भारत-पाक संबंध आणि मानवी किंमत

भारत-पाक संबंध आणि मानवी किंमत

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात झालेले बदल माझ्यासारख्या संशोधकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण या मागे माझे दशकभराचे संशोधन आहे. शिवाय

तुरुंगातील कैद्यांना ५० हजार कर्ज मिळणार
कोविड महासाथ ओसरूनही मनरेगाची मागणी कायम
भारत-इस्रायल संरक्षण कराराच्या चौकशीसाठी याचिका

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात झालेले बदल माझ्यासारख्या संशोधकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण या मागे माझे दशकभराचे संशोधन आहे. शिवाय २०१९-२०मध्ये अमृतसर, दुबई, उरी, पुँछ येथील सुमारे ५०० हून अधिक व्यापार्यांशी माझा झालेला संवाद आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचा सीमेवरून चालणारा व्यापार स्थगित झाला आणि त्याचे परिणाम या सीमांवर राहणार्या शेकडो कुटुंबियांच्या जगण्यावर झाला.

१६ फेब्रुवारी २०१९मध्ये एक बातमी आली. दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे ट्विट होते. या ट्विटमध्ये त्यांनी पुलवामा घटनेमुळे पाकिस्तानला देऊ केलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारत मागे घेत असून पाकिस्तानातून भारताकडे येणार्या सर्व मालावरची कस्टम ड्युटी २०० टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे म्हटले होते.

त्यानंतर भारत व पाकिस्तानातील प्रसार माध्यमे उभय देशांमधील व्यापार कसा नगण्य होता, त्यामुळे दोघांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, असे म्हणू लागली.

२०१८-१९च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात त्यांच्या एकूण निर्यातीच्या २ टक्के व आयात ३ टक्के होती. तर भारताची पाकिस्तानला होणारी आयात त्यांच्या एकूण आयातीच्या ०.६३ टक्के व निर्यात ०.१० टक्के होती.

व्यापार धोरणावर जे काही अर्थतज्ज्ञ बोलत असतात त्यांनीही पुलवामा घटनेनंतर बदललेल्या भारत-पाक व्यापार धोरणावर फारसे भाष्य केले नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारावर भाष्य करताना मोठ्या बाबींचा विचार केला जातो. सूक्ष्म पातळीवर व्यापार धोरणांचा कसा परिणाम होत असतो, याची दखल घेतली जात नसते.

पण प्रत्यक्षात कोणत्याही दोन देशांमधील व्यापारावर हजारो कुटुंबांचा चरितार्थ चालत असतो. त्यातल्या त्यात सीमेरेषेवरचा व्यापार हा संबंधित भौगोलिक प्रदेशात राहणार्या हजारोंसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.

एक उत्सुकता व संशोधन म्हणून मी अमृतसरला जायचे ठरवले व भारत-पाक व्यापार स्थगित झाल्याने त्याचे परिणाम सीमेवरच्या कुटुंबांवर कसे झाले याची माहिती मला संकलित करायची होती.

पुलवामा प्रकरणानंतर भारत-पाकमधील व्यापार स्थगित झाला. मला अशी अनेक मुले दिसली की वडिलांचा व्यापार थांबल्याने त्यांना खासगी शाळा सोडाव्या लागल्या होत्या. मी सीमेवरील अटारी ट्रक युनियनच्या एका ट्रक व्यापार्याला भेटले. २०१०मध्ये वाघा-अटारी व्यापार सुरू झाल्याने हा ट्रक व्यापारी हाँग काँगमधील आपला व्यवसाय गुंडाळून येथे आला आणि त्याने ३० ट्रक विकत घेतले होते. त्याला मोठे नुकसान सोसावे लागले.

नंतर एका कुटुंबातील तीन मुलं व त्यांच्या वडिलांना भेटले होते. हे चौघे ट्रकमध्ये माल चढवणे व उतरवण्याचे काम करत होते. या हमालीवर त्यांचे कुटुंब गुजराण करत होते. या सर्वांना व्यापार स्थगित झाल्याची झळ बसली. या कुटुंबातील एक शिक्षित युवक होता, त्याला ग्रंथी म्हणून गुरुद्वारा साहिबमध्ये रोजचे दोन तासांचे काम मिळाले.

नंतर अमृतसरमधील माजिथ मंडी येथे खारकाचा व्यवसाय करणार्या आयातदाराशी भेट झाली. याच व्यवसायावर त्यांची गुजराण होती. भारताची खारकांची ९९ टक्के आयात पाकिस्तानातून होते. भारतातले ५०० व्यापारी पाकिस्तानातून खारका आयात करतात आणि या व्यापार्यांच्यावर सुमारे एक हजार महिला कुटुंबांची जबाबदारी आहे. या महिला खारका फोडण्याचे काम करत असतात. त्या सर्वांचा रोजगार खारकांवर एकदम ३०० टक्के कस्टम ड्युटी वाढवल्याने धोक्यात आला.

