्यक अशा नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वाटेकरी होऊ पाहणारी प्रतिस्पर्धी टोळी अथवा टोळ्या, आणि शिकार वा संकलन मार्गे अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरणारे हिंस्र प्राणी हे त्याचे शत्रू होते. त्यांच्याशी मुकाबला बाहुबळाने वा कौशल्यानेच होऊ शकत असे. यासाठी टोळीतील सर्वात बलवान पुरुषाकडे टोळीचे नेतृत्व ओघानेच येई. शारीरबल हे राजकीय सत्ता मिळवण्याचे एकमेव हत्यार होते.

या वास्तविक शत्रूंबरोबरच प्राकृतिक घटक (वणवा, पाऊस, पूर, वादळ वगैरे) हे ही त्याचे शत्रू होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची शक्ती त्याला अद्याप सापडलेली नव्हती. त्यामुळे तो निसर्गापुढे हतबल होता. त्याच्या प्राकृतिक भयाला त्याने देवत्वाचे रूप देऊन(१) त्यांच्यासमोर तो लीन झाला होता. या देवत्वाशी संवादाचे माध्यम म्हणून टोळ्यांमध्ये भगताची नेमणूक झालेली असे. हा भगत टोळीमध्ये नेत्यापाठोपाठ महत्त्वाचा असे. हा एका बाजूने प्राकृतिक देवांना कौल लावणे, टोळीच्या कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेणे वगैरे कार्ये करण्याबरोबरच टोळीतील सदस्यांच्या व्याधींउपचारांची जबाबदारीही घेत असे. थोडक्यात हा मांत्रिक आणि वैद्य यांचे मिश्रण असे. त्यामुळे टोळीप्रमुखापाठोपाठ त्याचे स्वत:चे असे विशेष स्थान असे. त्यामुळे त्यालाही अप्रत्यक्ष सत्तेची जाणीव होत गेली असेल.

पुढे माणसाने शेतीचा शोध लावला, ज्यातून त्याच्या मूलभूत गरजा एका ठिकाणी स्थिर राहूनही भागवणे शक्य झाले. आता टोळीची समाजाकडे वाटचाल सुरू झाली. निसर्गजीवी असण्याकडून नागरजीवी होताना घटलेल्या शारीरिक संघर्षांचे नि प्राकृतिक धोक्यांचे प्रमाण पाहता बाहुबलाचे निर्विवाद श्रेष्ठत्व डळमळू लागले. आपल्या अप्रत्यक्ष सत्तेला प्रत्यक्ष सत्तेमध्ये रूपांतरित करण्याची इच्छा भगताच्या मनात बळावली असेल. अशा वेळी बाहुबलींकडे असणारी राजकीय सत्ता आपल्याकडे कशी खेचून घेता येईल, निदान त्यातील वाटा मिळवता येईल याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला असेल. मग त्यातून आपल्या हाती असलेल्या एकाधिकारालाच सत्तेचे रूप देण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली असेल.

परंतु हे तितकेसे सोपे नव्हते. भगताला ‘स्वबळावर’ बाहुबलाशी थेट संघर्ष शक्य नव्हते. त्याच्याकडे असलेले देवता-संपर्काचे बळही त्याला अशा थेट संघर्षात उपयुक्त ठरणारे नव्हते. कारण तोवर देवता-संकल्पना ही जेमतेम प्रतीक म्हणूनच अस्तित्वात होती. आपल्या कार्यात अडथळा आणू नये म्हणून भगतामार्फत माणसांची टोळी देवाला काही देऊ करत असे नि त्याबदल्यात ते देव आपले कार्य सुकर करतील अशी आशा करत असत. उलट दिशेने त्या देवतांकडून मानवाशी कोणताही संपर्क (?) केला जात नसे. देवाचा अनुग्रह झाला की कोप झाला याचे मूल्यमापन माणसानेच वास्तवाकडे पाहून करायचे असे. शिवाय देवतांमधील प्रत्येकाचे एक कार्यक्षेत्र निश्चित असे, ते सर्वशक्तिमान, सर्वव्यापी नव्हते. त्यामुळे त्यांच्या मुखी आपले बोल बोलवावे नि त्या आधारे सत्ता मिळवावी हे शक्य होत नव्हते. आणि म्हणून वास्तविक बलाची कमतरता असलेल्या भगतासारख्या सत्ताकांक्षी मंडळींनी मानवी-देव संकल्पना जन्माला घातली असेल.

