परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीयांना तात्काळ खार्किव्ह सोडण्यास सांगितले

परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीयांना तात्काळ खार्किव्ह सोडण्यास सांगितले

कीव्ह/ नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले, की पहिली सूचना जारी केल्यापासून सुमारे १७ हजार भारतीयांनी युद्धग्रस्त युक्रेनची सीमा सोडली आहे. मंत्रालयाने सांगितले, की रशियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आपल्या सर्व नागरिकांना खार्किव्ह सोडण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना सांगितले, “परिस्थिती कठीण आहे पण आम्ही प्रत्येक भारतीयाला देशात परत आणू.”

ते म्हणाले की, आम्ही सर्व भारतीयांना खार्किव्ह सोडून ताबडतोब सुरक्षित स्थळी किंवा पश्चिमेकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, की रशियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आपल्या सर्व नागरिकांना खार्किव्ह सोडण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की युक्रेनमध्ये नैसर्गिक कारणाने मरण पावलेले भारतीय नागरिक चंदन जिंदाल हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते. जिंदाल यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

याच्या एक दिवस आधी युक्रेनमध्ये गोळीबारामुळे नवीन या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी विद्यार्थ्यांसह तेथील सर्व नागरिकांना त्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन खार्किव्ह ताबडतोब सोडण्यास सांगितले असून, पेसोचिन, बाबाये आणि बेझल्युडोव्हका या ठिकाणी पोहोचण्यास सांगितले आहे.

भारतीय दूतावासाने ट्विट केले की, ‘कोणत्याही परिस्थितीत भारतीयांनी आज युक्रेनच्या वेळेनुसार संध्याकाळी ६ (१८.००) पर्यंत या ठिकाणी पोहोचले पाहिजे.’

दूतावासाने पुढे सांगितले की ज्यांना तेथून निघण्यासाठी कोणतेही वाहन किंवा बस मिळालेली नाही आणि जे रेल्वे स्टेशनवर होते, त्यांनी पेसोचिन (११ किमी), बाबाये (१२ किमी) आणि बेझल्युडोव्हका (१६ किमी) येथे पायी पोहोचावे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत हंगेरी, रोमानिया, पोलंड आणि स्लोव्हाकिया येथून भारतीयांना युक्रेनमधून ग्राउंड बॉर्डर चौक्यांमधून बाहेर काढल्यानंतर हवाई मार्गाने मायदेशी आणले जात आहे.

त्याचवेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितले की, पहिली सूचना ( अॅडव्हायझरी ) जारी झाल्यापासून सुमारे १७ हजार भारतीयांनी युद्धग्रस्त युक्रेनची सीमा सोडली आहे.

त्यांनी सांगितले, की युक्रेनमधून भारतीयांना देशात परत आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत, गेल्या २४ तासात सहा विमाने भारतात पोहोचली आहेत आणि आतापर्यंत एकूण १५ उड्डाणे आली आहेत.

प्रवक्त्याने सांगितले, की पुढील २४ तासांत आणखी १५ उड्डाणे नियोजित आहेत, त्यापैकी काही मार्गावर आहेत. त्यांनी सांगितले, की भारतीय हवाई दलाचे विमान बुधवारी रात्री भारतात पोहोचेल.

बागची म्हणाले, की भारताकडून युक्रेनला मानवतावादी मदत देखील पाठवली जात आहे, ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, तंबू, ब्लँकेट, सौर उपकरणे इत्यादींचा समावेश आहे.

यामध्ये २ टन वैद्यकीय मदत असलेली पहिली खेप काल रवाना करण्यात आली असून आणखी तीन खेपा पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खार्किव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची रशिया चौकशी करणार

युक्रेनच्या खार्किव्ह शहरात २१ वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची रशिया चौकशी करणार आहे. रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी ही माहिती दिली.

खार्किव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये चौथ्या वर्षात शिकणारा नवीन शेखरप्पा ग्यानगौदार हा मंगळवारी खार्किव्हमध्ये झालेल्या रशियन गोळीबारात ठार झाला होतं.

या घटनेनंतर, भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राजदूतांना खार्किव्ह आणि इतर संघर्ष क्षेत्रांमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी तात्काळ सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

अलीपोव्ह यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, “मला नवीन शेखरप्पा ग्यानगौदार यांच्या कुटुंबाप्रती आणि संपूर्ण भारतीय राष्ट्राप्रती संवेदना व्यक्त करायच्या आहेत. तीव्र संघर्षाच्या भागात भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी रशिया शक्य ते सर्व प्रयत्न करेल… आणि या दुर्दैवी घटनेची योग्य चौकशी करेल.”

COMMENTS