पण एका व्यक्तीच्या मुलाखतीनंतर तर मी अस्वस्थ झाले. ती व्यक्ती सेंट्रल वेअर हाउसिंग कॉर्पोरेशन वे ब्रिजची कर्मचारी होती. तो म्हणाला, पुलवामा घटनेनंतर चार दिवसांनी १८ फेब्रुवारी २०१९मध्ये माझे लग्न झाले आणि व्यापार बंद झाला. व्यापार बंद झाल्याने माझ्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याचे कारण दाखवत मुलीच्या कुटुंबियांनी लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्याकडे आता धड नोकरी आहे ना कुटुंब.

अमृतसरच्या या दौर्यानंतर मला तेथील परिस्थिती लक्षात आली आणि या घटनांचे दस्ताऐवजीकरण करावे यासाठी कोविडच्या काळातही मित्र व कुटुंबियांचा विरोध पत्करून मी दुबई ते ऊरी-पुँछ असा अनेक वेळा दौरा केला. अमृतसरला अनेक वेळा गेले, अनेकांशी चर्चा केल्या. वाघा-अटारी सीमेवरील द्विपक्षीय व्यापाराचे तेथील कुटुंबियांवर होणारे परिणाम यांचा जवळून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.

ऊरीमध्ये एका मजुराला भेटले. भारत-पाकिस्तान व्यापार चांगल्या पातळीवर होता तेव्हा तो महिन्याला १२ हजार रु. कमवत होता. त्याला एक बहीण होती. पण ती मधुमेहाने ग्रस्त झाली होती. आता व्यापार बंद झाल्यानंतर त्याला बहिणीच्या औषधांचा खर्च पेलवेत नाही. २५ रुपयांच्या गोळ्याही खरेदी करणे अशक्यप्राय झाल्याचे त्याचे म्हणणे होते.

वाघा-अटारी सीमेवरचा व्यापार स्थगित झाल्याने त्याची झळ व्यापारीच नव्हे तर कस्टम हाउस एजंट, पेट्रोल पंप, टायर पंक्चरची दुकाने, मेकॅनिक, धाबा चालक, ट्रक ड्रायव्हर, पोर्टर, हेल्पर अशा अनेक समाज घटकांना बसली आहे.

पंजाब व जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरल्याने माझा असा अंदाज आहे की, अमृतसरमधील ५० हजार व ऊरी-पुँछमधील सुमारे २५ हजार नागरिकांना अटारी-वाघा सीमेवरचा व्यापार बंद पडल्याचा फटका बसला आहे.

या लेखात मला सर्व तपशील लिहिता येणार नाही. पण पुलवामा घटनेनंतर मला तीन महत्त्वाचे धडे शिकता आले.

पहिला, अर्थशास्त्र संशोधक व्यापारासंबंधित केवळ आकड्यांवर चर्चा व अनुमान मांडत असतात पण मला अशा व्यापाराच्या आड असलेले मानवी जीवन समजून घेता आले.

दुसरा धडा, माझ्या अभ्यासदौर्यामुळे मला सीमेवरचा चालणारा व्यापार व त्यामध्ये असलेले अंतर्प्रवाह पाहता आले, ज्यांची दखल घेतली जात नाही, अशा अनेक बाबी पाहता आल्या.

तिसरा धडा, व्यापार सुरू करणे वा बंद करणे एवढ्यापुरतं अर्थकारण मर्यादित नसतं.

भारत-पाकिस्तानने व्यापार बंद केल्याने त्याची झळ दोन्ही बाजूच्या व्यापार्यांना, त्यावर अवलंबून असणार्या शेकडो कुटुंबांना बसलेली आहे. जे व्यापारी आशावादी आहे त्यांना जगण्याचा संघर्ष राजकारणापेक्षा अधिक आव्हानात्मक वाटत असेल.

निकिता सिंगला या ब्युरो ऑफ रिसर्च ऑन इंडस्ट्री अँड इकॉनॉमिक फंडामेंटल (ब्रिफ), नवी दिल्ली या संस्थेत असोसिएट डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी भारत-पाकिस्तान व्यापारावर Unilateral Decisions Bilateral Losses”, “Dubai Angled Triangle”, “Bridging the Divide” असे तीन रिपोर्ट लिहिले आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0