देव मानवी झाले नि त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. केवळ विशिष्ट प्राकृतिक घटक वा घटना यांच्यापुरती त्यांची सत्ता नव्हती. एका टोळीवर अधिराज्य गाजवणार्‍या टोळीप्रमुखाप्रमाणेच ते मानवांचे पारलौकिक जगातील नेते होते. ते सर्वसत्ताधारी, सर्वव्यापी बनू लागले नि त्यामुळे विविध टोळींचे, गटांचे – पुढे धर्मांचे – देव परस्परांशी स्पर्धा नि संघर्ष करू लागले हे ओघाने आलेच. त्यापूर्वीच्या अग्नि, वायु वगैरे प्राकृतिक देवांमध्ये आपसांत संघर्ष होण्याचे कोणतेही कारण नव्हते, कारण (एकतर ती प्रतीकेच होती आणि) त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती. पण देवता संकल्पनेला मानवी, सर्वव्यापी बनवल्यामुळे देवता-संघर्षांची ठिणगी पडली. पुढे संघटित धर्मांच्या स्वरूपात या देवांच्या फौजा तयार झाल्या, नि केवळ वर्चस्वाच्या लढाया नव्हे तर युद्धेच सुरू झाली.

देवता मानवी झाल्यामुळे आणखी एक महत्त्वाची सोय झाली आणि ती म्हणजे आता देव-मानव संपर्क स्थापित झाला. दोन माणसे परस्परांशी संवाद साधतात तसेच हे मानवी देव मानवाशी बोलू (?) लागले. परंतु हे देव सर्वसामान्यांशी अर्थातच बोलणार नव्हते. मानवाशी आपल्या संवादाचे माध्यम म्हणून – आपले ‘प्रेषित’ म्हणून –  भगताचीच निवड करावी हे ओघाने आलेच. थोडक्यात सांगायचे तर या मानवी देवतांची संकल्पना रुजवतानाच या भगतांनी, प्रेषितांनी त्यांच्या खांद्यावर बसून सत्तेच्या रिंगणात प्रवेश केला.

महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर एकनाथ शिंदेही आनंद दिघे यांची धर्मवीर म्हणून प्रतिमा रुजवत असतानाच ‘ते देव, मी त्यांचा वारस, प्रेषित’ हा दावाही रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करत असताना ते बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे या प्रस्थापित देव-प्रेषित जोडगोळीला नवा पर्याय देऊ पाहात आहेत.

टोळी ते नागर आयुष्य या संक्रमणानंतर टोळीच्या सामूहिक मालकीची साधनसंपत्ती ही साहजिक स्थिती हळूहळू मागे पडत वैयक्तिक मालकीच्या संकल्पनेचा उदय झाला. टोळीप्रमुख निवडला जात असे, राजसत्ता आता वारसाने मिळू लागली. भगतही शक्यतो आपला मुलगाच आपल्यानंतरचा भगत होईल अशी तजवीज करत असे. त्यामुळे प्रेषिताची अघोषित राजकीय सत्ताही वारशाने पुढे जावी असा प्रयत्न प्रेषिताने नि त्याच्या वारसांनी केला. त्याला विरोध करणार्‍यांना देवाचा आदेशाचा हवाला देऊन धर्मभ्रष्ट जाहीर केले गेले असेल (मुस्लिमांमध्ये शिया-सुन्नी भेद निर्माण झाले, ते प्रेषिताचे वारस कोण यावरूनच.) प्रत्यक्ष अथवा जैविक वारस आवश्यक तितका सबल नसेल, तर निदान त्याच्या एकनिष्ठ गटाकडे वारसा जावा असा पर्यायही समोर ठेवला गेला असेल. (ब्रिटनच्या राजगादीवर राजघराण्यातील कुणी कुठल्या क्रमाने बसावे याची काटेकोर प्राधान्ययादी असते.) त्यातून प्रेषिताचा, पुरोहितवर्गाचा एक गटच तयार झाला असेल. (भारतातील ब्राह्मण हा असा एक गट). आपणच निर्माण केलेल्या पारलौकिकाच्या, वंशसातत्याच्या भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊन धार्मिक वा राजकीय सत्ता आपल्या वारसाकडे, निदान आपल्या गटाकडे राहावी हा आटापिटा स्वयंघोषित प्रेषित-वारसांकडून सुरू झाला.

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणामध्येही घराणेशाहीचा बोलबाला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरु यांची कन्या इंदिरा गांधी, त्यांचे पुत्र आणि आता नातू हेच त्यांचे काँग्रेसमधील वारसदार ठरले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत फारुक अब्दुल्ला, प्रकाशसिंग बादल, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, एम. करुणानिधी, या आणि अशा अनेक मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार वा खासदार यांनी आपल्या राजकीय भूमीचा वारसा आपापल्या मुलांकडे सोपवलेला आहे. यात सद्यस्थितीत अधिक चर्चेत असलेले शिवसेना-अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मिरवत आहेत.

पण ही वारसा उतरंड सामान्य जनता नेहमीच निमूटपणे मान्य करते असे नाही. आपल्याहून कमी कुवतीचा राजकुमार वा भगतपुत्र वारस ठरतो आहे हे पाहून भगताच्या एखाद्या शिष्याला वा राजाच्या एखाद्या पराक्रमी सरदाराला वैषम्य वाटत असेल. (यात त्याच्या स्वत:च्या कुवतीबद्दलचा फाजिल आत्मविश्वासही असू शकेल.) त्यातले काही बंड करून सत्ता हस्तगत करण्याचा वा पर्यायी सत्ता स्थापण्याचा प्रयत्न करत असतील. पुढे या वैषम्य-बंडांतून नवी राज्ये जशी निर्माण झाली, तसेच एकाहून अधिक धर्मही. सर्वस्वी नवा धर्म, नवा पंथ किंवा नवे राज्य स्थापण्यासाठी निव्वळ वैयक्तिक कुवतीपलिकडे बरेच काही अधिक आवश्यक असे. भगताकडून मिळालेले ज्ञान वा अंगभूत शौर्य त्यासाठी पुरेसे नसे. मुख्य म्हणजे हे करत असताना जुन्या सत्ताधार्‍यांशी संघर्ष अटळ असे.

त्या संघर्षादरम्यान जुना पंथ/टोळी, जुने राज्य यातील बहुसंख्या ही बदलाला अनुत्सुक असे. आणि म्हणून मूळ धारेशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अधिक असे. अशा वेळी आपण नवे राज्य, नवा पंथ/धर्म स्थापन करत नसून मूळ धर्मालाच शुद्ध स्वरूपात समोर आणत आहोत किंवा मूळ राजाच्या/भगताच्या या नालायक वारसाने राज्याचा वा धर्माचा होणारा अध:पात टाळण्यासाठी उभे आहोत अशी बतावणी करणे अपरिहार्य असे. यातून जुने निष्ठावान काही प्रमाणात आपल्याकडे वळवणे किंवा निदान जुन्या वारसांशी होणार्‍या आपल्या संघर्षात तटस्थ राहतील याची खातरजमा करून घेता येत असे. इस्लाममध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये अनेक पंथ आपण लोकांना मूळ धर्मधारेकडे नेत आहोत असे उद्घोष करत उभे राहिले ते यामुळेच.

स्वातंत्र्यपूर्व कालात काँग्रेस सर्व जाती-धर्मांच्या, विचारधारांच्या व्यक्तींसाठी एक सामायिक मंच म्हणून काम करत होती. स्वातंत्र्योत्तर कालातील काँग्रेसी नव्या पिढीने ‘स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या काँग्रेसींचे आम्हीच वारस आहोत.’ असा उद्घोष करत सत्ता बळकावली आणि भोगली असे म्हणता येईल. आपले हे वारस असणे जनमानसात ठसवण्यासाठी त्यांनी जुन्या काँग्रेसच्या गांधी आणि नेहरु या दोन दिग्गजांच्या नावाचा घोष चालू ठेवला. आपण त्यांचेच वारस आहोत अशी मखलाशी ते करत राहिले. याचाच परिणाम म्हणजे काँग्रेसमधून फुटून निघालेल्या बहुतेक गटांनी, पक्षांनी आपल्या नावामध्ये काँग्रेस हे नाव कायम ठेवले होते.

स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसमध्ये हिंदुत्ववाद्यांपासून, समाजवादी, डावे इतकेच नव्हे तर काही सरंजामदारांचे समर्थकही होते. स्वातंत्र्योत्तर कालातही काँग्रेस अस्तित्वात राहिली, तर आपापल्या विचारधारेच्या आधारे राजकारण करताना तिचा सर्वात मोठा अडथळा आपल्याला असेल असे यातील अनेकांना वाटत होते. त्यामुळे यातील अनेकांनी ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचे कार्य संपुष्टात येईल नि तिला विसर्जित करावे’ अशी गांधीजींची इच्छा असल्याचे प्रतिपादित करायला सुरुवात केली. तरीही स्वतंत्र भारतामध्ये दीर्घकाळ काँग्रेस हाच प्रमुख राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात राहिला. आणि तिच्या विरोधकांनी ‘या काँग्रेसमधील नेते हे स्वातंत्र्यपूर्वकालातील मूळ काँग्रेसचे वारस नाहीत. त्यांना मागे सारून सत्तालोलुपांनी त्यांची जागा बळकावली आहे’, असा सूर अनेक विरोधकांनीच नव्हे तर पूर्व-काँग्रेसींनीही लावला होता. साहित्य, नाटक, चित्रपटादि कथनात्म कलांमध्ये तो उमटतही राहिला.

काँग्रेसचाच कित्ता गिरवत भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने कुण्या मागच्या थोर नेत्यांचा अथवा राजकीय पक्षाचा वारसा सांगतच आपले पहिले पाऊल टाकले आहे. रामजन्मभूमी यात्रेमुळे प्रस्थापित नेतृत्व असलेल्या अडवाणींचा चेला म्हणून मोदींनी आपले बस्तान बसवले. पण अडवाणींचा दावा असलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेतल्यानंतर त्यांना अडवाणींची गरज उरली नाही. मग देशभरात स्वत:चे नेतृत्व अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी पटेलांच्या खांद्यावर बसणे पसंत केले. दुसरीकडे गुजरात कनेक्शनचा फायदा घेत गांधींनाही मिरवणे चालू ठेवले. आज मोदींचा वारसा सांगणारे फडणवीसांसारखे महाराष्ट्र-मोदी उभे राहू लागले आहेत. या सार्‍यांच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांनीही आनंद दिघेंचा वारसा मिरवण्यास सुरुवात केली आहे.

पण ज्यांच्या जागी ते आनंद दिघेंना बसवू पाहात आहेत त्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे -त्यांच्या नवीन गटासह- तीन गट आज अस्तित्वात आहेत. इतकेच नव्हे तर काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बस्तान बसलेले राणे, भुजबळ यांच्यासारखे नेते अजूनही आपण बाळासाहेबांचे सैनिक असल्याचे ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आपण त्या देवाचे प्रेषित, वारस अशी मखलाशी करत असतानाच उलट दिशेने बाळासाहेबांची शिवसेना वारशाने मिळालेल्या उद्धव ठाकरेंनी ‘बाळासाहेबांचा मार्ग सोडला’ असल्याचा गवगवा करत शिंदे-गट, मनसे यांच्या जोडीला भाजपही उद्धव यांचा तो आधार खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत असतात.

महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेल्या शरद पवारांनी असा देव निवडलेला नाही. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातील त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारस म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो प्रयत्न फार लवकर सोडून दिला. त्यानंतर ते बव्हंशी स्वयंभू म्हणूनच राहिले. परंतु कदाचित त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या विस्तारावर मर्यादा पडल्या. त्याला नेतृत्वासाठी अर्वाचीन, संस्थानिक नेत्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली. कदाचित त्यामुळेच मोजक्याच जिल्ह्यांत, प्रामुख्याने अर्थकारणात प्राबल्य असलेल्या एकाच जातीचा पक्ष अशीच या पक्षाची इमेज तयार झाली आहे.

धार्मिक परंपरांमध्ये मुख्य देवांच्या सोबतीला निम्नदेवता असतात. त्यांना डेमि-गॉड म्हटले जाते. राजकारणामध्ये याच धर्तीवर गांधी, नेहरु, पटेल, बाळासाहेब ठाकरे, उत्तरेत मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, पूर्वेला ममता बॅनर्जी यांच्यासारखे ’सेमि-गॉड’ किंवा श्रद्धेय नेते असतात. त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर त्यांतून फुटून बाहेर पडलेल्या गटांतील राजकारणीही त्यांचा राजकीय वारस म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा आटापिटा करत असतात. या श्रद्धेय नेत्यांच्या यादीत आनंद दिघे या नावाची भर घालण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत.

प्राचीन काळापासून प्रत्येक देवाबरोबरच त्याच्या कर्तृत्व झळाळी देण्यासाठी सहाणेसारखा, धार लावण्याच्या दगडासारखा त्याचा एक शत्रू, असा एक सैतान असावा लागतो. बायबलमधला सेटन, बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा मार किंवा त्याच्या विचारांशी संघर्ष करणारा देवदत्त, आणि जवळजवळ प्रत्येक हिंदू देवाने पराभूत केलेला त्याचा त्याचा (अनेकदा असुर वा राक्षस म्हटला गेलेला) शत्रू हा त्याचा सैतान असतो. भारतीय राजकारणामध्ये जुन्या काँग्रेसला अशी निवड करावीच लागली नव्हती तिचा जन्मच त्यांच्या विरोधात प्रतिकारासाठी झाला होता ते ब्रिटिश शासन तिला अनायासे सैतान म्हणून मिळाले होते. सेनेला, भाजपला वा इतर स्थानिक पक्षांना आपले देव निवडावे लागले तसेच सैतानही. म्हणून मग भाजपने हिंदुत्ववादाची घोषणा करत काँग्रेस आणि नेहरु यांना राजकीय सैतान, तर मुस्लिमांना सामाजिक-सैतान म्हणून निवडले. सेनेने ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत दाक्षिणात्यांना लक्ष केले, राज ठाकरे वेगळे झाल्यावर त्यांनी मराठीवाद आणून अमराठींना- विशेषत: उत्तर भारतीयांना सैतानाची शिंगे चिकटवून दिली.

पण केवळ देव नि सैतान निर्माण करणे पुरेसे नसते. त्या देवाची काही एक शिकवणही निर्माण करावी लागते. ‘देवाचा शब्द’ अशी बतावणी करत प्रेषितच ही शिकवण निर्माण करतो नि रुजवत असतो. राजकारणातील आदर्श वा श्रद्धेय पूर्वसुरी ही माणसेच असल्याने ही शिकवणही अनायासे मिळते. बाळासाहेबांनी प्रथम मराठीवाद नंतर हिंदुत्ववाद स्वीकारून महाराष्ट्रात तोवर नसलेला राजकीय विचार पुढे आणला (संघाचा हिंदुवाद असला तरी हिंदुत्ववाद ही राजकीय विचारसरणी प्रथम सेनेच्या रमेश प्रभू यांनी निवडणुकीच्या राजकारणात आणली.) तीच घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत अशी बतावणी त्यांचा वारसा सांगणारे तीनही गट करत आहेत. याउलट शरद पवार जरी महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाचा राजकीय नेता म्हणून ते प्रस्थापित झाले असले तरी त्यांना स्वत:चा असा वेगळा राजकीय दृष्टीकोन रुजवता आलेला नाही. राष्ट्रवादी ही कायमच एक ‘काँग्रेस’ राहिली आहे. त्यामुळे त्यांना सदोदित काँग्रेसशी जुळवून घेतच राजकारण करावे लागले आहे.

जे पवारांचे झाले तेच राज ठाकरे यांचे आधीच झाले आहे, उद्धव ठाकरेंना पदच्युत करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचेही होणार आहे. पर्यायी सेना उभी करण्याच्या प्रयत्नात मूळ सेनेचा तोंडवळा नि दृष्टीकोन सोडला नाही, तर त्यांचे असे स्वत:चे स्थान निर्माण होणे अवघड आहे. त्यामुळेच सोपा पर्याय म्हणून ते सेनेचाच वारसा आपल्याकडे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात प्रत्येक माणूस समावेशक (inclusive) आणि वेगळेपण (exclusive) अशा दोन्ही अस्मितांचा आधार घेत असतो. राजकारणातही तसेच असावे लागते. शिवसेनेचे सैनिक ही शिंदेंची समावेशक ओळख आहे. वेगळेपण कोणते हे त्यांना लवकर शोधावे लागणार आहे. अन्यथा ‘बाळासाहेबांचा वारसा असणारी मूळ सेना असताना तुमच्याकडे आम्ही का यावे?’ या मतदारांच्या (दुर्दैवाने आता नागरिक हे केवळ मतदार म्हणूनच उरले आहेत) प्रश्नाला ठोस उत्तर देता येणे अवघड आहे. सध्या तरी ते केवळ बाळासाहेबांचा वारस म्हणून प्रस्थापित होण्याचा आटापिटा करत आहेत.

पण त्यांच्या निर्णयप्रक्रियेबाबत एक महत्त्वाचे वेगळेपण दिसते. उद्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आपल्या गटाला मान्यता मिळवण्याचा, स्वत:ला बाळासाहेबांचा नवा वारस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न फसलाच, तर प्लॅन-बी म्हणून त्यांच्यापुरता नवा सेमि-गॉड निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. प्रत्यक्ष बंडापूर्वीच त्यांनी ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे आनंद दिघे यांना नवा हिंदुहृदयसम्राट, नवा सेनापती म्हणून मिरवणे सुरू केले. त्यांच्या राजकीय बंडाच्या काळात आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावरही आपण आनंद दिघेंचे वारस असल्याचे ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करत आहेत. त्यासाठी केवळ ठाणे पट्ट्यातच ज्यांची ओळख होती, त्या दिघेंना त्यांना महाराष्ट्रभर न्यावे लागणार आहे. जुन्या काळात भगताला जसा स्वत:ची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आधी स्वनिर्मित देवाला प्रस्थापित करावे लागले, तसेच या नव्या प्रेषिताला आधी आपला नवा देव प्रस्थापित करावा लागणार आहे. त्यासाठी स्वत:बरोबरच त्यांच्या देवाची सत्ताही वाढवत न्यावी लागणार आहे. या प्रयत्नात त्यांनाही एका सैतानाची गरज पडणार आहे, उद्धव ठाकरेंच्या रूपाने त्यांना तो उपलब्ध आहे. परंतु निर्णायकरित्या जुन्या सेनेशी फारकत घेऊन नव्या सेनेचे हिंदुहृदयसम्राटच म्हणूनच नव्हे तर स्वयंभू धर्मवीर म्हणून आनंद दिघेंची आणि त्यांचे प्रेषित वा राजकीय वारस म्हणून शिंदेंची वर्णी लागण्यापूर्वी बर्‍याच प्रासंगिक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळवावी लागणार आहे.


(१) भारतातील अग्नि, वायु, सूर्य वगैरे वैदिक देव हे प्रामुख्याने प्राकृतिक होते, तसेच ग्रीक देवांच्या टायटन्स या पहिल्या पिढीतील देवही. त्यांच्याकडेही युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. त्यांची अपत्ये विविध प्राकृतिक घटकांचे देव अशी रचना होती.

(२) येशू ख्रिस्ताच्या समकालीन असे सुमारे अडीचशे प्रेषित जेरुसलेमच्या परिसरात देवाकडून मिळालेली शिकवण सामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्थानाच्या खटपटीत होते असा ‘सायमन सीबग मॉंटफिअरी’च्या ‘जेरुसलेम’मध्ये उल्लेख आहे.

COMMENTS